Leading International Marathi News Daily

बुधवार, १ जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

बळीराजा सुखावला
आर्णी, ३० जून / वार्ताहर

 

तालुक्यात पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी राजा सुखावला असून आता पेरणीच्या कामी लागला आहे. नदी-नाल्यात बऱ्याच दिवसांनी पाणी वाहत आहे. अडाण, अरुणावती नदी खळखळून वाहू लागल्याने त्याचा आनंद लोकांनी नदीच्या पुलावर जाऊन घेतला. रात्री झालेल्या पावसाने असंख्य नाले वाहू लागले. त्यामुळे पाणी टंचाईच्या दृष्टीने टंचाईग्रस्त गावातील लोकांना व जनावरांना मोठा दिलासा मिळाला आहे.
शेतकऱ्यांनी तब्बल एक महिन्यापासून बियाणे व रासायनिक खते घेण्याची तयारी चालवली होती. मात्र, पावसाने दगा दिल्याने एक महिना पेरण्या लांबल्या, असे चित्र असून यांचा पिकाच्या उत्पन्नावर फरक पडण्याची शक्यता शेतकऱ्यांत वर्तवली जात आहे.
पाऊस येण्याची शक्यता ढगाळ वातावरणावरून दिसत होती. त्यामुळे काही शेतकऱ्यांनी दोन दिवसांपूर्वी पेरणी सुरू केली होती. त्यांच्या पेरण्या साधल्या आहेत. पावसासोबतच शेतकऱ्यांना राशी-२ सारखे कापसाचे बियाणे एक हजार रुपये बॅगपर्यंत घ्यावे लागले. बोगस खतामुळे शेतकऱ्यांचा व्यापाऱ्यांवरील विश्वास डळमळीत झाला आहे. कापूस राशी-२ व सोयाबीन या बियाण्यासाठी शेतकऱ्यांनी प्रथम पसंती दिली असून गोदावरी कंपनीच्या डी.ए.पी. या मिश्रखताची मागणी मोठय़ा प्रमाणात होती. मात्र, हे खत बऱ्याच शेतकऱ्यांना मिळू शकले नाही. तुटवडा असल्याचे कारण दाखवून व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांचा हिरमोड केला.
आर्णी भागात रासायनिक खताचा बोगस साठा कृषी अधिकाऱ्यांनी पोलिसांच्या मदतीने जप्त केला असून हा गैरप्रकार गेल्या दोन ते तीन वर्षापासून सुरू होता, अशी चर्चा आहे. या प्रकरणात १३ आरोपींवर गुन्हा दाखल झाला असून काही व्यापाऱ्यांनी नियमबाह्य़ खताचा साठा ठेवल्याने एकूण पाच कृषी दुकानांचे परवाने निलंबित करण्यात आले आहे.