Leading International Marathi News Daily

शुक्रवार, ३ जुलै २००९

कोकणात धुवांधार पाऊस
रत्नागिरी, २ जुलै/खास प्रतिनिधी
गेल्या सुमारे महिनाभर कोकणवासीयांना हुलकावणी देणारा मान्सूनचा अस्सल धुवांधार पाऊस अखेर बरसायला सुरुवात झाली आहे. रत्नागिरी व सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्यांमध्ये पावसाने या मोसमातील उच्चांक गाठले आहेत. रत्नागिरी तालुक्यात गेल्या २४ तासांत सुमारे सहा इंच (१४९ मिलीमीटर), तर मालवण आणि वेंगुर्ले तालुक्यात प्रत्येकी सुमारे १२ इंच (अनुक्रमे ३०९ व २५० मिमी) पावसाची नोंद झाली आहे.

समलिंगी संबंध हा गुन्हा नाही
दिल्ली उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
नवी दिल्ली, २ जुलै/पीटीआय
प्रौढ व्यक्ती परस्परांच्या सहमतीने समलिंगी संबंध ठेवू शकतात व असे संबंध राखणे कायदेशीर आहे असा ऐतिहासिक निकाल दिल्ली उच्च न्यायालयाने आज दिला. समलिंगी संबंधांना फौजदारी गुन्हा ठरविणारी विद्यमान कायद्यातील तरतूद ही मूलभूत हक्कांवर गदा आणणारीच आहे, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे. या निकालाबाबत समलिंगी संबंध राखणाऱ्यांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या संघटना व व्यक्तींनी आनंद व्यक्त केला आहे तर धार्मिक नेत्यांनी नापसंती व्यक्त केली आहे.

ओव्हरहेड वायर तुटल्याने मध्य रेल्वेचा वाजला बोऱ्या
मुंबई, २ जुलै / प्रतिनिधी

अप धीम्या मार्गावरील तुटलेली ओव्हरहेड वायर दुरुस्त होण्यास दुपारचा दीड वाजला. तोपर्यंत मध्य रेल्वेच्या उपनगरी व लांब पल्ल्याच्या वाहतुकीचा पूर्ण बोजवारा उडाला. त्यामुळे दुपारी दोन वाजेपर्यंत लाखो प्रवाशांना कल्याण ते ठाणे प्रवासासाठी दोन ते अडीच तास आणि त्यापुढे ठाणे ते सीएसटी प्रवासासाठी एक ते दीड तासांचा वेळ लागत होता. लोकलच्या लांबच लांब रांगा लागल्याने अर्धा अर्धा तास लोकल जागीच खोळंबल्या होत्या.
केंद्रीय रेल्वेमंत्री ममता बॅनर्जी आज म्हणजे शुक्रवारी सकाळी १२ वाजता लोकसभेत रेल्वे अर्थसंकल्प सादर करतील.

आर्थिक सर्वेक्षण अहवालात व्यापक वित्तीय सुधारणांची शिफारस
नवी दिल्ली, २ जुलै/खास प्रतिनिधी
अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी आज संसदेत मांडलेल्या २००८-०९ सालच्या आर्थिक सर्वेक्षण अहवालात व्यापक वित्तीय सुधारणांवर भर दिला गेला आहे. या सर्वेक्षणात सार्वजनिक क्षेत्रातील आजारी उद्योगांचा लिलाव, फायद्यातील नवरत्न कंपन्यांमध्ये ५ ते १० टक्के निर्गुंतवणूक आणि शेअर बाजारात काही कंपन्यांची नोंदणी करून १० टक्के भांडवल विक्री करून सरकारने निर्गुंतवणुकीद्वारे २५ हजार कोटी रुपये गोळा करावे, अशी सूचना करण्यात आली आहे.

सत्यम घोटाळ्यातील ‘प्राइसवॉटर कूपर’ला राज्याच्या ई-गव्‍‌र्हनसच्या आराखडय़ाचे काम
समर खडस
मुंबई, २ जुलै

सत्यमच्या कोटय़वधींच्या घोटाळ्याबाबत आपल्या लेखा परीक्षणात कोणतीही त्रुटी न काढणाऱ्या प्राइसवॉटर कूपर या कंपनीला आता राज्याच्या ई-गव्‍‌र्हनसचा आराखडा तयार करण्याचे काम दिले गेल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्काच बसला आहे. राज्यातील प्रत्येक खात्याने आता ई-गव्‍‌र्हनसचे धडे गिरवावेत, असे निर्देश मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी दिल्याने प्रत्येक खात्याच्या संगणकीकरण व त्याद्वारे ई-गव्‍‌र्हनसची युद्ध पातळीवर तयारी सुरू आहे. आज मंत्रालयात याबाबत मुख्य सचिव जॉनी जोसेफ यांनी बैठक घेतली.

आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चरची पाच राज्यात रस्तेबांधणी
मुंबई, २ जुलै/प्रतिनिधी

रस्तेबांधणीच्या क्षेत्रात महाराष्ट्राचे नाव बुलंद करणाऱ्या आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स लिमिटेडने वीरेन्द्र म्हैसकर यांच्या नेतृत्वाखाली गुजरातनंतर आणखी तीन नव्या राज्यांमध्ये भक्कम पाय रोवत महाराष्ट्राची पताका अटकेपार नेण्यात यश मिळवले आहे. या राज्यांमध्ये गोवा, पंजाब आणि राजस्थानचा अंतर्भाव असून या तीनही प्रकल्पांची मुहूर्तमेढ लवकरच घातली जाण्याची शक्यता आहे. यातला गोवा ते कर्नाटक हा ६५.०७ किलोमीटर्सचा चार मार्गिकांचा संपूर्ण कॉँक्रीटीकरण असणारा रस्ता डीबीएफओटी तत्वावर बांधला जाणार असून त्याचा अंदाजित खर्च ८०० कोटी रुपये आहे.

पंढरपूरजवळील अपघातात सहा वारकरी ठार
सोलापूर, २ जुलै/प्रतिनिधी

पंढरपुरात आषाढी यात्रेसाठी येणाऱ्या वारकऱ्यांच्या टेम्पोला भरधाव वेगातील ट्रॅक्टर ट्रॉलीची जोरदार धडक बसून घडलेल्या अपघातात सहा वारकरी मरण पावले तर अन्य १९ जण जखमी झाले. पंढरपूर काही अंतरावर असतानाच कुर्डूवाडी-शेटफळ रस्त्यावर लऊळ येथे गुरुवारी पहाटे चारच्या सुमारास ही दुर्घटना घडली. या अपघातातील सर्व मृत व जखमी हे मराठवाडय़ाच्या जालना जिल्ह्य़ातील बदनापूर तालुक्यातील वाला येथील रहिवासी आहेत.ट्रॅक्टरला जोडलेल्या दोनपैकी एका ट्रॉलीची वारकऱ्यांच्या टेम्पोला समोरुन जोरदार धडक बसल्याने टेम्पो रस्त्याच्या खाली पालथा होऊन हा अपघात झाला.

ज्येष्ठ चित्रकार तय्यब मेहता यांचे निधन
मुंबई, २ जुलै / प्रतिनिधी
ज्येष्ठ चित्रकार तय्यब मेहता यांचे बुधवारी मध्यरात्री मुंबईत निधन झाले. ते ८४ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी सकीना, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे. चित्रकलेतील त्यांच्या महत्वपूर्ण योगदानाबद्दल त्यांना ‘पद्मभूषण’ या राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. मेहता यांनी १९५२ मध्ये जे. जे. कला महाविद्यालयातून कला शिक्षण पूर्ण केल्यानंतर १९५८ मध्ये जहांगीर कलादालनात आपले पहिले चित्र प्रदर्शन भरवले होते. लंडन, पॅरिस, वॉशिग्ंटन आदी ठिकाणीही त्यांच्या चित्रांची प्रदर्शन भरली होती. आंतरराष्ट्रीय स्तरावरही त्यांच्या चित्रांना मागणी होती. त्यांनी रेखाटलेली काही चित्रे विक्रमी किंमतीला विकली गेली होती.मेहता यांनी रेखाटलेल्या ‘ट्रस्डबुल’, ‘डायगोनल’ आदी चित्रमालिका कलाक्षेत्रात खूप गाजल्या असून मेहता यांनी रेखाटलेली विविध चित्रे देशभरातील मोठी कलासंग्रहालये, कालादालने आणि कलासंग्राहकांच्या संग्रहात आहेत. मेहता यांना १९८८ मध्ये मध्य प्रदेश शासनाचा कालिदास पुरस्कार मिळाला होता. २००४ मध्ये त्यांना राष्ट्रपती सुवर्णपदक मिळाले होते. मुंबई आर्ट सोसायटीचा ‘रुपधर जीवनगौरव’ पुरस्कारही त्यांना मिळाला होता.

शिक्षण मंडळाच्या मुंबई विभागीय सचिव बसंती रॉय सक्तीच्या रजेवर?
मुंबई, २ जुलै / प्रतिनिधी

माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या मुंबई विभागीय सचिव बसंती रॉय यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याची कारवाई करण्यात आल्याचे सूत्रांकडून समजते. रॉय महिनाभरात निवृत्त होणार असतानाही त्यांच्यावर कारवाई करण्यात आल्याने शिक्षण क्षेत्रातील अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. याबाबत शिक्षणमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याशी संपर्क साधला असता, रॉय यांच्यावरील कारवाईची आपल्याला कल्पना नाही. लहानसहान गोष्टीवरून मी कारवाई करण्याच्या भानगडीत पडत नाही. शिक्षण मंडळ हे स्वायत्त असल्यामुळे मंडळातील वरिष्ठांनी कारवाई केली असल्यास आपल्याला कल्पना नाही. मात्र, आपल्या माहितीनुसार रॉय स्वत:हूनच आजारपणाच्या रजेवर गेल्या असल्याचे त्यांनी सांगितले. बसंती रॉय यांनी आपण सध्या रजेवर आहोत. मात्र याविषयी आपल्याला काहीही बोलायचे नसल्याचे सांगितले. तर शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा विजयशिला सरदेसाई यांना वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न करूनही त्यांचा मोबाईल बंद ठेवण्यात आला होता.

९०:१० वरील सुनावणी आज संपण्याची चिन्हे
मुंबई, २ जुलै/प्रतिनिधी

इयत्ता ११ वीच्या प्रवेशांमध्ये ‘एसएससी’च्या विद्यार्थ्यांसाठी ९० टक्के जागा राखून ठेवण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाविरुद्ध केल्या गेलेल्या याचिकांवरील उच्च न्यायालयात सुरु असलेली सुनावणी उद्या शुक्रवारी पूर्ण होण्याची शक्यता आहे. राज्य सरकारतर्फे विशेष ज्येष्ठ वकील के. के. सिंघवी यांचा युक्तिवाद आजही अपूर्ण राहिला. उद्या सिंघवी यांचा युक्तिवाद पूर्ण झाल्यावर ‘एसएससी’ बोर्डातर्फे ज्येष्ठ वकील श्याम दिवाण यांचा युक्तिवाद होईल. सर्वानी आपापले युक्तिवाद उद्याच्या जेवणाच्या सुट्टीपर्यंत संपवावे, असे न्यायालयाने सांगितले.

‘मिनिस्टरसाहब से आओ’चे गौडबंगाल!
मुंबई, २ जुलै/प्रतिनिधी

शीव-पनवेल महामार्गाच्या सुधारणेसंबंधीच्या ८०० कोटी रुपयांच्या कामाकरिता निविदा भरण्याचा शनिवार हा शेवटचा दिवस असून चुनाभट्टी येथील कार्यालयात निविदा मागण्याकरिता गेल्यास ती न देता ‘मिनिस्टरसाहब से आओ’ असा कानमंत्र दिला जात असल्याच्या तक्रारी केल्या जात आहेत. भाभा अणुशक्ती संशोधन केंद्र जंक्शन ते कळंबोली जंक्शन दरम्यानच्या शीव-पनवेल महामार्गाच्या सुधारणेसंबंधीच्या कामाकरिता २० जून ते ४ जुलै २००९ दरम्यान निविदा दाखल करायच्या आहेत. ८०० कोटींच्या या कामाकरिता निविदा दाखल करण्याकरिता निविदा खरेदी करण्याकरिता जाणाऱ्यांना त्या दिल्या जात नाहीत.

भाजपचे ज्येष्ठ नेते बंडोपंत जोशी यांचे निधन
नाशिक, २ जुलै / प्रतिनिधी

भाजपचे ज्येष्ठ नेते प्रभाकर शंकर उपाख्य बंडोपंत जोशी (७३) यांचेआज सकाळी येथे कर्करोगाने निधन झाले. ‘इंडियन एक्स्प्रेस’ समुहाचे ते नाशिक येथील प्रमुख वितरक होते. त्यांच्या पश्चात पत्नी मंगला, मुलगा देवदत्त व विवाहित कन्या शुभदा नातू असा परिवार आहे. सायंकाळी येथील अमरधाममध्ये त्यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीतून घडलेले बंडोपंत अखेपर्यंत संघ परिवार आणि भाजपशी अत्यंत निष्ठावान राहिले. किंबहुना, नाशिकमध्ये बंडोपंत हीच जणू भाजपची ओळख बनून राहिली होती. तत्कालीन जनसंघाच्या माध्यमातून ते राजकारणात सक्रीय झाले. १९६७ साली प्रथम नाशिक नगरपालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आल्यावर त्यांनी आरोग्य समितीचे सभापतीपद भूषविले. त्याबरोबरच पक्ष संघटनेत त्यांनी मोलाचे योगदान दिले.

 


महाराष्ट्राचा आखाडा संदर्भातील बातम्या वाचण्यासाठी वरील इमेजवर क्लिक करा, त्याचप्रमाणे या बातम्यांवरील आपली प्रतिक्रिया ऑनलाईन नोंदविण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा.

 

प्रत्येक शुक्रवारी