Leading International Marathi News Daily

बुधवार, १ जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

प्रमोद महाजन स्मृती रुग्णालय परिसरात परिचारिका निवासस्थानांचे भूमिपूजन
अमरावती, ३० जून / प्रतिनिधी

 

गुरूकुल बहुउद्देशीय शिक्षण संस्थेच्यावतीने मेळघाटातील काटकुंभ या दुर्गम गावी उभारण्यात येत असलेल्या प्रमोद महाजन स्मृती जिजाऊ - शिवाजी रुग्णालय परिसरात डॉक्टर, परिचारिका तसेच रुग्णांच्या आप्तांसाठी बांधल्या जाणाऱ्या निवासस्थानांचे भूमिपूजन यवतमाळ अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेचे अध्यक्ष भाऊसाहेब मारोडकर यांच्या हस्ते करण्यात आले.
खासदार बाळासाहेब आपटे यांच्या स्थानिक विकासनिधीतून ही वास्तू बांधण्यात येणार आहे. या वास्तूच्या निर्मितीसाठी विविध संस्था व जनतेने मदत केली आहे. मेळघाटच्या दुर्गम भागात वसलेल्या काटकुंभ येथे आदिवासींच्या सोयीसाठी सुसज्ज असे रुग्णालय स्थापन व्हावे, अशी इच्छा प्रमोद महाजन यांनी व्यक्त केली होती. गुरूकुल बहुउद्देशीय शिक्षण संस्थेने हे रुग्णालय उभारण्याची जबाबदारी स्वीकारली आहे.
भूमिपूजन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गुरूकुलचे अध्यक्ष व भाजपचे जिल्हा सरचिटणीस तुषार भारतीय होते. यावेळी चंद्रकांत रानडे, रमेश बोचरे, मधु येनूकवार, उद्धवराव येरमे, मोहन देव उपस्थित होते. रूग्णालयाला वैद्यकीय सेवा पुरवणारे डॉ. अभिषेक मिसर हेही यावेळी उपस्थित होते. रुग्णालयाचा कारभार सुरळीत चालावा आणि आदिवासी जनतेच्या सेवेत रुग्णालय तात्काळ रुजू व्हावे यासाठी यवतमाळ अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्यावतीने १ लाख २१ हजार रुपयांची देणगी देण्यात आली. कार्यक्रमाचे संचालन संस्थेचे सचिव गजानन कोल्हे यांनी केले. तर पंढरी साठे यांनी आभार मानले.