Leading International Marathi News Daily

बुधवार, १ जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

‘सिकलसेल’ संशोधन केंद्र पूर्ववत सुरू करण्याची मागणी
चंद्रपूर, ३० जून / प्रतिनिधी

 

नागपुरातील मेयो रुग्णालयातील सिकलसेल संशोधन केंद्र बंद केल्याने या आजारावरील संशोधन थांबले आहे. कोटय़वधी रुपये खर्च करून सुरू करण्यात आलेले हे संशोधन केंद्र पूर्ववत सुरू करावे, अशी मागणी सिकलसेल सोसायटी ऑफ इंडियाचे अध्यक्ष संपत रामटेके यांनी केली आहे.वैदर्भीय जनतेला, सिकलसेलसारख्या जीवघेण्या आजारापासून मुक्ती देणाऱ्या नागपूरच्या मेयो हॉस्पिटलमधील प्रश्नदेशिक सिकलसेल संशोधन केंद्र सुरू करण्यात आले होते. सिकलसेल प्रतिबंध कृती समितीच्या जनआंदोलनाच्या दबावामुळे शासनाने १० जुलै २००१ ला मेयो हॉस्पिटलमध्ये संशोधन केंद्र सुरू केले होते. हे केंद्र सुरू करण्यात यावे म्हणून संपत रामटेके यांच्या नेतृत्वाखाली डॉ. मिलिंद माने, संजीव गजभिये, हरविंदरसिंग गांधी, बी.एम. डहाट यांच्या सहकार्याने २९ नोव्हेंबर २००० ला भीम चौकातून विधानसभेवर मोर्चा नेण्यात आला होता. राज्य शासनाने सिकलसेलच्या प्रतिबंधासाठी २००५ पर्यंत शासकीय तिजोरीतून स्वतंत्र निधी दिला नाही. हिवाळी अधिवेशन २००७ व २००८ मध्ये सिकलसेलसाठी निधी देण्याची घोषणा केली होती. त्या निधीचा वापर सिकलसेल जागृती व रक्त तपासणीसाठी खर्च न करता राज्यातील शासकीय मेडिकल कॉलेजमध्ये यंत्रसामुग्री खरेदीसाठी करण्यात आला. या खरेदीचे गुपित जेव्हा बाहेर पडेल, तेव्हा सर्वाना आश्चर्याचा धक्का बसेल. सिकलसेल निर्मूलनासाठी केंद्र सरकारने निधी देऊनही त्याचा वापर आजपर्यंत झालेला नाही. आता अचानक केंद्र बंद करण्याची घोषणा करण्यात आली. बंद करण्यात आलेल्या संशोधनाची पर्यायी व्यवस्था कशी व कुठे केली आहे, याबाबतचा खुलासा शासनाने करावा, अशी मागणी सिकलसेल सोसायटी ऑफ इंडियाचे अध्यक्ष संपत रामटेके यांनी केली आहे.