Leading International Marathi News Daily
शनिवार, ४ जुलै २००९
  ...पण बोलणार आहे!
बैरन सास ननंदिया..
  विज्ञानमयी
व्ही. कल्पगम
  जनरेशन ‘एल’
  लग्नगाठ स्थलांतरितांची
  भकास चेहरे उजाड वास्तव
  काळ सुखाचा
नवा अध्याय
  चिकन सूप...
एकीचे बळ..
  जिद्दी सुनीलची कथा..
  प्रतिसाद
  मणिपूरची अस्वस्थता
  पाहुणे.. त्या काळचे!
  भुलविणाऱ्या रानवाटा!
  ग्रीस आणि ऑलिव्हज्

(अरुणा ढेरे यांचे ‘कवितेच्या वाटेवर’ हे सदर यापुढे दर पंधरा दिवसांनी प्रसिद्ध होईल.)

 

...पण बोलणार आहे!
बैरन सास ननंदिया..
अगदी लहान वयातही वागण्या-बोलण्यात काही चुकलं, कमी पडलं, की एक वाक्य हमखास झेलावं लागायचंच! ‘‘इथे (म्हणजे या घरी- म्हणजे माहेरी) सगळे वेडे चाळे करून घ्या बायांनो. तिकडे (म्हणजे सासरी) गेल्यावर अशा गमजा चालायच्या नाहीत!’’
एकूण सासर, सासरची माणसं- त्यातही सासू, नणंद वगैरे वेचक मंडळी यांच्याबद्दल सदैव धाक वा दुरावा वाटेल, असंच मोठय़ांच्या तोंडून ऐकू यायचं. टिंगलीचाही तोच विषय. साधं खाताना ठसका लागला तरी ‘‘वर बघ.. सासू टांगली आहे,’’ असं भाष्य असायचं. टांगण्याजोगा अन्य नातेवाईक काही कोणाला सुचायचा नाही. पारंपरिक साहित्यातूनही ‘आसू नाही ती सासू कशाची?’, ‘सासरच्या वाटे, कुचूकुचू काटे..’ अशा विषगर्भ कल्पना पुढे यायच्या.
‘नणंदेचं करट किरकिर करतं, खरूज होऊ दे त्याला..
सासू माझी जाच करते, बोडखी कर गं तिला..’ अशी देवीची आळवणी करणारी भारुडं शाळेच्या स्नेहसंमेलनांत सादर व्हायची. तेव्हाच्या वयानुसार त्याची गंमत वाटायची. जरा जाणतेपणी हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत शिकायचा, ऐकायचा नाद लागला तेव्हाही या ‘बैरन सास ननंदिया..’सारख्या ‘स्टॉक व्हिलन कॅरॅक्टर्स’ ओलांडल्याशिवाय पुढे जाता यायचं नाही.

 

सासूच्या छळाने जेरीला आलेल्यांच्या कथा-कहाण्या प्रत्यही वाचनात यायच्या.
सारांश काय, तर सासर, सासरची माणसं यांच्याबद्दल सदैव साशंक राहावं, असेच संस्कार होत गेले. आपल्या मुलीचं असं चुकीचं ‘कंडिशनिंग’ होऊ नये यासाठी प्रौढपणात प्रयत्न करावासा वाटला तो याच पाश्र्वभूमीवर!
अर्थात इतर अनेक क्षेत्रांप्रमाणेच कौटुंबिक नातेसंबंधांमध्येही मधल्या काळात बरेच बदल होत गेल्याने फार कठोर प्रयत्न करावा लागला नाही, ही गोष्ट वेगळी. सर्वात पहिली गोष्ट म्हणजे हळूहळू मुलींची लग्नाची वयं मोठी झाली. त्यांना शिक्षण, अर्थार्जन, माहेरचे लोक, समाज यांचा पाठिंबा मिळण्याच्या शक्यता वाढल्या. कसंही, काहीही करून मुलीला कोणाच्या तरी ‘गळ्यात बांधण्याचा’ अट्टहास कमी झाला. मुलीला अनुरूप वर मिळावा, अशी अपेक्षा- मागणी सुरू झाली. मुलीची ‘डोली भेजी वही से अर्थी उठेगी’ अशा छापाचा निष्ठुरपणा कमी झाला. संपर्क माध्यमं, प्रवासाची साधनं वाढली. लग्न झालेल्या मुलीचा ‘नैहर छुटेनी’- ‘माहेर सुटणार नाही’ असं वातावरण.. पर्यावरण निर्माण झालं. मुलीचं सासर-घरातलं आणि माहेरातलं स्थान सुरक्षित कसं राहील, हे कायदा बघू लागला. याने सर्वाचे सर्व प्रश्न सुटले, असं अजिबात नाही. पण सासरचा जाच, फास रोखला जाऊ शकतो.. रोखला जाईल, असं तरी निश्चित भासू लागलं. ‘सास भी कभी बहू थी’ (सास भी कभी मऊ थी!) हे जाणवण्याइतपत खुलेपणा विचारात तरी आला. इकडे शहरी सुशिक्षितांमधल्या सासवा एकजात फटाफट ‘आया’ झाल्या. स्वत:ची आई ही ‘ए आई..’ आणि नवऱ्याची आई ही ‘अहो आई’ अशी चलाख विभागणी नकळत होऊन गेली. मग सासरे हे वडील होणं, नणंद-जावा या सख्या, जिवलग मैत्रिणी होणं, हे ओघानं आलंच. शाब्दिक गोडव्याचे झरे चौफेर झुळूझुळू वाहायला लागले. कुटुंबाची बदलती रचना, आकृतिबंध हेही त्यांच्या पथ्यावर पडले. घरं लहान, मुलं कमी.एखादाच दीर-नणंद असणार. नोकरी-उद्योगामुळे सगळे आपापल्या ठिकाणी- म्हणजेच एकमेकांपासून सुरक्षित अंतरावर राहत असणार. जो- तो आर्थिक पातळीवर शक्यतो स्वयंपूर्ण असणार. निदान सावध राहणार. खुद्द सासू आणि सून आपापली मठी जिवाभावाने सांभाळत असणार. कोणाला कोणाची दैनंदिन झळ लागत नाही. कोणाला कोणाबरोबर काही शेअर करायचं नाही. कोणी कोणावर अवलंबून नाही. तिच्या घरी ती सुखी, सुनेच्या घरी सून सुखी- असा सोयीस्कर नातेसंबंध अनेकींना लाभला. एकमेकींपासून शेकडो मैल अंतरावर राहणाऱ्या आणि वर्षांकाठी थोडय़ा दिवसांचा सहवास गोड करून घेणाऱ्या ‘प्रेमळ’ सासवा-सुनांच्या मुलाखती हिट् होऊ लागल्या. माहेरच्या साडीचं आकर्षण कधीच संपलं नाही; पण सासरची साडीसुद्धा नेहमीच असह्य वाटण्याइतकी टोचरी-बोचरी नसते, याचं भान काहींना तरी यायला लागलं.
म्हटलं तर हे सगळं छानच झालं. पण खडबडीत जमिनीवर देखणं जाजम घालण्याइतपतच हे छान आहे, हे मात्र विसरून चालणार नाही. जाजमामुळे त्या जमिनीवरचे खडे दिसत नाहीत, पण बोचायचे मात्र थांबत नाहीत. तिच्यावर झपाझप चालायला गेलं तर जास्तच बोचतात पठ्ठे! आजही तरुण दांम्पत्यात तणाव, बेबनाव होतात तेव्हा त्यामागे या नातेसंबंधांचा छुपा हात असल्याचं जाणवतं. विवाह समुपदेशक असं सांगतात की, अशा तणावग्रस्त जोडप्यांना सासरच्या माणसांपासून दूर, सुरक्षित अंतरावर नेलं की त्यांचं दांम्पत्य जीवन सुधारतं. कारण इतरांची ढवळाढवळ कमी होते. आजही मुलगी आणि सून किंवा उलटय़ा बाजूने ‘ए आई’ आणि ‘अहो आई’ यांच्यामध्ये भेदभाव होतो. ढोबळ, बटबटीत नसेल, तरीही सूक्ष्म पातळीवर होतोच. आजही मुलीची मुलं आणि सुनेची मुलं यांच्यात उन्नीस-बीस करणारे आजी-आजोबा आढळतात. लग्न होईपर्यंत ‘गुणी बाळ’ असणाऱ्या आपल्या मुलाला नव्या सुनेनं बिघडवलं, असं बऱ्याच वरमायांना वाटतं.
एकेकदा वाटतं, हे असंच असणार. ही असमान पायावरच्या नातेसंबंधांची तुलना नाही का? माता आणि अपत्य हे जैविक नातं आहे. तर सासू-सून, सासरचा परिवार आणि सून हे सांस्कृतिक नातं आहे. बाईच्या पोटी मूल जन्मावं, त्यांच्यात रक्ताचं नातं असावं, हे निसर्गाने ठरवलं. स्त्री-पुरुषामध्ये जैविक आकर्षण असावं, हे निसर्गाने ठरवलं. त्यात संस्कृतीचा वाटा काही नाही. पण समाजाची घडी नीट बसावी, गाडा सुरळीतपणे चालावा म्हणून लग्नसंस्था ही एक प्रकारची कृत्रिम योजना संस्कृतीला बेतावी लागली. कोणतीही कृत्रिम योजना कोणत्याही नैसर्गिक घटिताच्या ताकदीची, तोडीची असू शकत नाही, हे काय नव्याने सांगायला हवं?
तस्मात- सासरची वाट ही माहेरच्या वाटेइतकी गुळगुळीत नसणं, आई आणि सासू, भाऊ आणि दीर एखादीसाठी ‘वेगवेगळे’ असणं गृहीत धरायला मला तरी फार काही हरकत दिसत नाही. नेहमीच वेगळं ते वाईट नसतं. चांगल्या शिक्षणाने, चांगल्या संस्कारांनी त्याच्याकडे बघण्याची समतोल दृष्टी प्राप्त करून घेता येते. पुढच्या पिढय़ांना ती कशी देता येईल, याचा विचार व्हायला हवा. आपल्या मुलीला तिच्या सासूची मुलगी होण्याची सक्ती नको, पण निदान चांगली सून होण्याचं मार्गदर्शन तरी नक्कीच द्यायला हवं. तेच जावयाबद्दल, सासू-सासऱ्यांबद्दलही!
हे लिहीत असतानाच मला मागचे अनेक उंचावलेले हात हलकेच खुणावताहेत.. आम्ही नाही त्यातले, आम्ही सुनांचे आई-वडील आहोत किंवा आम्ही सासूच्या मुली/ मुलगेच आहोत, वगैरे म्हणण्याची त्यांच्यात अहमहमिका लागली आहे. ‘‘तुम्ही उगाच काहीतरी जुनेपाने आरोप करताहात.. आम्हा प्रगत, पुरोगामी मंडळींना या विषयाचा (विषाचा?) स्पर्शही झालेला नाही,’’ असं ते छुपेपणाने मला बजावताहेत. हे ओळखून मी अगोदरच त्यांचं अभिनंदन करते.. त्यांना शुभेच्छा देते आणि म्हणते- मे युवर ट्राइब इन्क्रीज! तुमच्यासारख्या संत-महात्म्यांची समाजाला फार गरज आहे. तेव्हा तुमची जमात वाढीला लागो! याबाबतीतलं माझं निरीक्षण खोटं ठरो, यातच माझा आनंद आहे!
मंगला गोडबोले
mangalagodbole@gmail.com