Leading International Marathi News Daily

बुधवार, १ जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

लिलावापूर्वीच वाळूचे अवैध उत्खनन
भंडारा, ३० जून / वार्ताहर

 

भंडारा जिल्ह्य़ात सर्वात जास्त महसूल हा वैनगंगा नदीच्या वाळूपासून मिळतो. जिल्ह्य़ातील ७५ वाळू घाटांपैकी फक्त १९ घाटांचा लिलाव झाला. घट असली तरी वाळूचे अवैध उत्खनन मात्र सर्वत्र सुरू आहे.
वैनगंगा नदीची वाळू उत्कृष्ट असल्याने या वाळूला मोठय़ा प्रमाणात मागणी आहे. घराच्या बांधकामासाठी बहुतेक वाळू नागपूरला पाठविली जाते. दरवर्षी बहुतेक वाळू घाटांचा लिलाव केला जातो. त्यातून वर्षाकाठी सात ते आठ कोटी रुपयांचा महसूल जिल्हा प्रशासनाला मिळतो. परंतु, यंदा जिल्ह्य़ातील ७५ घाटांपैकी फक्त १९ वाळू घाटांचा लिलाव झाला आहे. तरीसुद्धा नियम धाब्यावर बसवून रात्रंदिवस वाळूचे अवैध उत्खनन केले जात आहे. याविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आंदोलन केले होते. मात्र, या आंदोलनापुढे प्रशासन झुकले नाही.
सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंतच वाळूचे उत्खनन केले जावे, असा न्यायालयाने ठरविलेला नियम आहे. मात्र, रात्री लाईट सुरू करून घाटांवर उत्खनन होत आहे. रात्री वाळू भरलेले ट्रक गावातून जात असल्याने परिसरातील नागरिक त्रस्त आहेत. अतिरिक्त वाळू ट्रकमध्ये भरल्याने रस्त्यांचीही दुर्दशा झाली आहे. कोरंबी येथे घाट नाही तरी, ट्रॅक्टरने अवैधरीत्या वाळूची वाहतूक केली जाते. अशीच काहीशी परिस्थिती जिल्ह्य़ातील नदीकाठच्या गावांची आहे. एखादा गरीब बैलगाडी मुरूम, वाळू किंवा गिट्टीची वाहतूक करीत असेल तर तलाठी, मंडल अधिकारी किंवा तहसीलदार त्याला दंड करतात. मात्र, लाखोंची अवैध वाहतूक करणाऱ्यांसाठी रान मोकळे दिसत आहे.बहुतेक वाळूघाट हे राजकारण्यांचेच असल्याने अधिकारी त्यांच्यावर कारवाई करण्यास कचरतात. त्यामुळे जिल्हा प्रशासनाचा कोटय़वधी रुपयांचा महसूल बुडत आहे.