Leading International Marathi News Daily

बुधवार, १ जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

शंभर टक्के क्षेत्रात पेरणीबाबत कृषी तज्ज्ञ साशंक
चंद्रपूर, ३० जून/प्रतिनिधी

 

अत्यल्प पावसामुळे खरीप हंगामाच्या पेरणीला हळुवार सुरुवात झाली असून गेल्या वर्षी आजच्या तारखेपर्यंत ५० टक्के पेरणी आटोपली होती तेथे यंदा केवळ ८४० हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. पावसाची हीच स्थिती राहिली तर यंदा शंभर टक्के क्षेत्रात पेरणी होणार की नाही, अशी भीती कृषी खात्याकडून वर्तवली जात आहे.
आज येणार उद्या येणार म्हणता म्हणता यंदा पावसाने बराच विलंब केल्याने खरीप हंगामाच्या पेरणीला देखील उशिरा सुरुवात झाली. गेल्या आठवडय़ात चांगला पाऊस झाल्यानंतर शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष पेरणीला सुरुवात केली. जिल्ह्य़ात यंदा खरीप हंगामासाठी साडेचार लाख हेक्टर पेरणी क्षेत्र निर्धारित करण्यात आले आहे. यावेळी एक लाख ५९ हजार हेक्टर क्षेत्रात भात, सोयाबीन १.८० हजार हेक्टर, कापूस ५० हजार हेक्टर, तूर ३२ हजार हेक्टर, खरीप ज्वारी २ हजार हेक्टर क्षेत्रात घेण्यात येणार असल्याचे नियोजन करण्यात आले. फळबागाचे लक्षांक ५०० हेक्टर ठेवण्यात आले आहे. कृषी खात्याचे हे नियोजन लक्षात घेतले आणि पावसाची सध्या स्थिती पाहता ५० हजार हेक्टर क्षेत्रात कपाशीची लागवड कुठल्याही परिस्थितीत शक्य नाही. पाऊस लांबल्याने ही सर्व परिस्थिती उद्भवली आहे. त्यामुळे यंदा कापसाचे उत्पादन २० ते २५ टक्क्यांनी कमी होणार, असा कृषी खात्याचा अंदाज आहे.
गेल्या वर्षी आजच्या तारखेपर्यंत ५० टक्के पेरण्या आटोपल्या होत्या तिथे यंदा केवळ ८४० हेक्टर क्षेत्रात पेरणी झाली आहे. चंद्रपूर, नागभीड, सिंदेवाही, भद्रावती, ब्रह्मपुरी व वरोरा या तालुक्यातच चांगला पाऊस झाल्याने इथे धान व सोयाबीनची पेरणी सुरू झाली आहे. बल्लारपूर, राजुरा, जिवती, कोरपना, गोंडपिंपरी, पोंभूर्णा, चिमूर, मूल व सावली या तालुक्यात पावसाचे प्रमाण अत्यल्प असल्याने पेरणीच्या कामाला अजूनही सुरुवात झालेली नाही. उशिराने पेरणी झाल्यास झाडांच्या वाढीवर त्याचा विपरीत परिणाम होतो. तसेच रोगांच्या प्रश्नदुर्भावाची शक्यताही वाढते. कोरडवाहू शेती असल्याने कापूस उत्पादकांना सध्याच्या स्थितीत अधिक फटका बसणार आहे.
पावसाला आणखी उशीर झाल्यास कापसाचे पीक घेणारा शेतकरी वर्ग सोयाबीनकडे वळण्याची शक्यता असल्याने सोयाबीनच्या क्षेत्रात वाढ होणार आहे. या जिल्ह्य़ात सोयाबीनचे १.८० हजार हेक्टर क्षेत्र आहे. आता हे क्षेत्र दोन लाखाच्या वर जाण्याची शक्यता कृषी विभागाने वर्तवली आहे. सोयाबीनची लागवड १५ जुलै पर्यंत शक्य असल्याने या पिकांची वेळेतच लागवड शक्य होणार आहे. या जिल्ह्य़ात धानाचे क्षेत्र एक लाख ५८ हजार हेक्टर आहे. धान उत्पादकांचा कल जास्त कालावधीच्या वाणाकडे आहे. या वाणाचे पऱ्हे आतापर्यंत टाकणे गरजेचे होते. मात्र, पाऊस नसल्याने धान उत्पादकांनाही संकटाला सामोरे जावे लागत आहे. पावसाला आणखी उशीर झाल्यास कास्तकारांनी हलक्या वाणाचे उत्पादन घ्यावे, असे कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. सध्या बियाणे आणि खते पुरेशा प्रमाणात उपलब्ध असली तरी पाऊस बेपत्ता झाल्याने ही सर्व स्थिती उद्भवली आहे. या आठवडय़ात सलग पाऊस सुरू राहिला तर पेरणीच्या कामाला गती येणार आहे.
गेल्या वर्षी खरीप हंगामात चार लाख १० हजार हेक्टरवर पीक लागवडीचे लक्ष्य होते. प्रत्यक्षात मात्र चार लाख ३५ हजार हेक्टरवर लागवड झाली. त्यात प्रति हेक्टर पाच हजार ५१२ क्विंटलचे उत्पन्न झाले. यात भात पीक एक लाख ५५ हजार ४० हेक्टरवर होते. यंदा निसर्गाने साथ दिली तर या उत्पन्नात आणखी वाढ होण्याची शक्यता कृषी विभागाने वर्तवली आहे. यावर्षी भाताचे क्षेत्र १.८० लाख हेक्टर आहे. चांगला पाऊस पडला तर या क्षेत्रात वाढ होईल. सोयाबीनच्या पेऱ्यात यंदा कमालीची वाढ होण्याची शक्यता जिल्हा कृषी विकास अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. एकूणच सध्या किमान आठवडाभर पावसाची गरज आहे. चांगला पाऊस झाला तर पेरणीच्या कामाला गती येईल आणि पीकही चांगले येईल, अशी आशा कृषी खात्याकडून वर्तवली जात आहे.