Leading International Marathi News Daily

बुधवार, १ जुलै २००९

विविध
(सविस्तर वृत्त)

येमेनिया एअरलाइनचे विमान हिंदी महासागरात कोसळले; मोठी प्राणहानी, बालकाला वाचवले
मोरोनी, ३० जून/पीटीआय

 

येमेनिया एअरलाइनच्या एअरबस ए ३१० जेट जातीचे विमानाला अपघात होऊन ते कोमोरोस बेटांनजिक हिंदी महासागरात आज कोसळले. या विमानात १५३ जण होते. त्यापैकी एका लहान मुलाचे प्राण वाचविण्यात मदतपथकांना यश मिळाले आहे. या अपघातात मरण पावलेल्यांची संख्या मोठी असेल अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. विमान अपघातग्रस्त होऊन समुद्रात कोसळण्याची ही गेल्या महिनाभरातील ही दुसरी घटना आहे.
या अपघातग्रस्त विमानाचे अवशेष मोरोनोजवळ आढळून आले. येमेनिया एअरलाइनचे हे विमान सोमवारी पॅरिसहून निघाले होते. या विमानाने मार्सेली, साना, दजिबोती येथे थांबा घेतला होता. या अपघातासंदर्भात फ्रान्सचे वाहतूकमंत्री डॉमिनिक ब्रुसेरू यांनी सांगितले की, येमेनिया एअरलाइनच्या कारभारामध्ये अनेक त्रुटी आम्हाला पहिल्यापासून जाणवत होत्या. तसेच अपघातग्रस्त विमानामध्ये अनेक दोष असल्याचे यापूर्वीच निदर्शनास आणून देण्यात आले होते.
मोरोनी आंतरराष्ट्रीय विमानतळाचे संचालक हादजी अली यांनी सांगितले की, येमेनिया एअरलाइनच्या एअरबस ए ३१० जेट जातीच्या या विमानाचा ते धावपट्टीवर उतरण्याच्या काही वेळ आधी दूरनियंत्रण कक्षाशी असलेला संपर्क तुटला. कोमोरोस बेटांच्या परिसरात हवामान खराब आहे हे वैमानिकाला कळविण्यात आले होते. हे विमान अपघातग्रस्त होऊन कोसळले तेंव्हा हिंदी महासागर खवळलेला होता.
या विमानामध्ये १४२ प्रवासी व ११ कर्मचारी असे १५३ जण होते. त्यातील ६६ जण फ्रेंच असून प्रवाशांमध्ये तीन लहान मुलांचाही समावेश आहे. त्यातील एका मुलाचे प्राण वाचविण्यात मदतपथकांना यश आले आहे. विमानातील १५३ पैकी फारच कमी व्यक्ती वाचण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
हिंदी महासागरातील अपघातस्थळी फ्रान्स नौदलाच्या दोन नौका व एक विमान मदतकार्यासाठी रवाना झाले आहेत. मात्र वादळी वाऱ्यांमुळे मदतकार्यात अनेक अडचणी येत आहेत. यासंदर्भात कोमोरोस सरकारचे महासचिव नॉर्दिन बुऱ्हेन यांनी सांगितले की, शोधकार्यात सहभागी झालेल्या विमानाच्या वेैमानिकाला मोरोनीपासून १६ ते १७ सागरी मैल दूर इतक्या अंतरावर येमेनिया एअरलाइनच्या अपघातग्रस्त विमानाचे अवशेष तसेच काही मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळले.
याआधी गेल्या १ जूनला एअर फ्रान्सचे एक विमान अपघातग्रस्त होऊन अ‍ॅटलांटिक समुद्रात कोसळले होते. त्या विमानात २२८ प्रवासी होते. त्यानंतर महिनाभराच्या कालावधीतच येमेनिआ एअरलाईनच्या विमानाला आज भीषण अपघात झाला. ही दोन्ही विमाने एअरबस या कंपनीने बनविलेली होती. या अपघातांबद्दल एअरबस कंपनीने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही.
येमेनिया एअरलाइनच्या विमानाला कशामुळे अपघात झाला याचे नेमके कारण अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही. अपघातग्रस्त विमानाचा ब्लॅक बॉक्स फ्लाईट रेकॉर्डर्स शोधल्यानंतरच त्या बाबीवर प्रकाश पडू शकेल असे सांगण्यात आले.