Leading International Marathi News Daily

बुधवार, १ जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

कौंडण्यपूर, चांदूर बाजारच्या दिंडय़ा पंढरपुरात
अमरावती, ३० जून / प्रतिनिधी

 

आषाढी एकादशीसाठी अमरावती जिल्ह्य़ातील शेकडो वारकरी पंढरपूरच्या दिशेने रवाना झाले असून कौंडण्यपूर येथील विठ्ठल-रुक्मिणी संस्थानची पालखी सुमारे दीडशे वारकऱ्यांसह उद्या, १ जुलैला पंढरपूर येथे पोहोचत आहे. तर चांदूर बाजारच्या संत गुलाबराव महाराज संस्थानची दिंडी सोमवारी पंढरपुरात दाखल झाली. या दिंडीत ४०० वारकरी सहभागी झाले आहेत. या दोन प्रमुख पायदळ दिंडय़ांसह अनेक गावांमधील वारकरी विठ्ठल दर्शनाचा सोहोळा अनुभवण्यासाठी पंढरपूर येथे पोहोचत आहेत.
कौंडण्यपूर येथील विठ्ठल-रुक्मिणी संस्थानच्या पायदळ वारीला सुमारे ४०० वर्षाचा इतिहास आहे. सदाराम महाराज यांनी पंढरपूरची वारी सुरू केली होती. दरवर्षी येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातून आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला पालखी नेली जाते. गेल्या २६ मे रोजी संजय महाराज ठाकरे आणि संस्थानचे संचालक अरविंद विरूळकर यांच्यासह दीडशे वारकरी कौंडण्यपूरहून रवाना झाले. ही पालखी मार्गक्रमण करीत असताना या दिंडीत २००च्या वर वारकरी सहभागी होतात.
पंढरपूर येथे विठ्ठल-रुक्मिणी संस्थानचा मठ असून याठिकाणी वारकऱ्यांची सोय केली जाते. पंढरपुरातही कौंडण्यपूरच्या पालखीला अग्रक्रम दिला जातो. संस्थानचे अध्यक्ष वसंतराव कदम आणि सचिव नामदेव अंबाडकर हे गेल्या अनेक वर्षापासून या दिंडीचे नियोजन करीत आहेत. १ जुलैला ही पालखी पंढरपुरात पोहोचणार आहे.
चांदूर बाजारच्या भक्तिधाम येथील संत गुलाबराव महाराज संस्थानची पायदळ दिंडी २८ मे रोजी संस्थानचे नानाजी इंगोले आणि मधुकरराव काळे यांच्या मार्गदर्शनात पंढरपूरकडे रवाना झाली. सोमवारी ही दिंडी पंढरपूर येथे पोहोचली. गुलाबराव महाराज संस्थानमधून अनेक वारकरी पायदळ पंढरपूर येथे दर्शनासाठी जात होते. पण, गेल्या दहा वर्षापासून त्याला व्यापक स्वरूप देण्यात आले. दरवर्षी आषाढी एकादशीला संत गुलाबराव महाराज संस्थानची पालखी पंढरपूर येथे पोहोचते, तर कार्तिकी एकादशीला ही पालखी आळंदी येथे जात असते. या दिंडीत ४०० वारकरी सहभागी झाले आहेत.
सोबतच पूर्व विदर्भातून पंढरपूरला जाणाऱ्या अनेक पालख्या मार्गस्थ होत असताना अमरावती शहरात येतात. त्यांचा येथे मुक्काम असतो. ठिकठिकाणी या पालख्यांचे स्वागत केले जाते. या दिंडय़ांमधील वारकऱ्यांची सर्व व्यवस्था भाविक मोठय़ा भक्तीभावाने करतात.