Leading International Marathi News Daily

बुधवार, १ जुलै २००९

व्यक्तिवेध

‘सिम्पल, इनएक्स्पेन्सिव्ह, मल्टिलिंग्वल कॉम्प्युटर’ - अर्थात ‘सिंप्युटर’. या साध्या, विनाखर्चिक आणि बहुभाषी ‘सिंप्युटर’मागे ज्या व्यक्तीची प्रामुख्याने प्रेरणा आहे तिचे नाव आहे विनय देशपांडे. ‘वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’मध्ये २००० या वर्षांत अझीम प्रेमजी आणि एन. आर. नारायण मूर्ती यांचा उल्लेख तंत्रज्ञानाचे जनक म्हणून करण्यात आला. त्यानंतर बरोबर वर्षभरानेच या व्यासपीठाने ज्या आणखी काहीजणांचा उल्लेख तंत्रज्ञानाचे जनक म्हणून केला, त्यात विनय एल. देशपांडे यांचा समावेश

 

होता. देशपांडे हे ‘एन्कोर सॉफ्टवेअर’चे प्रमुख आहेत. बंगलोरमध्ये संगणकाविषयी ते १९७३पासून संशोधन करीत आहेत. स्टॅन्फर्ड युनिव्हर्सिटीतून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये पदव्युत्तर पदवी मिळवून ते बंगलोरमध्ये आले. तेव्हापासून ते संगणकाच्या सॉफ्टवेअरमध्ये काम करीत आहेत. ‘तुम्ही मला या विषयाचे प्रणेते वगैरे म्हणू नका. आमचे काम हे प्रामुख्याने सॉफ्टवेअरच्या निर्यातीसंबंधीचे आहे,’ असे ते म्हणतात. अमेरिकेत त्यांच्याबरोबर काम करणारे सहाध्यायी भारतात आले आणि त्यांनी उत्साहाने कामही सुरू केले, पण काही महिन्यांनी ते अमेरिकेत परत गेले. भारतात सर्वच विषयांत असणारी अनिश्चितता पाहून देशपांडे यांचे ते सहाध्यायी परत गेले. देशपांडे यांनी मात्र आपली चिकाटी सोडली नाही. ‘एन्कोर’ने सिंप्युटर बनवायला प्रारंभ केला आणि सध्या काही सिंप्युटर तयारही आहेत. हे सिंप्युटर आपल्या तळहातावर मावतील एवढे लहान आणि कुठूनही कुठेही नेता येतील, एवढे हलके आहेत. शेतकऱ्यांना या सिंप्युटरमार्फत ज्ञान मिळावे हा आपला उद्देश असून, विविध भाषांमध्ये त्याला ते याद्वारे मिळणार आहे. ब्राझील सरकारच्या शिक्षण मंत्रालयाने त्यांच्याकडे दीड लाख सिंप्युटरची मागणी यापूर्वीच नोंदवली आहे. ‘एन्कोर’ने भारतीय लष्करासाठी ‘सिच्युएशनल अवेअरनेस अॅन्ड टॅक्टिकल हँडहेल्ड इन्फर्मेशन’ - ‘साथी’ हे नवे उपकरण बनवायला घेतले आहे. ज्या भागात प्रामुख्याने घुसखोरी केली जाते, त्या भागात लष्कराला या उपकरणाचा निश्चित उपयोग होईल. पोलीस खातेही त्याचा वापर करू लागेल. सिंप्युटरच्या माध्यमातून शेतकऱ्याला ‘इंटरनेट’द्वारा उपलब्ध होणारी शेती आणि हवामानाविषयीची सर्व माहिती मिळू शकणार आहे. देशपांडे हे स्वत: ‘मॅन्युफॅक्चर्स असोसिएशन फॉर इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी’चे अध्यक्षही आहेत. स्वाभाविकच या विषयात निर्माण होणाऱ्या सर्व अडचणींचा लेखाजोखा घेणे त्यांना शक्य होते. भारतीयांमध्ये काम करण्याची जिद्द असली तरी ते बऱ्याचदा आत्मसंतुष्ट वृत्तीने वागतात. त्यामुळे ते धोका पत्करायला तयार होत नाहीत, असे त्यांचे म्हणणे आहे. सध्या आपल्या हातात पाच कोटी अमेरिकन डॉलर एवढय़ा रकमेची निर्यात मागणी आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. काही महिन्यांपूर्वी देशपांडे मोरोक्कोमध्ये गेले असता त्यांनी तेथे विद्यार्थ्यांसमोर भाषण केले. त्यांचे ते भाषण ऐकून प्रभावित झालेल्या विद्यार्थ्यांनी सभागृहाबाहेर चक्क त्यांच्या पाया पडून त्यांना वंदन केले. ‘३२ एमबी’चा सिंप्युटर बाजारात येईल तेव्हा त्याची किंमत नऊ हजार रुपयांच्या घरात असेल. भारतीय भाषा जाणणारी प्रणाली या ‘सिंप्युटर’मध्ये आहे. ‘इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स’मधल्या शास्त्रज्ञांनीही आपल्याला या उपक्रमात सहकार्य दिल्याचे ते प्रांजळपणे मान्य करतात. देशपांडे यांना डॉ. विजय चंद्रू, डॉ. स्वामी मनोहर, डॉ. व्ही. विजय आणि डॉ. रमेश हरिहरन यांनी सिंप्युटरच्या संशोधनात मदत केली. ‘एन्कोर’च्या मार्क मथाइस आणि शशांक गर्ग यांनी ‘सिंप्युटर’साठी बरेच कष्ट घेतले आहेत. इंग्रजी न जाणणाऱ्या बहुसंख्य समाजाला आपला ‘सिंप्युटर’ उपयोगी पडेल, असा त्यांना विश्वास आहे. खेडेगावातच काय, पण मोठय़ा शहरांमध्ये गरीब वस्तीत राहाणाऱ्यांना संगणक हे आजही स्वप्नच आहे, पण ‘सिंप्युटर’मुळे संगणकाचे सर्व फायदे त्यांना मिळतील. सिंप्युटरसाठी लागणारे सॉफ्टवेअर देशपांडे यांनीच विकसित केले आहे. पुढच्या महिन्यात त्यांच्याकडे १००-१५० सिंप्युटर प्रत्यक्ष कार्यवाहीत येतील. त्यानंतर त्यांचे व्यावसायिक उत्पादन सुरू करण्यात येणार आहे.