Leading International Marathi News Daily

बुधवार, १ जुलै २००९


मालेगाव येथील सामान्य रुग्णालयाच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे स्वागत करताना नाशिकचे पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री छगन भुजबळ. समवेत, केंद्रीय आरोग्यमंत्री गुलाम नबी आझाद, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, मुख्यमंत्री अशोक चव्हाण आदी. छाया : प्रशांत नाडकर

..अन् सोनियांनी जिंकून घेतले सारे!
प्रल्हाद बोरसे / मालेगाव

रात्रंदिवस सुरू असणाऱ्या यंत्रमागांच्या खडखडाटामुळे येथील मुलांमध्ये आलेल्या बहिरेपणाबद्दल राज्यातील मंत्र्यांपासून संत्र्यांपर्यंत अनेकजण अनभिज्ञ असताना आणि ज्या थोडय़ा बहुतांना याची जाण आहे ते या समस्येच्या निराकरणासाठी ‘ब्र’ही काढत नसताना काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मात्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांना स्थानिक मुलांमधल्या बहिरेपणावर तातडीने इलाज शोधण्याचे फर्मान सोडले. त्यामुळेच मंगळवारी येथील सामान्य रुग्णालयाच्या उद्घाटन समारंभाप्रसंगी सोनियांनी उपस्थित मालेगावकरांची मने जिंकून घेतली.

अमळनेर तालुक्यातील शाळा यंदाही ‘लाइटनिंग अरेस्टर’विना
चंद्रकांत पाटील / अमळनेर

पावसाळ्यात वीज कोसळून होणाऱ्या हानीपासून विद्यार्थ्यांचे रक्षण करण्यासाठी प्रशासनाने प्रत्येक शाळेच्या इमारतीवर वीजरोधक ‘लाइटनिंग अरेस्टर’ यंत्रणा उभारण्यासंदर्भात सूचना देण्यात आल्या. परंतु तब्बल दोन वर्षांनंतरही तालुक्यातील एकाही शालेय इमारतीवर ही यंत्रणा बसविण्यात आलेली नाही. कोणत्याही ग्रामपंचायतीने आतापर्यंत याची दखलही घेतलेली नसून ही यंत्रणा कुठे उपलब्ध आहे, याची माहितीही शिक्षण विभागाला नसल्याचे अज्ञान समोर आले आहे.

आळंदेंची नियुक्ती रद्द करण्याची मागणी
महापालिकेत प्रभाग समित्यांचे काम सुरू

प्रभाग समितीच्या प्रमुख पदावर आळंदेच्या नेमणुकीबद्दल खुलासा साबळे यांनी आयुक्तांकडे मागितला असता दुसरा लायक उमेदवार दिसला नाही, असे आयुक्तांनी सांगितल्याचे साबळे यांचे म्हणणे आहे.

(बाजारभाव)
लासलगाव बाजारात सप्ताहात कांद्याच्या दरात घसरण

लासलगाव / वार्ताहर

पाऊस लांबल्याचा परिणाम लासलगाव मुख्य बाजार आवारातील कांद्याच्या आवकवरही दिसून येत असून मागील सप्ताहात आवकमध्ये वाढ झाली. परंतु त्यामुळे बाजारभावात घसरण झाली. सप्ताहात कांद्यास कोलकाता, चेन्नई, लखनौ तसेच परदेशात दुबई, कोलंबो, मलेशिया येथून मागणी होती. सप्ताहातील बाजारभाव पुढीलप्रमाणे.

देवमामलेदार ट्रस्टच्या जागेचा वाद आता लालफितीत
वार्ताहर / सटाणा

येथील देव मामलेदार ट्रस्टच्या जागेतील पशुवैद्यकीय दवाखाना पर्यायी जागेत हलवून सदरची जागा देव मामलेदार यशवंतराव महाराज ट्रस्टकडे वर्ग करण्याबाबत जिल्हा परिषदेने ठराव केला असला तरी सदरचे प्रकरण अद्याप लालफितीतच अडकले आहे. ब्रिटीश राजवटीत सिटी सव्‍‌र्हे नं. ४८८ मध्ये असलेले तहसील कार्यालय १९१९ मध्ये स्थलांतरीत झाले. ही जागा जिल्हा परिषदेकडे वर्ग करण्यात आली. तेव्हापासून या ठिकाणी पशुवैद्यकीय दवाखाना आहे.

विहिरीत मृतावस्थेतील बिबटय़ा
भगूर / वार्ताहर

देवळाली कॅम्प येथील बार्न्‍स स्कूलजवळील पंपीग स्टेशनच्या वापरात नसलेल्या विहिरीत बिबटय़ाचा मृतदेह आढळून आला. आठवडय़ापूर्वी सर्पदंशाने त्याचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. पंपींग स्टेशनमधून शाळा व वसतीगृहाच्या वापरासाठी पाणीपुरवठा होत असतो. पंपींग स्टेशनची १९८५ पासून वापरात नसलेली विहीर आहे. शाळा विहिरीतील पाण्याचा वापर करीत नसली तरी शेजारीच असलेला तलाव पावसाळ्यात भरल्यानंतर हे पाणी नैसर्गिकरित्या या विहिरीत साठवून नंतर वापरात असलेल्या विहिरीत टाकण्यात येते. सध्या तलाव पूर्ण कोरडा असल्याने या विहिरीतही पाणी साचलेले नाही. बोगद्यासारख्या या विहिरीत जाण्यासाठी अतिशय अरुंद जागा आहे. सोमवारी दुपारी येथे बार्न स्कूलचा कर्मचारी विशाल साळुंखे हा गेला असता त्याला दरुगधी आली. त्यानंतर परिसर पिंजून काढण्यात आला. परंतु दरुगधी नेमकी कुठून येते, याचा अंदाज येत नव्हता. साळुंखे यांनी विहिरीत बॅटरीच्या सहाय्याने पाहणी केली असता तेथे बिबटय़ाचा मृतदेह दिसला. शाळा प्रशासनाने देवळाली कॅम्प पोलिसांना व पोलिसांनी नाशिक वनविभागाच्या अधिकाऱ्यांना यासंदर्भात कळविल्यानंतर वनविभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. बिबटय़ाचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढल्यावर तो विच्छेदनासाठी नाशिकला नेण्यासारखी परिस्थिती नसल्याने वनपालांनी वरिष्ठांना याबाबत माहिती देऊन बिबटय़ावर याच ठिकाणी अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेतला. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. देशमुख यांनी विहिरीला पाणी नसल्याने बिबटय़ाचा मृत्यू पाण्यात बुडून झाला असे म्हणता येणार नाही, तसेच बिबटय़ाची नखे व इतर अवयव सुरक्षित असल्याने त्याला कोणी मारल्याचेही सिद्ध होत नाही. पंपींग स्टेशनच्या परिसरात मोठय़ा प्रमाणात जंगल असल्याने सर्पदंशाने बिबटय़ाचा मृत्यू झाला असावा, अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली.

दिंडोरीत पुजाऱ्यावर मजुराचा प्राणघातक हल्ला
वणी / वार्ताहर

दिंडोरी तालुक्यातील परमोरी येथील जगदंबा मंदिराच्या पुजाऱ्यावर रविवारी मध्यरात्री प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची घटना घडली. तलवारीने केलेल्या हल्ल्यात पुजारी गंभीर जखमी झाला आहे. पुजाऱ्याबरोबर राहणारा परप्रांतीय युवक या घटनेपासून बेपत्ता असल्याने संशयित म्हणून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. लखमापूर फाटय़ालगत कादवा कारखाना रस्त्यावर परमोरी शिवारात जगदंबा मंदिराच्या जिर्णोद्धाराचे काम सुरू आहे. गुरूराज देवराज भारती (५०) हे १० ते १२ वर्षांपासून मंदिरात पुजारी आहेत. जिर्णोद्धाराचे काम करणारा उत्तर प्रदेशातील मजूर सूरजशी त्यांची ओळख झाली. तो युवक पुजाऱ्याबरोबरच मंदिराच्या पाठीमागील खोलीत गेल्या दोन आठवडय़ांपासून राहात होता. रविवारी मध्यरात्री साडेबारा ते एकच्या दरम्यान पुजाऱ्याजवळील तलवारीने पुजाऱ्यावरच हल्ला करून घरातील मोबाईलसह सुमारे ७०० रुपये चोरून नेले. जाताना हल्लेखोराने घराच्या खिडकीतून हात घालत आतील व बाहेरील कडी लावून घेतली. जखमी अवस्थेतील पुजारीने खिडकीतून बाहेर येत मंदिरापासून काही अंतरावर असलेल्या वस्तीवर धाव घेतली. वस्तीवरील लोकांनी पोलीस पाटलांच्या मदतीने वणी पोलिसात तक्रार देत पुजाऱ्यास ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. गंभीर अवस्थेतील पुजाऱ्यास प्राथमिक उपचारानंतर नाशिक येथे खासगी रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले. या घटनेनंतर परप्रांतीय मजूर फरार असल्याने वणी पोलिसांनी संशयित म्हणून सूरजच्या शोधाकरिता ठिकठिकाणी नाकेबंदी केली. परंतु तो सापडला नाही. वणी पोलिसांनी हल्ल्यात वापरलेली तलवार जप्त केली. नाशिक येथून श्वान पथकास पाचारण करून संशयिताचा माग काढला, परंतु तो लखमापूर फाटय़ापर्यंतच मिळून आला. ल्ल

खडकी येथे डिजिटल सॅटेलाईट फोन सेवा
शहादा / वार्ताहर

नंदुरबार जिल्ह्य़ातील अतीदुर्गम भागाताील ग्रामस्थांना दूरध्वनी सेवा उपलब्ध व्हावी यासाठी भारत संचार निगमने २२ डिजीटल सॅटेलाईट पब्लिक टेलिफोन सेवा देण्याचे निश्चित केले आहे. खडकी (तोरणमाळ) येथे पहिल्या डिजीटल सॅटेलाईट पब्लिक टेलिफोनचे उद्घाटन खासदार माणिकराव गावित यांच्या हस्ते करण्यात आले. नंदुरबार जिल्ह्य़ात धडगाव व अक्कलकुवा तालुक्यातील अनेक गावांशी संपर्क साधणे अत्यंत अवघड काम आहे, अशा ठिकाणी सॅटेलाईट फोन सेवा उपलब्ध करून देण्याचे धुळे विभाग भारत संचार निगमने ठरविले आहे. त्याचा प्रारंभ धडगाव तालुक्यातील खडकी या गावापासून होत आहे. खडकी, झापी, फलई, सिंदी दिगर ही गावे अतीदुर्गम म्हणून परिचीत आहेत.

पोलीस पाटलांना निवडणूक भत्ता देण्याची मागणी
देवळा / वार्ताहर
लोकसभा निवडणुकी दरम्यान पोलीस पाटलांना निवडणूक भत्ता ५०० रुपये प्रमाणे देवळा तालुक्यात वाटप करण्यात आला. परंतु जिल्ह्य़ात इतरत्र अद्याप त्याचे वाटप करण्यात न आल्याने तो तत्काळ देण्याची मागणी पोलीस पाटील संघटनेचे जिल्हा अध्यक्ष माधव पगार यांनी निवेदनाद्वारे केली आहे. निवडणूक काळात मतदानाच्या दिवशी पोलीस पाटील यांच्यावर महत्वपूर्ण जबाबदारी असते. मतपेटय़ा पोहच करेपर्यंत त्यांना सर्वत्र देखरेख ठेवावी लागते. या प्रक्रियेतील सर्व अधिकाऱ्यांची जबाबदारीही पोलीस पाटलांवर असते. या सर्व बाबीचा विचार करून शासनाने मंजूर केलेला भत्ता त्वरीत देण्याची मागणी करण्यात आली आहे. जिल्ह्य़ात सर्व तालुक्यात यासंदर्भात संबंधितांशी चौकशी केली असता उडवाउडवीची उत्तरे देण्यात आल्याचेही पगार यांनी सांगितले.

सॅटर्डे क्लबच्या सहसचिवपदी जळगावचे समीर देशमुख
जळगाव / प्रतिनिधी

सॅटर्डे क्लब या उद्योजक आणि व्यावसायिकांच्या आंतरराष्ट्रीय संघटनेच्या सहसचिवपदी येथील समीर देशमुख यांची नुकतीच निवड करण्यात आली. डोिंबवली येथे झालेल्या सभेत नव्या कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली. विश्वस्तपदी अध्यक्ष माधव भिडे, बँक ऑफ महाराष्ट्र व आयओबीचे माजी कार्यकारी संचालक अशोक दुगाडे, पितांबरी प्रॉडक्टचे प्रभु देसाई, निर्माण ग्रुपचे अजित मराठे, विन्फ्रोकेमिकल्सचे प्रदीप ताम्हणे यांचा समावेश आहे. सचिवपदी गिरीश टिळक, कोषाध्यक्ष म्हणून मिलींद गरूड, तसेच सहसचिवपदी सचिन येते, समीर देशमुख, प्रमोद कुवळेकर व विकास देशपांडे यांची निवड करण्यात आली आहे. जळगाव शाखेने केलेल्या कार्याची दखल घेऊन देशमुख यांची निवड झाल्याचे जळगाव क्लबचे अध्यक्ष छबीराज राणे व सचिव सचिन दुनाखे यांनी सांगितले.

ग्राहक समितीचा आरोप
कर्मचाऱ्यांच्या संगनमताने वीजचोरी
मनमाड / वार्ताहर

शहरात वायरमन आणि अधिकारी यांच्या संगनमताने होणाऱ्या कोटय़वधीच्या वीज चोरीची चौकशी करून दोषींना निलंबित करावे, अशी मागणी सर्वपक्षीय वीजग्राहक संघर्ष समितीने केली आहे.
शहरात गेल्या आठवडाभरापासून राज्य वीज वितरण कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वीज चोरीच्या बाबतीत मोहीम उघडली आहे. ही बाब चांगली असली तरी तपासणीच्या नावाखाली अनेक नियमित ग्राहकांना या अधिकाऱ्यांकडून वाईट वागणूक दिली जात असल्याचा आरोप समितीने केला आहे. शांतीनगर, कॅम्प, विवेकानंदनगर, माधवनगर, मुरलीधरनगर, आयुडीपी, वागदर्डीरोड, आंबेडकरनगर, हनुमाननगर यांसह जेथे बंगल्याचे प्रमाण जास्त आहे, अशा सर्व ठिकाणी गेल्या पाच वषार्ंपासून अनेक ग्राहक वायरमन व अधिकाऱ्यांच्या संगनमताने मीटर न घेता आकडय़ाच्या मदतीने वीजचोरी करीत आहेत. अशा ठिकाणी मोहीम न आखता नियमित ग्राहकांना वेठीस धरण्याचे काम कंपनी करीत आहे. शहरातील ७० ते ८० टक्के मीटर नादुरूस्त असताना व त्यात ग्राहकांचा कोणताही दोष नसताना अधिकाऱ्यांनी अनेक ग्राहकांविरूध्द कार्यवाही करून त्यांना दंडासह अवास्तव बील पाठविण्याचा डाव रचल्याचा आरोपही समितीने केला आहे. अशा ग्राहकांनी त्वरित संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क करावा. याविरुद्ध समितीतर्फे पूर्वसूचना न देता आंदोलन केले जाईल, असा इशारा समितीचे अध्यक्ष संतोष बळीद, गणेश धात्रक, राजाभाऊ पगारे, राजाभाऊ अहिरे, राजाभाऊ छाजेड, नितीन पांडे, सतीश शर्मा, गालीब शेख यांनी दिला आहे.

असे रुग्णालय, अशा सुविधा
मालेगाव येथील अद्ययावत रूग्णालयासाठी १३ कोटीचा निधी मंजूर झाला असला तरी प्रत्यक्षात खर्च मात्र १८ कोटी झाला आहे. रुग्णालयाच्या बाह्य़रुग्ण सेवा विभागात पुरूष, स्त्री व बालकांकरिता वैद्यकीय चिकित्सा, माता- बाल संगोपन, कुटुंबकल्याण, मनोविकृती, स्त्री रोग व प्रसुती, बालरोग, दंतशल्य चिकित्सा, कान-नाक व घसा विभाग, क्षयरोग, शरीरविकृती चिकित्सा, अस्थिव्यंग, गुप्तरोग आदी आजारांवर उपचाराची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच आंतररुग्ण विभागात २०० खाटा, अतिदक्षता विभाग, अत्यवस्थ व गंभीर रुग्णांवर उपचारासाठी अत्याधुनिक यंत्रसामग्री कार्यान्वित करण्यात आली आहे. रुग्णालयाच्या निमित्ताने शहराच्या पूर्व व पश्चिम भागास जोडणाऱ्या एका नवीन पुलाची भेट मालेगावकरांना मिळाली आहे. रुग्णालयास लागून असणाऱ्या या पुलाचा वापर मंगळवारपासून सुरू झाला.

चोरटय़ांनी दाखविला हात!
सोनिया गांधी यांच्या मालेगाव दौऱ्याच्या पाश्र्वभूमीवर, संपूर्ण मालेगाव शहराला पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले असताना स्थानिक भुरटय़ा चोरांनी कार्यक्रम स्थळाच्या परिसरातून वेगवेगळ्या वस्तू गायब करून आपला हात दाखविला. दौऱ्याच्या पूर्वसंध्येला, म्हणजे सोमवारी सायंकाळी चोरटय़ांनी रुग्णालयाच्या परिसरात असणारे ३०० ते ४०० पत्रे लंपास केले. मोसम नदीच्या किनाऱ्यावर संरक्षणासाठी हे पत्रे बसविण्यात आले होते. तथापि, उद्घाटन सोहळ्यापूर्वीच ते गायब करण्यात आले. एवढेच नव्हे तर, ज्या ठिकाणी सोनियांचे हेलिकॉप्टर उतरणार होते, त्या भागास संरक्षण देण्यासाठी बांबू व लाकडी बल्ल्या उभारण्यात आल्या होत्या. हेलिकॉप्टरच्या जवळपास कुणी फिरकू नये म्हणून पोलीस यंत्रणेचे हे नियोजन होते. त्यानुसार रुग्णालयाचे लोकार्पण झाल्यानंतर सोनिया गांधी हेलिकॉप्टरने मार्गस्थ झाल्या अन् त्यांच्या हेलिकॉप्टरने उड्डाण करताच या लाकडी बल्ल्यांवर चोरटय़ांनी धाड टाकली. काही मिनिटांच्या कालावधीत या भागात बसविलेल्या सर्व बल्ल्या लंपास झाल्या. कडेकोट पोलीस बंदोबस्त असतानाही चोरटय़ांनी पत्रे व लाकडी बल्ल्या गायब करण्याच्या या प्रकाराची परिसरात चांगलीच चर्चा सुरू होती.

..खजूर में अटके!
मालेगावचे महापौर शेख नजमुद्दीन शेख गुलशैर यांचा व्यवसाय खजूर विक्रीचा. त्यामुळे ते शहरात नजमुद्दीन शेख खजूरवाले या नावाने ओळखले जातात. रुग्णालयाच्या उद्घाटन सोहळ्यात बोलताना प्रत्येक वक्तयाने त्यांचा खजूरवाले याच नावाने उल्लेख केला. त्यामुळे सोनिया गांधी जेव्हा भाषणास उभ्या राहिल्या, तेव्हा त्यांनीही उपस्थितांची नावे सांगताना खजूरवाले असा नामोल्लेख केला आणि कार्यक्रमस्थळी एकच हशा पिकला. याचे नेमके कारण प्रथम सोनिया गांधी यांनाही उमगले नाही. त्यामुळे त्यांनी ‘मैने कुछ गलत कहा क्या’ असा सवाल केला. पण, उपस्थितांनी ‘नही आपने जो कहा वह गलत नहीं, बराबर है’, असे स्पष्ट केले. यामुळे सोनिया गांधी यांनी पुन्हा एकदा खजूरवाले यांच्या नावाचा उल्लेख करून उपस्थितांची दाद मिळविली.