Leading International Marathi News Daily
शनिवार, ४ जुलै २००९
  वाडा पडला..
पण आठवणी ताज्या, टवटवीतच!
  सीआरझेड कायदा पूर्ण की अपूर्ण?
  सहकारी गृहनिर्माण संस्था
उपविधींमधील खाचखळगे
  गृहनिर्माण संस्था आणि गुन्हे
  न्यायालयीन निवाडा
मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय
ऑक्युपेशन सर्टिफिकेट मिळाले नसले तरी पाणीपुरवठा बंद करता येणार नाही
  घर कौलारू
दोन महापूरही पचविलेले‘पारपुंड’चे पाध्ये-गुर्जरांचं घर
  वास्तुरंग
  मेलबॉक्स
  वरदान विजेचे.. १
वीजेचा वापर.. पण जरा जपून

 

वाडा पडला..
पण आठवणी ताज्या, टवटवीतच!
पुण्याच्या शुक्रवार पेठेतील बारी वाडा ही वास्तू आता इतिहासजमा होईल. वाडय़ाच्या दगड, विटा पडल्या आहेत आणि नवे बांधकामही सुरू झाले आहे. पण वाडय़ाच्या आठवणींनी आजही अनेकांची मने हेलावतात. वाडा पडला तरी वाडय़ाच्या आठवणी ताज्याच आहेत..
गेल्या दोन दशकांत पुण्याची वाढ चहूअंगांनी आणि मोठय़ा वेगात सुरू आहे. ही वाढ होत असताना जुने पुणे खूप खूप बदलून गेले आहे. एकेकाळी पुण्याचे वाडे हे पुण्याचे वैभव होते. ते वैभव आता लयाला जाण्याच्या मार्गावर आहे आणि ‘वाडय़ांचे पुणे’ आता ‘फ्लॅटचे पुणे’ झाले आहे. पुण्याच्या शुक्रवार पेठेतील ‘बारी वाडा’ ही अशीच एक ऐतिहासिक वास्तू! वाडय़ाचा वर्षांनुवर्षांचा पत्ता होता ‘८४१ सदाशिव पेठ’ असा! त्यात पुढे बदल झाला आणि ‘१४३६ भाऊमहाराज बोळ, शुक्रवार पेठ’ हा वाडय़ाचा अधिकृत पत्ता बनला. तरीही वाडय़ाची गेल्या पन्नास-

 

साठ वर्षांतील पुणेकरांना असलेली खरी ओळख बारी वाडा हीच. हा वाडा पाडून तेथे आता बहुमजली इमारती उभ्या राहाणार आहेत. वाडय़ाचा विकास होणार आहे. वाडा आता पाडूनही झाला आहे आणि त्याच्या अस्तित्वाच्या थोडय़ाच खुणा आज शिल्लक आहेत. बारी वाडा इतिहासजमा होणार या आठवणीने अनेकांची मने आजही हेलावतात.. वाडय़ाच्या आठवणीने कुणाला बालपण, तर कुणाला जुने, आनंदाचे दिवस आठवतात.. आणि मग कंठ दाटलेल्या स्वरांत ‘वाडय़ाचं वैभव काही वेगळंच होतं..’ अशी भावना व्यक्त होते.
वाडय़ाचे मूळ मालक बाळ ज. पंडित अगदी सहकुटुंब वाडय़ाच्या भेटीला जाऊन आले. माजी रणजीपटू आणि प्रसिद्ध क्रिकेट समालोचक ही ‘बाळ जं’ची खरी ओळख. ज्यांची ‘मराठी कॉमेंट्री’ ऐकण्यासाठी क्रिकेटप्रेमी तासन्तास रेडिओभोवती ठाण मांडत, तेच हे बाळ ज. पंडित. वाडय़ाला भेट दिल्याच्या आणि वाडय़ाच्या जुन्या आठवणी ते परवा सांगत होते आणि या आठवणी सांगतानाही त्यांचा गळा कितीतरी वेळा दाटून येत होता. माझे सारे बालपण याच वाडय़ात गेले. आम्ही वाडा सोडला तेव्हा मी चौदा वर्षांचा होतो आणि परवा सदुसष्ट वर्षांनी मी परत वाडय़ात गेलो.. पंडित सांगत होते. बोलता बोलता ते म्हणाले.. माझे वडील म्हणजे जगन्नाथ महाराज पंडित नेहमी सांगायचे की, हा वाडा पेशवाईतील घाशीराम कोतवाल याचा होता. अर्थात याचा कोणताही पुरावा वडिलांजवळ नव्हता आणि तेही ती गोष्ट मान्य करायचे. पण त्यांचे हे ठाम म्हणणे असायचे की, वाडा घाशीराम कोतवालाचा होता.
पंडित म्हणाले, माझी क्रिकेटची खरी सुरुवात या वाडय़ातूनच झाली. एक दिवस वाडय़ात आम्हा मुलांना क्रिकेटचे साहित्य सापडले. औंधच्या राजघराण्यातील बापूसाहेब औंधकर यांचे ते साहित्य होते. मग त्यांची परवानगी घेऊन आम्ही ते साहित्य वापरू लागलो आणि वाडय़ाच्या अंगणातच माझे क्रिकेट सुरू झाले. त्यावेळी बुचके नावाचा मित्र खूप फास्ट बोलिंग करायचा. त्याच्या सहा बॉलना आम्ही सहा वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा म्हणायचो. पण त्या खेळातून एक शिकायला मिळाले की, अशा गोलंदाजालाही घाबरायचे नाही.. तर अशी झाली एका रणजीपटूच्या क्रिकेटची सुरुवात!
वाडय़ातील वास्तव्याबद्दलच्या आठवणी जाग्या झाल्या आणि पंडित यांच्याकडून आणखीही खूप काही ऐकायला मिळाले. केडगावबेटच्या महाराजांचा रामनामाचा साखळी सप्ताह या वाडय़ात झाला होता. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यात कार्यक्रमासाठी आलेले असताना तब्बल महिनाभर याच वाडय़ात वास्तव्याला होते. दादासाहेब मावळणकर, अनंत अय्यंगार आदी दिग्गज वाडय़ात येऊन गेले होते. तत्कालीन ‘गव्हर्नर’ पुण्यात आले की, ते एका सायंकाळी वाडय़ात आवर्जून येत. हा प्रघातच होता. मग त्या दिवशी रस्त्यापासूनच ‘रेड कार्पेट’ टाकले जाई. गव्हर्नरच्या स्वागतासाठी वाडय़ात मंडप घातला जात असे. परिसरातील रहिवासी ‘गव्हर्नर’ना बघायला मोठय़ा संख्येने येत. लोकमान्य टिळक आणि आमच्या घराण्याचा ऋणानुबंधही खूप वर्षांचा होता. त्यामुळे त्यांचा या वाडय़ाशीही खूप वर्षांचा संबंध होता.. पंडित सांगत होते आणि इतिहासच समोर उभा राहात होता.
भाऊमहाराज पंडित यांचा हा मूळ वाडा. पुढे तो जगन्नाथ महाराज पंडित यांच्या मालकीचा झाला. त्यांनी तो के. के. बारी यांना विकला आणि तेव्हापासून वाडय़ाला ‘बारी वाडा’ ही ओळख मिळाली. वाडय़ाची मालकी नंतर पोपटशेठ नवलाखा यांच्याकडे गेली. तरी बारी वाडा ही ओळख कायम राहिली ती अगदी आजतागायत. पंडित कुटुंबीयांनी १९४३ च्या मे महिन्यात हा वाडा सोडला.
पंडित यांच्या सख्ख्या भगिनी सुषमा मोघे याही वाडय़ाबद्दल सांगू लागल्या आणि मग कितीतरी कौटुंबिक, भावनिक आठवणींचे बंध खुले झाले. त्यांचेही बालपण याच वाडय़ात गेले. वाडय़ाची भली उंच दिंडी, दिंडीच्या आतील देवडी, देवडीत कामाला बसणारी तेव्हाची क्लार्क मंडळी, वडिलांनी घडवलेला वाडय़ाचा सुंदर जिना, वाडय़ात चालणारे मुलींचे लपाछपीचे आणि इतर कितीतरी खेळ, वाडय़ातला सदाबहार पारिजातक, मोठे तुळशीवृंदावन, पंडितांचे राहाते प्रशस्त-भव्य घर, त्याची उत्कृष्ट रचना, सर्वानी मिळून सर्व गोष्टी करण्याची वृत्ती, वाडय़ातील मंगलकार्य, मंगळागौरी, डोहाळजेवणांसारखे कार्यक्रम, वाडय़ातील एकोपा, परस्परांतील जिव्हाळा.. याबद्दल सुषमाताई भरभरून बोलत होत्या.. एवढय़ा वर्षांनी मी वाडय़ात गेले आणि मला जणू माहेरी गेल्यासारखे वाटले.. ही त्यांची भावना खूप बोलकी होती.
‘वाडा संस्कृती’ ही कल्पना वा चर्चा तशी अलीकडची. पण या वाडय़ातील सुमारे ६०/७० भाडेकरू किमान शंभर वर्षे ही संस्कृती अनुभवत होते, जगत होते. वाडय़ातील ही बिऱ्हाडे केवळ वेगवेगळ्या खोल्यांत राहायची इतकेच वेगळेपण. बाकी सारा वाडा हे खरोखरच एक कुटुंब होते. तळमजला आणि त्यावर एक मजला अशी चारही बाजूंनी खोल्यांची बांधणी. छतावर कौले. मध्यभागी मोठ्ठे मोकळे मैदान. बाजूला कारंजी. एका बाजूला पाण्याचा हौद. त्याच्या बाजूला मंदिर. भरपूर झाडी. औदुंबर, जांभूळ हे वृक्ष अशी वाडय़ाची रचना होती. कात्रज तलाव ते शनिवारवाडा या दरम्यानची पेशवेकालीन जलवाहिनी बारी वाडय़ातूनच जाते. याच जलवाहिनीवर वाडय़ात पुरुषभर खोलीचा हौद होता. तो आजही आहे. या हौदावर परिसरातील शेकडो मुले पोहायला शिकली. ‘मोरीपाणी’ हा या वाडय़ातील एक प्रसिद्ध खेळ. त्याबरोबरच अप्पारप्पी, लपंडाव, डबडा ऐसपैस, लगोरी, तर मे महिन्याच्या सुटीत पत्ते, कॅरम यासह अनेक खेळ इथे रंगायचे. किमान ३०/४० मुले इथे एकाचवेळी खेळत असत आणि ती सारी वाडय़ातीलच असत.
काही दिवसांपूर्वी वाडय़ात सायंकाळी सहजच चक्कर मारली. सध्या वास्तव्याला असलेले काही बिऱ्हाडकरू त्यावेळी भेटले. वाडय़ातील पटांगण आम्ही साऱ्याजणी शेणाने सारवायचो. मुले तिथे क्रिकेट
खेळायची. हे तुमचे रात्रीचे सामने आत्ताचे; पण आमच्या वाडय़ात रात्री दिवे लावून क्रिकेट चालायचे. त्याला सहज ५० वर्षे झाली.. विजया मेढेकर सांगत होत्या. मेढेकर लग्नानंतर या वाडय़ात आल्या. या गोष्टीला आता ४७ वर्षे झाली आहेत. पूर्वी सरस्वती मंदिर ही शाळाही याच वाडय़ात भरत असे. रामभाऊ म्हाळगी, विठ्ठलराव गाडगीळ यांच्या सभा वाडय़ात झाल्या होत्या.. पुष्पा केतकर सांगत होत्या. वाडय़ातील साऱ्या महिला कशा रंगपंचमी
खेळत हे त्या कौतुकाने सांगत होत्या. वाडय़ातील चैत्रगौरीचे हळदीकुंकू, भोंडला, त्यानंतर वाटल्या जाणाऱ्या ताटभरून खिरापती, वाडय़ातील हनुमान जयंती, चांदणी भोजन, आवळी भोजन, अंगणातील भेळीचा कार्यक्रम, उन्हाळ्यातील वाळवणे.. अशा आठवणी लीलाबाई रणधीर, अश्विनी पुरंदरे सांगू लागल्या आणि वाडा संस्कृतीचा पटच नकळत उलगडत गेला.
वाडय़ातील दिवाळी म्हणजे खरोखरच मोठ्ठा सण असायचा. साठ-सत्तर घरांवर जेव्हा आकाशदिवे लागत तेव्हाचे दृश्य मी आजही विसरू शकत नाही.. वाडानिवासी दीपक रणधीर सांगत होते. बालपणाच्या गमती सांगताना ते म्हणाले, सायकलची टय़ूब कापून त्या रबरांचा बॉल आम्ही करायचो आणि तो आम्ही क्रिकेटसाठी वापरायचो. खेळापेक्षाही तो बॉल करण्यातली मजा काही वेगळीच होती. वाडय़ात पाण्याची रेचचेल होती. आजही आहे. कधी पाण्याचा तुटवडा झाला, तर इतर वाडय़ांतील मंडळींची आमच्या वाडय़ात केवढी तरी गर्दी व्हायची.
भाडेकरूंबरोबरच वाडय़ातल्या काही व्यावसायिकांनीही स्वत:ची ओळख इथे निर्माण केली. बोळाच्या कोपऱ्यावरचे ‘रतन सायकल मार्ट’ ही तर या परिसराचीच ओळख बनली आहे. त्यामुळेच पत्ता सांगताना कोणीही ‘रतनच्या जवळ’ असे सहज सांगून जातात. वाडय़ातले फडके तांदूळवाले, ढिले भेळवाले, किराणावाले वैद्य, देसाई, डेंग बंधूंचे नवभारत टेलरिंग, दादा बर्वे यांचे क्लासेस, मराठी रंगभूमीवरील अभिनेते राजाभाऊ कामतेकर यांची लायब्ररी, त्यातच असलेले इस्त्रीचे दुकान ही वाडय़ातील आणखी काही व्यावसायिकांची नावे. नळावरच्या भांडणांपासून मुलांच्या खेळातल्या भांडणांपर्यंत आम्ही इथे खूप काही अनुभवले. पण खरा अनुभव आला तो माणुसकीचा! कोणी गावाला निघाले की, घराच्या किल्ल्या शेजारीच देत. एकमेकांच्या सुखदु:खात सारा वाडा सहभागी असायचा. भीती नावाची गोष्टच नव्हती. त्यामुळे कोणाच्या घरातील कोणी आजारी पडले की, बाकी सारे मदतीला धावून जात. कोणाकडे लग्न निघाले की, गव्हले, सांडगे करण्यापासून ते लग्नानंतरच्या सत्यनारायणापर्यंतची सारी जबाबदारी वाडय़ातील मंडळीच हौसेने उचलत. त्यावेळी वाटे की, हे कार्य साऱ्या वाडय़ाचेच कार्य आहे. वाडय़ावरून एखादी पालखी, भिक्षावळ वा वरात जायला लागली की, वाडय़ातील किमान शंभरएकजण दारात प्रेक्षक म्हणून उभे असायचे!
या वाडय़ातील रहिवाशांनीच पुढे एकत्र येऊन १९७२ मध्ये ‘ओंकार स्वरूप सहकारी गृहरचना संस्था’ स्थापन केली आणि त्यांनी त्यांचा राहाता वाडा मालकांकडून विकत घेतला. आता या वाडय़ाच्या जागेवर विकसनाचे काम सुरू असून, तेथे नव्याने
इमारती बांधल्या जाणार आहेत. वाडय़ातील जुन्या मंडळींची आणि वाडय़ाच्या उर्वरित भागात सध्या राहात असलेल्या सर्वाची आजही हीच भावना आहे की, आम्ही सारे खूप खूप प्रेमाने वाडय़ात राहात होतो आणि वाडा या प्रेमळ वातावरणानेच खूप श्रीमंतही होता. तेच तर वाडय़ाचे खरे वैभव होते आणि तीच ‘वाडा संस्कृती’देखील होती.
नाही का?
विनायक करमरकर