Leading International Marathi News Daily

बुधवार, १ जुलै २००९

टँकरचा दर आठशे ते हजार रुपयांवर!
पुणे, ३० जून/प्रतिनिधी

शहरात मोठय़ा प्रमाणात पाणीकपात सुरू असल्यामुळे सर्व भागांतून टँकरच्या मागणीत वाढ झाली असून, खासगी टँकरच्या पाण्याचे दरही भडकले आहेत. समाविष्ट गावे, तसेच शहराच्या उपनगरांतून टँकरची मागणी सातत्याने वाढत असून, दहा हजार लीटरच्या टँकरसाठी नागरिकांना आता पाचशे ते एक हजार रुपये मोजावे लागत आहेत.

पाणलोट क्षेत्रात पावसाची भुरभुर;
कालव्यातील पाण्यात कपात
पुणे, ३० जून / खास प्रतिनिधी
मुळा-मुठा उपखोऱ्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची भूरभूर सुरू झाली असून पानशेत, वरसगाव, टेमघर व मुळशी धरणांच्या पाणलोटात तुरळक पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान, पुणे शहरात उद्या, बुधवारपासून वाढीव दहा टक्के पाणीकपात लागू होणार असल्याने मुठा उजव्या कालव्यातून कमी पाणी सोडण्यात येणार असल्याचे खडकवासला पाटबंधारे विभागाकडून स्पष्ट करण्यात आले.

भूजल पातळी चिंताजनक
सुनील कडूसकर
पुणे, ३० जून

राज्यातील भूजलाच्या पातळीत लक्षणीय घट झाली असून, घट होणाऱ्या तालुक्यांची संख्या यंदा जवळजवळ दुप्पट झाली आहे. गेल्या वर्षी १३९ तालुक्यांमधील भूजल पातळी घटल्याचे आढळून आले होते. यंदा हा आकडा २२१ तालुक्यांपर्यंत वाढला आहे.
धुळे, जळगाव, सोलापूर, परभणी, बुलढाणा, वाशिम आणि भंडारा या जिल्हय़ांतील सर्वच तालुक्यांतील भूजल पातळीत यंदा लक्षणीय घट झाली आहे.

पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत उद्या पाण्याबाबत अंतिम निर्णय
पुणे, ३० जून / प्रतिनिधी

पाणीकपात वाढल्यानंतर शहरात पाणीवितरणाचे नियोजन कशा पद्धताने करायचे यासंबंधी महापालिका वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत आज विचार करण्यात आला. या बाबतची अंतिम बैठक पालकमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी (२ जुलै) बोलावली असून या बैठकीत पाणीकपात व वितरणाबाबतचा अंतिम निर्णय जाहीर केला जाईल.

पुरवणी परीक्षा या वर्षीच आयोजित करण्यावर भर
पुणे, ३० जून / खास प्रतिनिधी

दहावी-बारावीच्या परीक्षेत नापास झालेल्या विद्यार्थ्यांचे वर्ष वाचविण्यासाठी राज्य शासन सर्वतोपरीने प्रयत्न करणार असून पुरवणी परीक्षा या वर्षीपासूनच सुरू करावी, अशा सूचना राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाला दिल्या आहेत. दहावी-बारावीच्या निकालाच्या पाश्र्वभूमीवर मंडळाच्या कार्यकारी परिषदेची आज बैठक घेण्यात आली. त्यामध्ये पुरवणी परीक्षेच्या प्रस्तावावर उशिरापर्यंत विचारविनिमय सुरू होता.

नोकरभरतीची प्रक्रिया आता खासगी संस्थेकडून
आरोग्य खात्यातील भ्रष्टाचाराला बसणार लगाम
पुणे, ३० जून / प्रतिनिधी
आरोग्य खात्यात वादग्रस्त ठरणारी आणि ‘मलई’ मिळण्याची संधी समजल्या जाणाऱ्या नोक रभरतीतील वाढता भ्रष्टाचार रोखण्यासाठी आता मलेरिया विभागासह अन्य विभागातील सहसंचालकस्तरावरून विविध पदांच्या नियुक्तयांची होणारी प्रक्रिया ही खासगी संस्थेकडून करण्याचा धाडसी निर्णय खात्याने घेतला आहे. यामुळे भ्रष्टाचाराला लगाम बसणार आहे.

शिवसेना शाखाप्रमुखाचा पोलिसांनी मनस्ताप दिल्याने मृत्यू ?
पिंपरी, ३० जून/ प्रतिनिधी

भाच्याच्या अपहरण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी देहूरोड पोलीस ठाण्यात गेलेल्या शिवसेना शाखाप्रमुखाला पोलिसांनी अरेरावी व दमदाटी केली. हा मनस्ताप सहन न झाल्याने त्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. या घटनेने संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी दोषी पोलीस व अपहरण करणाऱ्या आरोपींवर कारवाई होईपर्यंत मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यास नकार दिला. या प्रकाराने यशवंतराव चव्हाण रुग्णालयाच्या परिसरात तणाव निर्माण झाला होता.

प्राचार्य पायगुडे यांच्या बदलीमुळे रंगले राजकीय नाटय़!
निलंबनासाठी कर्मचारी आक्रमक
पिंपरी, ३० जून / प्रतिनिधी
मोरवाडी येथील िपपरी-चिंचवड महापालिकेच्या ‘आय.टी.आय.’चे वादग्रस्त प्राचार्य विजय पायगुडे यांच्याभोवती शहराचे राजकारण रंगत आहे. पायगुडे यांची उचलबांगडी झाल्यानंतर कर्मचारी महासंघाने आक्रमक पवित्रा घेतला असून, त्यांना थेट निलंबित करण्याची मागणी केली आहे.

विषय समित्यांच्या अध्यक्षपदासाठी पिंपरीत सहा जुलैला निवडणूक
अजित पवार यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
पिंपरी, ३० जून / प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या क्रीडा, विधी, महिला व बालकल्याण, तसेच झोपडपट्टी सुधार समितीच्या अध्यक्षपदासाठी येत्या सहा जुलैला (सोमवारी) निवडणूक घेण्यात येणार आहे, अशी माहिती पक्षनेते जगदीश शेट्टी यांनी आज दिली.

रस्त्यावर अतिक्रमण करणाऱ्या व्यावसायिकांवर कारवाई
स्थायी समितीतील टीकेची दखल
पिंपरी, ३० जून / प्रतिनिधी
पिंपरी पालिकेचे शहर अभियंता एकनाथ उगिले हे बिनकामाचे आहेत, अशी खरमरीत टीका स्थायी समितीच्या बैठकीत झाल्यानंतर लगेचच शहरात पदपथावर अतिक्रमण करणाऱ्या व्यावसायिकांच्या विरोधात पुन्हा कारवाईला सुरुवात झाली. शहरातील दापोडी, निगडी, चिंचवड, आकुर्डी या भागांत पालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने ही कारवाई केली. चार हातगाडय़ा, एक लोखंडी टेबल, एक टपरी, एक लाकडी टपरी आदी साहित्य जप्त करण्यात आले.

शिवशाहीर पुरंदरे व संजय सोमवंशी यांना
विद्या व्यास पुरस्कार जाहीर
पुणे, ३० जून/प्रतिनिधी

विद्या सहकारी बँकेतर्फे दिला जाणारा यंदाचा अकरावा ‘विद्या व्यास पुरस्कार’ ज्येष्ठ इतिहासकार शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे व संजय सोमवंशी यांना जाहीर करण्यात आला आहे.
बँकेच्या दरवर्षीच्या प्रथेनुसार ‘गुरुपौर्णिमा’ म्हणजेच ‘व्यास पौर्णिमे’च्या दिवशी हा पुरस्कार देण्यात येतो. विविध क्षेत्रांमध्ये गुरुतुल्य कार्य करून समाजाच्या सर्वागीण उन्नतीत मोलाचा वाटा उचलणाऱ्या गुणीजनांना दरवर्षी हा पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. हा पुरस्कार विविध क्षेत्रांमध्ये गुरुतुल्य कार्य करणाऱ्या ज्येष्ठ शिक्षकास त्याच्या आजपर्यंतच्या कार्याची पोहोच म्हणून रुपये ३० हजार रुपये रोख, मानपत्र व स्मृतिचिन्ह तसेच सध्या शिक्षण व संशोधन क्षेत्रात दिशादर्शक कामगिरी बजावत असणाऱ्या तरुण शिक्षकास प्रोत्साहनात्मक रु. २० हजार रुपये रोख, मानपत्र व स्मृतिचिन्ह अशा स्वरुपाचा आहे.

प्रेयसीची छेडछाड करणाऱ्याचा खून; दोघांना अटक
पुणे, ३० जून / प्रतिनिधी

प्रेयसीची छेडछाड करीत असल्याचा राग मनात ठेऊन संगनमताने बावीस वर्षांच्या युवकाचा डोक्यात दगड घालून खून करणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली असून त्यांना १० जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी उमेशचंद्र मोरे यांनी दिला. गोपी शिवाजी चव्हाण (वय १८, रा. शंकरशेठ रोड) आणि नितीन नथून पवार (वय २५, रा. घोरपडी पेठ) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. विशाल बाळू वाघमारे (वय २२, रा. पानमळा) असे मयत झालेल्या युवकाचे नाव आहे. याबाबत विनोद बाळू वाघमारे (वय २८, रा. पानमळा) यांनी ही फिर्याद दिली. ही घटना २७ जून रोजी घडली. चव्हाण आणि पवार या दोघांच्या प्रेयसीची विशाल हा छेडछाड करीत होता. या दोघांच्या मनात विशालचा राग होता. त्यावरून या दोघांनी आपआपसात संगनमत करून त्याच्या डोक्यात दगड घालून खून केला.

१४ जुलैला राज्यातील प्राथमिक शिक्षकांचा संप
पुणे, ३० जून /प्रतिनिधी
केंद्रशासनाच्या प्राथमिक शिक्षकांप्रमाणे वेतन आयोग लागू न केल्यामुळे महाराष्ट्रातील प्राथमिक शिक्षक येत्या १४ जुलैपासून लाक्षणिक संपावर जाणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे अध्यक्ष देवाजी गांगुर्डे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. यावेळी दिलीप अंधारे, सुरेश भावसार, दत्तात्रय सावंत, अशोक पवार, सुनील चिटणीस, मनोहर टोपले, संभाजी थोरात, बाळासाहेब काळे, अर्जुन सावळे, शामराव जवंजाळ उपस्थित होते.गांगुर्डे म्हणाले, ‘‘राज्यामधील सुमारे साडेतीन लाख शिक्षक व शिक्षण सेवक कर्मचाऱ्यांची फसवणूक शासनाने केली आहे. यामुळे प्राथमिक शिक्षकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. महाराष्ट्रातील सर्व शिक्षण संघटना एकत्रित येवून या अन्याया विरोधात दाद मागण्यासाठी अंदोलनास सज्ज झाल्या आहेत. संपात शंभर टक्के शिक्षक सहभागी होणार आहेत.

‘व्यवस्थापन शाखेचे संपूर्ण शुल्क जाहीर करावे’
पुणे, ३० जून / प्रतिनिधी
वैद्यकीय, अभियांत्रिकी शाखांबरोबरच व्यवस्थापन शाखेच्या प्रवेशप्रक्रियेपूर्वीच राज्य शिक्षणशुल्क समितीने संपूर्ण वर्षांचे शुल्क जाहीर करावे, अशी मागणी शहरातील विविध विद्यार्थी संघटनांनी केली आहे.शिक्षण सुधार कृती समितीचे निलेश बोराटे, स्टुडंट्स वेल्फेअर असोसिएशनचे सुरेश जैन, महाराष्ट्र विद्यार्थी परिषदेचे प्रमोद उमरदंड, मराठा विकास संघाचे जयराज लांडगे, राष्ट्रवादी कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक संघटनेचे प्रा. अविनाश ताकवले आदी या वेळी उपस्थित होते.संघटनांतर्फे १ जुलै रोजी शहरातील सर्व विद्यार्थी, पालक आणि संघटनांच्या प्रतिनिधींची संयुक्तिक बैठक पत्रकार भवन येथे दुपारी २.३० वाजता आयोजित केली आहे.

बालगंधर्व कलादालनात आज ‘वोल्युट’ प्रदर्शन
पुणे, ३० जून / प्रतिनिधी
डॉ. डी. वाय. पाटील आर्किटेक्चर महाविद्यालयाच्या वतीने बालगंधर्व कलादालन येथे १ व २ जुलै रोजी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी केलेल्या कामाच्या अभिव्यक्तीसाठी ‘वोल्युट’ या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रदर्शनाचे उद्घाटन डॉ. डी. वाय.पाटील यांच्या हस्ते होणार असून या वेळी शिरीष बेरी यांचे व्याख्यान होणार आहे. या प्रदर्शनामध्ये महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी रेखाटलेली आरेखने, संकल्पचित्रे, अभ्यासदौरा अहवाल, वस्ती अभ्यास अहवाल, विविध नियोजित प्रकल्पांच्या प्रतिकृती, नॅशनल असोसिएशन ऑफ स्कूल ऑफ आर्किटेक्चरच्या स्पर्धेतील चित्रे मांडण्यात येणार आहेत. नामवंत आर्किटेक्ट फिबोनाक्की यांनी विकसित केलेल्या गोल्डन स्पायरल या संकल्पनेवर प्रदर्शन आधारित आहे.

‘आय.आय.टी.’ साठी मार्गदर्शन सुविधा
पुणे, ३० जून/प्रतिनिधी
अभियांत्रिकी पदवी महाविद्यालयात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना युक्ती संस्थेच्या वतीने पायोनियर नावाचा प्रशिक्षण व मार्गदर्शन निवासी अभ्यासक्रम राबविला आहे.युक्ती संस्थेचे संचालक जितेश होरा यांनी आज पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली. लोकसेवा प्रतिष्ठान पुणे संचालित नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी शाळा व कनिष्ठ महाविद्यालय, फुलगाव यांच्या सहकार्याने फुलगाव येथे हा अभ्यासक्रम चालविला जाणार आहे पूर्णपणे निवासी स्वरुपाचा अकरावी व बारावी या दोन वर्षांसाठी विद्यार्थ्यांना सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.

कर्वे स्त्री अभ्यास केंद्रातर्फे विवाह समुपदेशन अभ्यासक्रम
पुणे, ३० जून /प्रतिनिधी
महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या बाया कर्वे स्त्री अभ्यास केंद्रातर्फे ‘विवाह समुपदेशन हा प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार असल्याची माहिती बाया स्त्री अभ्यास केंद्राच्या अध्यक्षा मृणालिनी चितळे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. विवाहपूर्व आणि विवाहोत्तर समस्या सोडवण्यासाठी समुपदेशन हा प्रभावी मार्ग ठरू शकतो हे लक्षात घेऊन या अभ्यासक्रमाची आखणी केली आहे.’’ या अभ्यासक्रमाचा कालावधी तीन महिने असून १४ जुलैपासून हा अभ्यासक्रम सुरू होणार आहे. अधिक माहितीसाठी बाया कर्वे अभ्यास केंद्र, कर्वेनगर दूरध्वनी क्रमांक २५४७५९७७, २५४७४८७० येथे संपर्क साधावा.

उद्योजक भांगडिया यांच्यासह तिघांना पोलीस कोठडी
पिंपरी, ३० जून/प्रतिनिधी
पिंपरी येथील दाम्पत्याला डांबून ठेवून मारहाण केल्याप्रकरणी उद्योजक अनिल भांगडिया यांच्यासह तिघांना आज न्यायालयाने एक दिवसाच्या पोलीस कोठडीचे आदेश सुनावले. पिंपरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक नंदकुमार िपजण यांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिल बालकिसन भांगडिया (वय ४४, रा. वास्तुउद्योग, पिंपरी), संतोष बनारसी चव्हाण (वय ३८, रा. प्रशांत निवास, नेहरुनगर, पिंपरी) आणि दर्शन श्यामसिंह पाल (वय २२, रा. लाईफ स्टाईल अपार्टमेंट, लिंकरोड, पिंपरी) अशी पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. त्रिभुवन रामजनम चव्हाण (वय ३९, रा. दोस्ती बेकरीजवळ, काळभोर चाळ, नेहरुनगर, पिंपरी) यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे. अधिक तपास निरीक्षक नंदकुमार िपजण करीत आहेत.

महाराष्ट्र प्रज्ञा शोध परीक्षेच्या गुणवत्ता यादीत ‘अभिनव’चे सातजण

पुणे, २० जून / प्रतिनिधी
अभिनव विद्यालयाच्या प्राथमिक शाळेतील सात विद्यार्थ्यांनी नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र प्रज्ञाशोध परीक्षेच्या गुणवत्ता यादीत स्थान पटकाविले. अभिनवचे एकूण बेचाळीस विद्यार्थी या परीक्षेला बसले होते. जळगाव येथील संस्थेतर्फे ही परीक्षा घेतली जाते. असावरी थिटे या विद्याíथनीने गुणवत्ता यादीत पस्तीसाव्वा क्रमांक मिळविला आहे. अविनाश आपटे याने विसावा, पूर्ती पंचपोर हिने विसावा, अथर्व पाटणे याने एक्कावन्नावा, प्रसाद इंगळे पंच्याऐंशीवा, पार्थ भालेराव याने एकशे अकरावा तर अथर्व ठाकूर याने एकशे विसावा क्रमांक मिळविला आहे.

रांजणगाव गणपती येथे तीन लाखांची चोरी
शिरूर, ३० जून / वार्ताहर

रांजणगाव गणपती औद्योगिक वसाहतीतील कारेगाव येथून २ लाख ८५ हजार रुपये किमतीचा माल चोरटय़ांनी चोरून नेला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार २९ जूनला रात्री कारेगाव येथील अशोका एंटरप्राइजेस वर्कशॉपमधून तीन अज्ञात चोरटय़ांनी जनरेटर, कॉम्प्रेसर, २ हॉर्सपॉवर अशी एकूण २ लाख ८५ हजार रुपयांची चोरी केली. चोरटय़ांनी एमएच १६ एएफ ५०४ या टेम्पोतून हा माल नेला. या संदर्भात प्रवीण बाळासाहेब जगताप, (रा. सापटणे, जि. सोलापूर, सध्या रा. सचिन पवार चाळ, कारेगाव) यांनी शिरूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक ज्योतीराम गुंजवटे करीत आहेत.

टाटा मोटर्स कंपनीतील साहित्य चोरणाऱ्यास अटक
पिंपरी, ३० जून / प्रतिनिधी
पिंपरीतील टाटा मोटर्स कंपनीतून साहित्य चोरणाऱ्यास, तसेच चिंचवड गावातील भाजी मंडईतून मोटारसायकल चोरणाऱ्या आरोपीस पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून चोरीचा माल जप्त करण्यात आला आहे. सोमवारी रात्री साडेबाराच्या सुमारास ४९ हजार रुपयांचे साहित्य चोरून नेणाऱ्यास पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडील एक टेम्पो व साहित्य जप्त केले आहे. हनुमंत दादाराव भाजीफळे (वय २५, रा. कुरळी, खेड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. विशाल आप्पाजी शिंदे (रा. रुपीनगर, तळवडे) यांनी फिर्याद दिली आहे.

चाकूच्या धाकाने लुटणाऱ्यास नागरिकांनी पकडून दिले
पिंपरी, ३० जून / प्रतिनिधी

येथील शनी मंदिराजवळील कुरियर कंपनीच्या मालकास चाकूचा धाक दाखवून २२ हजार चोरणाऱ्यास नागरिकांनी पकडून पोलीसांच्या ताब्यात दिले. तथापि, तीनजण पळून गेले. भूपेंद्र हरिलाल पाली (वय ४०, रा. जवाहरनगर, जि. भंडारा) याला अटक केले आहे. भरतभाई दयाभाई पटेल (रा. रविवार पेठ, पुणे) हे काल सायंकाळी कार्यालयात काम करताना चौघांनी चाकूच्या धाकाने त्यांच्याकडील साडेबावीस हजार चोरले. पटेल यांनी आरडाओरड केली. तेथे जमलेल्या लोकांनी पाली यास पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. फौजदार आर. एस. सय्यद तपास करीत आहेत.

रोटरी क्लबच्या वतीने आज रक्तदान शिबिरे
पिंपरी ३० जून / प्रतिनिधी
रोटरी क्लबतर्फे उद्या (१ जुलै) ‘डॉक्टर्स डे’निमित्त तीन रक्तदान शिबिरे आयोजित करण्यात आली आहेत. पहिले शिबिर शाहुनगर येथील रोटरी कम्युनिटी सेंटरमध्ये, दुसरे पुणे-मुंबई महामार्गावरील मेहता हॉस्पिटलमध्ये, तर तिसरे शिबिर मेहेर टेक्नोकन्सल्टंट येथे सकाळी नऊ ते एकपर्यंत होईल. याबाबत डॉ. अमोल मेहता (९३७१६१६६९३), डॉ. शेखर झिल्पेवार (९८५००५५६९१) यांच्याशी संपर्क साधावा.

आषाढी एकादशीकरिता पंढरपूरसाठी जादा गाडय़ा
पुणे, २६ जून/प्रतिनिधी
आषाढी एकादशीच्या निमित्ताने राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने पंढरपूरसाठी जादा गाडय़ा सोडण्यात येणार आहेत. स्वारगेट स्थानकातून या कालावधीत सकाळी सात ते रात्री आठ या वेळेत दर तासाला गाडी उपलब्ध होणार आहे.परतीच्या प्रवासासाठीही पंढरपूर येथून सोय करण्यात आली आहे.

रक्तदान शिबिराचे आयोजन
पुणे, ३० जून / प्रतिनिधी
रोटरी क्लब ऑफ पुणे मिडटाऊनच्या वतीने दि. १ जुलै रोजी दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर सकाळी ९ ते १ या वेळेत संपन्न होईल.