Leading International Marathi News Daily
बुधवार, १ जुलै २००९
  परिक्रमा पॉलिटेक्निक प्रवेशाची
  नॅनो टेक्नॉलॉजीतील करिअर संधी
  गरज व्होकेशनल ट्रेनिंगची
  लोककलांचे इंद्रधनुष्य मुंबई विद्यापीठाच्या नभांगणात
  सेवेतून संपन्नता
  इन्स्ट्रक्शनल डिझायनर एक नवे करिअर
  अ‍ॅनिमेशन आणि स्पेशल इफेक्टस्
  इन्स्टिटय़ूट ऑफ लोकल सेल्फ गव्हर्नमेंट
  संस्कृती ते स्पा.. पर्यटनाचा महामार्ग

परिक्रमा पॉलिटेक्निक प्रवेशाची
‘राष्ट्रोद्धाराय तंत्रशिक्षणम्’ हे ब्रिदवाक्य घेऊन महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात तंत्रशिक्षणाच्या विविध संधींची दालने तंत्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्यामार्फत विकसित झाली आहेत. प्रत्येक वर्षी नवनवीन संस्था, अभ्यासक्रम, प्रवेशक्षमता इ. मध्ये वाढ होत आहे. इंजिनीअरिंग (डिग्री/डिप्लोमा), फार्मसी, आर्किटेक्चर, हॉटेल मॅनेजमेंट, एम. बी. ए., एम. एम. एस. तसेच संबंधित अभ्यासक्रमांच्या विद्याशाखांचे प्रवेश तंत्रशिक्षण संचालनालयामार्फत देण्यात येतात. वरील विद्याशाखांपैकी विद्यार्थ्यांच्या दृष्टीने
 

सर्वात ‘हॉट केक’ म्हणजे इंजिनीअरिंग करिअर.
इंजिनीअरिंग डिग्री (अभियांत्रिकी पदवी) व इंजिनीअरिंग डिप्लोमा (अभियांत्रिकी पदविका) च्या प्रवेश प्रक्रिया स्वतंत्रपणे राबविण्यात येतात. इंजिनीअरिंग डिप्लोमा स्तरावरचे अभ्यासक्रम राबविणाऱ्या संस्थांना पॉलिटेक्निक अर्थातच तंत्रनिकेतन म्हणतात.
तंत्रनिकेतन
प्रामुख्याने दहावीनंतरचे तीन वर्षांच्या कालावधीचे अभ्यासक्रम (काही अपवाद वगळता) सदर संस्थांमार्फत राबविले जातात. शासकीय संस्था, अनुदानित संस्था, विनाअनुदानित संस्था, स्वायत्त संस्था, अल्पसंख्याक संस्था इ. विविध संस्थांचे प्रकार आहेत. महाराष्ट्रात एकूण २२० पेक्षा जास्त तंत्रनिकेतने असून त्यामध्ये ४० शासकीय व २० अनुदानित संस्था आहेत. एकूण प्रवेशक्षमता ६५००० पेक्षा जास्त आहे. तंत्रनिकेतनांमध्ये अभियांत्रिकीच्या ७५ पेक्षा जास्त विद्याशाखांचे पर्याय उपलब्ध आहेत.
दहावीनंतरच्या तीन/चार र्वष कालावधीच्या डिप्लोमा अभ्यासक्रमांना प्रवेश इच्छुक उमेदवाराला एस. एस. सी. अथवा समकक्ष परीक्षेमध्ये किमान एकत्रित ५० टक्के गुण असणे आवश्यक आहे. महाराष्ट्र राज्यातील मागास प्रवर्गातील उमेदवाराला किमान एकत्रित ४५ टक्के गुण असणे आवश्यक आहे. जनरल सायन्स/फिजिक्स व केमिस्ट्री, मॅथेमॅटिक्स/ अलजेब्रा व जॉमेट्री आणि इंग्रजी या विषयांसह प्रत्येक संवर्गासाठी किमान टक्केवारीची अट लागू आहे.
प्रवेश प्रक्रिया
दहावीनंतर तंत्रनिकेतन प्रवेशाची प्रक्रिया मागील वर्षांपर्यंत (२००८-०९) संस्थास्तरावर स्वतंत्रपणे संस्थानिहाय व्हायची. पण या वर्षीच्या तंत्रनिकेतन प्रवेशप्रक्रियेमध्ये आमूलाग्र बदल (२००९-१०) झालेले आहेत. या वर्षी प्रथमच ‘ऑन लाईन’ पद्धतीने महाराष्ट्रातील सर्व शासकीय, अनुदानित व इच्छुक विनाअनुदानित संस्थांची प्रवेशप्रक्रिया सामायिकपणे केंद्रीभूत पद्धतीने राबविली जाणार आहे. त्यामुळे संबंधित प्रवेशप्रक्रियेची माहिती विद्यार्थ्यांनी व पालकांनी सूक्ष्मपणे जाणून घेणे गरजेचे आहे. तंत्रशिक्षण संचालनालयाच्या संकेतस्थळावरील संस्था, प्रवेश क्षमता, वर्गवारी, विद्याशाखा, परवेशप्रक्रिया संदर्भात संपूर्ण माहती जाणून घेणे अत्यंत आवश्यक आहे.
माहितीपुस्तक
साधारणत: जुलैच्या दुसऱ्या आठवडय़ापासून प्रवेशासंबंधित माहितीपुस्तक (अ‍ॅप्लिकेशन किटसह) विहित शुल्क भरून ‘अ‍ॅप्लिकेशन रिसिट सेंटर’ (ए. आर. सी.)मधून प्राप्त केले जाऊ शकेल. संचालनालयाच्या वतीने महाराष्ट्रभर
४० पेक्षा जास्त ए. आर. सी.ची निवड करण्यात आलेली आहे. त्यापैकी १० पेक्षा जास्त आर. ए. सी. मुंबई विभागात आहेत. ए. आर. सी. संदर्भात संपूर्ण माहिती संचालनालयाच्या संकेतस्थळावर (www.dte.org.in/poly2009) दिलेली आहे.
अर्ज करण्याची पद्धत
पात्र उमेदवाराने ‘ऑनलाइन प्रवेश अर्ज’ संगणकावर http://www.dte.org.in/ poly2009 या संकेतस्थळाद्वारे सादर करणे आवश्यक आहे. अर्जामध्ये आवश्यक संपूर्ण माहिती बिनचूक भरल्यानंतर त्याची प्रिंटआऊट घ्यावी. त्यावर सही करून आवश्यक त्या प्रमाणपत्रांच्या साक्षांकित प्रती सदर प्रिंटआऊटसोबत अनुक्रमे जोडाव्यात. ए. आर. सी. सेंटरमध्ये जाऊन आवश्यक कागदपत्रांची सत्यता पडताळून घ्यावी. यावेळी ओरिजनल प्रमाणपत्रांची जंत्री सोबत असणे आवश्यक आहे. तसेच प्रवेशअर्जाची पोच झाल्याची खात्री ए. आर. सी.मधून करून घ्यावी.
प्राप्त अर्जाची संगणकाच्या माध्यमातून छाननी केल्यानंतर ‘प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट’ संकेतस्थळावर दर्शविण्यात येईल. त्यातील त्रुटी (असल्यास) दूर करून अंतिम गुणवत्ता यादी संकेतस्थळावर सादर करण्यात येईल. सदर गुणवत्ता यादीच्या आधारे विविध प्रवेशाच्या फेरी घेण्यात येणार आहेत.
विकल्प अर्ज भरणे
कॅप राऊंड एक, कॅप राऊंड दोन, कॅप राऊंड तीन व कौन्सिलिंग राऊंड असे एकूण चार राऊंड आहेत. प्रत्येक वेळी नव्याने विकल्प अर्ज भरवयाचा आहे. विकल्प अर्जामध्ये उमेदवाराने निवडलेले संकेतांक अतिशय अभ्यासपूर्ण पद्धतीने भरावयाचे आहेत. विभाग, संस्था व अभ्यासक्रम या तिन्ही बाबींचा मिळून एक विकल्प तयार करावयाचा असतो. प्रत्येक वेळी किमान एक विकल्प भरणे गरजेचे असते. विकल्प अर्ज भरण्यापूर्वी संबंधित आर. ए. सी.कडे शंकानिरसन करून घेणे गरजेचे आहे. पहिले तीन राऊंड (एक, दोन व तीन) अलॉटमेंट पद्धतीचे असूून चौथा राऊंड शासकीय तंत्रनिकेतन, औरंगाबाद येथे कौन्सिलिंग पद्धतीने होणार आहे.
उपरोक्त प्रवेश परिक्रमांच्या दरम्यान गुणवत्तेनुसार उमेदवाराचा प्रवेश निश्चित करण्यासाठी ए. आर. सी.मध्ये जाऊन मूळ कागदपत्रांसह आवश्यक शुल्काचा भरणा करणे आवश्यक आहे.
प्रथम राऊंडमध्ये कमाल २५ विकल्प, दुसऱ्या राऊंडमध्ये कमाल ४५ विकल्प व तिसऱ्या राऊंडमध्ये ४५ कमाल विकल्प कॉमन अ‍ॅडमिशन प्रोसेस (कॅप)द्वारे घेण्याची उच्च मर्यादा आहे तर कमीत कमी एक तरी विकल्प प्रत्येक फेरीमध्ये भरणे आवश्यक आहे.
संबंधित बाबींची माहिती अधिक तपशीलवारपणे माहितीपुस्तिकेत दिलेली आहे.
अल्पसंख्याक संस्था तसेच विनाअनुदानीत संस्था (कॅप राऊंडमध्ये नसलेल्या) मधील प्रवेश-प्रक्रियेसाठी संबंधित संस्थांमध्ये जाऊन संस्थास्तरावरील प्रवेश-प्रक्रिया तसेच प्रवेश अर्जाचे वेळापत्रक अत्यंत दक्षतेने समजावून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
अधिक माहितीसाठी- तंत्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, ३, महापालिका मार्ग, मुबई- ४०० ००१. दूरध्वनी : (०२२) २२६२०६०१, २२६९०६०२. वेबसाइट- www.dte.org.in/poly2009
अभियांत्रिकीच्या विद्याशाखा
१) ऑटोमोबाइल इंजिनीअरिंग
२) बायोटेक्नॉलॉजी
३) केमिकल इंजिनीअरिंग
४) सिव्हिल इंजिनीअरिंग
५) कॉम्प्युटर इंजिनीअरिंग
६) रबर टेक्नॉलॉजी
७) डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स
८) ड्रेस डिझाइनिंग
९) इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग
१०) इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअरिंग
११) इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅण्ड टेलिकम्युनिकेशन इंजिनीअरिंग
१२) फॅब्रिकेशन टेक्नॉलॉजी
१३) फॅशन अ‍ॅण्ड क्लोथिंग टेक्नॉलॉजी
१४) फूड टेक्नॉलॉजी
१५) गारमेंट टेक्नॉलॉजी
१६) इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी
१७) इन्स्ट्रमेंटेशन अ‍ॅण्ड कंट्रोल
१८) ज्वेलरी डिझाइनिंग अ‍ॅण्ड मॅन्युफॅक्चरिंग
१९) लेदर टेक्नॉलॉजी
२०) मरिन इंजिनीअरिंग
२१) मेकॅनिकल इंजिनीअरिंग
२२) प्लास्टिक इंजिनीअरिंग
२३) प्रिंटिंग टेक्नॉलॉजी
२४) टेक्स्टाइल टेक्नॉलॉजी इ.७५ पेक्षा जास्त.
महाराष्ट्रातील बहुसंख्य अभियांत्रिकीचे पदवी प्रवेश एकत्रित प्रवेश-प्रक्रिये (CAP) द्वारे तंत्रशिक्षण संचालनालयामार्फत राबविले जातात. सुमारे २५० पेक्षा जास्त महाविद्यालयांचे ८० हजारपेक्षा जास्त प्रवेशक्षमतेचे इंद्रधनुष्य
लीलया पेलण्याची क्षमता संचालनालयाने वारंवार सिद्ध केली आहे. केवळ एकाच अर्जाद्वारे विद्यार्थी आपल्या आवडीची संस्था अभ्यासक्रम महाराष्ट्रभरातून निवडू शकतो.
परंतु अशा प्रकारची व्यवस्था तंत्रनिकेतन प्रवेशासाठी उपलब्ध नव्हती. पर्यायी विद्यार्थ्यांला प्रवेशासाठी प्रचंड त्रास सहन करीत प्रत्येक संस्थेसाठी स्वतंत्र अर्ज करावा लागत असे. यामध्ये त्याचे पैसे, परिश्रम, मानसिक त्रास व वेळ उगाच फुकट जात असे. सदरहू
बाबींचा विचार करून विद्यार्थ्यांचे व पालकांचे
हित लक्षात घेता अभियांत्रिकी पदवी
प्रवेश धर्तीवर तंत्रनिकेतनामधील प्रवेश करण्याच्या दृष्टीने पहिले पाऊल टाकले व त्याचा परिपोष म्हणून शैक्षणिक वर्ष २००९-१० साठी तंत्रनिकेतनांचे प्रवेश एकत्रित प्रवेश प्रक्रियेद्वारे करण्यास सुरुवात झाली
आहे. भविष्यात महाराष्ट्रातील सर्व
प्रकारच्या तंत्रनिकेतनांना प्रवेशाच्या एकसूत्रात बांधण्याच्या दृष्टीने टाकलेले हे महत्त्वाकांक्षी पाऊल आहे.
निवडक ए. आर. सी. केंद्रे
१) शासकीय तंत्रनिकेतन, ४९, खेरवाडी, अली यावर जंग मार्ग, बांद्रा (पूर्व), मुंबई- ५१.
२) गव्हर्नमेंट इन्स्टिटय़ूट ऑफ प्रिंटिंग टेक्नॉलॉजी, जे. जे. स्कूल ऑफ आर्टचे आवार, डॉ. डी. एन. रोड, मुंबई.
३) एम. एच. साबूसिद्धीक तत्रनिकेतन, ०८ साबूसिद्धीक पॉलिटेक्निक रोड, भायखळा, मुंबई- ०८.
४) के. जे. सोमय्या तंत्रनिकेतन, विद्याविहार, मुंबई.
५) शासकीय तंत्रनिकेतन, पुणे विद्यापीठ रोड, पुणे.
६) शासकीय तंत्रनिकेतन, विद्यानगर, कोल्हापूर.
७) शासकीय तंत्रनिकेतन, समनगाव रोड, नाशिक.
८) शासकीय तंत्रनिकेतन, उस्मानपुरा, औरंगाबाद.
९) शासकीय तंत्रनिकेतन, सदर, नागपूर.
१०) शासकीय तंत्रनिकेतन, गाडगे नगर, अमरावती.
प्रा.मनोज देशमुख