Leading International Marathi News Daily
रविवार, ५ जुलै २००९

ख्रिस्तोफा कोरोंबो हे झिओनीज भाषेतलं नाव ऐकलंय कधी? ते ऐकलं नसेल तर मग लॅटिनमधलं ख्रिस्तोफोरस कोलंबस ऐकल्याचं तरी आठवतंय? ही दोन्ही आठवत नसतील तर मग इटालियन भाषेतलं ख्रिस्तोफोरो कोलोंबो, पोर्तुगीजमधलं ख्रिस्तोव्हा कोलोंबो किंवा स्पॅनिशमधलं ख्रिस्तोबाल कोलोन तरी आठवतंय..? नाही! काय म्हणताय काय? अहो, ही पाचही नावं आपल्या ख्रिस्तोफर कोलंबसचीच! साध्या बोटीतून जगप्रवासाला निघालेल्या एका जगप्रसिद्ध इटालियन दर्यावर्दीची!
जग धुंडाळायला निघालेल्या कोलंबसनं सर्वप्रथम स्पर्श केला तो कॅनरी आयलंडस्ना. त्यानंतर बहामा, क्यूबा, हैतीला. मग स्पेन आणि नंतर पोर्तुगालमधील लिस्बनला. पण हे सगळं घडलं त्याच्या पहिल्याच सफरीत.
 


कोलंबसच्या दुसऱ्या सफरीत अंतर्भाव होता- डोमिनिका, लेसर अ‍ॅँटिल्स, मॉँटेसेरात, अ‍ॅँटिगुआ, रेडोंडा, नेव्हिस, सेंट किटस, सेंट युस्टेशियस, सबा, सेंट मार्टिन, सेंट क्रॉइक्स, व्हर्जिन आयलंडस्, सेंट उर्सुला, व्हर्जिन गॉर्डा, टॉटरेला, पीटर आयलंडस्, ग्रेटर अ‍ॅँटिल्स, प्युटरे रिको, हिस्पॅनिओला, आयल ऑफ पाईन्स आणि जमैकाचा..
तिसरी सफर होती- पोटरे सॅँटो, केप वेर्दे, त्रिनिदाद आणि व्हेनेझुएलाची. तर चौथी शेवटची सफर होती- भारतीय उपखंड, अर्झिला, सेंट्रल अमेरिका, बे आयलंडस्, होंडुरास, निकारागुआ, कोस्टारिका आणि पनामाला स्पर्श करणारी. ग्रेनेडा हाही त्यानंच शोधलेला एक देश. कोलंबस ग्रेनेडाला पोचला तो १५ ऑगस्ट १४९८ या दिवशी! येत्या १५ ऑगस्टला त्याच्या ग्रेनेडाभेटीला ५११ वर्षं पूर्ण होतील.
****
ग्रेनेडा हे वेस्ट इंडिजच्या विंडवर्ड द्वीपसमूहापैकी ब्रिटिश राष्ट्रकुलांतर्गत असलेलं एक स्वतंत्र द्वीपराज्य. तीन मुख्य बेटांचं मिळून ते बनलंय. ग्रेनेडा, कॅरिकाऊ आणि पेटिट मार्टिनिक ही ती तीन बेटं. परंतु ग्रेनेडात तशी एकूण बेटं आहेत जवळपास सहाशे. ही बेटं आहेत ज्वालामुखीनिर्मित. डोंगराळ, दऱ्या आणि कडेकपारी असणारी. ग्रेनेडा हे इतर दोघांपेक्षा आकारानं मोठं; पण जगाच्या तुलनेत कितीतरी छोटं. तिघांचं मिळून एकूण क्षेत्रफळ ३४४ चौरस किलोमीटर. पण त्यातल्या एकटय़ा ग्रेनेडाचं क्षेत्रफळ १३३ चौरस किलोमीटर आहे. १८ कि.मी. रुंद आणि ३४ कि.मी. लांब असा त्याचा आकार. अतिशय दंतुर किनारा लाभलेलं हे बेट.
ग्रेनेडात असंख्य छोटय़ा छोटय़ा नद्या आहेत. पण या कुठल्याच नदीचा उपयोग वीजनिर्मितीसाठी होत नाही. ग्रेनेडात खनिज पाण्याचे झरे आणि ज्वालामुखीनंतर निर्माण झालेल्या खोलगट भागांत निर्माण झालेली उत्तम सरोवरे आहेत. सेंट जॉर्जेस या राजधानीपासून ११ कि.मी.वर पूर्वेला ४००-४२५ मीटर उंचीवर ग्रॅँड एटांग नावाचं नितांतरमणीय सरोवर आहे. ग्रेनेडा वसलं आहे त्रिनिदादच्या वायव्येस १४४ कि.मी.वर आणि बार्बाडोसच्या नैऋत्येस १६० कि.मी.वर! बहुतांश समुद्रसपाटीलगत असलेलं. क्वचित काही टेकडय़ा. सर्वात उंच टेकडी माऊंट सेंट कॅथरिन नावाची. तिची उंचीही फार नव्हे, जेमतेम २७५७ फूट. वर्षभर निरोगी हवामान असणारं हे बेट. तापमान २४ अंश सेल्सिअस ते ३० अंश सेल्सिअस. पाऊस पडतो जानेवारी ते मे वगळता. तेवढे पाच महिने कोरडे. बाकी सारे पावसाचेच. थंडी त्यातल्या त्यात नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात. सरासरी पाऊस १८० ते १९० सें.मी. इतकाच पडतो. पण एटांग सरोवराच्या क्षेत्रात तो अंदाजे ४०० ते ४१० सें.मी. पडतो. वादळं होतात, पण ती क्वचितच.
१९५५ सालच्या जबरदस्त वादळानंतरचं मोठं वादळ तब्बल ४९ वर्षांनंतर २००४ साली झालं. इव्हान हे त्याचं नाव. या वादळाचा फटका इतका तीव्र होता, की बेटावरची ९० टक्के वस्ती उद्ध्वस्त झाली. जायफळ हे ग्रेनेडाला मोठं उत्पन्न मिळवून देणारं पीक. इव्हाननं ते पार उद्ध्वस्त केलं. या वादळामुळे ग्रेनेडाची अर्थव्यवस्थाच कोलमडून पडली. तिला पुन्हा सावरायला एक वर्ष जावं लागलं. पाठोपाठ २००५ सालीही एमिली नावाचं वादळ आलं आणि ११० दशलक्ष अमेरिकन डॉलर्स एवढय़ा मालमत्तेचं नुकसान करून गेलं.. ग्रेनेडाची एकूण लोकसंख्या एक लाख १० हजार. सेंट जॉर्जेस ही त्याची राजधानी. त्याची लोकसंख्या जेमतेम २२-२३ हजार. ग्रेनेडाची लोकसंख्या संमिश्र आहे. त्यात आफ्रिकन आहेत, ईस्ट इंडियन आहेत आणि युरोपियनही आहेत. पण सर्वाधिक ७५ टक्के प्रमाण आहे ते आफ्रिकनांचं. ईस्ट कॅरेबियन डॉलर हे तिथं चालणारं चलन. एका अमेरिकन डॉलरचे होतात २.६७ ईस्ट कॅरेबियन डॉलर. रोख पैशात व्यवहार होतच नाहीत असं नाही, पण सर्वाधिक व्यवहार चालतात ते एटीएम आणि क्रेडिट-डेबिट कार्डावर. ग्रेनेडाची अर्थव्यवस्था अवलंबून आहे ती मुख्यत: पर्यटनावर. १९८५ साली आंतरराष्ट्रीय विमानतळ झाल्यापासून इथे विदेशी पर्यटकांचे प्रमाण मोठय़ा प्रमाणावर वाढले आहे. स्वाभाविकपणेच विदेशी चलनालाही गती मिळाली आहे. पर्यटनानंतरचा मुख्य आयस्रोत आहे- शेती. मसाल्याचे पदार्थ ग्रेनेडात मोठय़ा प्रमाणावर पिकतात. त्यात प्रामुख्याने समावेश आहे- वेलची, लवंग, सुंठ, जायपत्री, कोको आणि जायफळाचा.
****
कोलंबस ग्रेनेडाला पोचला तेव्हा कॅरिब जातीचे लोक तिथे राहत होते. ही गोष्ट अर्थातच पंधराव्या शतकाच्या अखेरची. १७ व्या शतकाच्या सुरुवातीस फ्रेंचांचे व इंग्रजांचे लक्ष या बेटांकडे वळले. निरनिराळ्या फ्रेंच मालकांकडून शेवटी १६७४ मध्ये ग्रेनेडा फ्रेंच शासनाकडे आलं. १७६२ मध्ये इंग्रजांनी ही बेटं जिंकली. मधल्या काळात ती पुन्हा फ्रेंचांकडे गेली, पण नंतर पुन्हा इंग्रजांकडेही आली. १९५८ सालापर्यंत ही बेटं ब्रिटिश विंडवर्ड बेटं म्हणून ओळखली जात होती. १८५८ मध्ये ती वेस्ट इंडीज संघराज्यात सामील झाली. पण १९६२ मध्ये ती पुन्हा फुटून निघाली. ग्रेनेडाचे पहिले पंतप्रधान एरिक गेअरी यांच्या प्रयत्नांनी १९७४ मध्ये ती ब्रिटिश राष्ट्रकुलांतर्गत स्वतंत्र झाली..
सेंट जॉर्जेस ही ग्रेनेडाची राजधानी. लोकसंख्या अवघी साडेसात हजार. पण आसपासचा सारा परिसर विचारात घेतला तर ती जाते ३३ हजारांच्या घरात. घोडय़ाच्या नालीसारखा आकार असलेलं हे शहर. चारी बाजूंनी डोंगर. तेही जिवंत ज्वालामुखी असलेले. पण तरीही हजारो पर्यटक या शहराला भेट देण्यासाठी वर्षांनुवर्षे येत असतात. सेंट जॉर्जेसनं आपला इतिहास, आपली संस्कृती आणि आपलं निसर्गसौंदर्य जतन करत शहराला आधुनिकही बनवलंय. कोको, जायपत्री आणि जायफळ ही इथून मोठय़ा प्रमाणावर निर्यात होणारी मसाल्याची पिकं. सेंट जॉर्जेस फ्रेंचांनी बांधलं १६५० मध्ये. लाल कौलांची फ्रेंच पद्धतीची घरं त्याची खूण पटवतात..
ग्रेनेडात संसदीय लोकशाही आहे, पण ती घटनात्मक राजेशाहीअंतर्गत आहे. दुसरी राणी एलिझाबेथच्या नावे गव्हर्नर जनरल इथलं प्रशासन चालवतात. इथे कॅर्लिल ग्लीन सध्या गव्हर्नर जनरल आहेत, तर टिलमन थॉमस पंतप्रधान आहेत. २००७ साली इथे क्रिकेटचे विश्वचषक सामने व्हायचे होते. तेव्हा अत्यंत कमी वेळात चीन सरकारच्या मदतीनं ग्रेनेडा सरकारनं सारं काही उभं करून दाखवलं. ग्रेनेडाची संसद दोन सभागृहांची आहे. सिनेट आहे १३ सदस्यांचं, तर हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह १५ सदस्यांचं. सिनेटर्सची नियुक्ती होते गव्हर्नर आणि विरोधी पक्षांच्या सल्ल्याने. सदस्यांची निवड होते ती पाच वर्षांसाठी. २००८ साली अलीकडची निवडणूक झाली तेव्हा ५१ टक्के मतं मिळवून आणि १५ पैकी ११ जागा जिंकून नॅशनल डेमोक्रॅटिक युनियननं बहुमत मिळवलं..
टिलमन थॉमस हे विद्यमान पंतप्रधान. वय र्वष ६४. परवाच्या १३ जूनला त्यांनी ६५ व्या वर्षांत पदार्पण केलं. येत्या १३ जुलैला त्यांच्या पंतप्रधानपदाच्या कारकीर्दीला एक र्वष पूर्ण होईल. मॉरिस बिशप यांनी त्यांना दोन र्वष गजाआड पाठवलं होतं. तब्बल १३ र्वष विरोधी पक्षात काढल्यानंतर गेल्या वर्षी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत ते पंतप्रधान झाले. ‘माझं सरकार बेरजेचं राजकारण करील. माझी कारकीर्द खुली असेल.. पारदर्शक असेल,’ हे त्यांनी दिलेलं आश्वासन महत्त्वाचं आहे. याचं कारण ‘ट्रान्स्परन्सी इंटरनॅशनल’च्या निकषानुसार ग्रेनेडा आहे १८८ देशांमध्ये ८५ व्या क्रमांकावर!
सुधीर जोगळेकर
sumajo51@gmail.com