Leading International Marathi News Daily
गुरुवार, २ जुलै २००९
  पाऊले चालती समतेची वाट...
  ती..
  बुक कॉर्नर
व्यक्तिमत्त्व म्हणजे काय?
  मेल बॉक्स
  दवंडी
बातमीदारीची दुकानदारी
  स्मार्ट बाय
  ग्रूमिंग कॉर्नर
अति श्रमापेक्षा योग्य श्रम करा..
  क्रेझी कॉर्नर
सिब्बलसाहेब, तुम्ही ५० वर्षांपूर्वी जन्माला यायला हवे होते..
  यंग अचिव्हर्स
समथिंग स्पेशल
  फोटो कॉर्नर
मनाच्या धुंदीत, लहरीत ये नाsss
  नेट कॉर्नर
  ओपन फोरम
लग्नाचं वय का वाढतय?
  फुड कॉर्नर

घरोघरी - मॅनर्स
शाल्मली : अरे, काय करतीये काय ही मिताली? किती वेळ दार उघडायला..
आर्यन : कुठे गेली तर नसेल?
देविका : अरे, कुलूप नाहीये दाराला, बघ ना.
आर्यन : जवळच गेली असेल, म्हणून कुलूप लावलं नसेल..
सचिन : मला तर आता दार उघडा ना गडे दार उघडा ना असं गावंसं वाटतंय..

 

देविका : अगं, काय हे मिताली, काय झोपली बिपली होतीस का काय?
सचिन : अरे, थांबा थांबा, हे पाहिलंत काऽ अरे, हिच्याही पायाला प्लास्टर आहे. काय झालं गं?
शाल्मली : अगं, कुठे, केव्हा, कशी पडलीस?
मिताली : हो हो, सगळं सांगते, पण आधी आत तर या. बसा. थांबा हं, पाणी आणते.
सचिन : ए पाणीवाली, बस इथे शांतपणे. काही पाणी बिणी नकोय आम्हाला. आधी हे सांग हे कसं झालं?
मिताली : अरे, रस्त्यात केघ्ळीच्या सालीवरुन घसरून पडले आणि पाय फ्रॅक्चर झाला.
शाल्मली : आपल्या लोकांना हे साधे साधे मॅनर्स कधी कळणार आहेत कुणास ठाऊक? तिकडे परदेशात स्वत:च्या कुत्र्यानं घाण केली तरी उचलावी लागते, आणि इथं बघा.
आर्यन : काय रे पाय मोडणे हा पण संसर्गजन्य रोग असतो का? नाही म्हणजे सगळ्यांच्या पायावर गदा आलीये म्हणून म्हटलं.
मिताली : का? आणखी कोणाचे पाय मोडलेत?
शाल्मली : अगं, रेखाकाकूचा पाय मोडलाय. माझा बॉस पण घरीच आहे पायाला लागलंय म्हणून. मिशेलच्या वडिलांचाही पाय मोडलाय. अभिजीतनंही पाय मोडून घेतलाय. आता आम्ही राधिका आणि मुरलीला भेटायला गेलो होतो. त्यांना पहिल्याच पावसानं तडाखा दिलाय. बाईक घसरली आणि अ‍ॅक्सिडेंट झाला. दोघांचेही पाय मोडलेत. तिथून इथे आलो तर तुझा पण तैमूरलंग झालाय.
आर्यन : आणि जॉन अब्राहमचाही पाय मोडलाय.. ते कोण सांगणार?
सचिन : ए आर्यन, कशाला फेकतो आहेस?
आर्यन : अरे, खरंच सांगतोय.
सचिन : हो, त्याचा फोन आला होता ना तुला?
आर्यन : शंका आहे का काय तुला? रोजच सकाळी जॉन, सलमान, अमीरशी माझं बोलणं होतं..
शाल्मली : ए पुरे रे. तुमची भंकस इथे सुरू करू नका हं.
आर्यन : भंकस करून आम्ही मितालीचं मन रमवायचा प्रयत्न करतोय.
सचिन : हो नं, नाही तर देविकाबाई सुटतील ना..
देविका : ए मी काय केलं रे? माझ्यावर का उगीच घसरताय?
सचिन : काय केलंस? माझे आई, मगाशी राधिका आणि मुरलीसमोर त्या कुणा तुझ्या नातेवाईकांबद्दल कशाला इतकी रंगवून रंगवून सांगत होतीस?
आर्यन : आणि मी तुला डोळ्यांनी खुणा करून सांगतोय, तर तुझं लक्ष कुठे होतं?
देविका : अरे पण त्यांची केस अगदी राधिकासारखीच होती.. खूप प्रयत्न केले पण शेवटी त्यांचा पाय कापून..
शाल्मली : देविका, बास. आता परत तेच उगाळू नकोस.
सचिन : काही काहींना कुठे काय बोलावं याचं भानच नसतं.
देविका : असू दे. तुला कळतं ना, मग बास. तुम्हाला कळतं, मला नाही कळत.
सचिन : देविका, पेशंटसमोर भांडू नये हेही आता यापुढे लक्षात ठेव.
शाल्मली : सचिन, पुरे. लहान आहे रे अजून ती. शिकेल हळूहळू. मिताली, हे सगळं झालं कधी म्हणे?
मिताली : झाले दहा दिवस आता.
शाल्मली : दहा दिवस? आणि तू आम्हाला कळवलं पण नाहीस.
मिताली : शाल्मली, अगं सगळेजण मला असंच ओरडताहेत, पण मला हे कळत नाही की असं कसं कळवायचं की माझा पाय मोडलाय. ते काय लग्नाचं आमंत्रण आहे का, की माझा पाय मोडलाय आपण कृपा करून भेटायला येण्याचे करावे.
सचिन : पॉइंट आहे हं मितालीच्या बोलण्यात.
शाल्मली : कसला पॉइंट डोंबलाचा.
सचिन : म्हणजे असं बघ की आजचं युग हे communication age मानलं जातं. इतकी communication tools आपल्या हाताशी असतात, पण तरीही आपण एकमेकांच्या संपर्कात असतोच असं नाही. त्या मानानं आपल्या आधीची पिढी बघ. त्यांना बरोबर सगळं माहिती असतं.
देविका : हो रे सचिन, तू म्हणतोस ते मलाही पटतंय. माझी आजी घरीच असते, पण तिला जगभरच्या गोष्टी माहिती असतात. आम्ही तर तिला ऑल इंडिया रेडियोच म्हणतो.
शाल्मली : सचिन, तू म्हणतो आहेस ते खरंच आहे हं. आपण कधी कधी इतके आपल्या कामात गुंतलेलो असतो की खबरबात घ्यायची राहूनच जाते. प्रत्यक्ष भेटणं तर दूर फोनही करायला वेळ मिळत नाही. खूप दिवसांत आपलंही बोलणं झालंच नाहीये नाही गं? आज आता आम्ही इथे आलो नसतो तर आपल्याला कळलाच नसता बाईसाहेबांचा पराक्रम.
मिताली : म्हणजे? मला वाटलं तुम्हाला कळलं म्हणून तुम्ही सगळे आलात.
शाल्मली : कुणाकडून कळणार?
मिताली : स्वाती काही बोलली नाही का? तिला माहिती होतं. ती आणि साकेत परवा येऊनही गेले. मला वाटलं तिच्याकडूनच तुम्हाला कळलं.
देविका : छे. स्वाती हल्ली कुठल्या जगात असते कुणास ठाऊक? आम्ही इथे आलो होतो राधिका आणि मुरलीला भेटायला. त्यांना अ‍ॅक्सिडेंट झालाय. त्यांना इथल्याच तुझ्या घराजवळच्या रत्ना हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडमिट केलंय. म्हणून आम्ही ठरवलं तिथून तुझ्याकडे यायचं आणि तुला सरप्राईज व्हिजिट द्यायची..
सचिन : तर उलट तूच आम्हाला सरप्राईज दिलंस.
शाल्मली : घरी तरी कळवलंस का नाही?
मिताली : अगं कळवलंय पण तुला तर माहितीए ना की, आजीची तब्येत आता खूपच खालावली आहे. त्यामुळे मीच तिला सांगितलं की तू इथे येण्याचा आटापिटा करूच नकोस.
देविका : मिताली, कशी काय गं तू एकटी राहू शकतेस? मला जर असं काही झालं ना तर मी आईला हलूच देणार नाही.
आर्यन : असं काही कशाला, ए लाडोबा, तू तर तशीही तुझ्या आईशिवाय राहू शकत नाहीस.
मिताली : देविका, अगं तुम्हा मुंबई- पुण्याच्या मुलींना हे शक्य आहे, पण आमच्यासारख्या लहान गावातून मुंबईला येऊन राहणाऱ्यांना पर्यायच नाही. आता आमचंच बघ ना. मी इथे, दादा बंगलोरला आणि आई-आजी गावाला. होस्टेलसाठीही मी खूप ट्राय केला होता, पण नाही जमलं. मग पी. जी. म्हणून राहण्याशिवाय गत्यंतरच नव्हतं. मग आम्हाला अ‍ॅडजस्ट करावंच लागतं. न करून सांगणार कुणाला?
शाल्मली : अरे, पण मित्र मंडळी त्यासाठीच असतात बरं का मितालीबाई. आता प्लास्टर निघेपर्यंत तुझी सगळी जबाबदारी आमच्यावर.
मिताली : अरे, पण तुम्हाला कशाला उगीच त्रास? आणि तुम्हाला तरी सारखं इथं यायला कसं जमेल? जवळ आहेत का आपली घरं?
शाल्मली : पण मग तूच आमच्या घरी चल ना. मग सगळा प्रश्न मिटेल
मिताली : छे! छे! नको, नको.
शाल्मली : अगं, नको नको काय? इथं एकटीनं राहण्यापेक्षा आमच्याकडे चल.
मिताली : अगं, तसं मला जमत असतं तर मी गावीच नसते का गेले? पण माझा थिसिस आता अगदी शेवटच्या टप्प्यात आलाय. बघते आहेस ना हा पुस्तकांचा पसारा. हा सगळा संसार घेऊन कुठे फिरू गं? एक एक दिवस काय, एक एक क्षण माझ्या दृष्टीनं महत्त्वाचा असताना हे भलतंच काही तरी होऊन बसलंय. पण सुदैवाने मला घरून काम करण्याची परवानगी मिळालीय. त्यामुळे जाण्या- येण्याचा इतका वेळ वाचतोय त्याचाच मी फायदा करून घेतेय. शांतपणे मी काम करू शकते आहे आणि खरं सांगायचं तर प्रॉडक्टिव्हिटीही खूप वाढलीय. म्हणून आता तुझ्याकडे येत नाही. नाही तर नक्की आले असते.
शाल्मली : ओके, पण काहीही लागलं तर हक्कानं सांग, संकोच करू नकोस.
मिताली : नक्की.
शुभदा पटवर्धन
shubhadey@gmail.com