Leading International Marathi News Daily

बुधवार, १ जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

सेना दलित विरोधी नाही -नितीन मोरे
मेहकर, ३० जून / वार्ताहर

 

शिवसेना दलित विरोधी नसून काँग्रेस पक्षानेच सेना जातीयवादी असल्याचा बागुलबुवा उभा करून दलितांची सतत दिशाभूल केल्याचा आरोप राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे सरचिटणीस नितीन मोरे यांनी येथे केला.
शिवसेनेविषयी बोलताना मोरे म्हणाले, शिवसेना दलितांना न्यायहक्क देणारी संघटना आहे. काँग्रेस पक्षाने दलित नेत्यांना जवळ करून आजपावेतो राजकीय लाभ घेतला. शिवसेना जातीयवादी आहे, अशी भीती निर्माण केली व काँग्रेसने राजकीय पोळी भाजली, असे ते म्हणाले. शिवसेना जात-पात न पाहता गुणवत्तेला महत्त्व देते. शिवसेना दलित विरोधी असती तर नीलम गोऱ्हे प्रवक्तया नसत्या व महादेव देवळे यांना मुंबईचे महापौर पद दिले असते का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. शिवशक्ती-भीमशक्ती परिवर्तन यात्रेचा अंशत: उपयोग लोकसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार प्रतापराव जाधव यांना झाला, असा दावा त्यांनी यावेळी केला. महानगरपालिकेत निवडणुकीच्या वेळीसुद्धा शिवशक्ती-भीमशक्तीचा सकारात्मक परिणाम दिसला, असे ते म्हणाले. मेहकर मतदारसंघ राखीव झाल्याने मातृभूमीची सेवा करण्यासाठी येथे आल्याचे त्यांनी सांगितले. मेहकर व लोणार तालुक्याच्या सेवेची संधी आवश्यक आहे, असे त्यांनी नमूद केले.
मेहकर व लोणार तालुक्याचा सर्वागीण विकास करण्यासाठी शिवशक्ती-भीमशक्ती एकत्र नांदत आहे. समाजाच्या तळागाळातील दीन-दलित, आर्थिक दुर्बल घटकांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेऊन २००२ मध्ये तानसेन ननावरे यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाची स्थापना झाली, असे त्यांनी सांगितले. बुलढाणा तालुक्यातील साखळी खुर्द हे नितीन मोरेंचे जन्मगाव आहे. आर्थिक अडचणींवर मात करून शिक्षण घेतले. मतिमंद मुलांच्या शिक्षणावर भर दिला. १९९६ मध्ये समाजकार्यात उडी घेतली, दरम्यान शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्यासोबत चांगले संबंध निर्माण झाले, असे त्यांनी सांगितले.
या प्रसंगी भास्कर इंगळे, विलास आराख, अॅड. मोरे, मेहकर तालुकाध्यक्ष सुशील साळवे, शेषराव वानखेडे उपस्थित होते.