Leading International Marathi News Daily

बुधवार, १ जुलै २००९

राज्य

बॉलीवूड स्टार धर्मेद्र करणार लोणावळय़ात शेती!
धनंजय जाधव
पुणे, ३० जून

बॉलीवूड स्टार आणि पंजाब दा पुत्तर खासदार धर्मेद्र आता लोणावळय़ातील औंढे गावामधील आपल्या सत्तेचाळीस एकर शेतजमिनीत शेती करणार आहे. या शेतजमिनीत फळ-फुलांच्या बहारदार बागा फुलविण्यासाठी पवना धरणातून पाणी मिळावे, यासाठी त्याने पाटबंधारे खात्याकडे अर्ज केला आहे. हिंदी चित्रपटसृष्टीतील आघाडीचा नायक आणि अँग्री यंग मॅन अमिताभ बच्चन यानेही लोणावळय़ातील पवना धरणालगतच्या पाले गावात शेतजमीन घेतली आहे.

कंटेनर वाहतुकीला नियमावलीची गरज
संगमेश्वर, ३० जून/वार्ताहर मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर लांब आकाराच्या कंटेनरची वाहतूक कमालीची वाढली असून यातून होणाऱ्या अपघातांमुळे कंटेनर वाहतुकीला काही नियमावली तयार करण्याची गरज निर्माण झाली आहे. ट्रकसहीत साधारणत: ३० फूट लांबीचे हे कंटेनर मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरून दिवसभरात शेकडोंच्या संख्येने जात असतात. आपल्या ताब्यातील वाहन लांबीला अधिक आहे, याचा थोडाही विचार न करता कंटेनरचालक बेदरकारपणे वाहन चालवित असल्याचे असंख्य अनुभव आजवर पादचारी व अन्य वाहनचालकांना आले आहेत.

पावसाला सुरुवात होताच गणेशमूर्तीना आकार..
संगमेश्वर, ३० जून/वार्ताहर

कोकणात पावसाला सुरुवात झाली की, कारखान्यांमधून गणेशमूर्ती आकार घेऊ लागतात. वर्षभर जरी गणेशमूर्ती तयार करण्याचे काम सुरू असले तरी त्याला खरा जोर चढतो पावसाळ्यातच. संगमेश्वर परिसरातील गणेशमूर्ती कारखान्यांमधून सध्या मातीकाम जोरात सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळते.

देवरुखातील कोकण वालीचे उत्पादन शेतकऱ्यांचे आकर्षण
देवरुख, ३० जून/वार्ताहर

कोकणातील शेतकऱ्यांना पावसाळ्यात पारंपरिक शेतीसमवेत भाजीपाला उत्पादनासाठी प्रोत्साहित करण्यासाठी ‘कोकण वाल’ या जातीच्या भाजीचा यशस्वी प्रयोग मातृमंदिर शेतीफार्मवर करण्यात आला आहे. सुमारे दोन फूट लांबीच्या झाडाला लगडणाऱ्या वालाच्या शेंगा शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांचेही आकर्षण ठरले आहे. एका गुंठय़ाला १७ ते १८ किलो इतक्या वालाच्या शेंगांचे उत्पादन देणारे ‘कोकण वाल-१’ हे रोप दापोली कोकण कृषी विद्यापीठाने विकसित केले आहे.

शिवसेनेच्या हल्लाबोल आंदोलनाने संपत्तीचे मोठय़ा प्रमाणात नुकसान
ठाणे, ३० जून/प्रतिनिधी

वीज दरवाढ, लोडशेडींग आणि महावितरणाच्या अनागोंदी कारभाराविरोधात मुंबईच्या धर्तीवर ठाण्यात शिवसेनेने केलेल्या आंदोलनात सार्वजनिक मालमत्तेचे मोठय़ा प्रमाणात नुकसान करण्यात आले. शिवसेनेच्या गनीमी काव्याने फसलेल्या पोलिसांची एकच तारांबळ उडाली. मुंबईतील वीजवितरण कंपन्यांनी केलेल्या दरवाढी विरोधात गेल्याच आठवडय़ात शिवसेनेने आंदोलन केले होते. मात्र त्यावेळी ठाण्यात कोणतीही प्रतिक्रिया उमटली नव्हती.

जळगाव येथील गुरुकुल संस्थेतर्फे गेल्या फेब्रुवारी महिन्यामध्ये घेण्यात आलेल्या महाराष्ट्र प्रज्ञा शोध (एमटीएस) परीक्षेत दापोली येथील आर्या विवेक तलाठी ही राज्यात प्रथम आली. आर्या ही दापोली येथील गोपाळ कृष्णा सोहनी प्राथमिक विद्या मंदिरची विद्यार्थिनी असून ती आता तिसरीत आहे. प्रज्ञा शोध परीक्षेत आर्याने ३०० पैकी २८८ गुण मिळविले. या यशाबद्दल मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते अलीकडेच आर्याचा मंत्रालयात सत्कार करण्यात आला. त्यावेळी तिचे वडील विवेक तलाठी, आई अपर्णा हेही उपस्थित होते.

रायगडात पावसाची बोंब, शेतकरी चिंताग्रस्त
अलिबाग, ३० जून / प्रतिनिधी
रायगडच्या किनारी भागात पावसाने हजेरी लावली असली तरी उर्वरित तालुक्यांत तो अद्याप स्थिरावत नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आह़े पावसाळी ऋतूची परिस्थतीच अद्याप निर्माण होऊ शकलेली नाही़ गतवर्षीच्या तुलनेत यंदा एकूण पाऊस ९४५९ मिमीने कमी झाला आह़े विहिरी, धरणे व जलाशयांच्या पातळीतही वृद्धी झालेली नाही परिणामी पाणी टंचाईचे उग्र स्वरुप कमी झालेले नाही़ रायगड जिल्ह्यातील १६ पर्जन्यमापन केंद्रांवर गेल्या २४ तासांत केवळ २०२ मिमी पावसाची नोंद झाली आहे, परिणामी जिल्ह्याचे सरासरी पर्जन्यमान केवळ १२.६ मिमी राहिले आह़े गतवर्षी जिल्ह्यात ३० जून रोजी १२ हजार ९०४ मिमी असणारा एकूण पाऊस यंदा ३० जून रोजी केवळ ३ हजार ४४५ मिमी झाला आह़े गेल्या २५ तासांत सर्वाधिक पावसाची नोंद अलिबाग येथे ५४ मिमी झाली आह़े उर्वरित ठिकाणी पाली-सुधागड (२३ मिमी), खालापूर (३५ मिमी), कर्जत (२२.४ मिमी), तर पनवेल येथे १५ मिमी पावसाची नोंद झाली आह़े

शहापूर-धेरंडचे ग्रामस्थ पाण्यापासून वंचित
अलिबाग, ३० जून / प्रतिनिधी

शहापूर-धेरंड परिसरात येऊ घातलेल्या टाटा व रिलायन्सच्या औष्णिक वीजनिर्मिती प्रकल्पास आम्ही शेतकरी ग्रामस्थ विरोध करीत आहोत, म्हणूनच केवळ आकसापोटी आम्हास पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येत नाही़ ज्या देशाच्या राष्ट्रपती महिला आहेत, त्याच देशातील महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागते, हे दुर्दैवी आहे. याप्रकरणी खासदार सुप्रिया सुळे यांची आम्ही भेट घेणार असून, मानवी हक्क आयोगाकडे तक्रार दाखल करीत असल्याचे एका संयुक्त निवेदनाद्वारे शहापूर महिला गावकीच्याअध्यक्षा मधुरा पाटील, गीता पाटील व नऊ गाव खारेपाट कृती समितीचे सचिव राजन भगत यांनी पालकमंत्री सुनिल तटकरे यांना फॅक्सद्वारे पाठवून कळविले आह़े गेल्या १९ जून रोजी मुंबईत झालेल्या बैठकीत, शहापूर ग्रामपंचायत हद्दीतील ग्रामस्थांना २० जूनपासून तात्काळ पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्याचे स्पष्ट आदेश पालकमंत्री तटकरे यांनी रायगड जि़ प़ मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वास भोसले आणि जिल्हाधिकारी डॉ़ निपुण विनायक यांना देऊनही आज ११ दिवस झाले तरी या उभय अधिकाऱ्यांकडून कोणतीही कार्यवाही झाली नसल्याने या शहापूर ग्रामस्थांना पडत्या पावसातही पिण्याच्या पाण्याच्या समस्येस सामोरे जावे लागत आह़े

देशभरात स्थापणार १५०० अभिमत विद्यापीठे!
पुणे, ३० जून/खास प्रतिनिधी

अभिमत विद्यापीठांच्या कार्यपद्धतीचा आढावा घेण्यासाठी मनुष्यबळ विकास खात्याने मोहीम हाती घेतली असतानाच देशभरात पंधराशे अभिमत विद्यापीठे स्थापन करण्याचा विचार असल्याची माहिती परदेशस्थ भारतीयांविषयीच्या खात्याचे मंत्री वायलर रवी यांनी आज येथे दिली.
सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाच्या पदवीप्रदान समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून रवी उपस्थित होते. त्यावेळी दीक्षान्त भाषणात त्यांनी ही माहिती दिली. कुलपती डॉ. शां. ब. मुजूमदार, कुलगुरू डॉ. मृणाल रास्ते, संस्थेच्या प्रधान संचालिका डॉ. विद्या येरवडेकर, आंतरराष्ट्रीय विद्यार्थी परिषदेचे अध्यक्ष सईद अल हमादी, खासदार सुरेश कलमाडी आदी या वेळी उपस्थित होते.
‘अकराव्या पंचवार्षिक योजनेतील तब्बल २० टक्के निधी शिक्षणासाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे,’ अशी माहिती देऊन रवी म्हणाले की, १० एनआयआयटी, सात आयआयएम, १६ केंद्रीय विद्यापीठे, १४ जागतिक दर्जाची विद्यापीठे, ३७० आदर्श महाविद्यालये यांच्या जोडीला पंधराशे अभिमत विद्यापीठेही स्थापन करण्याचा केंद्र सरकारचा विचार आहे. आजमितीस १० टक्क्यांपर्यंत रखडलेली उच्चशिक्षणातील पटसंख्या दुपटीने वाढविण्याचे ध्येय ठेवण्यात आले आहे. शिक्षणाचा विस्तार करताना गुणवत्ता राखण्याचे अवघड ध्येयही देशापुढे आहे, असे रवी म्हणाले.

प्रज्ञाशोध शिष्यवृत्तीसाठीचा सहा हजार विद्यार्थ्यांना लाभ
पुणे, ३० जून/खास प्रतिनिधी
महाराष्ट्र प्रज्ञाशोध शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यातील सहा हजार ३०४ विद्यार्थी पात्र ठरले असून, त्यांना सुमारे १५ लाख रुपयांची शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येणार आहे.
मॉडर्न एज्युकेशन सोसायटीच्या नौरोसजी वाडिया महाविद्यालयातील ‘सेंटर फॉर टॅलेंट सर्च अ‍ॅण्ड एक्सलन्स’ या संस्थेतर्फे ही परीक्षा घेतली जाते. परीक्षेचे मानद संचालक जी. सी. कुलकर्णी यांनी निकालाचा तपशील जाहीर केला. महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा व गुजरातमधील ८३ हजार ६६१ विद्यार्थी या परीक्षेला बसले होते. राज्यस्तरीय शिष्यवृत्तीसाठी एक हजार ४८ विद्यार्थी, जिल्हास्तरीयसाठी एक हजार ३८१, उत्तेजनार्थ पारितोषिकासाठी ९७८, तर तालुकास्तरीय पारितोषिकांसाठी दोन हजार ८९७ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. www.mtsexam.org या संकेतस्थळावर निकाल उपलब्ध करून देण्यात आला आहे. राज्यस्तरीय शिष्यवृत्तीसाठी आठवीच्या विभागात रायगड जिल्ह्य़ातील न्यू पनवेलमधील सेंट जोसेफ प्रशालेचा देवांग दीनानाथ पालव हा २५० पैकी १९८ गुण मिळवून पहिला आला आहे. शहर विभागामध्ये औरंगाबादमधील सेंट लॉरेन्स प्रशालेचा आनंद अनिल पाठक २१७ गुणांनी पहिला आला. नववीच्या ग्रामीण विभागात ठाणे जिल्ह्य़ातील कळव्याच्या न्यू इंग्लिश स्कूलचा प्रतीक प्रमोद फेगडे हा २०० पैकी १५१ गुण मिळवून पहिला आला. शहर विभागामध्ये पुण्याच्या सेंट जोसेफची संस्कृती अतुल ढवळे ही १५८ गुण पटकावून पहिली आली.

विश्वास पाटील यांना ‘मृण्मयी’ पुरस्कार
पुणे,३० जून/प्रतिनिधी

दिवंगत साहित्यिक गो. नी. दांडेकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिला जाणारा ‘मृण्मयी’ पुरस्कार ज्येष्ठ कादंबरीकार विश्वास पाटील यांना जाहीर झाला असून, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. आनंद यादव यांच्या हस्ते ८ जुलै रोजी सायंकाळी सहा वाजता टिळक स्मारक मंदिर येथे पुरस्काराचे वितरण होणारआहे. ‘मृण्मयी’ प्रकाशनच्या वीणा देव यांनी ही माहिती दिली. त्या म्हणाल्या की, साहित्य क्षेत्रात दिलेल्या योगदानाबद्दल पाटील यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे. तसेच वंचित समाज घटकांसाठी काम करणाऱ्या व्यक्तिलाही गेल्या चार वर्षांपासून संस्थेतर्फे ‘नीरा-गोपाल’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. गो. नी. दांडेकरांच्या पत्नी दिवंगत नीरा दांडेकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ हा पुरस्कार दिला जातो. या वर्षीचा पुरस्कार एड्सग्रस्त स्त्री-पुरुष व देहविक्री करणाऱ्या महिला व त्यांच्या मुलांच्या पुनर्वसनासाठी काम करणाऱ्या डॉ. गिरीश कुलकर्णी यांना देण्यात येणार आहे.