Leading International Marathi News Daily

बुधवार, १ जुलै २००९

विविध
(सविस्तर वृत्त)

मायकेल जॅक्सनचा महिन्याला औषधांवर 30 हजार पौंड खर्च..
लंडन ३० जून/पीटीआय

 

पॉप गायक मायकेल जॅक्सन हा महिन्याला तीस हजार पौंड औषधांवर खर्च करीत होता असे काही बातम्यांमध्ये म्हटले आहे. त्याच्या शवविच्छेदनाचा जो अहवाल फुटला आहे त्यानुसार जॅक्सनच्या शरीराचा केवळ सापळा उरला होता व मृत्यूसमयी त्याच्या पोटात काही गोळ्यांचा अंश सापडला, त्याने अन्न मुळीच घेतलेले नव्हते.
मायकेल जॅक्सन संगीत क्षेत्रात पुनरागमन करणार होता व लंडन येथे त्याचे पन्नास कार्यक्रम होणार होते. शेवटच्या काळात त्याला अनेक रोगांनी ग्रासले होते व त्यावर उपचारांसाठी तो औषधांचे जेवणच करीत होता असे म्हटले तर वावगे ठरू नये. त्याची प्रिस्क्रीप्शन्स ही ओमर अ‍ॅडम्स नावाने आणली जात होती. जॅक्सनने त्यासाठी हे खोटे नाव धारण केले होते.
सन ऑनलाईनने म्हटले आहे की, नारकोटिक वेदनाशामक व्हिकोडिनशिवाय तो स्नायू शिथिल करणारे सोमा व झ्ॉनॅक्स ही औषधे घेत होता. त्याशिवाय तो नैराश्यावरील पॅक्सिल व प्रिलोझेक ही औषधेही घेत होता. जॅक्सनच्या कुटुंबाचे वकील ब्रायन ऑक्समन यांनी सांगितले की, तो एवढी औषधे घेत होता हे उघड होताच त्याच्या कुटुंबीयांना धक्काच बसला, त्याला नेमकी किती औषधे घेण्यास सांगण्यात आले होते याचीही शहानिशा करण्याचे त्याच्या कुटुंबीयांनी ठरवले आहे. या औषधांमुळेच मायकेलची प्रकृती खराब होत गेली असा त्यांना संशय आहे. तो कुठल्या प्रकारची औषधे घेत होता यापेक्षा किती प्रमाणात घेत होता हे महत्वाचे आहे, असे त्याच्या कुटुंबीयांना वाटते. मायकेलवर मुलांच्या लैंगिक छळ प्रकरणात न्यायालयात खटला चालू असताना तो दिवसातून व्हिकोडिनच्या चाळीस गोळ्या घेत होता, हे प्रमाण कदाचित त्यापेक्षाही जास्त असू शकेल, एवढय़ा मोठय़ा प्रमाणात तो औषधे स्वत:हून घेत होता की त्याला त्या कुणी लिहून दिल्या होत्या याचा तपास व्हायला हवा असे वकील ऑक्समन यांनी सांगितले.
जॅक्सनचे काही प्रिस्क्रिप्शन हे बिव्हरली हिल्स येथील त्वचारोगतज्ज्ञ डॉ. अर्नोल्ड क्लेन यांनी दिलेली असून ती औषधे मिकी फाईन फार्मसी या स्थानिक दुकानातून आणली जात होती. त्यांचे पैसे मात्र त्याचे सहकारी व परिचारिका, तसेच ओमर अ‍ॅडम्स या खोटय़ा नावाने दिले जात होते.