Leading International Marathi News Daily
रविवार, ५ जुलै २००९

पड रं पाण्या, कर पाणी पाणी
पड रं पाण्या, पड रं पाण्या, कर पाणी पाणी
शेत माझं लई तान्हेलं चातकावाणी

आकाशाकडे पाहून प्रत्येक शेतकरी व्याकूळ होऊन ही हाक घालतो आहे- पड रं पाण्या, पड रं पाण्या; आणि का नाही म्हणणार तो? पाऊस म्हणजे त्याच्यासाठी सगळं काही, पाऊस नाही तर त्याच्या जीवनाचा खेळखंडोबाच!
पाऊस म्हणजे तरी काय? सिमेंट काँक्रीटच्या जंगलात-शहरवस्तीत पावसाळा असतो एक मोसम, एक सिझन. पण गावाकडे तो असतो प्रत्येकाच्या चेहऱ्यावरचं हास्य. पहिल्या पावसानं प्रत्येकजण असा उत्साही होतो, पाऊस यावा अन् त्यानं रानभर मस्ती करावी, त्या मस्तीनं शिवारालापण नशा यावी अन् त्या उन्मादातून सृष्टीच नाही तर माणसाचं जीवनही बहरून यावं, असा हा पावसाचा खेळ. पण हा खेळ झालाच नाही तर जगण्याची कसरत करता करता जी तारांबळ होते, तिला पारावार नाही. केवढी परवड होते मग.अशी परवड, फरफट आज झाली आहे. आज काय फक्त शेतच तान्हेलं आहे? आज तर शहरवस्तीतलाही माणूस तान्हेला आहे. ‘तोंडचं पाणी पळणं’ म्हणजे काय, ते पाऊस लांबल्यावरच कळतं.
 


या वर्षी वळीव घसरला नाही. मृगही घसरला नाही. आकाश रंग बदलेल अन् ढग कोसळतील या आशेनं माणूस नुसता खाली-वर पाहात आहे.
नद्या-नाल्याची सगळी वाळू उघडी झाली आहे. विहिरीनं तळ गाठला आहे अन् धरणातला गाळ उघडा पडला आहे. नांगरटी करून फाळांची टोकं बोथट झाली. या नांगरटीवर थेंब पडावेत, ढेकळं विरघळावीत अन् उभाटय़ा औताच्या कुळवण्या कराव्यात म्हणून शेतकरी तयार होता; पण आता ही औतं, कुळवं, रुमणी पार ढिल्ली पडलीत- वाडग्यात नाही तर पडवळीत. त्याची अवस्था कासावीस आहे.
बघ नांगरलं नांगरलं कुळवुन वज केली
सुगरणबाई पाभरीला शेतावर नेली
तापली धरणी, पोळले चरणी मी अनवाणी
पड रं पाण्या, पड रं पाण्या, कर पाणी पाणी
हे गाऱ्हाणं ऐकून मेघ भुलतील अन् ते कोसळतील, ही आशा आपल्या लोकगीतांतून व्यक्त झाली आहे.
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची अवस्था अशी बिकट आहे. गेल्या वर्षी पाऊस पडला; पण उशिरा. खरिपाचं पीक झालंच नाही. या वर्षीही तीच गत. फक्त रब्बीच्या पिकावर नाही जगता येत. बाजरी, मूग, हुलगा, सूर्यफूल अशा खरिपाच्या पिकांतून श्रावणापासून दसरा-दिवाळीपर्यंत येणारे सण त्याला उत्साहाने साजरे करता येतात. मूग, हुलग्यासारख्या पिकांमुळे शेतात बेवड होतं, या नैसर्गिक खतांचा फायदा रब्बीतल्या पिकांना होतो. गुराढोरांना हिरवा चारा मिळतो. दरवर्षी पावसानं अशी हुलकावणी दिली तर काय घडणार? आता पाऊस लांबला तर शेतकऱ्यांची पाठ-पोटं एक होतील, चरव्या-चरव्या, कासंडय़ा भरून दूध देणारी जनावरं भाकड जनावरांसारखी बुटकुलंभरपण दूध देणार नाहीत.
शेतकऱ्याला काय? मान्सूनच्या बातम्या हवामान खात्यासाठी. त्याला कुठून का होईना पाऊस पाहिजे, मग तो अरबी समुद्राकडून आला की हिंदी महासागरातून, जावा समुद्राकडून की पॅसिफिक महासागराकडून, तो राशिमेघ आहे की जलमेघ, याचा तो विचार करत नाही. गंगासागराकडून आलेल्या ढगातून भिजलेल्या रानात पिकलेली ही बाजरी आहे, अशी शिष्ट गोष्ट कोणताही शेतकरी करत नसतो. पण बाजारीकरणाच्या जगात त्याला ही गोष्ट उद्या कोणी शिकवणार नाही याची खात्री नाही.
पावसाळा आला, की ‘पावसाच्या कविता’ छापल्या जाताहेत, पण या कवितांतून रोमँटिझम व भावनोत्कटतेचा अतिरेक असतो. पाऊस नसतो तेव्हा कोरडा दुष्काळ असतो, याची भयावहता किती कवितांमधून स्पष्ट झाली आहे?
माणूस अडचणीत आला, की तो श्रद्धाळू बनतो. आशा-अपेक्षांचं ओझं घेऊन तो फिरतो. तो नियतिशरण बनतो. अशा वेळी ईश्वराला शरण जाणं तो अधिक स्वीकारतो. या शरणागतीतून पाऊस पडावा म्हणून समजतील आणि करता येतील तेवढे मार्ग तो हाताळतो. आज पाऊस पडावा म्हणून काही गावांतून बेडकांची लग्नं लावली जात आहेत, काही ठिकाणी महादेवाची पिंड पाण्यात किंवा दुधात बुडवण्यासाठी, दुधाच्या चरव्या, कळशा घेऊन माणसं देवळाकडे पळत आहेत. ओल्या अंगानं पाण्याच्या कावडी घेऊन धाव घेत आहेत. शहरवस्तीत काही ठिकाणी यज्ञ चालू आहेत, कोरडय़ा वाटेनं चालणारे वारकरी, विठ्ठलाला साकडे घालत आहेत, निदान परतताना तरी ही वाट ओली व्हावी.
समाजात पाप बोकाळलं आहे, प्रत्येकजण भ्रष्ट झाला आहे, नीतिमत्ता राहिली नाही म्हणून पाऊस येत नाही, अशीही कुजबुज वाढली आहे. जीवन-मरणाच्या या सीमारेषेवर खेडय़ापाडय़ातला माणूस हतबल आहे. तो सैरभर झाला आहे.
ही परिस्थिती थोडी ताणली गेली तर ते जगण्यासाठी बाहेर पडतील. ‘अन्नासाठी दाही दिशा आम्ही फिरविशी जगदीशा’ म्हणत ते आधार सापडेल तिकडे पळत सुटतील, शहरांकडे लोंढेच्या लोंढे सरकतील. ही परिस्थिती येऊ नये, म्हणून ते पुन:पुन्हा प्रार्थना करताहेत.
शहरवस्तीत पेट्रोल आणि डिझेलचा वास सोडत गाडय़ा पळताहेत. शेअर मार्केट वर गेलं- खाली आलं, अशा गोष्टी चघळत आहेत. चंगळवाद शिगेला पोहोचला आहे. सगळा गोंगाट माजला आहे, नळाला पाणी आलं नाही तर त्यांच्या हातात बिसलेरीच्या बाटल्या आहेत. इलेक्ट्रॉनिक मीडिया तर अहोरात्र बडबड करत आहे.
खेडय़ापाडय़ातला माणूस मात्र मुका झाला आहे. त्याला आधार आहे जुन्या लोकगीतांचा, ती आठवून तो प्रार्थना करतो आहे-
पाण्या पड तूं, पाण्या पड तूं, वाट किती पाहूं?
खिंडीतोंडी हटवाद्या, नको उभा राहू
पड रं पाण्या, पड रं पाण्या, कर पाणी पाणी
अरुण जाखडे
arunjakhade@padmagandha.com