Leading International Marathi News Daily

बुधवार, १ जुलै २००९

विविध
(सविस्तर वृत्त)

एलपीजी भरलेल्या रेल्वे वाघिणींमध्ये स्फोट; १५ ठार, ५० जखमी
व्हिरेज्जिओ, ३० जून/पीटीआय

 

इटलीतील व्हिरेज्जिओ शहरानजिक एलपीजी वायूची वाहतूक करणारी एक रेल्वेगाडी रुळावरून घसरून तिच्या दोन वाघिणींमध्ये स्फोट झाला. त्यामध्ये रेल्वेमार्गालगतच्या घरांचे नुकसान झालेच शिवाय या घरांतील रहिवाशांपैकी १५ जण ठार झाले तर ५० जण जखमी झाले. जखमींपैकी ३५ जणांची प्रकृती गंभीर आहे. हा अपघात आज झाला.
यासंदर्भात अग्निशमन दलाच्या सूत्रांनी सांगितले की, जखमींपैकी अनेक जण गंभीररित्या भाजले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. एलपीजी वायूची वाहतूक करणारी व १४ वाघिणींचा समावेश असलेली रेल्वेगाडी व्हिरेज्जिओ शहरानजिक रेल्वेरुळावरून घसरली. या गाडीतील एलपीजी भरलेल्यापैकी दोन वाघिणींमध्ये भीषण स्फोट झाला. हा स्फोट होण्याआधी एलपीजी वायू रेल्वेमार्गालगतच्या घरामध्ये पसरला होता. वाघिणींमध्ये झालेल्या स्फोटामुळे रेल्वेमार्गालगतच्या घरांचे नुकसान झाले आहे. या स्फोटामुळे दोन लहान इमारती कोसळल्या असून तेथील मातीच्या ढिगाऱ्याखाली काहीजण गाडले गेल्याची भीती अग्निशमन दलाने व्यक्त केली आहे.
या रेल्वेगाडीच्या इतर वाघिणींमध्ये असलेल्या एलपीजीचा स्फोट होण्याची शक्यता लक्षात घेऊन रेल्वेमार्गालगतच्या घरांतील सर्व रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे.