Leading International Marathi News Daily

बुधवार, १ जुलै २००९

२२ जुलैला खग्रास सूर्यग्रहण
चंद्रपूर, ३० जून / प्रतिनिधी
येत्या २२ जुलै रोजी सकाळी सूर्योदयानंतर लगेच मोठे खग्रास सूर्यग्रहण मध्यभारतात दिसणार आहे. सदर सूर्यग्रहण पुन्हा ७८ वर्षाने २०७८ मध्ये दिसणार आहे. हे सूर्यग्रहण महाराष्ट्राच्या उत्तर सीमेजवळून तसेच गुजरात, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, बिहार, बंगाल आणि अरुणाचल प्रदेशातून खग्रास दिसणार असून उर्वरित महाराष्ट्र आणि भारतातून ते खंडग्रास दिसणार आहे. सूर्योदयाच्या वेळी २२ जुलै रोजी ग्रहण लागलेले असेल. या अमावस्येला चंद्राचा आकार मोठा आणि सूर्याचा आकार लहान दिसणार असल्यामुळे खग्रास स्थिती जास्त वेळ दिसेल. सुरत येथे ३.१५ मिनिटे, पाटना येथे ४ मिनिटे तर जपानमध्ये ६.४० मिनिटे दिसेल. ग्रहण सकाळी ५.२८ ला सुरवात होऊन १०.४२ वाजता संपेल. सकाळी ७.१९ वाजता खग्रास सूर्यग्रहण सुटेल. खग्रास ग्रहणाची सुरवात गुजरातमधील सुरत येथून होईल.

कौंडण्यपूर, चांदूर बाजारच्या दिंडय़ा पंढरपुरात
अमरावती, ३० जून / प्रतिनिधी

आषाढी एकादशीसाठी अमरावती जिल्ह्य़ातील शेकडो वारकरी पंढरपूरच्या दिशेने रवाना झाले असून कौंडण्यपूर येथील विठ्ठल-रुक्मिणी संस्थानची पालखी सुमारे दीडशे वारकऱ्यांसह उद्या, १ जुलैला पंढरपूर येथे पोहोचत आहे. तर चांदूर बाजारच्या संत गुलाबराव महाराज संस्थानची दिंडी सोमवारी पंढरपुरात दाखल झाली. या दिंडीत ४०० वारकरी सहभागी झाले आहेत. या दोन प्रमुख पायदळ दिंडय़ांसह अनेक गावांमधील वारकरी विठ्ठल दर्शनाचा सोहोळा अनुभवण्यासाठी पंढरपूर येथे पोहोचत आहेत.

शंभर टक्के क्षेत्रात पेरणीबाबत कृषी तज्ज्ञ साशंक
चंद्रपूर, ३० जून/प्रतिनिधी

अत्यल्प पावसामुळे खरीप हंगामाच्या पेरणीला हळुवार सुरुवात झाली असून गेल्या वर्षी आजच्या तारखेपर्यंत ५० टक्के पेरणी आटोपली होती तेथे यंदा केवळ ८४० हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. पावसाची हीच स्थिती राहिली तर यंदा शंभर टक्के क्षेत्रात पेरणी होणार की नाही, अशी भीती कृषी खात्याकडून वर्तवली जात आहे. आज येणार उद्या येणार म्हणता म्हणता यंदा पावसाने बराच विलंब केल्याने खरीप हंगामाच्या पेरणीला देखील उशिरा सुरुवात झाली. गेल्या आठवडय़ात चांगला पाऊस झाल्यानंतर शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष पेरणीला सुरुवात केली.

स्वच्छ ग्राम जिल्हास्तरीय स्पर्धेत दत्तपूर प्रथम
जिल्हास्तरीय मूल्यमापन समितीचा निकाल घोषित
बुलढाणा, ३० जून / प्रतिनिधी

संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानांतर्गत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेचा निकाल जिल्हा मूल्यमापन समितीने आज घोषित केला असून या स्पर्धेत बुलढाणा तालुक्यातील दत्तपूर ग्रामपंचायतीने प्रथम पुरस्कार पटकावला आहे. नांदुरा तालुक्यातील धानोरा ग्रामपंचायतला द्वितीय पुरस्कार तर खामगाव तालुक्यातील राहुड व बुलढाणा तालुक्यातील अजिसपूर ग्रामपंचायतींना तृतीय पुरस्कार विभागून देण्यात आला आहे. या पुरस्काराची घोषणा आज जिल्हा परिषदेच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात जिल्हा मूल्यमापन समितीच्या अध्यक्षा व अहमदनगर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शालिनी विखे पाटील यांनी केली.

आर्थिक परिस्थितीमुळे शेतमजुराची आत्महत्या
यवतमाळ, ३० जून / वार्ताहर
आर्थिक विवंचनेपायी वैफल्यग्रस्त झालेल्या आदिवासी शेतमजुराने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना भारी येथे घडली. यवतमाळ येथून दहा कि.मी. अंतरावरील भारी येथील मारोती किसन मसराम (५०) या शेतमजुराने घरीच गळफास घेऊन आत्महत्या केली. मारोती मसराम यांना दोन मुली आणि नऊ वर्षाचा एक मुलगा आहे. त्याच्या दोन्ही मुलींची लग्ने झाली. दुसऱ्या मुलीचे लग्न दोन महिन्यांपूर्वीच झाले. मोलमजुरी करून मुलीचे लग्न करणे, पत्नी आणि ९ वर्षाच्या मुलाचा सांभाळ करणे, मुलाच्या पुढील शिक्षणाची सोय करणे, इत्यादी गोष्टी आर्थिक विवंचनेपायी त्यांना शक्य होत नव्हत्या. त्यामुळे त्यांनी अखेर गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेची माहिती कळताच ठाणेदार गिरीश बोबडे, पोलीस उपनिरीक्षक ओमप्रकाश ठाकूर यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. पार्थिवाच्या उत्तरीय तपासणीनंतर भारी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा प्रश्न अजूनही ऐरणीवर असताना एका शेतमजुराची वैफल्यग्रस्त होऊन झालेली आत्महत्या हाही चिंतेचा विषय झाला आहे.

युवतीच्या मृत्यूस कारणीभूत जीप चालकाविरुद्ध गुन्हा
रिसोड, ३० जून / वार्ताहर
जीपने धडक दिल्याने युवतीच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या चालकाविरुद्ध तब्बल १ आठवडय़ानंतर पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे.तालुक्यातील सवड येथील ज्योती धोंडू वाकाडे (२०) व एकलसपूर येथील सोनू अलाट (८) या दोघी सवड फाटय़ावर रस्ता ओलांडत असताना अवैध वाहतूक करणाऱ्या जीपने (एमएच३७ए-५३५) गेल्या २१ जून ०९ रोजी दुपारी त्यांना धडक दिली होती. या अपघातात ज्योती वाकोडे व सोनू अलाट या दोघी जबर जखमी झाल्या होत्या. दोघींना अकोला येथील खाजगी रुग्णालयात नेण्यात आले पण, डॉक्टरांनी ज्योती वाकोडेला मृत घोषित केले तर सोनू वर वैद्यकीय उपचार सुरू आहेत. या घटनेतील आरोपी जीप चालकाविरुद्ध तब्बल एक आठवडय़ानंतर गुन्हा दाखल केला. अवैध वाहतुकीचा बळी ठरलेल्या ज्योती या तरुणीच्या मृत्यूस कारणीभूत असणारी ‘संभाजी’ जीप काँग्रेसच्या एका पदाधिकाऱ्यांची असून यामुळेच गुन्हा दाखल करण्यास विलंब लागल्याची चर्चा आहे.

पहिल्याच पावसात गटारे साचली
चंद्रपूर,३० जून / प्रतिनिधी
चंद्रपूर शहर व परिसरात आज सायंकाळी मुसळधार पावसाने हजेरी लावली. पहिल्याच पावसात शहराच्या मुख्य मार्गावर पाणी साचल्याने पालिकेने गटारे सफाई केली नसल्याचे उघडकीस आले. पावसाळय़ाला सुरुवात झाल्यानंतरही या जिल्हय़ात मुसळधार पाऊस झाला नाही. २७ जूनला पाऊस झाला. या पावसाने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असला तरी दोन दिवस कडक ऊन्ह पडल्याने पुन्हा जैसे थे वातावरण झाले होते. सर्वत्र उकाडा कायम होता. अशा स्थितीत शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत होते. आज सायंकाळी चार वाजताच्या सुमारास आकाशात ढग एकत्र आले आणि जोरदार पाऊस कोसळला. या पावसामुळे शहराच्या मुख्य मार्गावर सर्वदूर पाणी साचले.

पुलगावच्या नगराध्यक्षांचा सत्कार
पुलगाव, ३० जून/ वार्ताहर
नगरपालिका तथा नवनिर्वाचित अध्यक्षा शालवंती दाबोडे व उपाध्यक्ष मीना पनिया यांचा सत्कार अ.भा. ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने नुकताच करण्यात आला. शालवंती दाबोडे यांचे गोपाल चरखा यांनी तर उपाध्यक्षा मीना पनिया यांचे किरण उपाध्ये यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. याप्रसंगी पत्रकार चरखा व प्रश्न. अश्विन शहा यांची भाषणे झाली. तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रभाकर शहाकार यांनी नगराध्यक्षांनी कामात कुचराई करू नये, असा सल्ला दिला. नगराध्यक्ष दाबोडे सत्कारास उत्तर देताना म्हणाल्या की आम्ही शहर विकासाच्या कामात स्वत:ला कुठेही कमी पडू देणार नाही तसेच वेळोवेळी पत्रकार संघास सहकार्य करण्याचे आश्वासनही दिले. कार्यक्रमास पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष आशीष पांडे, जिल्हा नियोजन समिती अध्यक्षा गोपाल चरखा, वर्धा जिल्हाध्यक्ष प्रमोद बोराटणे, सहसंपर्क प्रमुख किरण उपाध्ये, सचिन सुरसे, कृष्णराव दुधे, चेतन कोवळे, स्वप्निल दुबे, हर्षल काळे, प्रशांत मेटे, गौतम नंदेश्वर आदी उपस्थित होते.

विचार संवर्धन समिती करणार गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
चंद्रपूर, ३० जून / प्रतिनिधी
महात्मा ज्योतीबा फुले तथा डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार संवर्धन समितीच्यावतीने दहावी व बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार येत्या २६ जुलै रोजी आयोजित करण्यात आला आहे. जिल्हय़ातील सर्व कनिष्ठ महाविद्यालय शाळातील प्रश्नचार्य तथा मुख्याध्यापक, मुख्याध्यापिका यांनी आपल्या शाळेतील खुल्या प्रवर्गात ८५ टक्के व मागास प्रवर्गात ८० टक्के पेक्षा अधिक गुणप्रश्नप्त विद्यार्थ्यांचा तपशील जसे की नाव, वर्ग, प्रश्नप्त गुण, गुणांची टक्केवारी, प्रवर्ग, निवासी पत्ता, दूरध्वनी क्रमांक वा भ्रमणध्वनी क्रमांक व विशिष्ट परीक्षांमध्ये जसे की जेईई, एआयईईई ए आय, पीएमटी, एमएचटी, सिईटी मधील प्रश्नवीण्य नमूद करावे, वरील माहिती तातडीने कळवावी, असे आवाहन करण्यात आले आहे. ही माहिती १५ जुलै २००९ पर्यंत समितीच्या कार्यालयीन पत्त्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह, बोधीसत्व परिसर, हॉटेल कुंदन प्लाझाजवळ, नागपूर मार्ग, चंद्रपूर येथे पाठवायची आहे.

डॉ. आंबेडकर नगरात पथदिव्यांचे लोकार्पण
तुमसर, ३० जून / वार्ताहर
येथील डॉ. आंबेडकर नगरात पथदिव्यांचे लोकार्पण केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष अमरनाथ रगडे होते. याप्रसंगी माजी खासदार केशवराव पारधी, राज्यमंत्री नाना पंचबुद्धे, माजी नगराध्यक्ष जगदीशचंद्र कारेमोरे व अरविंद कारेमोरे, विजयकुमार डेकाटे, नगरसेविका माला भवसागर व लक्ष्मी बिसने, लक्ष्मी कहालकर आदी प्रश्नमुख्याने उपस्थित होते. तुमसर पालिकेनी विकासाची अनेक कामे केली आहेत. त्यात आणखी नवीन कामांसाठी निधी कमी पडू देणार नाही. शहराच्या विकासकार्यासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही प्रफुल्ल पटेल यांनी यावेळी दिली. सिहोरा, नाकाडोंगरी आणि तुमसर येथे पक्ष कार्यकर्त्यांच्या अडचणी पटेलांनी ऐकून घेतल्या व त्या दूर करण्याचे आश्वासन दिले. राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष रामदयाल पारधी यांनी बंद युनिव्हर्सल फेरो कारखाना सुरू करण्याची विनंती केली त्यावर त्यांनी सकारात्मक होकार दिला. याप्रसंगी मनोहर सिंगनजुडे, प्रश्नचार्य फुळेकर, विठ्ठल कहालकर, डॉ. मधुकर लांजे आदी उपस्थित होते.

शिवराज मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबीर
कारंजा- लाड, ३० जून/ वार्ताहर
येथील शिवराज मित्र मंडळातर्फे, रविवारी डॉक्टर्स दिनानिमित्त रक्तदान शिबीर घेण्यात आले. यावेळी मंडळाच्या २६ सदस्यांनी रक्तदान केले. ग्रामीण रुग्णालयात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वैद्यकीय अधीक्षक डॉ. साळुंके होते. या शिबिराचे उद्घाटन ठाणेदार देवीदास चौधरी यांनी केले. रक्तदानाचे श्रेष्ठत्व त्यांनी याप्रसंगी सांगितले. श्याम सवाई, उपनिरीक्षक पाटील, प्रेस क्लबचे सचिव संतोष वैद्य, रक्त संकलन अधिकारी डॉ. जोशी, चव्हाण, रक्तपेढी तंत्रज्ञ दीपक चौधरी, व्यासपीठावर उपस्थित होते. रक्त संकलन करण्यासाठी अकोल्याचे डॉ. एस.पी. जोशी, पी.ए. पिंपळकर, प्रकाश नवरखेडे, शुभांगी इंगळे, ए.एस. चंदनशिवे, देवकरण तायडे यांची चमू उपस्थित होती. यावेळी शिवराज मित्र मंडळाचे देवेंद्र राऊत, अमित वानखडे, गौरव गांजरे, नीलेश राठोड, गणेश जानकर, सचिन जिरापुरे, आतिश चिमेगावे, योगेश चव्हाण, गोविंद पंजवाणी, नीलेश पारे, सचिन सुपनकर, राहुल थेर, राहुल रोकडे, वैभव जिचकार, गौरव येळणे, स्वप्निल वाकेकर, पवन इचे, अमोल अधम, प्रशांत रेवाळे, प्रतीक उकंडे, मनोज संपळे, प्रकाश पटेल, नीलेश पवार, शिवराज खोरघडे, श्याम पेटकर, सचिन राजगुरे, रवींद्र सदार या कार्यकर्त्यांनी रक्तदान केले. शिवराज मित्र मंडळाच्या सदस्यांनी शिबिराच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.

पुलगावात महिला काँग्रेसचा मेळावा
पुलगाव, ३० जून / वार्ताहर
राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या नेतृत्वामुळे महिलांना राजकारणात सन्मानाचे स्थान मिळत आहे, असे प्रतिपादन जिल्हा काँग्रेस अध्यक्ष हेमलता मेघे यांनी केले. कामगार भवनात शहर महिला काँग्रेसच्या मेळाव्यात त्या बोलत होत्या. या कार्यक्रमात मेघे यांच्या हस्ते नवनिर्वाचित नगराध्यक्ष शालवंती दाबोडे व उपाध्यक्ष मीना पनिया यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी लीला मिश्रा, महिला अत्याचार निर्मूलन समितीच्या प्रदेशाध्यक्ष वंदना करोडे प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या आयोजक छाया चव्हाण होत्या. नगर काँग्रेस समितीचे अध्यक्ष रमेश सावरकर यांनी प्रश्नस्ताविक केले. मेघे यांच्या हस्ते शहर अध्यक्ष छाया चव्हाण यांचाही सत्कार यावेळी करण्यात आला. संचालन काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष चारूदत्त वंजारी यांनी केले तर वहिदा शेरमोहम्मद शेख यांनी आभार मानले. या कार्यक्रमास संजय दाबोडे, कामगार नेते रामेश्वर वाघ, सुभाष लुंकड, भगवान कडू, मौला शरीफ, पवन साहू, अब्दुल जलिल आदी उपस्थित होते.

अश्लील चित्रफित तयार करणारे तिघे अटकेत
बुलढाणा, ३० जून/ वार्ताहर
बुलढाणा तालुक्यातील साखळी (बु.) या गावातील एका विवाहितेशी अनैतिक संबंध ठेवून भ्रमणध्वनी व सीडीवर अश्लील चित्रफित तयार करणाऱ्या गावातील तीन जणांना ग्रामीण पोलिसांनी अटक केली. महिला गावातून बेपत्ता असल्याची तक्रार तिच्या पतीने सोमवारी दाखल केली आहे. साखळी (बु.) येथील संजय किसन नाटेकर (२७), अनिल रामदास दराखे (२८), विजय लोंढे (३०) यांनी गावातील एका विवाहित महिलेची २६ जून पूर्वी गावातील एका गॅरेजच्या पाठीमागे असलेल्या घरात विजय लोंढे यांनी स्वत: च्या भ्रमणध्वनीमध्ये अश्लील चित्रफित तयार केली असा आरोप आहे. चित्रफित गावातील मित्रांच्या भ्रमणध्वनीवर पाठवल्याने गावात त्या महिलेची बदनामी झाल्याची चर्चा सुरू होती. या बदनामीला घाबरून ती गावातून निघून गेली आहे. पोलिसांनी या प्रकरणी तिघांना अटक केली असून त्यांच्याकडून तीन भ्रमणध्वनी व एक सीडी जप्त केली आहे. ही सीडी कोणत्या संगणक केंद्रावर तयार केली व विक्री केली का? या दिशेने पोलीस तपास सुरू आहे.

विषारी मोहफुले खाऊन आठ जनावरे दगावली
भंडारा, ३० जून / वार्ताहर
येथून जवळ कोका जंगल परिसरात असलेल्या सर्पेवाडा या गावी शेतात पेरणीच्या रक्षणाकरता विषारी कीटकनाशक औषध लावून टाकलेली मोहफुले खाऊन आठ जनावरे दगावली तर १५ आजारी पडली. भैयादास आत्माराम डोंगरे यांच्या शेतात नुकतीच धानपेरणी झाली. मोकळ्या फिरणाऱ्या जनावरांकडून उगवलेली रोपे खाल्ली जाऊ नयेत, त्यांना प्रतिबंध व्हावा याकरिता डोंगरे यांनी शेतात मोहफुलांना विषारी कीटकनाशक औषध लावून ठेवले होते. शनिवारी या शेतात गुरे शिरली व रोपांसोबत त्यांनी मोहफुले खाल्ली. गुरे तडफडू लागल्याने गुराख्याने त्यांना जवळच्या तलावावर नेऊन पाणी पाजले व गुरांना गावात नेले. दुपारी या गुरांपैकी सहा मृत्युमुखी पडली. त्यानंतर रात्री एक बैल व रविवारी सकाळी एक बैल मरण पावला. यापैकी ४ बैल भैयादास डोंगरे यांच्या भावाचे होते. १५ गुरांवर पशुवैद्यकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रोपांच्या रक्षणाकरता विषारी मोहफुलांचा उपयोग केला परंतु, अशावेळी धोक्याची सूचना म्हणून काही उपाययोजना शेतमालकाने करायला हवी होती, असे बोलले जात आहे. आठ जनावरांची किंमत सुमारे दीड लाख रुपयांपर्यंत होती.

विजेचा धक्का लागून ८ प्रश्नण्यांचा मृत्यू
कारंजा- लाड, ३० जून/ वार्ताहर
रविवारी तालुक्यात सर्वदूर पावसाने हजेरी लावली. पेरण्या खोळंबल्याने आकाशाकडे नजर लावून बसलेल्या कास्तकारांना त्यामुळे दिलासा लाभला. एकूण ८० मि.मी. पावसाची नोंद झाली. रविवारी पोहा या गावी विजेच्या तारा तुटल्याने विजेचा धक्का लागून ७ बकऱ्या व एक बैल मरण पावल्याची माहिती तहसील सूत्रांनी दिली. यात सुरेश बाबुराल राठोड यांचा बैल, गजानन कान्हे यांच्या ४ बकऱ्या, नागो कवळ यांची १ बकरी, तर बबु बागवान व इसा इस्माईल यांची प्रत्येकी एक बकरी मरण पावली. एकूण ४६ हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले. पावसाचे दमदार आगमन झाल्याने पेरणीच्या कामाला सुरुवात झाली असून कारंज्यातील सर्वच कृषी केंद्रांवर बियाणे व खतांसाठी कास्तकारांची गर्दी झाली आहे.

जिल्हा पेन्शनर्स असोसिएशनचे मुख्यमंत्र्यांना निवेदन
चंद्रपूर, ३० जून / प्रतिनिधी
सेवानिवृत्त पेन्शनर्सला पाचव्या वेतन आयोगानुसार पूर्ण पेन्शन देण्यात यावी तसेच सहावा वेतन आयोग लागू करावा या व इतर वीस मागण्यांचे निवेदन जिल्हा पेन्शनर्स असोसिएशनच्या वतीने मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात आले आहे. या जिल्हय़ात सेवानिवृत्त पेन्शनधारकांची संख्या हजारोच्या घरात आहे. शासनाने १९८६ व १९९६ पूर्व सेवानिवृत्त, कुटुंब सेवानिवृत्तांना पाचव्या वेतन आयोगानुसार निवृत्ती वेतनात आवश्यक सुधारणा पूर्णपणे अद्यापही झालेली नाही. त्यामुळे सहावे वेतन आयोगानुसार त्यांच्या निवृत्ती वेतनात, कुटुंब निवृत्ती वेतनात मोठे आर्थिक नुकसान संभवते. संबंधितांनी अध्यक्ष जिल्हा पेन्शनर्स असोसिएशन चंद्रपूर यांच्याशी संपर्क साधावा.

अतिरिक्त शिक्षकांना दिलासा
भंडारा, ३० जून / वार्ताहर
इंग्रजी माध्यमाच्या शाळा तसेच मराठी माध्यमांच्या अनेक नवीन शाळांना शासनमान्यता मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांच्या संख्येच्याअभावी अनेक शिक्षक अतिरिक्त ठरू पाहत होते. परंतु, शासनाच्या नवीन धोरणामुळे या शिक्षकांना दिलासा मिळाला आहे. शासनाने परिपत्रक काढून एका तुकडीसाठी शहरी भागात २५ विद्यार्थी तर ग्रामीण भागात २० विद्यार्थी आणि आदिवासी-डोंगरी भागातील शाळांकरिता १५ विद्यार्थी संख्या निश्चित केली आहे. नंतरच्या दुसऱ्या तुकडीसाठी शहरी भागात ५० विद्यार्थी तर ग्रामीण भागात ४० विद्यार्थी संख्या निश्चित केली आहे. शहरी भागात तिसऱ्या तुकडीसाठी ७५ तर ग्रामीण भागात ६० संख्या निश्चित केली आहे. शहरी भागात चवथ्या तुकडीसाठी १०० विद्यार्थी तर ग्रामीण भागात ८० विद्यार्थी आवश्यक आहेत. या धोरणामुळे अनेक शिक्षकांवरील नोकरी गमावण्याची टांगती तलवार दूर होईल, असे शिक्षक प्रतिनिधींचे मत आहे.

विसापुरात गटई ‘स्टॉल्स’चे वाटप
चंद्रपूर, ३० जून / प्रतिनिधी
दीन, दुर्बल, शोषित पीडिताना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी भारतीय जनता पक्ष सदैव कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
बल्लारपूर तालुक्यातील विसापूर येथे चर्मकारांना गटई स्टॉल्स वाटप करण्याच्या कार्यक्रमात आमदार मुनगंटीवार बोलत होते. यावेळी त्यांनी विसापूर या गावात केलेल्या विविध विकासकामांची माहिती दिली. आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नातून सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून विसापूर येथील चर्मकारांना व्यवसायासाठी लोखंडी पत्र्याचे गटई स्टॉल्स मंजूर झाले आहेत. या ‘स्टॉल्स’चे वितरण आमदार मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भाजपचे जिल्हा सरचिटणीस प्रमोद कडू, जिल्हा परिषद सदस्य अंजली पंदिलवार, पंचायत समिती सदस्या रंजना थेरे, बल्लारपूर तालुका भाजपाचे अध्यक्ष किशोर पंदिलवार, भाजप नेते तुषार सोम, प्रभाकर पटकोटवार उपस्थित होते. भाजपचे तालुकाध्यक्ष किशोर पंदिलवार यांनी प्रश्नस्ताविक केले. यावेळी गटई स्टॉल्सच्या लाभार्थ्यांनी आमदार मुनगंटीवार यांचे आभार मानले. यावेळी चर्मकार सेवा संघ विसापूरचे अध्यक्ष नवानंद खंडाळे, सचिव सुभाष भटवलकर, विसापूर भाजपचे अध्यक्ष अशोक भोयर, सरचिटणीस रवी कोट्टलवार, देवराव धुर्वे, शशिकांत पावडे, मंजुळा कन्नाके, बंडू बावणे, अनसूया राजूरकर, लता गेडाम, अनंता कन्नाके उपस्थित होते.

चिखली परिसरात शेतकऱ्यांना दिलासा
चिखली, ३० जून / वार्ताहर
विक्रमी उशिरा आलेल्या पावसाने सतत दोन दिवस दमदार हजेरी लावल्याने शेतकरी वर्गात आनंद व्यक्त होत असून आजच्या उघाडीमुळे पेरण्याच्या कामांना वेग आला आहे. शनिवारी ४७ व रविवारी १७ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. परिसरात एकूण ११० मिमी. पाऊस झाला असल्याचे सुत्रांनी सांगितले. पावसामुळे प्रचंड उकाडय़ातून सुटका झाल्याने व पेरण्यांना वेग आला आहे.

‘कर्मयोगी’ पुस्तकाचे प्रकाशन
पुलगाव, ३० जून/ वार्ताहर

संत साहित्याचे अभ्यासक प्रश्न. सचिन सावरकर यांनी लिहिलेल्या ‘महान कर्मयोगी- संत वैराग्यमूर्ती गाडगेबाबा व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज’ या संयुक्त जीवन चरित्राच्या द्वितीय आवृत्तीचे प्रकाशन पुणे येथे साहित्यिक डॉ. रामचंद्र देखणे यांच्या हस्ते नुकतेच झाले. या द्वितीय लोकार्पण सोहोळ्याला कवी सुभाष सदाफळे, ज्ञानप्रबोधिनीचे मिलिंद नाईक उपस्थित होते. पुणे येथील तुकाराम महाराज संकुलात हा सोहोळा थाटात पार पडला.