Leading International Marathi News Daily
रविवार, ५ जुलै २००९

अमृताच्या ताटी नरोटी ठेवणाऱ्यांची खरडपट्टी
विविध भाषांमधून महाभारतावर किंवा त्यातील एखाद् दुसऱ्या व्यक्तिरेखेवर लेखन करणाऱ्यांची मोजदाद केल्यास ती संख्या अक्षरश: शेकडय़ातच भरेल. कोणी कृष्णावर, तर कोणी भीष्मावर, कोणी द्रौपदीवर तर कोणी पांडवांपैकी कोणा एकावर हजारो पाने लिहून त्या त्या व्यक्तिरेखेला न्याय देण्याचा खटाटोप केला आहे. कर्णाने तर कित्येक लेखकांच्या प्रतिभांना आजवर आकर्षित केले आहे. पण या सर्वापेक्षा आनंद विनायक जातेगावकर यांचा दृष्टिकोन अगदीच निराळा आहे. महाभारतात प्रक्षेपांच्या स्वरूपात टाकली गेलेली भर वेगळी करून दाखवणे आणि व्यासांचा खरा वारसा अधोरेखित करणे अशा दुहेरी हेतूने हे लेखन झाले आहे. महाभारतातील पात्रांना आदर्श, परंपरा, सुष्टदुष्टत्वाच्या रूढ चौकटी आणि सांस्कृतिक संदर्भ इत्यादी जोखडांतून मुक्त करून निखळ माणूसपणाच्या परिप्रेक्ष्यात ठेवताना महाभारताकडे पाहण्याचा एक नावाच दृष्टिकोन जातेगावकर वाचकांना देतात. कोणत्याच एका पात्रात ते गुंतून पडत नाहीत, कित्येक पात्र जसे दिसले जाणवले तसे मांडत जातात. त्याचवेळी ठिकठिकाणी व्यासांनी आपल्यासाठी सोडलेल्या ‘कोऱ्या जागांचा’ तसेच विशिष्ट प्रसंगीच्या सर्व शक्यतांचा पडताळा घेत घेत ते महाभारताचे मर्मही शोधत असतात.
 


जातेगावकरांच्या लेखनाचे सर्वात प्रथम नजरेत भरणारे वेगळेपण हे त्यांच्या भाषेचे आणि पुस्तकाच्या रचनाबंधाचे आहे. त्यांची मांडणी विलक्षण गतिमान असून वाचकांना खिळवून ठेवत असतानाच विचारप्रवृत्त करण्यात त्यामुळे ते यशस्वी ठरले आहेत. भाषेचा बहुस्तरीय आविष्कार त्यांच्या लेखनात झाला आहे. महाभारतातील व्यक्तिरेखांसंबंधी सांगताना ते कहाणीची धावती निवेदनशैली वापरतात, तर मूळ महाभारतातील काही प्रसंगांचे, निसर्गरम्य ठिकाणांचे, वास्तूंचे, ऋतूंचे वा व्यासांच्या अलौकिक प्रतिमासृष्टीचे वर्णन करण्यासाठी ते मुक्तछंदातील कवितेच्या सुंदर व प्रत्ययकारी ओळीच लिहून जातात. महाभारत ही मूलत: एक सर्जनशील कलाकृती आहे, पण त्याचबरोबर तो जय नावाचा इतिहासही आहे या दुहेरी वस्तुस्थितीचे अचूक भान लेखनशैलीची निवड करताना व्यासांप्रमाणेच जातेगावकरांनीही बाळगले आहे. महाभारताच्या महावस्त्राला आपल्या दळभद्री पण स्वार्थी गोणपाटांची ठिगळे लावणारे कसे नतद्रष्ट आहेत हे सांगताना जातेगावकरांची शैली कमालीची कठोर, आक्रमक व उपरोधिक होते. वाचकांशी सहज संवाद करण्याची भूमिका लेखकाने स्वत:कडे घेतल्यामुळे कथानकातील प्रसंगाची क्रमवारी न पाळता जसे सुचेल तसे तो सांगत जातो, सांगता सांगता मध्येच वर्तमानाचा संदर्भ मनात जागा झाला किंवा जर अन्य साहित्यकृतीतील काही आठवले तर तो तिथेच सांगून टाकतो. सहज बोलण्याच्या ओघात येणारे इंग्रजी शब्द टाळण्याचा उगाच अट्टहासही तो करत नाही. व्यासांनी जिथे जिथे मौन पाळले आहे जिथे जे प्रश्न मनात अपरिहार्यत: उद्भवतात त्यांची मालिका उभी करून वाचकांना त्यावर विचार करण्यास भाग पाडणे हाही लेखकाच्या शैलीचाच एक भाग आहे.
पुस्तकाची मार्मिक सुरुवात जातेगावकरांनी हेमिंग्वेच्या ओल्ड मॅन अ‍ॅण्ड द सी कादंबरीतील पहिल्या प्रसंगापासून केली आहे. जुन्या होडीत समुद्रात हिंडत असलेल्या म्हाताऱ्याच्या गळाला एक महाकाय व्हेल मासा लागतो, त्याला किनाऱ्याकडे खेचून आणण्यात तो आपल्या सर्व शक्ती पणाला लावतो, पण मधल्या काळात असंख्य खादाड- भुकेले शार्क मासे त्या देवमाशाचे लचके तोडतात आणि अखेरीस त्याचा फक्त सांगाडा शिल्लक उरतो. व्यासांनी सर्व शक्ती पणाला लावून साकार केलेल्या महाभारताची अशीच दुर्दशा आपापल्या वकुबानुसार किंवा अंतस्थ हेतूनुसार लचके तोडणाऱ्यांनी आजवर केली असा लेखकाचा अभिप्राय आहे. त्याचा स्वत:चा प्रयत्नही आणखी एक लचका ठरेल की काय अशी शंकाही त्याने व्यक्त केली आहे. पण हे नि:संदिग्धपणे सांगावेसे वाटते की, प्रस्तुतचा प्रयत्न स्वत:च्या जबडय़ाच्या कुवतीनुसार लचका तोडण्याच्या स्वरूपाचा मुळीच नाही तर महाभारताचा संपूर्ण व्हेल मासा मुळात कसा असेल याची सप्रमाण मांडणी करणारा झाला आहे आणि त्यासाठी लेखक निश्चितच अभिनंदनास पात्र आहेत. महाभारताचे असे लचके तोडून व्यासांचा वारसा कधीच कोणाच्या हाती लागण्याची सुतराम शक्यता नाही, तर व्यासांची समग्र भूमिका नीटपणे समजून घेतली तरच तो सापडू शकेल अशी रास्त धारणा मनात बाळगून हे लेखन झाले आहे. यातच त्याच्या वेगळेपणाचे रहस्य दडलेले आहे.
व्यासांनी स्वत:चे कोणतेही भाष्य न करता किंवा कोणतेही बौद्धिक तर्क न मांडता प्रसंगांमागून प्रसंग ठेवले आहेत, त्यातून वरकरणी सुटय़ा सुटय़ा वाटणाऱ्या पण एकमेकींशी घट्ट जोडल्या गेलेल्या घटनांच्या साखळीतून एक प्रसरणशील व संतुलित कथावस्तू वाचकांसमोर त्यांनी ठेवली आहे. प्रत्येक व्यक्तिरेखेच्या विशिष्ट प्रकारे झालेल्या वाटचालीमागे तिची स्वभाववैशिष्टय़े आणि तिचे स्वत:च्या प्रतिमेच्या कोंडीत अडकून पडणेच कसे कारणीभूत झालेले आहे हे व्यासांना दाखवून द्यायचे असते. व्यक्तिविशिष्टापेक्षा ती ज्या विकारांना बळी पडते त्यांची सार्वकालीनता व सर्वनाशकता जनमानसावर ठसवणे आणि प्रत्येक प्रसंगामागील मानसिकता समजून घेणे तसेच संहाराच्या आत दडलेले सर्जनाचे कोंभही सूचकतेने दाखवणे ही व्यासांची शैली आहे. ते स्वत: अगदीच अपवादात्मक प्रसंग वगळता बोलत नाहीत, निर्णय देत नाहीत की आज्ञा करत नाहीत; तर फक्त प्रश्न उपस्थित करतात आणि वाचकांना विचारप्रवृत्त करतात. व्यासांची जीवनदृष्टी संपूर्ण जगाला कवेत घेण्याइतपत विशाल तरीही तितकीच सूक्ष्म; आर्ष तितकीच आधुनिक आहे. व्यासांची भूमिका सकृद्दर्शनी निष्क्रिय दिसत असली तरी ती अलिप्त, कोरडी व तटस्थ निरीक्षकाची नसून प्रत्येक पिढीने स्वत:च्या चिंतनाची खोली वाढवावी अशी आर्त हाक देणाऱ्या व मानवतेचा निरंतर कळवळा बाळगणाऱ्या सद्सद्विवेकबुद्धीची आहे हे जातेगावकरांचे प्रतिपादन अत्यंत मार्मिक आहे. त्यांच्या मते व्यास हे सर्वकाळात माणसांना जागे करू पाहणाऱ्या युगायुगांच्या मानवी जाणिवेला लाभलेले व्यक्तिरूप असून अंतरीच्या ज्ञानदिव्याचे, समष्टीच्या कधीही नष्ट न होणाऱ्या सुज्ञ नेणिवेचे, शरीरात शिरलेल्या रोगजंतूंचा प्रतिकार करण्यासाठी रक्तात स्वाभाविकपणेच तयार होणाऱ्या अ‍ॅन्टीबॉडीजचे कार्य ते पार पाडत असतात. कोणी त्यांचा सल्ला न मानला तरी ते विचलित वा हताश होत नाहीत. त्यादृष्टीने पाहिल्यास महाभारताची कथा ही ऱ्हासकालीन समाजात सर्वत्र नकारात्मक शक्तींनी थैमान घातले असताना त्या परिस्थितीला समष्टीने दिलेले ठोस उत्तरच ठरते. म्हणूनच महाभारताचा वर्तमानाशी असलेला धागा जातेगावकरांनी जागोजागी जोडून दाखवलेला आहे.
व्यासांच्या संयत-सूचक शैलीशी छत्तीसचा आकडा असलेल्यांनी महाभारतात वेळोवेळी जी भर घातली तिचा खरपूस समाचार लेखकाने घेतला आहे. ते महाभाग कोणत्या वर्णाचे वा लिंगाचे होते यापेक्षाही ते अत्यंत सामान्य वकुबाचे होते ही बाब लेखकाला अधिक दुर्दैवी वाटते. मौखिक परंपरेतून त्यांनी हे महाकाव्य हजारो वर्षे जतन केले हे त्यांचे श्रेय मान्य करूनही, आजचे धनलंड प्रयोजक जसा दूरदर्शन मालिकांच्या कहाण्यांमध्ये स्वत:च्या बाजारू जाहिरातींचा सुकाळू करतात तसे, त्यांनी वाटेल ते घुसडून वा भव्यसुंदर कलाकृतीची नासधूस करावी हे लेखकाला अक्षम्य वाटते. अर्जुन- बब्रुवाहन यांच्यातील युद्धाचा प्रसंग, खुद्द व्यासांना अश्वमेधाचा घोडा सोडायला लावून नंतर लग्नाच्या व्हिडीओ सीडीप्रमाणे केलेले त्या यज्ञाचे वर्णन, युधिष्ठिराचे कुत्र्यासह सदेह स्वर्गगमन, यक्षप्रश्नांचा आचरटपणा, शास्त्रशुद्ध मयसभेचे फिल्मी चमत्कारदृश्यांत केलले रूपांतर अशा अनेक प्रसंगांतील प्रक्षिप्त अंशांची लेखकाने परखड चिकित्सा केली आहे. महाकाव्याचे लेखक व्यास यांना बाजूला सारून कृष्णाच्या व्यक्तिरेखेचे ‘भगवानीकरण’ करणाऱ्या पढीक ब्राह्मणांच्या अनेक पिढय़ांसाठी श्रीमद्भगवदगीता व शरपंजरी पडलेल्या ‘सर्वज्ञ’ भीष्माने अनेक प्रश्नांची दिलेली उत्तरे हे दोन प्रसंग तर आपले म्हणणे घुसडण्याच्या नामी जागा कशा वाटल्या आहेत यासंबंधीचे त्याचे विवेचन मुळातून वाचण्याजोगे आहे. कृष्णाच्या तोंडून भगवंती दैववाद पिकवणे, अंधश्रद्धांना खतपाणी घालणे, कर्मविपाकाच्या विचाराला व चातुर्वण्र्याच्या विषम समाजरचनेला धार्मिक सिद्धांताचे अधिष्ठान देणे यापैकी काहीही व्यासांच्या भूमिकेशी जुळणारे नाही हे जातेगावकरांनी सप्रमाण सांगितले आहे. कृष्णाचा धडा गिरवीत ज्या विद्वांनानी स्वार्थासाठी गीतेचा वापर भुसभुशीत जमिनीसारखा करून तिला सतत फुगवत- फोफावत नेले त्यांचाही निषेध ते नि:संदिग्ध शब्दांत करतात. प्रक्षेपकर्त्यांनी भीष्माशी झालेल्या प्रश्नोत्तरांना तर पारावरल्या गावगप्पांच्या पातळीवर आणून ठेवले असा त्यांचा रास्त आक्षेप आहे. कोणीही उठावे आणि त्यांच्या तोंडी काहीही घालावे हे इतक्या सहजपणे का घडते याचेही स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न जातेगावकरांनी केला आहे.
वस्तुत: गीता हे अंतिम सत्य नव्हे याचे भान व्यासांचे कधीही सुटलेले नव्हते. त्यांच्या दृष्टीने एका आणीबाणीच्या प्रसंगी एका पात्राने दुसऱ्याला जे सांगितले ते तिसऱ्या पात्राने चौथ्यापर्यंत पोहोचवणे एवढेच गीतेचे प्रयोजन होते. त्यामुळेच त्यांनी गीतेला काऊंटरबॅलन्स करणारा युद्धसमाप्तीनंतरचा प्रसंग प्रभावी स्वरूपात उभा केला आहे. गीता प्रमाणाबाहेर मोठी लार्जर दॅन लाइफ होऊ नये याची दक्षता त्यांनी घेतली आहे. अनेक प्रक्षेप होऊनही महाभारताचे सत्त्व अबाधित राहिले ते व्यासांच्या जीवनदृष्टीतील त्रिकालदर्शी चिरंजीवित्वामुळेच हे सांगताना जातेगावकर दाखवून देतात की प्रक्षेपकर्त्यांच्या असंख्य पिढय़ांनी प्रयत्न करूनही भारतीय संस्कृतीने कृष्णाची जीवनदृष्टी स्वीकारलेली नाही. ती जर स्वीकारली असती तर गीता हा इथला एकमेव पवित्र धर्मग्रंथ ठरला असता आणि करुणेची महत्ता जाणणारा बुद्ध इथे झालाच नसता. आजही कबिराचे दोहे, तुकारामाचे अभंग, सुफी संतांच्या रचना इथल्या जनमानसावर प्रभाव गाजवताना दिसतात; मुक्ताबाईचे ताटीचे अभंग, ज्ञानेश्वरांचे पसायदान, मीरेची भजने ऐकताना अडाणी माणसेही स्वत:ला ओलांडून स्वत:पलीकडे जाताना दिसतात, हे सारे व्यासांची स्वीकाराची जीवनदृष्टी या समाजाने आपली मानल्यामुळेच शक्य झाले आहे. तोच खरा व्यासांचा वारसा आहे आणि तेच या सहिष्णू संस्कृतीचे सार आहे.
भास्कर लक्ष्मण भोळे
व्यासांचा वारसा,
आनंद विनायक जातेगावकर,
शब्द पब्लिकेशन,
पृष्ठे - २७२,
मूल्य - २६० रुपये.

अंतर्मुख करणाऱ्या कथा
मराठी साहित्यात अनेक मान्यवर लेखकांनी आपल्या कथांमधून अनेक पात्रे, घटना आणि प्रसंगांना अजरामर केले आहे आणि रसिकांच्या मनात घर करून राहिलेल्या या कथांनी कथांचे दालन समृद्ध केले आहे. मोनिका गजेंद्रगडकर यांनी विविध क्षेत्रांत मुक्त संचार करून तेथील माणसांच्या मनातील व्याकुळता प्रतिबिंबित करणाऱ्या कथांच्या ‘आर्त’ या कथासंग्रहाद्वारे यात मोलाची भर घातली आहे.
लेखिकेच्या अनुभवांची व्यापकता आणि विचारांची सखोलता अविष्कृत झालेल्या या कथासंग्रहात केवळ सहाच कथा आहेत. परंतु वेगवेगळी सहा क्षेत्रे, वेगवेगळ्या व्यक्ती, निरनिराळे प्रसंग आणि घटना यांना दिलेले शब्दरूप रसिक वाचकांना खिळवून ठेवणारे आहे. भिन्न भिन्न स्तरावरील व्यक्ती वेगवेगळ्या प्रसंगी कशा वागतात, त्या त्या वेळी त्यांची मानसिकता कशी असते, त्यांचे कुटुंबाशी व समाजाशी नातेसंबंध कसे असतात आणि त्यांच्या उक्ती व कृतीमध्ये कोणते साम्य व भेद असतात हे सर्व या कथांमध्ये दिसून येते. धर्मावरील आत्यंतिक श्रद्धेमुळे एखादी व्यक्ती कोणत्या थराला जाऊन पोहोचते, याशिवाय परस्पर भिन्न मतप्रवाह असलेले दोन भाऊ, त्यांच्या आई-वडिलांशी असलेला संवाद, माहेर आणि सासरकडून अनुकूलता असतानादेखील मुसलमान पतीच्या हिंदू पत्नीची स्वत:च्या मुलाकडून होणारी अवहेलना आणि तिच्या मनाची झालेली कुतरओढ हे ‘श्रद्धा’ या कथेतून अतिशय परिणामकारकपणे मांडले आहे.
या संगणकयुगात स्त्रियांनी गगनाला गवसणी घातली असली तरीही कौटुंबिक जीवनात तिला स्थान कोठे आहे? पुरुषप्रधान संस्कृतीमधून तिची मुक्तता झाली आहे काय? याला संस्कृतीचा पगडा जबाबदार आहे काय? मुलीच्या जन्मापासूनच तिला बाई म्हणून कसे वागवले जाते? या आणि अशा अनेक प्रश्नांची जंत्री मांडणारी कथा म्हणजे ‘संक्रमण’ या कथेमधून मनाने दूर झालेल्या, बेशुद्धावस्थेत असलेल्या आपल्या आईशी मूकपणाने संवाद साधणाऱ्या मुलीचा जीवनपट उलगडून दाखविला आहे.
‘नातं’ या कथेमधून, रेवी नामक पात्राचे ऐन तारुण्यात अपघाती निधन झाल्यामुळे त्याचे आई-वडील आणि त्याची गर्भवती पत्नी यांच्यावर कोसळलेल्या दु:खाची कहाणी सांगितली आहे. आई-वडिलांच्या मुलावरील निरतिशय प्रेमामुळे त्यांना त्याच्या अस्तित्वाचे कसे भास होतात आणि त्याची पत्नी धैर्य एकवटून, दु:खाचे डोंगर झेलीत पुन्हा संसार सुरळीत चालविण्यासाठी नोकरी कशी सांभाळते याचे वर्णन येथे आहे. या कथेत गर्भवती सूनेच्या भावी आयुष्याचा विचार करून आणि जन्माला येणाऱ्या बाळाला पित्याचे नाव मिळावे म्हणून सासू-सासरेच तिचा विवाह ठरविण्यात पुढाकार घेतात हे दाखवून समाज प्रबोधनही केले आहे.
एखादी व्यक्ती सुखाचा शोध घेत परदेशात गेली तरीही तिला तेथील आनंद पूर्णपणे लुटता येत नाही. मातृभूमीच्या ओढीमुळे त्या व्यक्तीला मानसिक अस्वस्थता कशी जाणवते हे ‘रुट्स’ या कथेतून वाचावयास मिळते. घरातल्या व्यक्तीशी बंड पुकारून विदेशात गेलेल्या मोठय़ा भावाची कथा लहान भाऊ सांगतो. हा भाऊ म्हणजे आई-वडिलांना नको असलेले अपत्य आहे आणि यामुळेच दोन मुलांना त्यांनी दिलेली वेगवेगळी वागणूक व यामुळे त्या दोन भावांमध्ये वाढत गेलेले अंतर यांच्या वर्णनाबरोबरच परदेशात स्थायिक झालेल्या दादाची मानसिक स्थिती बिघडल्यावर, पुतणीच्या निमंत्रणावरून लहान भावाने परदेशात जाऊन आपल्या बालपणीच्या, स्वत:ला नको असलेल्या आठवणी दादाला सांगून त्याला त्याच्या मुळाकडे घेऊन जाताना सोसलेल्या यातनांची वर्णने येथे आहेत. याशिवाय विदेशात जन्मलेली पुतणी सुझान हिची मानसिकता आणि तेथील संस्कृती याचीही माहिती येथे मिळते.
‘जन्म’मध्ये संगीतामधले दोन मातब्बर कलावंत नानासाहेब व बाईसाहेब आणि संगीत क्षेत्रातच नावलौकिक मिळवण्यास उत्सुक असलेला त्यांचा मुलगा सत्यजित यांची कथा सांगितली आहे. कलेच्या प्रेमापोटी दोन महान कलावंत एकत्र येतात. त्यांचा विवाह होऊन पुत्ररत्नाची प्राप्ती त्यांना होते. परंतु दोघंही कालांतराने विभक्त होतात. सत्यजित आईकडेच संगीताचे धडे घेतो. अधिक शिक्षणासाठी तो वडिलांकडे जातो. अशा आशयाच्या या कथेमधून दोन कलावंतांच्या आचरणात कोणता फरक आहे, सत्यजितला वडिलांशी जुळवून घेता येते का? नानासाहेब मुलाकडे कोणत्या दृष्टिकोनातून पाहतात, वडिलांकडे संगीतसाधना करताना सत्यजितला कोणकोणत्या प्रसंगांना तोंड द्यावे लागते या सर्वच बाबींवर येथे प्रकाश टाकला आहे.
अशाच प्रकारे आई-वडिलांमध्ये दुरावा निर्माण होऊन घटस्फोटापर्यंत प्रकरण गेल्यावर मानसिक कुचंबणा झालेल्या मुलीची कथा ‘बाबांची आई’ या कथेतून सांगितली आहे. आई-वडील एकत्र राहात नाहीत आणि मुलगी वसतिगृहात राहात असते. आई-वडिलांनी एकत्र व्हावे असे तिला मनापासून वाटते. अखेर ती बाबांना आईच्या मायेने समजावते. या कथेत आई, बाबा आणि मुलगी या सर्वाचीच भूमिका आपापल्या परीने योग्य असली तरी बाबांची असहाय्यता व मुलीची ससेहोलपट मनाला चटका लावणारी आहे.
प्रस्तुत कथासंग्रहातील कथांमधली पात्रे एकमेकांना समजून का घेत नाहीत हा प्रश्न उभा ठाकतो. यातील काही पात्रे विचारांच्या गर्तेत सापडली आहेत, तर काही पात्रांमध्ये निर्णयशक्तीचा अभाव जाणवतो आणि त्यामुळे ती पात्रे द्विधा मन:स्थितीत पडलेली दिसतात. यातील सर्वच पात्रांची भावविभोर व्याकुळता पदोपदी दिसून येते. ‘श्रद्धा’मधील यशोदा, ‘बाबांची आई’मधील राधा, ‘संक्रमण’मधील रेणू, ‘नातं’मधील उमा आणि ‘जन्म’मधील बाईसाहेब अशा निरनिराळी कौटुंबिक पाश्र्वभूमी असलेल्या वेगवेगळ्या वयोगटातील आणि भिन्नभिन्न कार्यक्षेत्रातील स्त्रियांची होणारी मानसिक कुचंबणा कमी अधिक प्रमाणात सारखीच असल्याचे येथे प्रकर्षांने जाणवते. तरीही त्यांच्यावर गुदरलेल्या प्रसंगाना सामोरे जाण्याची त्यांची पद्धत आणि त्यांचे धैर्य हे कौतुकास्पद असून रसिक वाचकांनी बोध घेण्यासारखे आहे.
अशा प्रकारे महाराष्ट्र शासनाच्या पुरस्कारासह अनेक पुरस्कार प्राप्त झालेल्या या कथासंग्रहातील वैविध्यपूर्ण प्रसंगांची गुंफण करून, प्रगल्भ भाषेत शब्दबद्ध केलेल्या या कथा रसिकांनी अवश्य वाचाव्यात अशा आहेत.
कमलाकर राऊत
आर्त (कथासंग्रह)
मोनिका गजेंद्रगडकर
मौज प्रकाशन, मुंबई
पृष्ठे : १६९, मूल्य : १६० रुपये

पुस्तकाच्या मागील पानावर पुस्तकाचा कथाविषय सांगणाऱ्या आशयाचा सारांश मांडणाऱ्या- मोजक्या ओळी असतात निर्मितीच्या प्रक्रियेत ‘ मागे ’ राहून ‘ बोलकी ’ आणि मोलाची कामगिरी करणारे हे समर्थ सारांश..

आपण माणसात जमा नाही - राजन गवस
मेहता पब्लिशिंग हाऊस
पृष्ठे: १७६ , मूल्य: १५० रुपये
राजन गवस यांची कथा ऐंशीनंतरच्या कथा परंपरेतील एक महत्त्वाची कथा आहे. त्यांच्या कथेतून आधुनिक काळातील स्त्रीविषयक विशिष्ट मूल्यदृष्टीयुक्त जाणिवा, बदलता गावगाडा यासंबंधीची आशयसूत्रे प्रभावीरीत्या आविष्कृत झाली आहेत. समकालीन कथेतील त्यांचे वेगळेपण म्हणजे त्यांच्या कथेतून संपूर्ण गावाचे भान प्रकट होते. गावाचा म्हणून एक संवेदनस्वभाव असतो, तो या जीवनदृष्टीतून साकारला आहे.
बदलत्या गावगाडय़ाचे चित्र या कथेत पाहायला मिळते. कृषी संस्कृतीतील विविध तऱ्हेचे संबंध, समूहमानस, नवे सत्तासंबंध, जातीयतेची उतरंड याबद्दलचा जीवनार्थ ही कथा व्यक्त करते.
गेल्या तीनेक दशकभरातील महाराष्ट्रातील गावगाडय़ाचा बदलता अवकाश ही कथा चित्रित करते. आधुनिक काळातील शहरकेंद्रित मूल्यदृष्टीचे लोण हळूहळू ग्रामीण जीवनात कसे पसरते आहे व त्यामुळे या लोकमानसामध्ये घडलेल्या पालटाचे, स्थित्यंतराचे, त्यातील ताणाचे चित्रण ही कथा करते. या गोष्टींमुळे कृषी संस्कृतीतील एकसंध सहजीवी जीवनदृष्टीला तडे बसत आहेत व स्वार्थार्थ, व्यवहारी, उपयोगितावादी जीवनदृष्टीची रुजवात होते आहे, याची सूचना ही कथा करते. या कथेत शहरी आक्रमणाचा ताण सतत केंद्रवर्ती राहिलेला आहे. नव्या कृषी संस्कृतीकडे पाहण्याची एक नवी मर्मदृष्टी ही कथा देते. म्हणूनच राजन गवस यांची कथा वैशिष्टय़पूर्ण ठरते. तिच्यात जीवनार्थाच्या अनेक शक्यता सामावल्या आहेत.
रणधीर शिंदे