Leading International Marathi News Daily

बुधवार, १ जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

पाऊस थांबला, पेरण्यांची लगबग कापसाचा पेरा वाढणार
यवतमाळ, ३० जून / वार्ताहर

 

जिल्ह्य़ात एखाद्या तालुक्याचा अपवाद वगळता बारा तास झालेल्या दमदार पावसाने सोमवार-मंगळवार विश्रांती घेतल्याने शेतकऱ्यांना पेरणीसाठी चांगलीच सवड मिळाली आहे. मृग आणि रोहिणी नक्षत्र कोरडे गेल्यावर आद्र्राच्या उत्तरार्धात पावसाने जिल्ह्य़ात दमदार हजेरी लावल्याने नदीनाले खळाळून वाहू लागले. तशातच अपेक्षेप्रमाणे पावसाने विश्रांती घेतली आणि वातावरण ढगाळ राहिले त्यामुळे कमी तापमानात शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात केली आहे. जिल्ह्य़ात कापूस आणि सोयाबीन ही दोन मुख्य पिके आहेत. एकूण ९ लाख हेक्टर क्षेत्रात यंदा पेरणीचे नियोजन झाले आहे. त्यापैकी साडेतीन लाख हेक्टरमध्ये कापूस आणि तीन हेक्टरमध्ये सोयाबीनच्या पेरणीचा अंदाज आहे.
बी-बियाणे आणि रासायनिक खते यांची आवश्यकतेप्रमाणे उपलब्धता असून शेतकऱ्यांनी पेरणीपूर्व सर्व तयारी केलेली असल्याने पावसाच्या दमदार आगमनाबरोबरच क्षणाचीही उसंत न घेता बळीराजाने पेरणीला सुरुवात केली आहे.कापूस आणि सोयाबीनशिवाय तूर, ज्वारी, उडीद, मूग, भुईमूग आणि ऊस इत्यादी पिकेसुद्धा घेतली जातात पण, त्यांचे प्रमाण कमी आहे.कापसाचा पेरा यंदासुद्धा सोयाबीनपेक्षा जास्त राहणार असल्याचा अंदाज आहे. यवतमाळ जिल्हा महाराष्ट्रात ‘पांढऱ्या सोन्या’ साठी प्रसिद्ध आहे. कापूस हे नगदी आणि हमखास येणारे पीक आहे. कापसाला हमी भावसुद्धा चांगला आहे. निश्चित खरेदीदार आहे आणि ‘कपात’ नाही, तसेच पंधरा दिवसात पूर्ण चुकारा मिळतो, त्यामुळे कापसाकडे जास्त कल आहे. उलट सोयाबीनच्या भावात चढउताराची शक्यता जास्त असते म्हणून सोयाबीनला कापसाच्या तुलनेने प्रश्नधान्य कमी आहे.