Leading International Marathi News Daily

बुधवार, १ जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

२२ जुलैला खग्रास सूर्यग्रहण
चंद्रपूर, ३० जून / प्रतिनिधी

 

येत्या २२ जुलै रोजी सकाळी सूर्योदयानंतर लगेच मोठे खग्रास सूर्यग्रहण मध्यभारतात दिसणार आहे. सदर सूर्यग्रहण पुन्हा ७८ वर्षाने २०७८ मध्ये दिसणार आहे. हे सूर्यग्रहण महाराष्ट्राच्या उत्तर सीमेजवळून तसेच गुजरात, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, बिहार, बंगाल आणि अरुणाचल प्रदेशातून खग्रास दिसणार असून उर्वरित महाराष्ट्र आणि भारतातून ते खंडग्रास दिसणार आहे. सूर्योदयाच्या वेळी २२ जुलै रोजी ग्रहण लागलेले असेल. या अमावस्येला चंद्राचा आकार मोठा आणि सूर्याचा आकार लहान दिसणार असल्यामुळे खग्रास स्थिती जास्त वेळ दिसेल. सुरत येथे ३.१५ मिनिटे, पाटना येथे ४ मिनिटे तर जपानमध्ये ६.४० मिनिटे दिसेल. ग्रहण सकाळी ५.२८ ला सुरवात होऊन १०.४२ वाजता संपेल. सकाळी ७.१९ वाजता खग्रास सूर्यग्रहण सुटेल. खग्रास ग्रहणाची सुरवात गुजरातमधील सुरत येथून होईल.
महाराष्ट्राच्या उत्तर सीमेवरील नंदूरबार, धुळे, जळगाव जिल्हय़ाच्या सीमेजवळून काही भागात ग्रहण खग्रास दिसेल. पुणे, भावनगर, बडोदरा, इंदोर, भोपाल, जबलपूर, अलाहाबाद, वाराणसी, पाटना व अरुणाचल प्रदेशातून हे खग्रास ग्रहण दिसेल तर उर्वरित भारतात ते खग्रास दिसणार आहे. मुंबई-नागपूर येथे ९६ टक्के तर दक्षिण भारतात ८० टक्के दिसेल. तीन हजार किलोमीटर लांब आणि २२० किलोमीटर रुंद भारताच्या पट्टय़ातून हे ग्रहण खग्रास दिसेल, अशी सविस्तर माहिती प्रश्न. चोपणे यांनी दिली.
खग्रास ग्रहणाचे वेळी सुंदर असे श्ॉडो बॅण्ड्स, कोरपना, डायमंड रिंग आणि बेलिज बीड्स पाहता येतील तर त्याच वेळेस अंधार होताच बुध आणि शनी ग्रहांनासुद्धा पाहता येऊ शकेल. २००९ हे आंतरराष्ट्रीय खगोल वष्रे जाहीर झाल्यामुळे या घटनेला अधिक महत्त्व येणार आहे. भारतासहीत जगातील अनेक खगोल विज्ञानसंस्था या ग्रहणाच्या निरीक्षणासाठी सज्ज झाल्या असून महाराष्ट्रातील मराठी विज्ञान परिषद, सेंट्रल इंडिया स्कॉय वॉच ग्रुप आणि २००९ वर्षासाठी स्थापन झालेली ‘पुना फोरम’ या संस्था महाराष्ट्रभर सूर्यग्रहण निरीक्षण शिबिराचे आयोजन करणार आहे. हे सूर्यग्रहण सकाळी होत असले तरी ते इतर भागातून खंडग्रास दिसेल तेव्हा पाहताना सुरक्षा म्हणून काळय़ा फिल्म्स, वेल्डिंगच्या काचा किंवा ग्रहणचष्मे वापरावे. विद्यार्थ्यांनी सूर्यबिंबाचे प्रतिबिंब पांढऱ्या भिंतीवर पाडून ग्रहणाचे निरीक्षण करावे, दुर्बिणी वापरताना सरळ सूर्याकडे न पाहता समोरच्या भिंगावर सुरक्षित काळय़ा फिल्म वापरूनच पाहावे, असे आवाहन सुरेश चोपणे यांनी केले. गेल्या १५ वर्षात भारतात फक्त तीन सूर्यग्रहण दिसले. त्यात विदर्भात ११ ऑगस्ट १९९९ रोजी खग्रास ग्रहण दिसले होते. पुढील वर्षी १५ जानेवारी २०१० ला दक्षिण भारतातून अतिशय दुर्मिळ कंकणाकृती सूर्यग्रहण दिसेल. तर २० मार्च २०३४ रोजी काश्मीरमधून खग्रास सूर्यग्रहण दिसेल. येत्या ५० वर्षात जवळ जवळ शंभर सूर्यग्रहण होणार असले तरी असेच सूर्यग्रहण यानंतर २०८७ मध्ये तब्बल ७८ वर्षाने मध्यभारतातून खग्रास सूर्यग्रहण दिसेल. तेव्हा कुठल्याही प्रकारच्या अंधश्रद्धा न बाळगता २२ जुलैच्या खग्रास, खंडग्रास सूर्यग्रहणाचे सर्व विद्यार्थी आणि खगोलप्रेमींनी निरीक्षण करावे, असे आवाहन सुरेश चोपणे यांनी केले आहे. या संबंधी अधिक माहिती व संपर्कासाठी ९८२२३६४४७३ यावर सुरेश चोपणे यांच्याशी संपर्क साधावा, असे कळवण्यात आले आहे.