Leading International Marathi News Daily

बुधवार, १ जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

ग्रामरोजगार सेवक मानधनापासून वंचित
बुलढाणा, ३० जून / प्रतिनिधी

 

रोजगार हमी योजनेत नाव नोंदविणाऱ्या कामगारांना न्याय मिळावा म्हणून ग्रामरोजगार सेवकांची नियुक्ती करण्यात आली. मात्र, या ग्राम रोजगार सेवकाला ही योजना सुरू झाल्यापासून एक रुपयाही मानधन मिळाले नाही.
जिल्ह्य़ाला योजनेचे कोटय़वधी रुपये उपलब्ध होत असताना गावात कामे होत नाहीत. मजुरांना काम मिळत नाही, असे गौडबंगाल या योजनेमागे आहे. ग्रामरोजगार सेवकांनी आपल्या हक्कासाठी, मजुराच्या भाकरीसाठी, गाव समृद्धीसाठी संघटितपणे लढले पाहिले, असे प्रतिपादन कम्युनिस्ट नेते राजन क्षीरसागर यांनी येथे केले. सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन (सीटू) संलग्न महाराष्ट्र ग्रामरोजगार सेवक संघटनेच्यावतीने प्रगती वाचनालयात ग्राम रोजगार सेवकांचा मेळाव्यात या सेवक संघटनेचे राज्यसचिव राजन क्षीरसागर बोलत होते. व्यासपीठावर सीटूचे पंजाबराव गायकवाड, महेश वाकदकर हे उपस्थित होते. क्षीरसागर पुढे म्हणाले की, २१ हजार ग्रामरोजगार सेवकांना संघटित करण्याचे काम संघटना करीत आहे. मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, खान्देश या ठिकाणी संघटनेच्या आंदोलनाला यश प्रश्नप्त होत असून विदर्भातही या संघटनेची आवश्यकता आहे. कोरडवाहू भागातील ग्रामीण बेरोजगारीचा विचार करता रो.ह. योजना प्रभावीपणे राबविल्या जावी, गावातील मजुरांनी कामाची मागणी केली पाहिजे व हक्कासाठी लढले पाहिजे, असेही ते म्हणाले.
‘जॉबकार्ड’ खतविणे, फोटो कार्यक्रम राबविणे, रजिस्टर मस्टर बाळगणे, नोंदी करणे यासारखी अनेक कामे ग्राम रोजगार सेवकाला करावी लागतात. त्यांची जबाबदारीच्या पदावर नियुक्ती करण्यात आली. मात्र, शासनाने ग्रामरोजगार सेवकाला अद्यापही मानधन दिले नसल्याने ग्राम रोजगार सेवक आणि मजुरांमध्ये असंतोष आहे. ग्रामरोजगार सेवकांनी आपल्या प्रश्नासाठी संघटित लढा दिल्याशिवाय न्याय मिळणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
प्रश्नस्ताविक महेश वाकदकर यांनी केले. पंजाबराव गायकवाड यांनी आभार मानले. या मेळाव्याला प्रदीपसिंग राजपूत, मदन जाधव, भास्कर भालेराव, बाबुराव काळे, धनसिंग पाडळे, विष्णू बोराडे, रंगनाथ नप्ते, भिमराव धंदर, जगन्नाथ गोबरे, दत्ता शेळके, हमिदखाँ असलमखाँ पठाण, गजानन सोनोने, पांडुरंग उबरहंडे, सुरेश सोर उपस्थित होते.