Leading International Marathi News Daily

बुधवार, १ जुलै २००९


नाशिक शहरातील रिक्षाचालकांकडून नियमांचे सर्रास उल्लंघन होत असल्याची बाब खुद्द रिक्षा चालक संघटनांनाही मान्य आहे. ओमसाई रिक्षा चालक संघटनेने रविवार कारंजा चौकात, ‘नेमून दिलेल्या जागेवरूनच चालकांनी प्रवासी भरावेत’, अशा आशयाचा सूचनाफलक लावला आहे.

मीटरविना प्रवासी वाहतूक करणाऱ्या १८ रिक्षाचालकांवर कारवाई
प्रतिनिधी / नाशिक

शहरातील बेशिस्त रिक्षा वाहतुकीस शिस्त लावण्याच्या अध्यायात आता आणखी एक नवीन पाऊल उचलण्यात आले असून प्रादेशिक परिवहन विभाग आणि वाहतूक पोलीस यांनी मंगळवारपासून संयुक्तपणे रिक्षा मीटर तपासणी मोहीम हाती घेतली आहे. या अंतर्गत पहिल्या दिवशी मीटरविना प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या १८ रिक्षाचालकांवर ‘मेमो’ बजावण्यात आले आहेत.

अस्वस्थ शिवसैनिकांसाठी मनसेचे ‘रेड कार्पेट’
प्रतिनिधी / नाशिक

लोकसभा निवडणुकीत नाशिक मतदारसंघात झालेला दारूण पराभव आणि त्याची योग्य ती कारणमीमांसा करण्याऐवजी पक्ष संघटना भलत्याच दिशेने भरकटू लागल्याने अस्वस्थ झालेल्या शिवसेनेतील वरिष्ठ पदाधिकारी अन् शिवसैनिकांप्रती मनसेने ‘सॉफ्टकॉर्नर’ ठेवला असून कोणत्याही अटी व शर्ती न टाकता आपल्या पक्षात दाखल होऊ इच्छिणाऱ्यांचे स्वागत करण्याचे ठरवले आहे.

सोन्याचे अंडे देणारी कोंबडी राखायची असेल; तर..
अभिजीत कुलकर्णी

सातपूर औद्योगिक वसाहतीचे रुपांतर स्वतंत्र औद्योगिक नगरीमध्ये करण्याच्या प्रस्तावाला महापालिका पदाधिकाऱ्यांकडून होणारा एकमुखी विरोध सोन्याचे अंडे देणारी कोंबडी हातची जाणार या भावनेतूनच होत असल्याची प्रतिक्रिया उद्योजकीय वर्तुळात उमटत आहे. औद्योगिक वसाहतीत रस्ते, पथदीप, सांडपाणी व्यवस्था या सारख्या पायाभूत सुविधा पुरवण्याच्या मुद्दय़ांवरून वर्षांनुवर्षे टोलवाटोलवी करणाऱ्या पालिकेला सातपूर औद्योगिक वसाहतीबाबत एकाएकी आलेला प्रेमाचा उमाळा हा येथून मिळणाऱ्या घसघशीत कर उत्पन्नावर पाणी सोडावे लागण्याच्या भितीपोटीच आल्याचे स्पष्ट आहे.

कालिदासदिनाचे कार्यक्रम ठरले केवळ एक उरकणे
महाकवी कालिदास यांनी रघुवंशम, कुमार संभवम, ॠतुसहारंग, मेघदूत, विक्रर्मोवर्शिय, आदिज्ञान, शांकुतल, मालदिविकादी विक्रम यासारखी खंड काव्ये लिहिली. या महान कवीचा ‘दिन’ दिमाखदार पध्दतीने होणे गरजेचे असताना सर्वाच्या लेखी केवळ एक ‘आटोपणे’ म्हणूनच त्याकडे पाहिले जाते. नाशिकमध्ये साजरा झालेला यंदाचा कालिदास दिनही त्यास अपवाद ठरला नाही. महाकवी कालिदास दिनानिमित्त शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

नाशिक येथील महाराष्ट्र समाज सेवा संघ संचलित रचना माध्यमिक विद्यालयाचा दहावी परीक्षेचा निकाल ९७ टक्के लागला. शाळेतील पहिल्या पाचमध्ये अमोल बाकसे (९४.७६), अपूर्वा क्षीरसागर (९४.३०), अजेय माहुलीकर (९४.१५), गौरव कांकरिया (९३.६९) आणि विनय नांदुर्डीकर (९३.६९) यांचा समावेश आहे. विभागीय परीक्षा मंडळातर्फे दिला जाणारा दि. ना. कापसे स्मृती पारितोषिकाचा बाकसे हा मानकरी ठरला. या विद्यार्थ्यांसोबत मुख्याध्यापिका मंगला धाडणकर, निरंजन ओक, संस्थेचे सचिव सुधाकर साळी, अध्यक्ष चंद्रकांत धामणे, सहसचिव शांताराम अहिरे, उपमुख्याध्यापक बी. जी. उबाळे, पर्यवेक्षक युवराज निकुंभ आदी.

ठेवीदारांनी उपस्थित केला प्रश्न
फैज, झुलेलाल पतसंस्थांची निवडणूक घेण्याविषयी साशंकता
नाशिक / प्रतिनिधी
नाशिक विभागात एकूण१२७ पतसंस्था डबघाईस आल्या असून अनेक पतसंस्थांवर प्रशासक कार्यरत आहेत. अशी स्थिती असताना नाशिक व नाशिकरोड येथील फैज व झुलेलाल पतसंस्थांची निवडणूक घेण्याचा निर्णय जिल्हा आणि विभागीय सहकार अधिकारी घेत असून हा निर्णय कर्जवसुली व ठेवी वाटपाच्या दृष्टीने कितपत न्याय्य आहे, असा प्रश्न ठेवीदारांनी उपस्थित केला आहे. या दोन्ही पतसंस्था विशिष्ट समाजाच्या असल्याने निवडणुकीत त्या त्या समाजाचे संचालक निवडून येणे स्वाभाविकच आहे. अशा संचालकांवर संस्था डबघाईस आणणाऱ्या माजी पदाधिकारी व संचालक मंडळाचा दबाव, प्रभाव राहणार असेल तर निवडणुकीचा निर्णय उचित ठरेल का? तसेच डबघाईस आणणाऱ्या माजी संचालकांवरील कायदेशीर सुरू असलेली कारवाई करण्यात शिथीलता येऊन कर्जवसुलीत अडथळे येण्याची शक्यता नाकारता येणार नाही. विशेष म्हणजे गैरप्रकारांमुळे या पतसंस्थांची विश्वासार्हता निर्माण होईल की नाही, याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. नवीन ठेवी मिळून पतसंस्थांचे व्यवहार सुरळीत व सुरक्षित कितपत होतील, अशी चर्चा सभासद करीत आहेत. या निवडणुका घेण्याच्या निर्णयामागे माजी संचालकांचा अर्थपूर्ण प्रभाव असल्याची कुजबूज सहकार कार्यालयात सुरू आहे.

मुख्याध्यापिका एम. जी. कांबळे यांचा सेवापूर्तीनिमित्त गौरव
नाशिक / प्रतिनिधी

दिंडोरी तालुक्यातील वरखेडा येथील जनता विद्यालयाच्या मुख्याध्यापिका एम. जी. कांबळे यांचा सेवापूर्तीनिमित्त विद्यालयाच्या प्रांगणात गौरव करण्यात आला. कांबळे या अहमदनगर येथील रहिवासी असून मविप्रच्या सिन्नर, घोटी, इगतपुरी, नायगाव येथील विद्यालयांमध्ये त्यांनी उपशिक्षिका म्हणून काम केले. जून २००७ मध्ये वरखेडा येथील विद्यालयाचा कार्यभार त्यांनी स्विकारला. मुख्याध्यापिका म्हणून अनेक उपक्रम राबवितांना शालेय विकासाचे उद्दिष्ट त्यांनी डोळ्यांसमोर ठेवले. त्यांच्या कार्यकाळात तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात आले. हिंदी स्पर्धामध्ये संस्थेत प्रथम व द्वितीय येण्याचा मान विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मिळवला. विद्यार्थ्यांना स्वखर्चाने पेन, वह्य़ा, पुस्तके व इतर शालेय साहित्य भेट देऊन त्यांचा उत्साह त्यांनी वाढविला. वरखेडा शाळेत दहावीमध्ये प्रथम येणाऱ्यास रोख रकमेचे पारितोषिक देण्यासाठी त्यांनी बँकेत कायमस्वरूपी ठेव ठेवली असल्याची माहिती एस. एस. पवार यांनी दिली आहे.

अरूणा ढेरे, डॉ. आत्माराम पवार यांचे व्याखान
प्रतिनिधी / नाशिक

गौतमी प्रकाशन, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान विभागीय केंद्र आणि कुसुमाग्रज प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या ११ व १२ जुलै रोजी भारती ठाकूर लिखीत ‘नर्मदा परिक्रमा : एक अंतर्यात्रा’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यानिमित्त ज्येष्ठ लेखिका-कवयित्री अरूणा ढेरे आणि औषध निर्माण शास्त्र विषयातील तज्ज्ञ डॉ. आत्माराम पवार यांच्या व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले आहे. पहिल्या दिवशी म्हणजे ११ जुलै रोजी सायंकाळी ६.३० वाजता ठाकूर यांच्या पुस्तकाचे प्रकाशन ढेरे यांच्या प्रमुख उपस्थितीत कुसुमाग्रज स्मारकात होणार आहे. याप्रसंगी ढेरे यांचे ‘स्त्रियांची अंतशक्ती आणि त्याची विविध तऱ्हेने होणारी अभिव्यक्ती’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. १२ जुलै रोजी सायंकाळी साडे सहाला भारती अभिमत विद्यापीठाच्या फार्मसी महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. आत्माराम पवार हे औषधासंबंधीची सर्व माहिती सोप्या भाषेत समजावून सांगणारा ‘औषधांची ऐशी की तैशी’ हा कार्यक्रम सादर करतील. हा कार्यक्रम देखील कुसुमाग्रज स्मारकात होणार आहे. अधिक माहितीसाठी संपर्क : ९४२३९-६४९७५, २३१०४२१.