Leading International Marathi News Daily
रविवार, ५ जुलै २००९

मधूशेठच्या दुकानासमोर लावलेल्या मोठय़ा तराजूजवळ हातात कागदांचं पोतं घेऊन गंगी केव्हाची उभी होती. पण मधूशेठ काही तिच्याकडे लक्ष देत नव्हता. संध्याकाळ व्हायला आली होती. दिवसभर कागद गोळा करून गंगी थकली होती.
आता मधूशेठ ती कागदं मोजेल, वजन करील, जास्तीचे घाण कागद फेकून देईल. आणि हे करताना तोंडाची टकळी सुरू ठेवील. गंगीच्या देहाकडे हावरटासारखा पाहत राहील. पैसे देताना गंगीच्या जास्त जवळ सरकेल. हाडुकाजवळ कुत्रं घोटाळावं, तसा! गंगीला हे नवीन नव्हतं. मधूशेठला नुसती खूण करायचा अवकाश होता- लाळ घोटत त्याने गंगीवरून पैसा ओतला असता. मग महिनाभर गंगीनं कागद गोळा करायचं काम नसतं केलं तरी चालणार होतं. पण..
हा पणच गंगीला अडवत होता.
 

‘अय मधूशेठ, मला मोकळं कर लवकर. केव्हापासून उभी हाय मी.’
‘गंगे, दहा मिनिटं थांब जरा. घरी काय नवरा वाट पाहत नाही तुझा. गप उभी राहा.’
‘पण मधूशेठ, तू पैसा देशील तवा बाजार होईल. मंग रातच्याचं कालवण. माझ्या बापूला खायला लवकर लागतं. मला मोकळं कर लवकर..’ असं म्हणून गंगी कागदाच्या पोत्यावर वाकली. वाकताना मुद्दाम पदर पाडला. मधूशेठला चाळवायला आणिगल्ल्यावरनं उठवायला एवढं पुरे होतं. मधूशेठ खरंच गल्ल्यावरनं उठला.
‘गंगे! कशाला एवढी हाय उपस करते? उन्हात फिरते? काय कमवते या कचऱ्यातनं? त्यापेक्षा माझं ऐक..’ तिच्या उफाडय़ा देहाकडे अधाशासारखा पाहत मधूशेठ म्हणाला.
‘एका दिवसात महिनाभरची कमाई करशील.’
‘अय मधूशेठ! फालतूची बडबड नाय पायजे. चल- कचरा मोज. पैसा टाक लवकर!’’
‘गंगे, कचरा राहू दे. मी मोजून घेईल नंतर..’ मधूशेठने पन्नासची नोट गंगीच्या हातात कोंबली. तिचा भरलेला हात हेतुपुरस्सर दाबला. डोळे मिचकावले. गंगीला हे नवीन नव्हतं. मधूशेठ आपल्या देहावर फिदा झालाय, हे ती जाणून होती. पण एकदा का मधूशेठला जवळ येऊ दिलं की ते रोजचंच होऊन जाईल. मग वस्तीवर राहणंही कठीण होऊन जाईल.
वस्तीची आठवण येताच तिला पुन्हा बापूची आठवण झाली.
बापू काही तिचा सख्खा बाप नव्हता. गंगीला त्यानं असंच एका कचऱ्याच्या ढिगाऱ्यातून उचलून आणलं होतं. बापू तिला बापासारखा होता. त्यानंच तिला वाढवलं होतं. तिला त्यानं कचऱ्यातनं उचलली तेव्हा गंगी काही दिवसांची होती. कुणीतरी तिला तिथं टाकून गेलं होतं..
मधूशेठच्या हातातनं हात सोडवत गंगी पन्नास रुपये घेऊन वस्तीकडे निघाली. तिच्या पाठमोऱ्या शरीराकडे मधूशेठ बराच वेळ पाहत राहिला.
त्या पन्नास रुपयातनं गंगीनं तेल-मिरचीचा बाजार केला. तीस-पस्तीस रुपये त्यात गेले. झोपडय़ात गेल्यावर बापूच्या मढय़ावर पाच-दहा रुपये दारूसाठी फेकावे लागतील, नाही तर तो अंगाशी झोंबेल.
..बापू जेवण करून घोरायला लागला. गंगी गोधडीवर कलंडली.. उद्याची चिंता करत.
गंगी दिवसभर कॉलन्यांमध्ये फिरून कागदं गोळा करायची. उन्हात फिरून तिचा रंग तांबूस झाला होता. पण त्या रंगालाही एक आगळी तकाकी होती. शरीराचे फाजील लाड पुरवण्यासाठी पैसाच नसल्यानं जे होतं ते घाटदार होतं. गंगी मक्याच्या कणसासारखी गच्च भरलेली होती.
उच्चभ्रू समाजात गंगीसारख्यांकडे पाहणाऱ्या नजरा विशिष्ट रसायनात तयार झालेल्या असतात. रस्त्यावरचा माल विकाऊ असतो.. मग ती गंगी का असेना! मधुशेठही त्यातलाच. गंगी दिसली की तो कावराबावरा व्हायचा. स्वत:ची बायको विसरायचा. पण गंगी त्याला थारा देत नव्हती.
रात्री मध्येच केव्हातरी गंगी दचकून जागी झाली. एक अस्पष्टशी किंकाळी तिच्या घशातून बाहेर पडली. घाबरल्यानं तिचा उर वर-खाली होऊ लागला. तिच्या किंकाळीनं बापू जागा झाला.
‘काय झालं पोरी?’
‘काय नाय, सपन पडलं..’
‘झोप गुमान..’ बापूनं तिच्या जवळ सरकत तिच्या पाठीवर थोपटल्यासारखं केलं. पण त्या स्पर्शात बाप कुठेच नव्हता. होती ती एक भूक.. वासना! गंगीच्या पाठीवरनं त्याचा हात सरकत तिच्या खांद्यावर आला. बापाच्या स्पर्शातला आणि बाप म्हणवणाऱ्या या हैवानाच्या स्पर्शातला फरक ओळखायला गंगीला कोणत्याही शाळेत जायची गरज नव्हती. चवताळून गंगीनं त्याला हटकला. गोधडीचं रकटं घेऊन ती पुन्हा झोपली.
दुसरा दिवस वाईट गेला.
रात्रीची चूल पेटायला पाहिजे! नाइलाजानं गंगी पोतं घेऊन निघाली. कॉलेजजवळ तिला बरीच कागदं मिळाली. आणखी कागदांसाठी तिनं कॉलनीचा रस्ता धरला. पण कॉलनीत काहीच मिळालं नाही. नगरपालिकेच्या घंटागाडीच्या नावानं तिनं दोन-चार शिव्या हासडल्या. हताश होऊन घामानं निथळत ती एका झाडाखाली बसली. पदरानं चेहरा टिपला आणि त्याच पदरानं वारा घेऊ लागली. तिला तहान लागली होती. तिनं कॉलनीत इकडे-तिकडे पाहिले. सर्व खिडक्या बंद होत्या. तिचं लक्ष एका खिडकीकडे गेलं. एक माणूस तिच्याकडेच पाहत होता. तिला हुरूप आला. आंगठय़ाच्या खुणेनंच तिनं त्याच्याकडे पाणी मागितलं. त्यानंही खिडकीतनं हात काढून तिला येण्याची खूण केली. कागदांचं पोतं पाठीवर घेऊन ती बंगल्याच्या फाटकात शिरली.
‘पाणी पाहिजे..’
‘मागच्या दारानं ये. ते पोतं तिथेच गेटजवळ ठेव.’
मागचं दार उघडून सुरेश बाहेर आला. हातात तांब्या भांडं! गंगीला जवळून पाहताच तो गार झाला. साली कमळं चिखलातच येतात! आपल्या दारात निवडुंग लावतो आपण. आपणहून! तिचा घामानं थबथबलेला देह पाहून सुरेश दुनिया विसरला.
‘साहेब, पाणी..’
‘अं..? हे घे. बसून घे शांतपणे सावलीत.’
एका दमात गंगीनं पाणी संपवलं आणि ती जायला उठली.
‘दिवसभरात किती कागदं गोळा करतेस?’
‘पन्नास रुपये सुटतात साहेब.’
‘नाव काय तुझं?’
‘गंगी!’
‘दोन-चार दिवसातनं इकडे चक्कर टाक. मी रद्दी कागदं काढून ठेवीन.’
गंगी जायला उठली. जाता जाता ती सुरेशकडे पाहून हसली. या दुनियेत मधूशेठसारखेपण आहेत आणि या साहेबासारखेपण आहेत. गेटजवळ ठेवलेलं कागदाचं पोतं उचलून ती गेटबाहेर गेली. सुरेश कितीतरी वेळ तिच्या पाठमोऱ्या देहाकडे पाहत राहिला.
सुरेश नुकताच ऑफिसातनं आला होता. तेवढय़ात गेटची कडी वाजली. ‘च्या मायची कटकट!’ असं म्हणत तो बाहेर आला. गंगीला पाहताच त्याच्या साऱ्या शरीरात एक विचित्र सळसळ झाली. मानेनंच त्यानं तिला यायला सांगितलं.
‘साहेब, तुम्ही कागद देणार होता. म्हणूनशान आली..’
‘गं.. गं..! थांब- बैस इथं पायरीवर.’
गंगीचं प्रमोशन झालं. ती झाडाखालून पायरीवर आली. सुरेशनं तिला पाणी दिलं.
‘साहेब, ती कागदं..’
‘अगं, हो! मी आताच ऑफिसातनं आलोय. अजून चहापण घेतला नाही. तू घेशील चहा?’
‘साहेब, नगं! रात व्हाया लागली.’
‘पाच मिनिटांत होतो बघ चहा. एकीकडे चहा होईल, दुसरीकडं मी कागदं काढेन.’
गंगी कशीनुशी हसली. चहा होईतो बंगल्याच्या वैभवाकडे पाहत राहिली. साहेबाच्या नशिबाचा हेवा करत राहिली. सुरेशनं तिला चहा दिला. दरवाजातच खुर्ची टाकून तो बसला.
‘नवरा काय करतो तुझा?’
‘नवरा? कोनाचा? साहेब, अजून कवारी हाये मी. बापूजवळ राहते. बापू.. माझा बाप!’
‘मग.. बापू काय करतो?’
‘काय नाय! दिवसभर दारू ढोसतो. साहेब, त्ये कागद..’
गंगीच्या डोक्यातनं कागद गेले नव्हते. कागद मिळाल्याशिवाय पैसा मिळणार नव्हता. आणि पैशाशिवाय रात्रीचं जेवण मिळणार नव्हतं. सगळं टीचभर पोटासाठी! सगळ्यांचे पोट इथून तिथून टीचभरच असतं, पण गरीबाच्या टीचभर पोटावर केव्हा टाच येईल याचा काही भरवसा नाही.
सुरेश खोलीत गेला. खरं म्हणजे तो कागद काढायला विसरला होता. आणि आता तर त्याची इच्छापण नव्हती.
‘हे घे!’
‘पन्नास रुपये?’
‘मी कागद काढले नाहीत. तुझी फेरी वाया जाईल.’
‘पण साहेब, मी बापूला काय सांगू? पैसा कुठून आणला म्हणून इचारंल तो मला.’
‘सांग- कागद विकून आणले म्हणून..’
‘पण तो मुडदा मधूशेठ बोंबलंल ना बापूजवळ- गंगी आली न्हाय म्हणून!’
‘तू हे पन्नास रुपये घे आणि दोन-तीन दिवसांनी ये. मी नक्की कागद काढून ठेवीन. तुझ्या बापूला काहीपण सांग.’
सुरेशनं गंगीच्या हातात पन्नास रुपये कोंबले. त्यानं हात हातात घेताच तिच्या शरीरातनं एक विचित्र वीज चमकून गेली.
गंगी घराकडे यायला आणि गंगीच्या घरातनं मधूशेठ बाहेर पडायला एकच गाठ पडली. गंगीकडे पाहून मधूशेट छद्मी हसला. गंगीनं मनातल्या मनात त्याला शिव्या दिल्या. बापू हवेत तरंगत होता. मधूशेठने त्याला भरपूर दारू पाजली होती.
‘मेल्याचा मुडदा बशिवला!’ म्हणत गंगी बापूजवळ गेली.

आज गंगीला भरपूर कागदं मिळाली. तरीपण कुणास ठाऊक, तिची पावलं आपसूक कॉलनीकडे वळली. साहेबानं रद्दी दिली तर तेवढाच एक दिवस वाचेल. तिनं गेटची कडी वाजवली. पण सुरेश अजून ऑफिसातून आला नव्हता. थोडा वेळ वाट पाहून ती चालू लागली. रस्त्यात सुरेशला ती दिसली. तो आपणहून थांबला.
‘काय गंगी! आज बराच धंदा झालेला दिसतोय!’ तिच्या भरलेल्या पोत्याकडे पाहत तो म्हणाला.
‘व्हय. पण तुमी कागदं देणार हुता म्हणून आली व्हती.’
थोडा विचार करून सुरेश म्हणाला, ‘असं कर गंगी! हे पोतं घरी ठेवून ये. तेवढय़ा वेळात मी कागदं काढून ठेवतो. तुझ्या बापूला पण सांगून ये काहीतरी..’
गंगी हसली. ‘येते-’ म्हणाली.
सुरेश घरी आला. नेहमीप्रमाणे त्यानं चहा केला. चार-पाच महिन्यांची रद्दी जमली होती ती काढली आणि रात्रीच्या स्वयंपाकासाठी कांदे चिरायला बसला. थोडय़ा वेळानं गंगी आली. तोपर्यंत सुरेशची भाजीची तयारी झाली होती.
साहेबांना स्वयंपाकाच्या तयारीत गुंतलेलं पाहून तिला आश्चर्य वाटलं. गंगी आता सरळ घरातच आली होती.
‘साहेब! तुम्ही जेवण करणार? हाटलीत नाय जात?’
‘गंगी, हॉटेल परवडत नाही. आणि मला आवडतही नाही. स्वयंपाकात वेळपण जातो.’’
‘तुमचं लगीन? बाईसाहेब?’
‘लग्न झालंय आणि बाई पण आहे. पोरंही आहेत. पण ती घरी.’
‘हे काय वंगाळ साहेब! लगीन होऊनबी एकलं राहणं..’
आपण भलतंच खासगी बोलून गेलो, याची गंगीला लाज वाटली. साहेबाला काय वाटेल? पण सुरेशही पुष्कळ गावचं पाणी प्यायलेला होता.
‘काय करणार गंगी! आठवडाभर एकट राहायचं. बायको असून उपयोग नाही.’
‘साहेब, ते कागदं..’
विषय भलतीकडे चाललाय पाहून गंगी मूळ मुद्दय़ावर आली. नाइलाजानं सुरेश उठला. कोपऱ्यात ठेवलेली रद्दी त्यानं काढली. व्यवस्थित रचून, बांधून ठेवलेली ती रद्दी पाहून गंगीला आनंद झाला. मधूशेठ तीस-चाळीस रुपये सहज देईल. गंगीनं पोतं काढलं. पोत्यात रद्दी टाकताना सुरेशनं जाणूनबुजून गंगीला स्पर्श केला. पण तो अजाणतेपणी झाला असं दर्शवलं.
त्या स्पर्शानं गंगीच्या अंगातनं वीज चमकून गेली.
‘साहेब, तुमचे लईच उपकार झाले.’
‘गंगी, मग आता उपकार तू कर माझ्यावर!’
‘..?’
‘म्हणजे आजचा दिवस माझा स्वयंपाक करून दे. त्याचे निराळे पैसे देईन मी तुला.’ गंगी विचारात पडली.
‘साहेब, आज लई वेळ झाला. उद्या येईल मी स्वयंपाकाला.’
‘ठीक आहे. मग असं कर- उद्या तू पण इथंच जेव.’
गंगी हसली. तिनं पोतं उचललं आणि झोपडय़ाच्या दिशेनं चालू लागली. चालता चालता साहेबाचाच विचार मनात होता. बिचारा साहेब- किती चांगला! नाही तर तो मधूशेठ! मधूशेठची आठवण येताच ती त्याच्या नावानं रस्त्यातच पचकन् थुंकली. ती झोपडीकडे आली. ही रद्दी ती उद्या मधूशेठच्या मढय़ावर घालणार होती.
दुसऱ्या दिवशी संध्याकाळी गंगी बापूचा स्वयंपाक करून कॉलनीकडे जायला निघाली. आज तिने गेटची कडी वाजवली नाही. कडी उघडून ती सरळ आत आली. सुरेश केव्हाचा आला होता. बाहेर अंधार पडू लागला होता. गंगीने बाहेरून सुरेशला हाक मारली- ‘साहेब..!’
‘अरे! गंगी.. तू? तुला रद्दी तर दिली ना काल!’
‘साहेब, तुम्हीच तर बलावलं व्हतं स्वयंपाकाला! म्हणूनशान आली.’
सुरेश चक्क विसरला होता. पण आता ही आलेलीच आहे, तर तिला काय काम सांगावं, त्याला प्रश्न पडला.
‘पण गंगी.. माझी भाजी-भाकरी तर झाली आता.’
गंगी हिरमुसली आणि नाइलाजाने जायला उठली.
‘मंग जाते मी साहेब.’
‘अगं, आता आलीच आहेस तर जेव तूही.’
‘पण.. साहेब! तुम्ही तुमच्यापुरतं रांधलं असंल..’
‘राहू दे! तू ये.’
गंगी खोलीत आली. सडा पुरुष असून नीटनेटकी लावलेली खोली, स्वच्छता पाहून तिला आपल्या घाणेरडय़ा झोपडय़ाची आठवण आली. त्यात बापू दारू ढोसूून ओकायचा. तंबाखूच्या पिचकाऱ्या मारायचा. सुरेशच्या कॉटवरची चादरसुद्धा व्यवस्थित घातलेली होती. गंगीला एकदम आपली लायकी आठवली.
गंगीला विचारात पडलेलं पाहून सुरेशला आश्चर्य वाटलं.
‘कसला विचार करतेस? चल आटप! हात धू. खाऊन बघ माझ्या हातचं आज. तुझ्या हातचं नंतर बघू कधीतरी..’
‘साहेब, नगं! आम्ही घाणेरडे लोक! उकिरडा उसकणारे. लायकी नाय आमची. आठाठ दिन साबून गावत नाय अंगाला..’
गंगीनं शरमेनं मान खाली घातली. सुरेश जागेवरून उठला आणि त्याने सरळ गंगीचा हात धरून तिला बेडवर बसवलं. तिची खाली घातलेली मान त्याने दुसऱ्या हाताने वर उचलली. गंगीचे डोळे भरून आले होते. सुरेश तिच्याकडे एकटक पाहत बसला. एखाद्या टपोऱ्या गुलाबावर दंवबिंदू डुलावेत तसे गंगीच्या डोळ्यांत अश्रू दाटले होते.
‘अरे.. अरे..! हे काय? तू रडतेस?’
‘साहेब, हेच कर्म..’ एवढंच बोलून गंगी मुसमुसून रडू लागली. आणि रडता रडता अभावितपणे सुरेशला बिलगली. सुरेशने तिच्या गालांवर ओघळणारे अश्रू पुसले आणि हलकेच तिच्या ओठावर ओठ टेकवले. गंगी थरारली. हा उत्कट अनुभव ती पहिल्यांदाच घेत होती. ती सैरभैर झाली आणि जास्तच आवेगाने सुरेशला बिलगली. पुढचं सगळं घडायचं तसंच घडलं. सुरेश तृप्त झाला. गंगीही शांत झाली..
गंगी घरी आली. घरात बापूबरोबर मधूशेठला पाहून- तेही इतक्या रात्री- तिचं माथं भडकलं. बापू काही क्षणात कलंडणार होता. तशाही अवस्थेत तो बरळला- ‘गंगे.. कुठं शिलगली व्हती रातच्याला..? तुज्या मायची..’
गंगीचा स्वयंपाक आवरेपर्यंत मधूशेठ आणि बापूचा आणखी एकेक राऊंड झाला. तिने त्यांना जेवण वाढलं. बापू जेवण करून तिथंच कलंडला. मधूशेठ जाता जाता गंगीच्या अंगचटीला आला. तिच्या हातात नोटा कोंबत म्हणाला, ‘येतो मी.’ आणि तो निघून गेला.
गंगी शहारली. आपण मधूशेठपासून जे जपतोय- ते साहेबाच्या हवाली इतक्या सहजपणे का केलं? साहेबात असं काय होतं? साहेबाकडून आपण पैसाही घेतला नाही. आणि इथं मधूशेट आपल्यावर नोटा उधळायला तयार आहे!
प्रश्नांत गुंगत गंगीचा डोळा केव्हा लागला, ते तिलाही समजलं नाही. ती दिवा विझवायलाही विसरली.
..आणि अचानक केव्हातरी तिला आपला श्वास कोंडला जात असल्याची जाणीव झाली. पुढच्याच क्षणाला दारूचा उग्र दर्प तिच्या तोंडाजवळ आला. तिच्या शरीरावरून कुणाचे तरी हात राकटपणे फिरत होते. तिने ओरडण्याचा प्रयत्न केला. ती त्याला ढकलून बाहेर धावली.. पण झोपडय़ाचं दार बाहेरनं बंद होतं. ती भीतीने आणि संतापाने थरथरत घरभर फिरली. तेवढय़ात झोपडय़ात लायटरचा उजेड पडला. मधूशेटचा लायटर! आपल्या बापाचा आणि मधूशेटचा कावा लक्षात यायला तिला वेळ लागला नाही. पोरीला दुसऱ्याच्या हवाली करून बाप झोपडय़ाच्या बाहेर रखवाली करत होता.
‘गंगे, गुमान राहा. तुझ्या बापाला नोटा मोजल्यात मी. दहा मिनिटांत मोकळं करतो तुला. चल..’ असं म्हणत मधूशेट तिच्याकडे सरकला.
‘मधूशेठ.. मागं व्हय. अंगाला हात लावशील तर पर्नाम लई खराब व्हईल..’
पण मधूशेठ आणखीनच पुढे सरकला. त्याने गंगीच्या अंगावर हात टाकला.. आणि पुढच्याच क्षणी गंगीचा विळी उचललेला हात फिरला.. मधूशठच्या गळ्यावरून! एक अस्पष्ट घुसमट त्याच्या तोंडून बाहेर पडली- न पडली. अन् तडफड करून तो शांत झाला. ते भयानक कृत्य पाहून बापू लटलट कापू लागला. एका कोपऱ्यात उभं राहून तो घाबरलेल्या आवाजात बोलला, ‘गंगी, पोरी हे काय केलं?’
‘चूप रे भाडखाऊ! बाप हायेस का राक्षस? सग्ग्या लेकीवर नजर लावतो..’ असं म्हणून गंगी बापूच्या दिशेने सरकली.. हातात रक्ताळलेली विळी घेऊन..!
संजय जाधव