Leading International Marathi News Daily

बुधवार, १ जुलै २००९

सात वर्षानंतरही सुखद प्रवासाचे स्वप्न सायडिंगला!
अजून नाही सरल्या आशा..
संजय बापट
११.४ मीटर रुंदी आणि ४३.६३ मीटर लांबीचा, तसेच सुमारे सव्वादोन कोटी रुपये खर्चाचा कोपरी उड्डाणपूल १२ महिन्यांत पूर्ण होणार होता. मात्र रेल्वे अधिकाऱ्यांची मनमानी भूमिका, पालिका प्रशासनाची हतबलता आणि राजकीय पक्षांची डोळेझाक, यामुळे या प्रकल्पाचे पुरते १२ वाजले आहेत. एवढेच नव्हे, तर तो पूर्ण कधी होणार याचे उत्तर कोणाकडेच नाही. ठाणेकरांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी पालिकेने अनेक प्रकल्प हाती घेतले.

व्हीआयपींच्या सग्यासोयऱ्यांना घरचा रस्ता
ठाणे पालिकेची कारवाई
ठाणे/प्रतिनिधी

नोकरभरतीसाठी आवश्यक असलेली कोणतीही प्रक्रिया न अवलंबता शहरातील राजकीय व्हीआयपींच्या सग्यासोयऱ्यांची थेट भरती करणाऱ्या ठाणे महापालिकेने चौकशीचा ससेमिरा मागे लागताच या ४१ कर्मचाऱ्यांना कायमचे घरी पाठविले आहे. नोकरीच्या प्रतीक्षेत असणाऱ्या हजारो सुशिक्षित बेरोजगारांना ‘नो व्हेकन्सी’चे उत्तर देणाऱ्या ठाणे महापालिकेने मागच्या दाराने बिनबोभाटपणे नोकरभरती चालविली होती. आयुक्तांच्या अधिकाराचा आधार घेत शहरातील व्हीआयपी आणि पालिकेतील वजनदारांच्या सग्यासोयऱ्यांची वर्णी लावली जात असल्याचे ‘लोकसत्ता’ने उघडकीस आणल्यानंतर पालिकेत एकच खळबळ उडाली होती.

ठाण्यातील शिवसेनेला झाले आहे तरी काय?
मुंबई/ प्रतिनिधी

लोकसभा निवडणुकीमध्ये ठाण्यासारखा बालेकिल्ला शिवसेनेच्या हातून गेल्यानंतर येथील पदाधिकाऱ्यांवर कारवाई करण्यास कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी लावलेल्या दिरंगाईमुळे सेना कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता पसरू लागली आहे. मुंबईत मोहन रावले यांच्यासह युतीचे सर्व उमेदवार पराभूत झाल्यानंतर ठाकरे यांनी तातडीने दोन विभागप्रमुखांना नारळ दिला .मात्र ठाण्यासारखी प्रतिष्ठेची जागा गेली तरी अद्याप कुणावरही कारवाई झालेली नाही.
तिकीटवाटपाच्या वेळी विजय चौगुले यांची प्रतिमा वादग्रस्त आहे, याची जाणीव असूनही त्यांना निवडून आणूच, ठाणेदार सेनेशिवाय कोणालाही मत देणार नाही, अशा फुशारक्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी मारल्या होत्या. चौगुले निवडून न आल्यास राजीनामे देण्याची तयारी दर्शविली होती.

मालमत्ता विभागात झारीतील शुक्राचार्याचे अद्यापही बस्तान
कल्याण/प्रतिनिधी - कल्याण-डोंबिवली पालिका हद्दीत जेवढे गाळे, गटई कामगार, अपंगांच्या टपऱ्या पालिकेच्या मालमत्ता विभागाने गाळेधारकांना, टपरीधारकांना भाडेपट्टय़ाने, कायमस्वरूपी तत्त्वावर दिल्या आहेत. या सर्व गाळे, टपऱ्या प्रकरणांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने चौकशी सुरू केली, तर मालमत्ता विभागाचा नवीन घोटाळा उघड होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

दहावीत ९१ टक्के मिळविलेल्या योगेशला हवा आहे मदतीचा हात!

आई दुसऱ्यांची धुणीभांडी करणारी, वडील नाका कामगार. ते जेमतेम चौथी शिकलेले, तर आईला साधी अक्षरओळखही नाही. अशा परिस्थितीत पोटासाठी मिळेल ते काम करून कुटुंबाची गुजराण करणाऱ्या शिवराम जाना बुंदे या आदिवासीच्या झोपडय़ात आनंदाला उधाण आले आहे. त्यांचा मोठा मुलगा योगेशने घरातील अठरा विशे दारिद्रय़ाशी झुंजत दहावीच्या परीक्षेत ६५० पैकी ५९१ (९०.९२ टक्के) गुण मिळविले आहेत. मात्र खडतर आयुष्य जगत देदीप्यमान यश मिळविलेल्या योगेशची सध्या पैशाअभावी निकराची झुंज सुरू झाली आहे. (सुभाष हरड)

गरिबीच्या झळा सोसून ‘देवयानी’ने फुलवला शिक्षणाचा मळा!
हातावर पोट असणाऱ्या व उदरनिर्वाहासाठी धडपडणाऱ्या आईवडिलांना मदत करून अभ्यासात कष्ट उपसून दहावीला ९१ टक्के व बारावीला (विज्ञान) ८४ टक्के गुण प्रश्नप्त केलेल्या देवयानी या गुणी व जिद्दी गरीब मुलीचे प्रतिकूल परिस्थितीमुळे शिक्षण ठप्प होण्याच्या मार्गावर आहे. दहा बाय दहाच्या पत्र्याच्या खोलीत राहात असलेल्या, घरात कोणतेही शैक्षणिक वातावरण नसताना केवळ जिद्द, चिकाटी, अपार मेहनत व इच्छाशक्तीच्या जोरावर देवयानी लाड या प्रतिभासंपन्न मुलीने यशाचे शिखर पार करूनही सध्या ती आर्थिक अडचणींमुळे घरी बसून आहे. गुणवत्ता असूनही गरीब परिस्थितीमुळे आपले शिक्षण अर्धवट राहते की काय, या शंकेने देवयानीची झोपच उडाली आहे.(सुभाष हरड)

इच्छुकांनी योगेश बुंदे व देवयानी लाड या विद्यार्थ्यांच्या नावे धनादेश काढावेत.
संपर्क : लोकसत्ता मुंबई कार्यालय- एक्स्प्रेस टॉवर्स, नरिमन पॉईंट, मुंबई- ४०००२१ दूरध्वनी- ०२२/२२०२२६२७, ६७४४००००. ठाणे कार्यालय- कुसुमांजली बिल्डिंग, दुसरा मजला, गोखले रोड, ठाणे (प)- ४००६०२ दूरध्वनी- ०२२/२५३८५१३२.

विनाअनुदानित महाविद्यालयांवर ऑन लाईन प्रवेशाची कुऱ्हाड!
कल्याण/प्रतिनिधी - ऑन लाईन प्रवेश प्रक्रियेमुळे विनाअनुदानित महाविद्यालयांना आता आपले वर्ग विद्यार्थ्यांनी भरलेच नाहीत, तर महाविद्यालय सुरू राहणार की नाही, अशी भीती निर्माण झाली आहे. काही प्रश्नध्यापकांनी नाव न सांगण्याच्या अटीवर ही माहिती दिली. सर्वच विद्यार्थ्यांचा आपल्याला बिर्ला, के.व्ही. पेंढरकर, प्रगती, मॉडेलसारखी कॉलेज मिळाली पाहिजेत म्हणून आग्रह असतो. उच्च गुणवत्ता प्रश्नप्त विद्यार्थी या महाविद्यालयांमध्ये जातो, पण उर्वरित विद्यार्थी हे कोठेच प्रवेश मिळाला नाही की, विनाअनुदानित महाविद्यालयांत प्रवेश मिळण्यासाठी अर्ज भरतात. तेथे नियमित प्रवेश शुल्क व इतर शुल्क भरणा केल्यानंतर व काही ठिकाणी डोनेशन देऊन प्रवेश प्रक्रिया पूर्ण केली जाते.

ठाण्यात शनिवारी आयुर्वार्ताची ‘आरोग्य-कुंडली’
ठाणे प्रतिनिधी - आयुर्वार्ता प्रबोधिनी या संस्थेच्या वतीने शनिवार, ४ जुलै रोजी गडकरी रंगायतन येथे सकाळी ११ वाजता आयुर्वेद संशोधन केंद्राच्या निधी संकलनासाठी आरोग्य कुंडली हा आयुर्वेदाच्या सिद्धांतावर आधारित माहितीपूर्ण व रंजक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. फेब्रुवारी महिन्यात ठाणे, वाशी, दादर, माटुंगा आणि पार्ले येथे अशा तऱ्हेचे आरोग्यविषयक कार्यक्रम आयुर्वार्ता प्रबोधिनीने आयोजित केले होते. त्या कार्यक्रमांना खूप चांगला प्रतिसाद मिळाला. जागेअभावी अनेकांना या कार्यक्रमांचा लाभ घेता आला नव्हता, त्यामुळे पुन्हा एकदा अशाच स्वरूपाचा कार्यक्रम ठाण्यात आयोजित करण्यात आला आहे. आरोग्य-कुंडली हा कार्यक्रम दोन सत्रांत होणार असून, पहिल्या सत्रात आयुर्वेदाच्या ऋतुचर्या, दिनचर्या इ. मूलभूत सिद्धांतांची माहिती टॉक शो आणि डॉक्युमेंटरीच्या माध्यमातून सादर करण्यात येईल. निरोगी राहण्यासाठी सर्वानी आहार, विहाराचे कोणकोणते नियम पाळावेत, याची सविस्तर माहिती देणारी आरोग्य कुंडली कार्यक्रम संपल्यानंतर सर्वाना विनामूल्य देण्यात येईल. आयुर्वेदातील रंजक महिती देणाऱ्या टॉक शोमध्ये डॉ. उदय कुलकर्णी, डॉ. मधुरा कुलकर्णी आणि सुप्रसिद्ध वैद्य पाध्ये गुर्जर सहभागी होणार आहेत. संपर्क-९८६९२६३२२७.

कलेक्टर कॅन्टीनमध्ये राबत होता बालमजूर
ठाणे/प्रतिनिधी - बाल कामगारविरोधी कायद्यांची अंमलबजावणी आणि वेठबिगारसंदर्भात कृती आराखडय़ाबाबत ठाणे जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत कागदी घोडे नाचविले जात असताना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या कॅन्टीनमधून एका बालमजुराला स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने पोलिसांनी ताब्यात घेतल्याने एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी कॅन्टीनच्या मालकाला अटक करण्यात आली आहे. कामगारमंत्री गणेश नाईक राहत असलेल्या जिल्ह्यात मोठय़ा प्रमाणावर बालमजूर कार्यरत असून स्वयंसेवी संघटना कामगार उपायुक्तालयामार्फत आस्थापनांवर छापे घालून त्यांची सोडवणूक करण्यात येत असते. अशा बाल कामगार आणि वेठबिगारविरोधी कृती आराखडय़ावर चर्चा करण्यासाठी जिल्हाधिकारी आबासाहेब जऱ्हाड यांनी अधिकाऱ्यांची बैठक बोलाविली होती. ही बैठक पहिल्या मजल्यावर सुरू असताना तळमजल्यावर असलेल्या कॅन्टीनमध्ये स्वप्निल लक्ष्मण लांडगे (१६) रा. प्रशांतनगर नौपाडा, हा बालमजूर काम करीत होता. याची माहिती घेतल्यानंतर प्रथम या स्वयंसेवी संघटनेने पोलिसांच्या मदतीने कॅन्टीनमध्ये छापा घालून बालमजुराची सुटका केली. या प्रकरणी ठाणेनगर पोलीस ठाण्यात बाल कामगार कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून कॅन्टीनचा मालक राघवेंद्र गोविंद शेट्टी याला अटक करण्यात आली आहे.

ऋतुजा जाधवच्या यशात ‘यशस्वी भव’चा सिंहाचा वाटा!
वाडा/वार्ताहर - शालेय अभ्यासक्रमाबरोबर ‘लोकसत्ता’ने दहावीसाठी राबविलेल्या ‘यशस्वी भव’ या उपक्रमाचा अभ्यासात चांगलाच फायदा झाल्याचे ऋतुजा विजयकांत जाधव या विद्यार्थिनीने आपल्या यशाबद्दल बोलताना सांगितले. नौपाडय़ातील सरस्वती सेकंडरी शाळेतून तिने ९४.३० टक्के गुण मिळवून या शाळेत सहावा क्रमांक पटकाविला आहे. माझ्या यशामध्ये ‘लोकसत्ता’च्या ‘यशस्वी भव’ उपक्रमामधील तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाबरोबर माझ्या शाळेचे शिक्षक व माझे आईवडील यांचेही मला वारंवार मार्गदर्शन मिळाल्याने मी हे यश संपादन करू शकले, असेही ऋतुजाने सांगितले. ऋतुजा जाधव ही विद्यार्थिनी वाडा तालुक्यातील मानिवली या खेडेगावातील मूळ रहिवासी असून, तिचे आईवडील नोकरीनिमित्त ठाण्यामध्ये राहत आहेत. ऋतुजाच्या यशाबद्दल मानिवली गावातील तिच्या कुटुंबियांनी, नातेवाईकांनी व ग्रामस्थांनी तिचे अभिनंदन केले आहे.

तोंडवळकर शाळेचे दहावीच्या परीक्षेत सुयश
डोंबिवली/प्रतिनिधी - उमेशनगरमधील संस्कार शिक्षण संस्था संचालित तोंडवळकर विद्यावर्धिनी शाळेचा दहावीचा निकाल ९४.३८ टक्के लागला आहे. सायली गावडे हिने ९३.८४ टक्के गुण मिळवून शाळेतून प्रथम येण्याचा मान मिळवला आहे. रंजना मांजरेकर हिने ९२.३० टक्के गुण मिळवून दुसरा क्रमांक पटकावला आहे. शाळेतील १३ विद्यार्थी विशेष श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. ३० विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. संस्थेचे अध्यक्ष नितीन तोंडवळकर, मुख्याध्यापिका संगीता आचरेकर आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांना यश मिळाले आहे.

आहना कुलकर्णीचे सुयश
डोंबिवली/प्रतिनिधी - सिस्टर निवेदिता शाळेची मराठी माध्यमाची आहना कुलकर्णी हिने दहावीच्या परीक्षेत ९४.१५ टक्के गुण मिळवून शाळेत सर्वप्रथम येण्याचा मान मिळवला. मराठीत तिने ९१ गुण, विज्ञानमध्ये ९४ गुण मिळवले आहेत. तिला संगणक अभियंता व्हायचे आहे. ती व्हीजेटीआयला प्रवेश घेणार आहे. आपल्या यशाचे श्रेय तिने आई-वडील आणि शिक्षकांना दिले आहे.

नितीन पडळकरचे सुयश
कल्याण/प्रतिनिधी - काटेमानिवली येथील विश्वास विद्यालयाचा नितीन पडळकर याने दहावीच्या परीक्षेत ९१.५३ टक्के गुण मिळवून शाळेतून प्रथम येण्याचा मान मिळवला आहे. मुख्याध्यापिका सुषमा चौधरी यांनी त्याचे कौतुक केले. यशात आईवडील आणि शिक्षक यांचा मोलाचा वाटा असल्याचे त्याने सांगितले.

कांती कोळी यांना बदलण्याची मागणी
ठाणे/ प्रतिनिधी

शहर काँग्रेसचे कार्यालय दररोज सुरू असते का.. आम्ही महिलांनी कुठे बसायचे.. शहरात काँग्रेस शिल्लक तरी आहे का.. सगळे कार्यक्रम राष्ट्रवादीच राबवते आहे.. आमच्या अध्यक्षाचे तोंडदेखील आम्हाला कधी बघायला मिळत नाही.. अशा शब्दांत महिला काँग्रेस कार्यकर्त्यांनी अखिल भारतीय काँग्रेस सरचिटणीस प्रवीण राजपाल यांच्यापुढे आपली कैफियत मांडली. राजपाल यांनी अलीकडेच विधानसभा निवडणुकांसाठी कार्यकर्त्यांच्या विश्रामगृहात भेटी घेतल्या. शहर काँग्रेस अध्यक्ष कांती कोळी यांना प्रकृतीमुळे कार्यालयातदेखील येणे जमत नाही. अध्यक्ष नसल्याने शहरात काँग्रेसतर्फे कोणतेच कार्यक्रम होत नाहीत. महिला पदाधिकाऱ्यांना कोणीही विचारात घेत नाही. कार्यालयात त्यांच्यासाठी जागादेखील नाही. विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या असल्याने अनेक कार्यक्रम हाती घेणे गरजेचे आहे, पण ठाण्यातील काँग्रेस कार्यकर्ते शांत बसले आहेत. शहतातील दोन ते तीन जागांवर काँग्रेसचा उमेदवार उभा करायचा आहे, मात्र पक्षबांधणीच नसल्याने कोणता मतदारसंघ घ्यायचा, संभाव्य उमेदवार कोण, याबद्दल आनंदीआनंदच आहे. निष्क्रिय अध्यक्षामुळे काँग्रेसचे वाटोळे होत असून असा अध्यक्ष बदला, अशी कळकळीची मागणी यावेळी कार्यकर्त्यांनी पक्षश्रेष्ठींकडे केली. महिला कार्यकर्त्यांचा रौद्रावतार पाहून कांती कोळी यांनी कार्यकर्त्यांना दटावण्याचा प्रयत्न केला, मात्र कोणीही शांत बसले नाही, असे सांगण्यात आले.

‘कल्याण रेल्वे टर्मिनससाठी पाठपुरावा करणार’
कल्याण/वार्ताहर

कल्याण रेल्वे टर्मिनसाठी सर्वपक्षीय खासदारांना एकत्र करून संसदेच्या अधिवेशनात पाठपुरावा करणार असल्याचे खासदार आनंद परांजपे यांनी सांगितले. टर्मिनसला लागणारी जागा तसेच रेल्वेचे १६ ट्रॅक्स आहेत. यासाठी रेल्वेच्या निवृत्त अधिकाऱ्याची मदत घेऊन कल्याण रेल्वे टर्मिनसचा आराखडा तयार करून त्याची सी. डी. रेल्वेमंत्री ममता बॅनर्जी यांना सादर करून त्यांच्याकडे रेल्वे टर्मिनसची मागणी करणार आहे. विमानतळाला सोयीची जागा मलंगगड परिसरात असल्याने तेथे चांगल्या प्रकारे विमानतळ होईल, असा विश्वास व्यक्त करून याही प्रश्नाचा पाठपुरावा करणार असल्याचे परांजपे यांनी सांगितले.कल्याण लोकसभा मतदारसंघाचा विकास हेच आपले ध्येय असून, यासाठी आपण डोंबिवलीमधील तोरणा रेसिडेन्सी, संगीतावाडी रोड येथे कार्यालय थाटणार असून, येत्या महिन्याभरात शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. आठवडय़ातून तीन दिवस आपण तेथे उपलब्ध राहणार आहे. तसेच नागरिकांच्या भेटीसाठी शनिवारी संध्याकाळी व रविवारी सकाळी शिवसेना शाखेत बसून या भागातील अधिकाधिक चांगली कामे करण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला.

मोटारसायकल चोऱ्यांमध्ये वाढ
वाडा/वार्ताहर-गेल्या महिन्याभरात वाडा, कुडूसमध्ये १५ ते २० मोटारसायकली व एक बोलेरो गाडीची चोरी झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. वाडा, कुडूसमध्ये मोठय़ा प्रमाणात शासकीय, निमशासकीय कर्मचारी राहात असून, बहुतेक कर्मचारी दुचाकी वाहनांचा वापर करतात. रात्री अंधाराचा फायदा घेऊन घराशेजारी लावलेल्या गाडय़ांची कुलपे तोडून चोरटे गाडी लंपास करीत. काही गाडय़ा तर दिवसाढवळ्या चोरीस गेल्या आहेत. शनिवारी (२७ जून) रात्री कुडूस येथून एक बोलेरो गाडी व तीन मोटारसायकली चोरीस गेल्या, तर सोमवारी (२९ जून) वाडा शास्त्रीनगर येथून दोन मोटारसायकली चोरीला गेल्या. दरम्यान, संशयित चोरटय़ांची नावे पोलिसांकडे देऊनही त्यांना ताब्यात घेतले जात नसल्याचा आरोप जिल्हा परिषद सदस्य व भूमिपुत्र कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुनील पाटील यांनी केला आहे.

विवेक घळसासी यांचा द्वारकेमध्ये भागवत सप्ताह
डोंबिवली/प्रतिनिधी -भागवतकथाकार विवेक घळसासी यांचा द्वारकेमध्ये ३० सप्टेंबर ते १२ ऑक्टोबर या कालावधीत भागवत सप्ताह आयोजित केला आहे. या नावीन्यपूर्ण संकल्पनेच्या संयोजिका स्मिता केसकर आहेत. द्वारकेत भागवत सप्ताह करून डाकोर येथे सप्ताहाची सांगता करण्यात येणार आहे. सप्ताहाच्या पहिल्या दिवशी मिरवणुकीतून भागवत ग्रंथ आणि द्वारकाधिशाची भेट हा सोहळा आयोजित केला आहे. त्यानंतर सप्ताहाला सुरुवात होईल. सप्ताहात द्वारकाधिशाचा पोशाख, विष्णूयाग, रुक्मिणी विवाह, कृष्णजन्म, व्यासपूजा हे उपक्रम आहेत. संपर्क- ९९२०८५८८१४