Leading International Marathi News Daily

शनिवार, ४ जुलै २००९

नवी दिल्ली, ३ जुलै/खास प्रतिनिधी
प्रवासी वा मालभाडय़ात कोणतीही वाढ न करता गोरगरीब व कष्टकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवून युपीए सरकारच्या वतीने संसदेत आपला पहिला रेल्वे अर्थसंकल्प सादर मांडताना आज रेल्वेमंत्री ममता बॅनर्जी यांनी घोषणा आणि आश्वासनांचा पाऊस पाडला. असंघटित क्षेत्रातील कामगार, शेतकरी, महिला, अपंग, अल्पसंख्याक, तरुण आणि अल्पउत्पन्न गटांवर सुविधा आणि सवलतींचा वर्षांव करताना १२ नव्या नॉनस्टॉप प्रवासी गाडय़ा सुरु करण्याची तसेच ५७ नव्या गाडय़ा, २७ गाडय़ांच्या अंतरात आणि १३ गाडय़ांच्या फेऱ्यांमध्ये वाढ करण्यात येत असल्याची घोषणा केली.

मुंबई, ३ जुलै / प्रतिनिधी
रेल्वे भाडय़ात कोणतीही वाढ न करता देशवासियांवर नवनवीन सोयीसुविधा, रेल्वे गाडय़ा आणि रेल्वेमार्गाची उधळण करणाऱ्या रेल्वेमंत्र्यांची ‘ममता एक्स्प्रेस’ अखेर मुंबईत न थांबताच टा टा करीत पुढे निघून गेली. आदर्श रेल्वे स्थानक म्हणून काही स्थानकांचा विकास, एमयूटीपी प्रकल्पासाठी ४२९ कोटींची तरतूद, बोरिवली स्थानकात नवा फलाट, लांब पल्ल्याच्या काही गाडय़ा यांसारख्या काही मोजक्या घोषणा करून रेल्वे अर्थसंकल्पात मुंबईला लांबूनच टाटा करण्यात आला आहे.

रेल्वे अर्थसंकल्प विशेष
मुंबई, पुणे आणि नागपूरची रेल्वेस्थानके विश्वस्तरीय बनविणार

नवी दिल्ली, ३ जुलै/खास प्रतिनिधी

रेल्वेमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज सादर केलेल्या रेल्वे अर्थसंकल्पात सीएसटी मुंबई, पुणे आणि नागपूर अशी तीन विश्वस्तरीय रेल्वेस्थानके, ३२ आदर्श रेल्वेस्थानके आणि चार बहुउद्देशीय परिसर असलेली रेल्वेस्थानके, तीन नॉनस्टॉप गाडय़ा, ९ नव्या सुपरफास्ट गाडय़ा आणि काही पथदर्शक प्रकल्प महाराष्ट्राच्या वाटय़ाला आले आहेत.

‘ममता एक्स्प्रेस महाराष्ट्रात थांबलीच नाही’
‘संयुक्त पुरोगामी आघाडी’चे निम्म्याहून अधिक खासदार निवडून आलेल्या महाराष्ट्राचा रेल्वे अर्थसंकल्पात पूर्णपणे विसर पडला आहे, गरीबांची भाषा करणाऱ्या ममता बॅनर्जी यांची फास्ट ट्रेन महाराष्ट्रात थांबलीच नाही, असे खासदार गोपीनाथ मुंडे म्हणाले. परळी-अहमदनगर, कल्याण-नगर, इंदौर-मनमाड अशा रेल्वेमार्गासाठी भरीव तरतूद अपेक्षित होती. तसेच मुंबईतील ५५ लाख प्रवाशांसाठी नवीन गाडय़ा व रेल्वेमार्गासाठी करणे गरजेचे होते. मात्र केंद्राने महाराष्ट्राच्या तोंडाला पाने पुसली आहेत, अशी टीका त्यांनी केली.

विविध योजनांची घोषणा
नवी दिल्ली, ३ जुलै/खास प्रतिनिधी

तीर्थक्षेत्रे, पर्यटन स्थळे आणि औद्योगिक केंद्रापाशी असलेल्या ५० रेल्वेस्थानकांवर खरेदीची सुविधा, भोजनाचे स्टॉल्स, बजेट हॉटेल्स आदींची सोय असलेल्या बहुउद्देशीय परिसराची निर्मिती करण्यात येईल. आधुनिक मशीनच्या मदतीने स्वयंचलित धुलाईची व्यवस्था आणि चादरी, उशा, अभ्रे यांच्या आणखी चांगल्या व्यवस्थापनाची तरतूद असलेल्या ऑनबोर्ड हाऊस किपिंग योजना अतिरिक्त २०० प्रवाशी गाडय़ांच्या जोडय़ांनाही लागू करण्यात येईल. दोन तासांपेक्षा जास्त वेळ धावणाऱ्या डीईएमयू आणि एमईएमयू गाडय़ांमध्ये शौचालय सुविधा उपलब्ध करण्यात येईल.

निळ्या झोळीतील ‘सर्वसमावेशक’ रेल्वे अर्थसंकल्प!
नवी दिल्ली, ३ जुलै/खास प्रतिनिधी

‘रोशनी चाँद से होती है, सितारोंसे नही, मोहब्बत दिल से होती है जुल्म से नही,’ असा बंगाली उच्चारातील उर्दू शेर पेश करीत रेल्वे अर्थसंकल्पाचा समारोप करणाऱ्या रेल्वेमंत्री ममता बॅनर्जी यांनी मनमोहन सिंग सरकारच्या ‘सर्वसमावेशकते’च्या तत्वाचे पालन करताना आपल्या विरोधकांना निरुत्तर केले. यापूर्वी वाजपेयी सरकारच्या वतीने दोन रेल्वे अर्थसंकल्प मांडणाऱ्या ममता बॅनर्जींचा युपीए सरकारकडून सादर केलेला हा पहिलाच रेल्वे अर्थसंकल्प होता.

माकपची टीका ; पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकांवर डोळा ठेवून रेल्वे अर्थसंकल्प सादर
नवी दिल्ली, ३ जुलै/पीटीआय
पश्चिम बंगालमध्ये २०११ साली होणाऱ्या विधानसभा निवडणुकांवर डोळा ठेऊन ममता बॅनर्जी यांनी यंदाचा रेल्वेअर्थसंकल्प सादर केला आहे अशी प्रतिक्रिया माकपने व्यक्त केली आहे.हा रेल्वे अर्थसंकल्प म्हणजे तृणमूल काँग्रेसचा विधानसभा निवडणुकांसाठी सादर केलेला जाहीरनामाच आहेअसे वाटत नाही का या पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर माकपचे नेते वासुदेव आचार्य यांनी सांगितले की, अगदी तशीच परिस्थिती आहे.

काँग्रेसकडून स्वागत तर विरोधकांची टीका
नवी दिल्ली, ३ जुलै / पी.टी.आय.

पुरेसा अभ्यास न करता अत्यंत घिसाडघाईने तयार केलेला अर्थसंकल्प अशा शब्दात प्रमुख विरोधी पक्ष भाजपने रेल्वे अर्थसंकल्पावर टीका केली. तर सरकारच्या योजनांचे प्रतिबिंब असणारा लोकाभिमुख अर्थसंकल्प असे सांगत कॉँग्रेसने या अर्थसंकल्पाचे स्वागत केले आहे.

रेल्वे अर्थसंकल्पाबाबत मुख्यमंत्रीही असमाधानी
मुंबई, ३ जुलै / प्रतिनिधी
यंदाचा रेल्वे अर्थसंकल्प संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या जाहिरनाम्यातील आश्वासनांची पूर्तता करणारा आणि आधुनिकतेचा पुरस्कार करून, सर्वसामान्य प्रवाशांच्या हिताची काळजी घेणारा असल्याचे मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे. मात्र रेल्वे अर्थसंकल्पात राज्यातील अनेक रेल्वे प्रकल्पांसाठी कोणतीही तरतूद नसल्याबद्दल त्यांनी असमाधान व्यक्त केले आहे.अहमदाबाद-बीड-परळी, वर्धा-नांदेड-यवतमाळ-पुसद, मनमाड-इंदौर आणि वडसा-देसाईगंज-आरमोरी-गडचिरोली या चार मार्गासाठी राज्य सरकारने २४ मे रोजी रेल्वेमंत्र्यांना पत्र लिहून, या मार्गासाठी येणाऱ्या खर्चाचा अर्धा वाटा उचलण्याची तयारी दर्शविली होती. अहमदाबाद-बीड-परळी या मार्गासाठी १५ कोटी रुपयांची आणि वर्धा-नांदेड रेल्वेमार्गासाठी थोडीफार तरतूद करण्यात आली असली, तरी ती अपुरी आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. तसेच या प्रकल्पांसाठी राज्यातील सर्व केंद्रीय मंत्र्यांकडे पाठपुरावा करू आणि ८ जुलै रोजी दिल्लीत होणाऱ्या सर्वपक्षीय खासदारांच्या बैठकीतही ही बाब मांडू, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

राज्यात सर्वदूर दमदार पाऊस; घाटमाथ्यावरही हजेरी
पुणे, ३ जुलै/खास प्रतिनिधी

कोकणात काल दमदार हजेरी लावलेल्या पावसाची व्याप्ती आज वाढली आणि राज्याच्या बहुतांश भागातही त्याचा जोर वाढला. त्यामुळे या पावसाळ्यात पहिल्यांदाच पावसाची व्याप्ती कोकणापासून विदर्भापर्यंत असून, हीच स्थिती आणखी किमान चार दिवस कायम राहाण्याची शक्यता पुणे वेधशाळेतर्फे वर्तविण्यात आली आहे. राज्यातील बहुतांश धरणे भरण्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या ठरणाऱ्या पश्चिम घाटातही आजपासून पावसाला सुरुवात झाल्याने राज्यातील पिण्याच्या पाण्याची टंचाई कमी होण्यास मदत होण्याची चिन्हे आहेत.

मुंबईकरांनो..भाज्या खा, पण जरा जपून!
विकास महाडिक
मुंबई ३ जुलै

हापूस आंबा लवकर बाजारात यावा म्हणून ‘कल्टार’चा प्रयोग करुन झटपट उत्पादन घेणाऱ्या कोकणातील बागायतदारांनंतर आता पश्चिम महाराष्ट्रातील भाजी शेतकरीही मोठय़ा प्रमाणात रासायनिक खतांचा वापर करुन भाज्या मुंबईत पाठवू लागले आहेत. या भाज्यामध्ये नैर्सगिकरित्या पिकणाऱ्या भाज्यांचा ‘फ्रेशनेस’ नसल्याने भाज्या सडण्याचे तसेच किड लागण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे गृहणींना घरात आणलेल्या पाव किलो भाज्यांमध्येही अध्र्या खराब असल्याचे आढळून येत आहे.

पंढरीत आषाढी यात्रेला सात लाख भाविकांची गर्दी..
नंदकुमार देशपांडे
पंढरपूर, ३ जुलै

आषाढी एकादशीच्या अनुपम भक्तीसोहळ्यासाठी राज्याच्या सर्व भागांतून व इतर प्रांतांतून आलेल्या सुमारे सात लाख वारकरी भक्तांच्या समवेत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री अशोक चव्हाण, त्यांची पत्नी अमिता चव्हाण आणि पहिल्या दर्शन रांगेतील मानाचे वारकरी पंढरी मारुती वानखेडे, पत्नी तुळसा वानखेडे, मुलगा राजकुमार वानखेडे यांच्या हस्ते मानाच्या शासकीय पूजेने एकादशी सोहळा संपन्न झाला.

भिवंडीतील पोलीस ठाणे कधी होणार?
शहीद पोलिसांच्या कुटुंबियांचा सवाल
दिलीप शिंदे
ठाणे, ३ जुलै

भिवंडीतील पोलीस ठाण्याच्या बांधकामावरून उसळलेल्या दंगलीत दोन पोलिसांसह चौघांचे बळी गेल्याच्या घटनेला ५ जुलै रोजी तीन वर्षे पूर्ण होतील. मुंबई उच्च न्यायालयाबरोबर वक्फ बोर्डाची वर्षांपूर्वी त्या भूखंडावरील स्थगिती उठूनही नव्या पोलीस ठाण्याचे बांधकाम करण्याचे धारिष्टय़ गृहविभागाकडून दाखविले जात नसल्याने पोलिसांचे आणखीनच खच्चीकरण होऊ लागले आहे. भिवंडीतील कोटरगेट सव्‍‌र्हे क्र. ५७३ येथे नवीन पोलीस ठाण्याचे बांधकाम सुरू असताना रझा अकादमीच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांवर हल्ला केला.

सावधान, भाववाढीचा भडका उडणार!
मुंबई, ३ जुलै/ व्यापार प्रतिनिधी

फेब्रुवारीपासून चलनवाढीचा अर्थात महागाईचा निर्देशांक घसरणीला लागून प्रत्यक्षात उणे झाला असला तरी व्यवहारात त्यानंतरच भाववाढीने हळूहळू वेग पकडला असल्याचा निष्कर्ष एचडीएफसी बँकेने या संदर्भात आज प्रसिद्ध केलेल्या अहवालात काढला आहे. एका बाजूला अन्नधान्य व इंधनाचे दर वाढत चालले आहेत, तर दुसऱ्या बाजूला चलनवाढीचा दर सप्ताहागणिक खाली उतरत उणे स्तरावर पोहचला आहे, अशी विसंगती एचडीएफसी बँकेच्या या अहवालाने पुढे आणली आहे. सरकारने अलीकडेच पेट्रोल व डिझेलच्या दरात अनुक्रमे १० व सहा टक्क्यांची केलेली दरवाढ अहवालाने ध्यानात घेतली आहे. त्यातून प्रथमदर्शनी महागाई निर्देशांकात थेट ०.३५ ते ०.४० टक्क्यांनी वाढ दिसून येईल, तर प्रत्यक्षात वाहतुकीचा खर्च वाढल्याने अन्नधान्य, भाजीपाला, दूध आणि औद्योगिक क्षेत्रासाठी आवश्यक कच्च्या मालाचे दर वाढल्याने एकंदर भाववाढीला वेग येईल, अशा इशारा एचडीएफसी बँकेने दिला आहे. त्यामुळे पेट्रोल-डिझेलच्या ताज्या दरवाढीने भाववाढीबाबत अहवालाचा पूर्वअंदाज येत्या महिन्यात आणखी तीव्र बनला असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. सध्याच्या सर्वकालिक निम्नतम महागाई निर्देशांकाने सुखावलेल्या मंडळींना उद्देशून अहवालाने सप्टेंबर २००९ नंतरचा काळ खूपच कठीण असेल असे भाकीतही वर्तविले आहे.

वीज पडून एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू
राजुरा, ३ जुलै/ प्रतिनिधी

राजुरा तालुक्यातील नांदगाव सूर्या येथे मेघगर्जनेसह झालेल्या पावसात घरावर वीज पडून भिंत कोसळल्याने शेजारच्या घरातील पती, पत्नी व मुलाचा मृत्यू झाला. ही घटना रात्री तीन वाजताच्या सुमारास घडली. दरम्यान, विदर्भात गेल्या चार दिवसातील वीज बळींची संख्या २३ झाली आहे.

 


महाराष्ट्राचा आखाडा संदर्भातील बातम्या वाचण्यासाठी वरील इमेजवर क्लिक करा, त्याचप्रमाणे या बातम्यांवरील आपली प्रतिक्रिया ऑनलाईन नोंदविण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा.

 

प्रत्येक शुक्रवारी