Leading International Marathi News Daily

बुधवार, १ जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

स्वच्छ ग्राम जिल्हास्तरीय स्पर्धेत दत्तपूर प्रथम
जिल्हास्तरीय मूल्यमापन समितीचा निकाल घोषित
बुलढाणा, ३० जून / प्रतिनिधी

 

संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानांतर्गत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेचा निकाल जिल्हा मूल्यमापन समितीने आज घोषित केला असून या स्पर्धेत बुलढाणा तालुक्यातील दत्तपूर ग्रामपंचायतीने प्रथम पुरस्कार पटकावला आहे. नांदुरा तालुक्यातील धानोरा ग्रामपंचायतला द्वितीय पुरस्कार तर खामगाव तालुक्यातील राहुड व बुलढाणा तालुक्यातील अजिसपूर ग्रामपंचायतींना तृतीय पुरस्कार विभागून देण्यात आला आहे.
या पुरस्काराची घोषणा आज जिल्हा परिषदेच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात जिल्हा मूल्यमापन समितीच्या अध्यक्षा व अहमदनगर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शालिनी विखे पाटील यांनी केली. यावेळी बुलढाणा जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश पाटील, नगर जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजाराम माने, बुलढाणा जिल्हा परिषद अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी बी.एन. उबाळे, अजिंक्य पवार, आर.पी. तायडे, एस.एस. नागापूरकर, कँफो प्र.द. ताठे उपस्थित होते.
शालिनी विखे पाटील यांच्या नेतृत्वात जिल्हास्तरीय मूल्यमापन समिती २६ जूनला जिल्ह्य़ाच्या दौऱ्यावर आली होती. या समितीने अभियानात सहभागी झालेल्या २३ ग्रामपंचायतची प्रत्यक्ष पाहणी करून अहवाल तयार केला. त्यात प्रथम दत्तपूर, द्वितीय धानोरा, तृतीय (विभागून) राहुड व अजिसपूर यांच्या कार्याचे शालिनीताईंनी कौतुक केले. इतर पुरस्कारप्रश्नप्त ग्रामपंचायतमध्ये खालील ग्रामपंचायतीचा समावेश आहे.
सानेगुरुजी स्वच्छ शाळा प्रथम पुरस्कार, शिलोडी ता. चिखली, सावित्रीबाई फुले स्वच्छ अंगणवाडी पुरस्कार वसाडी बु. ता. नांदुरा, विशेष पुरस्कार कुटुंब कल्याण मांडवा ता. जळगांव जामोद, पाणी व सांडपाणी व्यवस्थापनाचा पुरस्कार येऊलखेड ता. शेगांव, सामाजिक एकतेचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार जांभूळ ता. लोणार, शाहू, फुले, आंबेडकर दलित वस्ती विकास व सुधारणा अभियानांतर्गत प्रथम पुरस्कार वकाणा ता. संग्रामपूर, द्वितीय कुंड ता. मलकापूर व तृतीय पुरस्कार गोहोगाव ता. मेहकर यांना मिळाला आहे.
या पुरस्काराचे वितरण आज जिल्हा परिषदेच्या सभागृहात मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी पुरस्कारप्रश्नप्त ग्रामपंचायतीचे सरपंच, ग्रामसेवक व नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते. दत्तपूर ग्रामपंचायततर्फे सरपंच वसंत जाधव, पंचायत समिती सदस्य भागवत वानरे, उपसरपंच रामधन तायडे व ग्रामसेवक अशोक काळे यांनी पुरस्कार स्वीकारला.