Leading International Marathi News Daily

बुधवार, १ जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

विदर्भासह दहा राज्यांचे प्रस्ताव केंद्राकडे पडून
यवतमाळ, ३० जून / वार्ताहर

 

विदर्भ राज्याच्या निर्मितीच्या मागणी बरोबरच देशात आणखी दहा राज्यांच्या निर्मितीचे प्रस्ताव केंद्र सरकारच्या गृह खात्याकडे पडून आहेत, अशी माहिती स्वतंत्र विदर्भ राज्याचे खंदे समर्थक माजी मंत्री नानाभाऊ एंबडवार यांनी दिली.
नानाभाऊ एंबडवार यांच्या पुढाकाराने या पाश्र्वभूमीवर येत्या रविवारी ५ जुलै रोजी शेगाव येथे विदर्भ, मराठवाडा, कोकण आणि तेलंगणा या प्रदेशातील स्वतंत्र राज्य निर्मिती समर्थक नेत्यांची परिषद आयोजित करण्यात आली आहे. शेगावच्या मुरारका महाविद्यालयाच्या सभागृहात सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत दोन सत्रात होणाऱ्या या परिषदेला चारही प्रदेशातील नेते, विचारवंत सहभागी होणार असल्याचा दावा एंबडवार यांनी केला. डॉ. श्रीनिवास खांदेवाले, सत्यानारायण शर्मा, माजी आमदार अॅड. हरीश मानधना, ज्येष्ठ पत्रकार देवीदास भोरे, दाळू गुरुजी, अॅड. भाऊ साबळे, मोहन नायडू इत्यादी विदर्भातील नेते या परिषदेत सहभागी होणार असल्याचे त्यांनी सांगितले. मराठवाडा, कोकण आणि तेलंगणा या भागातूनही ठराविक नेते सहभागी होणार आहेत, असे एंबडवार म्हणाले.
मंगळवारी येथे ‘लोकसत्ता’शी बोलताना या परिषदेचे मुख्य आयोजक नानाभाऊ एंबडवार म्हणाले की, छोटय़ा राज्यांची मागणी आता जोर धरू लागली आहे. विदर्भाची मागणी फार जुनी आहे. तेलंगणा राज्याचीही मागणी आहे. छोटी राज्ये आवश्यक आहेत किंवा नाही याबद्दल विचार करण्यासाठी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी प्रणव मुखर्जी समिती नियुक्त केली पण, या समितीच्या कार्याला गतीच मिळाली नाही. आता तर केंद्र शासनाच्या गृह मंत्रालयाकडे विदर्भासह दहा स्वतंत्र राज्याचे प्रस्ताव आलेले आहेत.
बिहारमधून मिथिलांजल, गुजरात मधून सौराष्ट्र, आंध्रतून तेलंगणा, उत्तर प्रदेशातून हरित प्रदेश किंवा किसान प्रदेश, बुंदेलखंड, भोजपूर इत्यादी स्वतंत्र राज्ये निर्माण करावीत, अशी मागणी आहे. झारखंड, गोरखालँडचेही प्रस्ताव आहेत. या सर्व पाश्र्वभूमीवर छोटय़ा राज्यांच्या संकल्पनेचा सारासार विचार शेगावच्या परिषदेत होणार असल्याची माहिती एंबडवार यांनी दिली. प्रश्नदेशिक, सांस्कृतिक, मानववंशीय तसेच आर्थिक विकास इत्यादी समस्यांच्या निराकरणासाठी ‘छोटी राज्ये’ हाच उपाय असल्याचे मतही एंबडवार यांनी व्यक्त केले आहे.