Leading International Marathi News Daily
रविवार, ५ जुलै २००९

नाशिकचा सरकारी नोटांचा छापखाना सगळय़ांनाच माहिती आहे. पण या नाशकातच अंजनेरीच्या पर्वतरांगेत ऐतिहासिक नाण्यांचीही एक टांकसाळ दडली असल्याचे फार कमी लोकांच्या गावी आहे. त्र्यंबकेश्वराच्या ओढीने निघालेली पावले जेव्हा या अंजनेरीवरून जातात, तेव्हा त्यांना वाटेतच हा ‘मुद्रा संग्रहालया’चा फलक अडवतो आणि मुद्रांच्या त्या चेहऱ्यात गुंतवून टाकतो.
नाशिकहून अंजनेरी वीस किलोमीटर. त्र्यंबकेश्वर रस्त्यावरचे एक महत्त्वाचे गाव. इथे १९८० मध्ये ‘इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ युमिस्मॅटिक स्टडीज’ या संस्थेची स्थापना झाली. भारतीय नाणी आणि त्याचे शास्त्र यावर संशोधन अभ्यास करण्याच्या हेतूने के. के. माहेश्वरी आणि परमेश्वरी लाल गुप्ता या दोन तपस्वींनी या संस्थेची स्थापना केली. गेली तीस वर्षे या संस्थेत नाण्यांचा संग्रह, अभ्यास, संशोधन आणि या विषयाचा प्रसार असे मोठे कार्य सुरू आहे. अद्ययावत इमारत ज्यामध्ये अभ्यासिका, ग्रंथालय, प्रयोगशाळा आणि संग्रहालयाच्या माध्यमातून संस्थेचे हे कार्य सुरू आहे. यातील संस्थेचे संग्रहालय आणि ग्रंथालय या दोन गोष्टी तर आवर्जून पाहण्यासारख्या. या ग्रंथालयात आज या विषयावरील पंधरा हजार ग्रंथ, पाच हजारांहून अधिक शोधनिबंध आणि देशभरातील दीड लाख नाण्यांची छायाचित्रे-माहिती असलेली सूची तयार आहे. हे समृद्ध ग्रंथालय पाहायचे, संस्थेचे या विषयातील कार्य समजून घ्यायचे आणि मग प्रत्यक्ष नाणी पाहण्यासाठी संग्रहालयात पाऊल ठेवायचे.
 


प्रवेशद्वारीच असंख्य नाण्यांच्या छापातून तयार केलेले एक म्यूरल आहे. ज्यामध्ये आपली लाडकी ‘शिवराई’ अगदी मधोमध चमचमत असते.
एकूण ३५ पॅनेल्स, त्यावर विविध काळांतील, विविध राजांची आणि विविध धातू-आकारातील तब्बल तीन हजार नाणी. सोबतीला पुन्हा या साऱ्यांची माहिती, छायाचित्रे, काही दुर्मिळ-किमती नाण्यांच्या प्रतिकृती, नाण्यांशी संबंधित वस्तू अशा या साऱ्यांनी हे मुद्रा संग्रहालय सजले-भारले आहे.
‘सिक्कों से पहिले’ असे शीर्षक घेतच पहिले दालन येते. नाणीपूर्व असा हा वस्तुविनिमयाचा काळ! त्या काळातील वस्तूंच्या आधारेच तो इथे मांडला आहे. एका गाईच्या बदल्यात अमुक धान्य, दुसरीकडे या धान्याच्या बदल्यात अमुक वार कापड असा हा वर्षांनुवर्षे सुरू असलेला ‘वस्तुविनिमय!’ पण या व्यवहारात विनिमय कमी आणि अडचणीच जास्त! यातूनच मग धातूंच्या विशिष्ट आकारातील तुकडय़ांचा पर्याय पुढे आला. धातूला असलेले व्यवहारमूल्य, सोपी हाताळणी, दीर्घायुष्य, संचय सुलभता आणि मुख्य म्हणजे सार्वत्रिक स्वीकार्यता या गुणांमुळे हा पर्याय सर्वमान्य झाला. मग पुढे त्याची प्रमाणता-अधिकृतता ठरविण्यासाठी हे धातूंचे तुकडे तो-तो राजाच पाडू लागला आणि त्याने त्यावर आपली संकेत मोहरही उमटवली. अशारीतीने या साऱ्या निर्मितीतून इतिहासातील पहिल्या-वहिल्या नाण्याची निर्मिती झाली.
प्रस्तावनेचा हा सारा इतिहास समजून घ्यायचा आणि मग भारतातील त्या पहिल्या ‘आहत’ नाण्यांकडे वळायचे.
ही गोष्ट सव्वीसशे वर्षांपूर्वीची! भारतात असणाऱ्या छोटय़ा-छोटय़ा राजवटींनी- जनपदांनी ही अशी प्राथमिक नाणी सर्वप्रथम पाडली. आहत, जनपद नाणी किंवा ढ४ल्लूँ ें१‘ी ि्रूल्ल२ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या नाण्यांचे किमान शंभरएक प्रकार आपल्या पुढय़ात उभे असतात. मगध, काशी, पांचाल, गांधार, कलिंग, शूरसेन, आंध्र आदी जनपदांची ही नाणी. प्रामुख्याने चांदीत बनवलेली ही नाणी चौकोनी, गोल, लंबगोल अशा विभिन्न आकारांत तयार होत गेली. त्यावर एका बाजूस वन्यजीवांपासून चंद्र-सूर्यापर्यंत अनेक निसर्गरचनांचे दोन किंवा चार चिन्हे-छाप अंकित करण्यात आले. पुढे मौर्याची सत्ता संपूर्ण भारतभर पसरल्यावर त्यांनी यामध्ये स्वत:चे अस्तित्व थोडेसे वेगळे ठेवत सर्वत्र ५ चिन्हे अंकित केली. त्यांनीच चांदीबरोबर तांब्याची नाणीही सुरू केली आणि ठसे ठोकून नाणी करण्याऐवजी साच्यात धातूचा रस ओतून ती बनवण्याची कलाही अस्तित्वात आणली.
नाण्यांचे हे पहिले ‘आहत’ रूप पाहायचे आणि मग पुढे एकेक राजवट आणि तिची नाणी पाहात निघायचे. यामध्ये इंडो-ग्रीकांची नाणी सर्वप्रथम येतात. चिन्हांच्या जोडीने लिपी-अक्षरांचा पहिला वापर इथे झाल्याने या नाण्यांना भलतेच महत्त्व! ग्रीक लिपीच्या जोडीने या नाण्यांवर ब्राह्मी आणि खरोष्टीचा वापर केला आहे. गंमत अशी, की पुढे जेव्हा या दोन्ही भारतीय लिपींचा अर्थ लावण्याची वेळ आली तेव्हा या कामी ही नाणी फारच उपयोगाची ठरली.
यानंतर कुशाणांची नाणी येतात. चांदी, तांब्याबरोबर पहिले सोन्याचे नाणे या कुशाणांनी इसवी सन पहिल्या शतकात पाडले. पुढे गुप्तांनी त्यात मोठी भर घातली. सोन्याच्या नाण्यांच्या इथे अनेक प्रतिकृती मांडल्या आहेत. त्यात समुद्रगुप्ताची ती वीणावाद्य घेतलेली सुवर्णमुद्रा मात्र तोऱ्यात झळकत असते.
पुढे महाराष्ट्राचा आद्यकुल सातवाहन येतो. त्यांची चांदी, तांबे आणि शिशाची नाणी दोन हजार वर्षांचा काळ घेत पुढे येतात. क्षत्रप, विजयनगर साम्राज्याची नाणीही अशीच प्राचीन! नाण्यांचा हा प्रवास पाहात असतानाच त्यातले धातू-आकार, रंग-रूप आणि लिपीतील बदलही लक्ष वेधत असतात. यातलाच क्रांतिकारी बदल सांगत मुस्लिम राजवटींची नाणी येतात. दिल्ली सल्तनत, दक्षिणेकडील बहमनी सत्ता आणि मुघलांचा हा काळ! बदलत्या संस्कृतीत ही नाणीही बदलली. या काळातील प्रमुख बदल म्हणजे नाण्यांवरील चिन्हे कमी होऊन लेखन वाढले. यातही हिजरी सन, राजाचे नाव येऊ लागल्याने ही नाणी जास्त बोलकी झाली. अनेक नाण्यांवर कुराणातील विचार-उपदेश तर होतेच, पण काहींवर हिंदू देवताही झळकू लागल्या. महम्मद घौरीच्या नाण्यावरील लक्ष्मी, अकबराच्या नाण्यावरील राम-सीता आणि हैदरअलीच्या नाण्यातील चक्क शिव-पार्वती आपल्याला चक्रावून सोडते.
या काळातच शेरशहा सुरीने काढलेल्या एका नाण्याला ‘रुपया’ हे नाव दिले गेले. ज्या शब्दानेच पुढे आजचे आपले चलन ओळखू लागले. चांदीला संस्कृतमध्ये ‘रूप’ म्हणतात. म्हणून मग हा चांदीचा ‘रुपया!’ संस्कृतचा हा आधार कुणा शेरशहा सुरीने घेतला ही मात्र गंमत आहे.
या सुरीनेच चांदीबरोबर सोन्याच्या नाण्याला ‘मोहर’ आणि तांब्याच्या नाण्याला ‘दाम’ अशी नावे दिली. पुढे जहांगीरने या एक हजार मोहरांपासून एक भलीमोठी मोहर तयार केली. तिचे वजन होते तब्बल १२ किलो. या जहांगीरनेच बारा राशींची बारा सुवर्णनाणीही काढली. दुसरीकडे औरंगजेबाने मात्र या सर्व धार्मिक गोष्टींना मूठमाती देत त्यावर व्यवहारभाषा आणली. गंमत अशी, की त्याने सुरू केलेली ही नाणी त्याच्या पश्चात १८५७ पर्यंत संपूर्ण देशभर चालली.
बहमनी सत्तेचीही असंख्य नाणी इथे दिसतात, पण यामध्ये अली आदिलशहाचे चांदीचे ‘लारी’ नाणे मात्र फारच गमतीशीर! स्त्रियांच्या केसात अडकावयाच्या पिनेसारखे हे नाणे पर्शियातील ‘लार’ नावाच्या स्थळी बनवले जायचे म्हणून त्याचे नावच पुढे ‘लारी’ असे झाले.
मुस्लिम सत्तांची ही नाणी संपून मराठय़ांच्या मुद्रा येतात आणि पाहणाऱ्यांचे डोळे एकदम किलकिले होतात. ‘श्री राजा शिव’ आणि दुसऱ्या बाजूला ‘छत्र पती’ अशी अक्षरे धारण केलेली ‘शिवराई’ म्हणजे एखाद्या देवाचा टाकच वाटतो. शिवरायांच्या सुवर्ण होनांच्या प्रतिकृतीही इथे दर्शन देतात. पेशवाई आणि मराठा सरदारांची नाणीही हा मध्ययुगातील इतिहास जागा करतात.
मराठे जातात आणि ‘आणा, पैसा, रुपया..’ घेत ब्रिटिशांची नाणी येतात. स्वतंत्र भारताच्या नाण्यांचे एक पॅनेलही यालाच चिकटलेले असते. ओळखीच्या वाटणाऱ्या या नाण्यात आठ-दहा नाणी तरी नव्याने ओळख देतात.

अडीच हजार वर्षांचा हा काळ, असंख्य सत्ता आणि शेकडो नाणी हे सारे पाहताना एक भला मोठा इतिहास पुढे उभा राहतो. धातू-चलन, लिपी-अक्षरे, छाप-नक्षी, रूप-आकार या साऱ्या गुंत्यात इतिहासाच्या शास्त्राबरोबर त्याचे मानवी जीवनाशी असलेले धागेदोरेही थोडेसे सैलावतात.
कुठेतरी जुनावाडा-गढी पाडताना अचानक नाण्यांचा हंडा सापडला की लोक आजही पाहण्यासाठी गर्दी का करतात, या प्रश्नातील कुतूहल हे संग्रहालय पाहिले की खऱ्या अर्थाने शमते. मानवाने नवनिर्मितीच्या भूगोलाकडे कितीही धाव घेतली तरी त्याचे मन मात्र कायम इतिहासाच्या या पायातच घुटमळते, याचेच हे उदाहरण! अंजनेरीच्या या टांकसाळीतून फिरताना भूतकाळाचे हे गारुडच मनावर पुन्हा आरूढ होते.
(अंजनेरी नाणे संग्रहालय, अंजनेरी, जि. नाशिक. हे संग्रहालय अल्पदरात सर्वासाठी खुले आहे. संपर्क- अमितेश्वर झा, दानेश मोईन. दूरध्वनी ०२५९४-२२०००५)
अभिजित बेल्हेकर
abhibelhekar@gmail.com