Leading International Marathi News Daily
रविवार, ५ जुलै २००९

राज कपूर ‘सुखाचे घोट’ एन्जॉय करतोय, हे पाहून तुमचा जळफळाट होतोय का? हेमामालिनीच्या शुभ हस्ते हे घडतंय, म्हणून तिचे चाहते विलक्षण कावरेबावरे झाले असतील. बिंदूने हिंदी सिनेमाच्या पडद्यावर असे कारनामे सहज पचविल्याने तिच्या हाती प्याला असल्याचे पाहून फारसे अस्वस्थ व्हायची गरज नाही. ‘सपनों का सौदागर’च्या यशाच्या ओल्या पार्टीतील हा सोनेरी क्षण आहे. पण ज्या पद्धतीने तो घडतोय, ते पाहून अनेकांना निदान पाण्याची तरी तहान लागली असेल. सिनेमाच्या जगात ‘पार्टी! पार्टी!!’चा ‘शो’ हे कायमस्वरूपी सत्य आहे. ‘बडी फिल्म’ फ्लॉपचं झाल्याचं दु:ख असो किंवा ग्लॅमर इंडस्ट्रीवर आणखी कोणती संकटे येवोत, पाटर्य़ाचा दुष्काळ पडलाय, उंची मद्य हरवलंय, असं कधीही होत नाही. बदलत्या काळासोबत त्यासाठी कुछ नये बहाने व नवे स्पॉट मात्र आले आहेत. आज एखाद्या मराठी चित्रपटाच्या
 

पार्टीतल्या मराठी तारकाही छान ड्रेसमध्ये लक्ष वेधतात. डीजेची साथ असेल तर पाय दमेपर्यंत नाचतात. पण ‘पार्टी कल्चर’ असे कितीही मोकळे व आधुनिक झाले तरी राज कपूरच्या पाटर्य़ाची ‘चव’च वेगळी! फिल्म इंडस्ट्रीतील कालच्या एखाद्या ‘पार्टीबाजा’कडून तेव्हाचे काही किस्से, काही दंतकथा कळतात, त्यातून राज कपूरभोवतीचे वलय आणि वळण आणखीनच वाढते. मग ती ‘संगम’च्या अप्सरा थिएटरमधील प्रीमियरनंतरची पार्टी असो वा ‘बॉबी’ची ज्युबिली पार्टी असो. तो स्वत: उंची खाना-पिना पचवणार आणि पाहुण्यांनाही त्याचा स्वाद देणार. उगाच आपलं काही निवडकांना स्कॉच पाजायची आणि इतरांना साध्या मद्दय़ाची झिंग द्यायची- असला भेदभाव नाही. राज कपूरच्या अनेक खासियतींपैकी अशा वेगळेपणाचा अनुभव आपल्याही नशिबी यावा असे पुढच्या पिढीतील आम्हा पत्रकारांना वाटणे स्वाभाविकच होते. मग कधी राज कपूरच्या हस्ते ‘कर्मा’च्या ध्वनिफीत प्रकाशनाची पार्टी असो, तर कधी ‘राम तेरी गंगा मैली’च्या यशाची पार्टी असो, राज कपूरच्या दिलखुलास मेहमान नवाझीचा ‘आँखो देखा हाल’ खूपच ओलाव्याचा वाटला. तर कधी त्याची उपस्थितीही एखाद्या पार्टीची शान वाढविणारी वाटली. आजच्या पार्टीत राज कपूर आहे, ही जाणीवही मग कुतूहल निर्माण करणारी असे. एखादी तारका त्याची हांजी हांजी करण्यात कसा रस घेतेय, नि एखादा बडा निर्माता वा वितरक त्याच्याशी कशी जवळीक साधतोय, हे पाहणेही रोचक, रंजक ठरे. फिल्मी पाटर्य़ा तशा रोजच्याच हो; पण अशा पाटर्य़ासाठीही ग्लॅमरस कलावंताची उपस्थिती कशी असते, हे अनुभवणे जास्त महत्त्वाचे होते. कारण त्या गोष्टी किश्श्यांच्या स्वरूपात प्रसारमाध्यमांतून नंतर रंगत राहतात. रसिकांची पिढी बदलली तरी ते किस्से मात्र ‘लाइव्ह’ राहिलेत. इथेही राज कपूर दिसतो. सिनेमाच्या जगात मद्दय़पान हा गुन्हा मानला जात नाही. पार्टी हा येथील कल्चरचा महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे पाटर्य़ा दुर्लक्षित करताच येत नाहीत.
राज कपूरच्या एका वेगळ्या पार्टीची बातमी कशी झाली, हे आवर्जून सांगायला हवे. २५ जून १९८३ रोजी भारतीय क्रिकेट संघाने विश्वचषक जिंकला तेव्हा मुंबईत रात्रभर धमाल चाललेली असताना एका पार्टीवरून राज कपूर आपली पत्नी कृष्णासह चेंबूरच्या घरी निघाला होता. दादरला गाडी थांबवून तो खाली उतरला आणि तोदेखील विश्वचषक जिंकल्याच्या आनंदाने क्रिकेटशौकिनांसह धुंद होऊन नाचला. त्या रात्री रस्त्यावर पार्टी करणाऱ्यांना तेव्हा आणखी वेगळ्या नशेची गरज भासली नसेल.
दिलीप ठाकूर
thakurdilip@gmail.com