Leading International Marathi News Daily

बुधवार, १ जुलै २००९

विविध

बाबरी विध्वंसाची चौकशी पूर्ण, लिबरहान आयोगाचा अहवाल सादर
नवी दिल्ली, ३० जून/खास प्रतिनिधी
गेल्या दोन दशकांपासून देशातील हिंदू आणि मुस्लिमांदरम्यान तणावाचा प्रमुख मुद्दा असलेल्या बाबरी मशीद विद्ध्वंसाची चौकशी अखेर १७ वर्षांंच्या प्रदीर्घ कालावधीनंतर पूर्ण करीत आज लिबरहान आयोगाने पंतप्रधान मनमोहन सिंग यांना अहवाल सादर केला. गुरुवारपासून सुरु होत असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान युपीए सरकार कृती अहवालासह संसदेच्या पटलावर हा अहवाल मांडण्याची अपेक्षा असून बाबरी विद्ध्वंसाच्या दोषाला सामोरे जाण्याची भाजप नेत्यांवर वेळ आली आहे.

येमेनिया एअरलाइनचे विमान हिंदी महासागरात कोसळले; मोठी प्राणहानी, बालकाला वाचवले
मोरोनी, ३० जून/पीटीआय

येमेनिया एअरलाइनच्या एअरबस ए ३१० जेट जातीचे विमानाला अपघात होऊन ते कोमोरोस बेटांनजिक हिंदी महासागरात आज कोसळले. या विमानात १५३ जण होते. त्यापैकी एका लहान मुलाचे प्राण वाचविण्यात मदतपथकांना यश मिळाले आहे. या अपघातात मरण पावलेल्यांची संख्या मोठी असेल अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. विमान अपघातग्रस्त होऊन समुद्रात कोसळण्याची ही गेल्या महिनाभरातील ही दुसरी घटना आहे.

एलपीजी भरलेल्या रेल्वे वाघिणींमध्ये स्फोट; १५ ठार, ५० जखमी
व्हिरेज्जिओ, ३० जून/पीटीआय

इटलीतील व्हिरेज्जिओ शहरानजिक एलपीजी वायूची वाहतूक करणारी एक रेल्वेगाडी रुळावरून घसरून तिच्या दोन वाघिणींमध्ये स्फोट झाला. त्यामध्ये रेल्वेमार्गालगतच्या घरांचे नुकसान झालेच शिवाय या घरांतील रहिवाशांपैकी १५ जण ठार झाले तर ५० जण जखमी झाले. जखमींपैकी ३५ जणांची प्रकृती गंभीर आहे. हा अपघात आज झाला.

मायकेल जॅक्सनचा महिन्याला औषधांवर 30 हजार पौंड खर्च..
लंडन ३० जून/पीटीआय

पॉप गायक मायकेल जॅक्सन हा महिन्याला तीस हजार पौंड औषधांवर खर्च करीत होता असे काही बातम्यांमध्ये म्हटले आहे. त्याच्या शवविच्छेदनाचा जो अहवाल फुटला आहे त्यानुसार जॅक्सनच्या शरीराचा केवळ सापळा उरला होता व मृत्यूसमयी त्याच्या पोटात काही गोळ्यांचा अंश सापडला, त्याने अन्न मुळीच घेतलेले नव्हते.


‘ लालगढ रॉयल्स’
लालगढमध्ये माओवाद्यांविरोधात संयुक्त कारवाई सुरू आहे. मात्र त्याचा या बालक्रिकेटपटूंना मागमूसही नाही. मंगळवारी शेतात ‘लालगढ रॉयल्स’ बनून ते आनंद लुटत आहेत.


‘मान्सून रायडर्स’
उत्तर भारतात मंगळवारी मान्सून दाखल झाला,. पहिल्या पावसामुळे अलाहाबाद येथील या कुटुंबाची तारांबळ उडाली होती.

उद्योग सुरू करायचाय? मुंबईपेक्षा पाटणा उत्तम!
नवी दिल्ली, ३० जून/पीटीआय

यादवी, अराजक, लालफीत या सर्वाची बजबजपुरी म्हणजे बिहार अशी या राज्याची काही वर्षांपूर्वी ओळख होती. त्या तुलनेत महाराष्ट्र हा कितीतरी प्रगतीशील व पुरोगामी होता असे म्हटले जायचे. जागतिक बँकेने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या अहवालाने हे चित्र एकदम बदलले आहे. मुंबईपेक्षा बिहारची राजधानी पाटणामध्ये उद्योग सुरू करणे अधिक सोपे आहे. याबाबत दिल्ली मात्र पाटण्यापेक्षा वरचढ आहे असा निष्कर्ष या अहवालात काढण्यात आला आहे.
‘२००९ सालामध्ये भारतात उद्योग सुरू करण्यासाठी असलेले वातावरण’ या विषयाच्या अनुषंगाने जागतिक बँक व इंटरनॅशनल फायनान्स कॉर्पोरेशन या दोन संस्थांनी भारतातील १७ शहरांचा अभ्यास करून एक संयुक्त अहवाल प्रसिद्ध केला. त्यामध्ये जयपूर, हैदराबाद, भुवनेश्वर आदी शहरांचा समावेश आहे. या अहवालात पुढे म्हटले आहे की, हैदराबाद, भुवनेश्वर, गुरगाव, अहमदाबाद, नवी दिल्ली, जयपूर, गुवाहाटी येथे उद्योग सुरू करणे तुलनेने सोपे आहे. या क्रमवारीत पाटणा शहराला १४ व्या क्रमांकाचे स्थान मिळाले आहे. त्यानंतर चेन्नई (१५) व कोलकाता शहराला या क्रमवारीत सर्वात तळातला म्हणजे १७ वा क्रमांक मिळाला आहे. उद्योग सुरू करणे, बांधकामासाठी अनुमती मिळविणे, मालमत्तेची नोंदणी, करभरणा, व्यापाराची व्याप्ती, एन्फोर्सिग कॉन्ट्रॅक्टस्, उद्योग बंद करणे असे विविध स्तरांवरील सात निकष लावून १७ शहरांतील स्थितीचा अभ्यास करण्यात येऊन निष्कर्ष काढण्यात आले.

लालगढमधील २२ गावांत तीव्र शोधमोहीम
कांतापहाडी (प. बंगाल), ३० जून / पी.टी.आय.

पश्चिम मिडनापूर जिल्ह्य़ातील माओवाद्यांची पकड सैल करण्यासाठी सुरक्षा दलांनी ठोस मोहिमेवर लक्ष केंद्रित केले असून अशांत लालगढमधील २२ गावांमध्ये तीव्र शोधमोहीम सुरू झाली आहे. कांतापहाडीवर सुरक्षा दलाने कब्जा मिळवल्यानंतर लालगढच्या साऱ्या सीमा सील करण्यात आल्या आहेत, अशी माहिती एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिली. लालगढमध्ये माओवादी पुन्हा परतू नये, या दृष्टीने पुरेसा बंदोबस्त लावण्यात आला आहे. परंतु, माओवाद्यांनी पश्चिम मिदनापूर सोडून शेजारच्या झारखंडमध्ये आश्रय घेतला असावा, असा अंदाज आहे. गेल्या १३ दिवसांपासून लालगढमध्ये सुरक्षा दलाची मोहीम सुरू आहे. माओवादी पलायन करत असल्याने गावागावात त्यांचा शोध घेतला जात आहे. यामुळे सामान्य नागरिकही भरडला जात असला तरी भविष्यातील सुरक्षेसाठी हा कारवाई उचित असल्याचे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने स्पष्ट केले. सुरक्षा दलाच्या जवानांनी बारोपलिया, चोटोपेलिया, दालीपूर चौक आणि अन्य नजीकच्या खेडय़ात प्रत्येक घरात शोधसत्र सुरू केले आहे. माओवाद्यांनी सोडून दिलेली शस्त्रास्त्रे आणि दारुगोळा सुरक्षा दलाच्या हाती लागला आहे. सेजुआ, कोईमा आणि कालीमुरी येथे अद्यापही संशयित माओवादी दडून बसल्याचा पोलिसांचा संशय असल्याने या भागातील बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. पीटीआयच्या प्रतिनिधीने काल बारा खेडय़ांचा दौरा केला असता घरांमध्ये शुकशुकाट आढळून आला. फक्त वृद्ध आणि अपंग लोक सोडले तर घरे रिकामी होती. लोक पोलिसांच्या भीतीने पळून गेलेले आहेत. या आदिवासी भागातील असंतोषाचे कारण जाणून घेण्यासाठी आठ सचिवांचा समावेश असलेल्या कृती दलाची स्थापना करण्यात आली आहे.

अटकपूर्व जामिनासाठी मंत्र्याने दबाव आणल्याची न्यायाधीशांची तक्रार
चेन्नई, ३० जून/पीटीआय

एका केंद्रीय मंत्र्याने डॉक्टर व त्याच्या मुलाला बनावट गुणपत्रिका प्रकरणी सीबीआयने दाखल केलेल्या खटल्यात अटकपूर्व जामीन देण्यासाठी आपल्यावर दबाव आणला, असा गौप्यस्फोट मद्रास उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीनी सुनावणीच्या वेळी केला. पुडुचेरीच्या खासगी वैद्यकीय महाविद्यालयात शिकणारा एस. किरूब श्रीधर व त्याचे डॉक्टर वडील कृष्णमूर्ती यांच्या वतीने काम पाहणाऱ्या वकिलांनी असे वक्तव्य केले होते, की फिर्यादी पक्षाच्या सांगण्यावरून अटकपूर्व जामीन मंजूर करण्यास न्यायालय नकार देत आहे, त्यावर न्या. रघुपथी यांनी सांगितले, की एका केंद्रीय मंत्र्यांनी आपल्याशी बोलून अटकपूर्व जामीन मंजूर करण्यासाठी दबाव आणला.

परराष्ट्र सचिवपदी निरुपमा राव
नवी दिल्ली, ३० जून/पीटीआय
परराष्ट्र खात्याच्या सचिव म्हणून चीनमधील राजदूत निरुपमा राव (५८) यांची नेमणूक करण्यात आली आहे. त्या शिवशंकर मेनन यांची जागा घेतील. मेनन हे ३१ जुलैला निवृत्त होत आहेत. मेनन तीन वर्षे परराष्ट्र सचिव होते. निरुपमा राव या १९७३च्या आयएफएस (भारतीय परराष्ट्र सेवा) अधिकारी असून, त्यांनी अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे. चोकिला अय्यर यांच्यानंतर त्या दुसऱ्या महिला परराष्ट्र सचिव आहेत. ऑक्टोबर २००६ मध्ये त्यांना चीनमध्ये राजदूत नेमण्यात आले होते. निष्णात राजनैतिक अधिकारी म्हणून त्यांनी श्रीलंकेतील राजदूत म्हणूनही चांगली कामगिरी केली होती. परराष्ट्र खात्यात सहसचिव असताना त्यांनी वॉशिंग्टन व मॉस्को येथे दूतावासात काम केले होते.

‘व्हॅट’ वाढीमुळे मोबाईल महागणार!
नवी दिल्ली, ३० जून/पी.टी.आय.
मोबाईलवरील मुल्यवर्धित कर(व्हॅट) वाढवण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतल्याने मोबाईलच्या किंमतीत ८ ते १० टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता आहे. मोबाईलच्या खरेदीमागे आत्तापर्यंत ग्राहकाला किंमतीच्या चार टक्के इतका ‘व्हॅट’ भरावा लागत होता. मात्र उद्यापासून हा कर १२.५ टक्के इतका असणार आहे. तज्ज्ञांच्या मते तीन हजार रुपये किंमतीच्या मोबाईलमागे ग्राहकाला २५० रुपयांचा व्हॅट भरावा लागणार आहे. व्हॅटमध्ये वाढ केल्यामुळे महाराष्ट्रात मोबाईलच्या किंमतींमध्ये ८ ते १० टक्क्यांनी वाढ होऊ शकते, असे नोकिया इंडियाचे संचालक डी. शिवकुमार यांनी सांगितले.