Leading International Marathi News Daily

बुधवार, १ जुलै २००९

क्रीडा

पेस-ब्लॅकने नमविले सानिया-भूपतीला
लंडन, ३० जून / पीटीआय
भारताचा आघाडीचा टेनिसपटू लिएण्डर पेस व त्याची मिश्र दुहेरीतील सहकारी कॅरा ब्लॅक यांनी विम्बल्डन टेनिस स्पर्धेत भारताच्याच सानिया मिर्झा व महेश भूपती या जोडीला पराभूत करीत उपान्त्यपूर्व फेरीत धडक मारली. पेस-ब्लॅक जोडीने ही लढत ६-२, ६-७ (२), ६-३ अशी जिंकली. गेल्या वर्षी पेस-ब्लॅक जोडीने अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेचे विजेतेपद पटकाविले होते. यावेळी विम्बल्डन टेनिस स्पर्धा जिंकण्याचा मनोदय पेसने व्यक्त केला आहे.

विल्यम्स भगिनी उपान्त्य फेरीत
विम्बल्डन, ३० जून / पीटीआय

अमेरिकेच्या विल्यम्स भगिनींनी विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या उपान्त्य फेरीत धडक मारली असून आता त्यांना अंतिम फेरीत आमनेसामने येण्याची संधी आहे. उपान्त्यपूर्व सामन्यात सेरेना विल्यम्सने बल्गेरियाच्या व्हिक्टोरिया अझारेन्काला ६-२, ६-३ असे पराभूत केले तर दुसऱ्या उपान्त्यपूर्व सामन्यात रशियाच्या दिनारा सफिनाने जर्मनीच्या सबिन लिसिकीला ६-७, ६-४, ६-१ असे नमविले व उपान्त्य फेरीत प्रवेश केला.

सानियापेक्षा सायना सरस - पदुकोण
मुंबई, ३० जून / क्री. प्र.

भारतीय टेनिसमधील आघाडीची खेळाडू सानिया मिर्झा आणि बॅडमिंटनमधील तारका सायना नेहवाल यांच्यात कोण श्रेष्ठ असा प्रश्न कुणी विचारला तर मतभेद होऊ शकतील, पण भारताचे माजी बॅडमिंटनपटू प्रकाश पदुकोण यांच्या मते सानियापेक्षा सायनाच ‘ग्रेट’ आहे. हैदराबादमधील या दोन्ही खेळाडूंची तुलना करताना पदुकोण म्हणतात की, सानियापेक्षा सायनाने आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक अव्वल खेळाडूंना नमविलेले आहे.

वॉन निवृत्त
एजबॅस्टन, ३० जून / वृत्तसंस्था

इंग्लंडचा सर्वाधिक यशस्वी कर्णधार असा लौकिक मिळविलेल्या मायकेल वॉन याने आज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारत असल्याची घोषणा केली. वॉन हा मंगळवारी निवृत्तीची घोषणा करणार असल्याचे वृत्त इंग्लंडमधील प्रसारमाध्यमांनी रविवारीच दिले होते. त्याप्रमाणे आज वॉन याने निवृत्तीची घोषणा केली.

टाटा खुल्या बॅडमिंटन स्पर्धेला पाच लाखांची बक्षिसे
मुंबई, ३० जून / क्री. प्र.

सुमारे पाच लाखांची बक्षिसांची रक्कम असलेली टाटा अखिल भारतीय खुली बॅडमिंटन स्पर्धा उद्यापासून क्रिकेट क्लब ऑफ इंडियाच्या वातानुकूलित कोर्टवर खेळविली जाणार आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकत असलेली सायना नेहवाल मात्र या स्पर्धेत खेळू शकत नसली तरी भारतातील आघाडीचे खेळाडू मात्र या स्पर्धेत खेळणार आहेत.

खेळाडूंना सर्वोत्तम सुविधा देण्यात यावी - कलमाडी
पुणे ३० जून/प्रतिनिधी

शिवछत्रपती क्रीडानगरी ही जागतिक स्तरावरील अव्वल दर्जाची क्रीडानगरी आहे, त्यामुळे तेथे सरावाकरिता येणाऱ्या खेळाडूंना सर्वोत्तम सुविधा द्याव्यात, अशा सूचना भारतीय ऑलिम्पिक महासंघाचे अध्यक्ष खासदार सुरेश कलमाडी यांनी राज्याच्या क्रीडा संचालनालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

मुंबई हॉकी संघटनेत परिवर्तनाची लाट,
केहारसिंग मात्र विजयी
मुंबई, ३० जून / क्री. प्र.
मुंबई हॉकी संघटनेच्या निवडणुकीत जोअकिम काव्‍‌र्हालो, एम. एम. सोमय्या यांच्या परिवर्तन पॅनेलने बाजी मारली. सचिवपदासाठी निवडणुकीत उभे राहिलेले माजी ऑलिम्पिकपटू गुरबक्षसिंग यांना मात्र केहारसिंग यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला. या निकालामुळे मात्र वादाची स्थिती उद्भवली.

भारतीय अ‍ॅथलेटिक्स संघात दहा खेळाडूंचा समावेश
नवी दिल्ली, ३० जून/पीटीआय

इटलीमध्ये होणाऱ्या जागतिक युवा अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेसाठी भारतीय संघात दहा खेळाडूंना स्थान देण्यात आले असून, मुलांच्या गटात प्रज्योतसिंग व मुलींच्या गटात जी.मोनिका यांच्यावर भारताची मुख्य मदार आहे.प्रज्योतसिंग याने मदुराई येथे गेल्या महिन्यात झालेल्या राष्ट्रीय युवा स्पर्धेत ५९.६२ मीटर्स हा उच्चांक नोंदविला होत. मोनिका हिच्याकडून २०० मीटर्स धावण्याच्या शर्यतीच्या पदकाबाबत आशा आहे. तिने २४.८८ सेकंद हा राष्ट्रीय विक्रम नोंदविला आहे. युवा राष्ट्रीय स्पर्धेत सर्वोत्तम अ‍ॅथलेटचे पारितोषिक मिळविणारा गुरवंतसिंग याच्याकडून गोळाफेकमध्ये पदकाची आशा आहे.भारतास २००७ मध्ये ओस्त्रावा (चेक प्रजासत्ताक) येथे झालेल्या जागतिक युवा स्पर्धेत एकही पदक मिळविता आले नव्हते. त्यावेळी भारतीय संघात बारा खेळाडूंचा समावेश होता. यंदाच्या स्पर्धेसाठी भारतीय संघ- मुले- अमेय मल्लिक (२०० मी.धावणे), अंकित शर्मा (लांब उडी), अर्पिदर सिंग (तिहेरी उडी), गुरवंत सिंग (गोळाफेक), कृपालसिंग, प्रज्योतसिंग (थाळीफेक).मुली- रंजिता महंत (१०० मी.धावणे), जी.मोनिका (२०० मी.धावणे), अश्विनी मोहानन (४०० मी.धावणे), सी.आर्या (४०० मी.धावणे).

पाकिस्तानविरुध्द कसोटीसाठी श्रीलंकेचा संघ जाहीर
कोलंबो ३० जून/पीटीआय

पाकिस्तानविरुध्द होणाऱ्या तीन कसोटींच्या मालिकेसाठी श्रीलंकेच्या क्रिकेट संघाची निवड आज येथे जाहीर करण्यात आली. श्रीलंकेचे नेतृत्व कुमार संगकारा करीत आहे. श्रीलंकेचा संघ-कुमार संगकारा (कर्णधार), मुथैय्या मुरलीधरन, मलिंथा वर्णपुरा, थरंगा परणविथाना, माहेला जयवर्धने, दिलशान तिलकरत्ने, थिलान समरवीरा, अ‍ॅंजेलो मॅथ्युज, चामरा कपुगेदरा, अजंथा मेंडीस, थिलाना थुशारा, नुवान कुलसेकरा, धम्मिका प्रसाद, कौशल सिल्वा, सुरंगा लकमल.