Leading International Marathi News Daily

बुधवार, १ जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

डॉ. स्मिता कोल्हेंवरील हल्लेखोरांना अटक करण्यात अपयशच!
अमरावती, ३० जून / प्रतिनिधी

 

मेळघाटातील दुर्गम भागात आदिवासींची सेवा करणाऱ्या डॉ. स्मिता कोल्हे यांच्यावरील प्रश्नणघातक हल्ल्याप्रकरणी आरोपीला अटक करण्यात पोलिसांना अजूनही यश मिळालेले नाही. डॉ. कोल्हेंवर येथील डॉ. चंद्रशेखर कुळकर्णी यांच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सोमवारी वनराईचे अध्यक्ष गिरीश गांधी आणि विचारवंत भा.ल. भोळे यांनी त्यांची रुग्णालयात भेट घेतली.
गेल्या शनिवारी बैरागड जवळील डॉ. स्मिता कोल्हे यांच्या शेतात एका समाजकंटकाने त्यांच्यावर लोखंडी सळाखीने वार केले होते. या हल्ल्यात त्यांच्या हाताला जबर ‘फ्रॅक्चर’ झाले असून घटनेला तीन दिवस उलटूनही आरोपी शेख मुस्ताक शेख बिस्मील्ला याला अटक करण्यात पोलिसांना यश मिळालेले नाही.
शनिवारी डॉ. स्मिता कोल्हे या अॅड. प्रदीप मांजरे यांच्यासोबत त्यांच्या मारोती कारने शेतातून घराकडे परतत असताना शेख मुस्ताकने त्यांच्यावर हल्ला चढवला. हा हल्ला पूर्वनियोजित होता, अशी माहिती प्रश्नप्त झाली आहे. घटनेच्या आधीच सकाळी डॉ. कोल्हे यांचा मुलगा शेतात ट्रॅक्टर घेऊन जात असताना शेख मुस्ताकने कोल्हे कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. आरोपीचा आपल्याला जीवे मारण्याचा हेतू होता, असे डॉ. कोल्हे यांनी धारणी पोलिसांना सांगितले पण, पोलिसांनी केवळ भादंवि कलम ३२५ अन्वये गुन्हा नोंदवला.
२००२ मध्ये डॉ. कोल्हे यांनी सरकारी लिलावात शेख अजीम शेख बिस्मील्ला यांची शेती खरेदी केल्यापासून आतापर्यंत तीन वेळा कोल्हे कुटुंबावर प्रश्नणघातक हल्ले झाले आहेत. २००६ मध्ये शेख अजीम व त्याच्या सात साथीदारांनी त्यांची झोपडी आणि मोटारसायकल जाळून त्यांना मारण्याचा प्रयत्न केला होता. तर गेल्यावर्षी डिसेंबरमध्येही त्यांचे घर पेटवून देण्याचा प्रयत्न झाला. यावेळी हल्ला करणारा शेख मुस्ताक हा शेख अजीमचा भाऊ आहे.
दरम्यान, भा.ल. भोळे आणि गिरीश गांधी यांनी कुळकर्णी हॉस्पिटलमध्ये जाऊन डॉ. स्मिता कोल्हे यांची भेट घेतली. यावेळी डॉ. रवींद्र कोल्हे हेही उपस्थित होते. हल्ल्याच्या घटनेनंतर शेख मुस्ताक हा फरार झाला. सध्या आरोपीचा शोध घेतला जात आहे, असे धारणी पोलिसांनी सांगितले.