Leading International Marathi News Daily

बुधवार, १ जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

शिष्यवृत्ती देताना भेदभावाचा आरोप
अमरावती, ३० जून / प्रतिनिधी

 

येथील शिवाजी जैव तंत्रज्ञान महाविद्यालयातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देताना भेदभाव करण्यात आल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला असून इतर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना तीन वर्षात ४५ हजार रुपये एवढी शिष्यवृत्ती मिळालेली असताना या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची मात्र केवळ १५ हजारावर बोळवण करण्यात आली.
याप्रकरणी शासन दफ्तरी न्याय मागून थकल्यानंतर आता या विद्यार्थ्यांनी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्याकडे निवेदन पाठवून विद्यार्थ्यांना आत्महत्या करण्याची परवानगी द्यावी, अशीच थेट विनंती केली आहे. शिवाजी जैव तंत्रज्ञान महाविद्यालयातील ३० च्यावर विद्यार्थ्यांनी २००५-०६ या शैक्षणिक वर्षात प्रवेश घेतला होता. प्रवेशाच्यावेळी या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना पूर्ण शिष्यवृत्ती देण्यात येईल आणि तुमचे शिक्षण नि:शुल्क होईल, असे आश्वासन महाविद्यालयातील प्रतिनिधींनी दिले होते. मात्र, पहिल्या वर्षी केवळ पाच हजार रुपये शिष्यवृत्ती मिळाली. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाशी संलग्नित असलेल्या दुसऱ्या वसुधाताई देशमुख कॉलेज ऑफ फुडटेक या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना शिकवणी शुल्काच्या पूर्ण दराने ४५ हजार रुपये प्रती विद्यार्थी अशी शिष्यवृत्ती देण्यात आल्याची माहिती या विद्यार्थ्यांना मिळाल्यानंतर हे विद्यार्थी बुचकळ्यात पडले. त्यांनी येथील समाजकल्याण अधिकाऱ्यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी नवीन शासन निर्णय आल्याचे सांगितले. नंतर या विद्यार्थ्यांनी माहितीच्या अधिकाराअंतर्गत राज्यातील इतर महाविद्यालयांमधील परिस्थिती जाणून घेतली. तेव्हा त्यांना धक्काच बसला. इतर सर्व महाविद्यालयांमध्ये मागासवर्गीय विद्यार्थ्यांना दरवर्षी १५ ते १६ हजार रुपये शिष्यवृत्ती मिळत आहे. राज्यातील पाच कायम अनुदानित महाविद्यालयांमध्येही हीच परिस्थिती आहे. हे त्यांना कळले. त्यावर विद्यार्थ्यांनी समाज कल्याण अधिकाऱ्यांची पुन्हा भेट घेतली. त्यावेळी इतर जिल्ह्य़ातील अधिकाऱ्यांनी चुकीच्या पद्धतीने शिष्यवृत्तीचे वाटप केल्याचा अजब खुलासा केला.
हतबल झालेल्या विद्यार्थ्यांनी आतापर्यंत शासनस्तरावर अनेक निवेदने पाठवली आहेत पण, त्यांच्या मागण्यांची दखल घेतली गेली नाही, ही खंत त्यांना आहे. गरीब कुटुंबातील या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रत्येकी १ लाख रुपये खर्च येतो. तो शिष्यवृत्तीच्या माध्यमातून भरून काढण्याचा त्यांचा प्रयत्न होता. मात्र, तीन वर्षात केवळ १५ हजार रुपये एवढीच शिष्यवृत्ती त्यांना देण्यात आली आहे.