Leading International Marathi News Daily

गुरुवार, २ जुलै २००९

सागरी सेतूवर झाली वाहतूक कोंडी
सात मिनिटांच्या प्रवासासाठी सत्तर मिनिटे
मुंबई, १ जुलै / प्रतिनिधी
समुद्रावर घोंघावणाऱ्या बेभान वाऱ्याशी स्पर्धा करीत, सुसाट वेगाने गाडी हाकण्याचा आनंद लुटण्याची खुणगाठ मनाशी बांधून हजारो मुंबईकरांची वाहने आज वांद्रे-वरळी सागरी सेतूकडे वळली. मात्र उत्साही मुंबईकरांच्या या उधानामुळे सागरी सेतूवर दिवसभर ‘ट्रॅफिक जॅम’ झाला आणि ‘बंपर टू बंपर’ वाहने हाकण्याची वेळ वाहनचालकांवर आली. सागरी सेतूवरील अपेक्षित सात मिनिटांच्या प्रवासाला सत्तर मिनिटांचा अवघी लागला. रात्री उशिरा तर वांद्रे येथील बाजूने सेतूकडे जाण्यासाठी वाहनांची इतकी गर्दी झाली की वांद्रे रेक्लमेशन, टी जंक्शनपासून ते अगदी धारावीपर्यंत वाहतुकीची तुफान कोंडी झाली होती.

पेट्रोल चार रुपयांनी; तर डिझेल दोन रुपयांनी महागले
नवी दिल्ली, १ जुलै/पीटीआय

अर्थसंकल्प जवळ आला असतानाच आज केंद्र सरकारने पेट्रोलचे दर लिटरला चार रुपयांनी तर डिझेलचे दर लिटरला दोन रुपयांनी वाढवले आहेत. आज मध्यरात्रीपासून ही दरवाढ लागू करण्यात आली आहे. स्वयंपाकाचा गॅस व केरोसिनच्या दरात मात्र बदल करण्यात आलेला नाही. पेट्रोल व डिझेलच्या किमतींवरचे नियंत्रण काढून ते आंतरराष्ट्रीय किमतींशी निगडित करण्याचा निर्णय मात्र तूर्त टाळण्यात आला आहे.

९०:१० कोटय़ावरील सुनावणी
अर्जदारांवर त्यांचाच मुद्दा उलटवून सरकारी युक्तिवाद सुरू
मुंबई, १ जुलै/प्रतिनिधी
इयत्ता १० वीची परीक्षा देणारे ‘एसएससी’ बोर्डाचे विद्यार्थी आणि इतर बोर्डाचे विद्यार्थी यांच्यात मुळात एकसमानता नाही त्यामुळे त्यांची तुलना होऊ शकत नाही, असा मुद्दा गेल्या वर्षीच्या ‘पर्सेंटाईल’ पद्धतीला विरोध करताना ‘आयसीएसई’ व ‘सीबीएसई’च्या विद्यार्थ्यांनी मांडला होता. एवढेच नव्हे तर या दोन्ही विद्यार्थ्यांमध्ये समानता नसल्याने ते पूर्णपणे वेगळ्या आणि स्वतंत्र गटात मोडतात, असा निष्कर्ष न्यायालयानेही त्या प्रकरणात नोंदविला होता.

सागरी सेतू रिलायन्सच्या मुठीत अन् खारे वारे होणार महागडे !
संदीप प्रधान
मुंबई, १ जुलै

वरळी-हाजी अली दरम्यानच्या सागरी सेतूचे काम अनिल अंबानी यांच्या रिलायन्सला देण्याचा प्रस्ताव राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीसमोर मंजुरीच्या प्रतिक्षेत आहे. बीओटी तत्त्वावर होणाऱ्या या कामाकरिता रिलायन्स-हुंडाई यांना राज्य शासनाने १३९२ कोटी रुपयांचे अनुदान देण्याचा प्रस्ताव आहे. अनुदानाची रिलायन्सने केलेली मागणी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अंदाजापेक्षा कमी आहे. त्यामुळे टोलरुपाने ही रक्कम वसूल करण्याचा प्रयत्न रिलायन्सकडून केला जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

भूजल पातळीत लक्षणीय घट..
सुनील कडूसकर
पुणे, १ जुलै

राज्यातील भूजलाच्या पातळीत लक्षणीय घट झाली असून, घट होणाऱ्या तालुक्यांची संख्या यंदा जवळजवळ दुप्पट झाली आहे. गेल्या वर्षी १३९ तालुक्यांमधील भूजल पातळी घटल्याचे आढळून आले होते. यंदा हा आकडा २२१ तालुक्यांपर्यंत वाढला आहे. धुळे, जळगाव, सोलापूर, परभणी, बुलढाणा, वाशिम आणि भंडारा या जिल्हय़ांतील सर्वच तालुक्यांतील भूजल पातळीत यंदा लक्षणीय घट झाली आहे.

जलाशयांममध्ये अवघा सात टक्के साठा शिल्लक
मुंबई, १ जुलै / खास प्रतिनिधी

पाऊस लांबल्याने राज्यातील जलाशयांमधील पाण्याच्या पातळीत चिंताजनक घट झाली असून पाण्याचा काटकसरीने वापर करण्याची सूचना शासनाला सर्व यंत्रणांना करावी लागली आहे. दरवर्षी जुलैच्या सुरुवातीला राज्यातील जलाशयांमध्ये १० ते १२ टक्के पाण्याचा साठा असतो. मात्र अपेक्षित पावसामुळे जुलैच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवडय़ांपासून जलाशयांमधील पाण्याची पातळी वाढू लागते. काही जलाशय तर जुलैअखेर भरून वाहू लागतात. यंदा पाऊसच नसल्याने जलाशयांमधील पाण्याच्या साठय़ाची स्थिती चिंताजनक बनली आहे. आजच्या घडीला राज्यातील जलाशयांमध्ये एकूण क्षमतेच्या सरासरी सातच टक्के साठा असल्याचे जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव व्यंकटेश गायकवाड यांनी सांगितले. मात्र आजच काही ठिकाणी पुन्हा पाऊस सुरू झाल्याने परिस्थिती सुधारेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. विभागवार जलाशयांमधील साठय़ाचा आढावा घेतला असता कोकण (२० टक्के), मराठवाडा (५ टक्के), नागपूर (३ टक्के), अमरावती (१० टक्के), नाशिक (६ टक्के), पुणे (७ टक्के) साठा आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या भातसा धरणात क्षमतेच्या ३१ टक्के साठा असल्याने मुंबईकरांच्या दृष्टीने तेवढाच दिलासा आहे.

..तर मुंबईकरांना प्यावे लागेल विहिरीचे पाणी!
मुंबई, १ जुलै / प्रतिनिधी

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांच्या क्षेत्रात अद्यापही समाधानकारक पाऊस झालेला नसला तरी मुंबईकरांमध्ये घबराट पसरेल, अशी माहिती पालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी देऊ नये, असे आज स्थायी समितीने बजावले. सध्या तलावांतील पाण्याची पातळी खालावली आहे, त्यामुळे १५ जुलैपर्यंत पाणीकपात सुरूच राहणार असून वेळ पडल्यास विहीरीतल पाणी मुंबईकरांना पुरविण्यात येईल, असे प्रशासनातर्फे आज स्पष्ट करण्यात आले.
अप्पर वैतरणा जलाशयातून दररोज ७०० दशलक्ष लिटर पाणी मोडक सागर तलावांत आणण्यात येत असून मोडक सागरची पातळी राखण्यात येत आहे. भातसामध्ये सध्या १२४ दशलक्ष लिटर पाणी उपलब्ध आहे. मात्र तलावांच्या पाणलोटक्षेत्रात येत्या १५ जुलैपर्यंत पाऊस झाला नाही तर गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळे पाण्याच्या पर्यायी स्त्रोतांचा वापर करावा लागेल, असे अतिरिक्त आयुक्त माधव सांगळे यांनी सांगितले. त्यादृष्टीने पालिका तयारी करत असून शहरातील विहीरांचा ऐन वेळी वापर करता येऊ शकेल. उपनगरात ५हजार ३६५ मोठय़ा विहिरी आहेत. या विहिरीतील गाळ काढण्यात येत आहे. ६ हजार ९८६ विंधन विहिरीतील पाण्याचा वापर करणेही शक्य आहे. खासगी जागेतील विहिरीतील गाळही काढण्यात येणार आहे. राज्य सरकारसोबतही पाण्याच्या प्रश्नावर समन्वय ठेवण्यात येईल, असेही सांगळे यांनी स्पष्ट केले.

विदर्भात वीज कोसळून ९ जणांचा मृत्यू
नागपूर, १ जुलै/ प्रतिनिधी

विदर्भात चंद्रपूर, यवतमाळ व गोंदिया जिल्ह्य़ात वीज कोसळून ९ जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये यवतमाळ जिल्ह्य़ातील राजूरवाडी येथील एकाच कुटुंबातील तिघांचा समावेश आहे. विजांच्या कडकडाटासह पाऊस सुरू असताना बुधवारी दुपारी जिवती तालुक्यातील भारी येथे शेतात वीज कोसळल्याने तिघांचा तर नागभीड तालुक्यात एकाचा मृत्यू झाला तर दोनजण गंभीर जखमी झाले. भारी येथे कारू शेंडे यांच्या शेतात कामे सुरू असताना चौघांच्या अंगावर वीज पडली. यामध्ये चौघेही गंभीर जखमी झाले. त्यांना ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात येत असतानाच तिघांचा मृत्यू झाला. नागभीड तालुक्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस सुरू असताना एकाचा मृत्यू झाला. यवतमाळ जिल्ह्य़ातील राजूरवाडी येथे एकाच कुटुंबातील तिघांचा व गोंदिया जिल्ह्य़ातील तिरोडा येथे दोन महिलांचा वीज कोसळून मृत्यू झाला. घरावरील छतांची कौले बदलत असतानाच वीज कोसळून वडील आणि दोन तरुण मुलांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना बुधवारी घाटंजी तालुक्यातील राजूरवाडी येथे घडली. गोंदिया जिल्ह्य़ातील तिरोडा येथील अदानी वीज प्रकल्पातील ईशा कन्स्ट्रक्शन कंपनीत काम करणाऱ्या कांता मेघनाथ भालाधरे दोन महिलांचा वीज कोसळून मृत्यू झाला.

 


महाराष्ट्राचा आखाडा संदर्भातील बातम्या वाचण्यासाठी वरील इमेजवर क्लिक करा, त्याचप्रमाणे या बातम्यांवरील आपली प्रतिक्रिया ऑनलाईन नोंदविण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा.

 

प्रत्येक शुक्रवारी