Leading International Marathi News Daily
रविवार, ५ जुलै २००९हॅलो! ए. बी. जोशी आहेत का?’’
‘‘बोलतोय.’’
‘‘नमस्कार सर. आम्हाला पुढच्या एपिसोडमध्ये मान्यवर परीक्षक म्हणून आपण हवे आहात.’’
‘‘आपण कोण बोलताय?’’
‘‘मी ‘सतत वाहिनी’च्या अंधेरी ऑफिसमधून बोलतेय. आमचा गाण्यांचा रिअ‍ॅलिटी शो आपण बघत असालच.’’
‘‘हो तर. बघतो ना.’’
‘‘मग येताय न सर? शूटिंग बुधवारी सकाळी नऊ वाजता सुरू होईल. आपण साडेनऊ पर्यंत आलात तरी चालेल.’’
‘‘अहो पण.. तुमचे स्पर्धक काय तयारीने गातात हो. मला तर गाण्यातलं ओ की ठो कळत नाही.’’
 


‘‘या तर मग. आम्ही वाट पाहतोय. आपला जाण्या-येण्याचा टॅक्सीचा खर्च ‘सतत वाहिनी’ देईल.’’
‘‘तुमचा काही तरी गैरसमज झालेला दिसतोय.’’
तेवढय़ात तिकडे फोन ठेवल्याचा आवाज झाला. मी ‘अहो अहो’ करत राहिलो. माझ्या ए. बी. जोशी नावामुळे असे घोळ होतात. मी ‘सतत वाहिनी’ला फोन करून दिलगिरी कळवण्याचा प्रयत्न केला. आमच्या लाईन्स नेहमीच ओपन असतात असं नेहमीच म्हणणाऱ्या त्या वाहिनीचा फोन माझ्या वेळी मात्र नेमका बंद होता.
पत्नी बाजूला एक मासिक वाचत बसली होती. एकूण प्रकार तिच्या लक्षात आला असावा. ती म्हणाली, ‘‘या महिन्याचं तुमचं भविष्य वाचा- संधी दार ठोठावेल; तिला पाठ दाखवू नका. धाडस करा!’’
मग मी खरोखर धाडस करायचं ठरवलं. त्या झगमगत्या मंचावर चकमकत्या लाल रंगाचा झब्बा वगैरे परिधान करून मी ‘आजचा मान्यवर परीक्षक’ म्हणून दाखल झालो. जगातल्या असंख्य (पण मान्यवर) ए. बी. जोशींपैकी एक. टाळ्यांचा प्रचंड गजर.
‘‘आपण आमचा कार्यक्रम पाहता का? सूत्रसंचालिकेचा प्रश्न.’’
‘‘हो तर. वीजपुरवठा असेल तेव्हा पाहतो आणि भारनियमन असेल तेव्हासुद्धा पाहतो; कारण आम्ही इन्व्हर्टर घेतला आहे. अर्थात केबलवाल्याकडेच काही प्रॉब्लेम असला तर इलाज नसतो.’’
मी खरं तर वस्तुस्थिती सांगितली होती; पण ‘मी एक मान्यवर’ म्हणून माझ्या या उत्तराला प्रेक्षकांनी टाळ्यांच्या गजरात जोरदार प्रतिसाद दिला! मग मी काय ऐकतोय!
‘‘आमच्या गायकांना आपण काही सांगू इच्छिता काय?’’ यावर मी म्हटलं, ‘‘संपूर्ण महाराष्ट्रात किंबहुना संपूर्ण जगात आज तुमचा आवाज पोहोचत आहे; तरीपण कोणतंही टेन्शन न घेता बिनधास्त गा!’’
माझं बेअरिंग मस्त जमलं! मग काय! आपल्या जागेवर (!) स्थानापन्न होण्याची गोड विनंती मला ऐकावीच लागली.
पहिलं गाणं झालं. अभिप्राय द्यायला मान्यवरांपासूनच सुरुवात करावी अशी त्या स्पर्धकाची मागणी होती. मी म्हटलं, ‘‘या गाण्याला जसं अ‍ॅटिटय़ूड पाहिजे तसं तुम्ही ठेवलंत. अगदी उत्फूल्लपणे गायलात. छान. गॉड ब्लेस यू.’’
दुसरं गाणं झालं. आता मत देण्याच्या बाबतीत माझा नंबर तिसरा होता. पहिल्या दोन परीक्षकांच्या मताशी मी पूर्णपणे सहमत असल्याचं सांगत मी त्यांचाच अभिप्राय पुन्हा एकदा ऐकवला. वरचं सप्तक, खालचं सप्तक वगैरे.
तिसऱ्या गाण्यानंतर मी तिसरी युक्ती लढवली. मी म्हटलं, गाण्याबद्दल इतर दोघे बोलतीलच. मी एक वेगळीच आठवण सांगणार आहे. नुकतीच गायलेली कविता शालेय जीवनात शिकताना शिक्षक तिची कशी वाट लावून टाकत असत ते रंगवून रंगवून सांगितलं. टाळ्याच टाळ्या.
चौथ्या गाण्याच्या वेळी स्पर्धकाचा आवाजच त्याला दगा देत होता. ‘त्यांच्यात’ करतात तसे तो स्वत:चा एक कान पकडत होता. माझं काम सोपं झालं. म्हटलं, ‘‘हरकत नाही. भरपूर खा- पी, तब्येत सुधार आणि पुढल्या वेळी उत्तम गा. विशेषत: रोज एक चमचा लोणी खाल्लं तर व्होकल कॉर्डस्साठी चांगलं असतं आणि पहाटेचा रियाज हवाच.’’ (स्पर्धक आज्ञाधारकपणे मान हलवत होता ,त्यामुळे मला अगदी सात्त्विक सात्त्विक वाटू लागलं.)
पाचव्या गायकाला प्रेक्षकांनी टाळ्या, शिट्टय़ा, वन्समोअरची मागणी यांनी एवढं उचलून धरलं की यंव रे यंव. मी म्हटलं, ‘‘मी तुझ्याबाबतीत एकच करू शकतो. स्टॅण्डिंग ओव्हेशन!’’ म्हणजेच मी उठून टाळ्या वाजवून त्याच्या टॅलेण्टला मानवंदना दिली.
आता मी नंतरच्या गाण्यांना आणखी धीटपणे आणि ‘प्रिसाइज’ अभिप्राय देऊ लागलो. जसे-
‘‘हे गाणं ऐकायला सोपं असलं तरी गायला अवघड आहे.’’
‘‘तुझ्या गाण्याला मातीचा गंध आहे.’’
‘‘तू मला अगदी लहानपणच्या काळात घेऊन गेलीस. धन्यवाद.’’
‘‘तुझी गाण्याची निवड फार छान होती. हे माझ्या आवडत्या गाण्यांपैकी दुसरं- तिसरं गाणं आहे.’’
‘‘चांगलं गायलीस, पण अजून चांगलं व्हायला हवं होतं आणि तू गाऊ शकतेस.’’
एव्हाना मी एक सराईत मान्यवर झालो होतो. शेवटी मात्र माझी चांगलीच पंचाईत झाली. मंचावर जाऊन, त्या दिवसाची सर्वच गाणी चांगली झाली पण नियमानुसार एका स्पर्धकाला बाहेर जावं लागणार हे सांगून संकोचपूर्ण आवाजात मी आऊट होणाऱ्या स्पर्धकाचं नावही घोषित केलं. पण त्यानंतर जेव्हा सूत्रसंचालिकेने प्रथेप्रमाणे मला माझ्या गाण्याने समारोप करायला सांगितला तेव्हा मात्र मला कोंडीत की खिंडीत की कशात तरी पकडल्यासारखं झालं. मी गाण्याचा प्रयत्न करू लागलो, पण गळ्यातून सूरच निघेना. दोन्ही हात गळ्याशी घेऊन मी चित्रविचित्र आवाज काढू लागलो. आणि त्यालाही कडाडून टाळ्या पडल्या..
रत्नाकर धर्माधिकारी

‘गांधीजींच्या वस्तू’मुळे मौजे कोल्हे-काकडी हे गाव पंचक्रोशीत प्रसिद्ध झाले होते. शब्बीर मियांचं हॉटेल, मल्लेवार किराणा दुकान.. तर जगप्रसिद्धच झाले होते. शब्बीर मियाच्या हॉटेलमध्ये भज्यांचा घाणा टाकला की, त्याचा दरवळ गावभर दरवळायचा आणि लोकांच्या तोंडाला पाणी सोडायचा. त्या भज्यांना आपली एक खास चव व सुगंध असायचा; (कोंढाळीच्या भज्यांना असतो तसा) ही भजी थेट अमेरिकेत पाठविली जायची! (गावच्या भुतडाजींची मुलगी अमेरिकेला दिली होती. तिला या भज्यांचे डोहाळे लागले होते. तेव्हा एकदा व्हाया पोस्ट पाठविली होती.) अशी ही भजी म्हणजे गावाचे पेटंट होते. ‘दहाची-पंधराची’ सोबत तर ती पंचपक्वान्नासारखी लागायची. हा मद्यभजे योग ज्यांनी अनुभवला होता ते त्या गावचे ‘कायल’ झाले होते.. अशा कोल्हे-काकडीत, आपल्या गण्याचं प्रमोशन झालं होते. त्याचा बालवर्गमित्र मुकुंद देशपांडे आता डॉक्टर झाला होता व त्याने ग्रीनस्टार हॉटेलशेजारीच आपला दवाखाना उघडला होता. गण्याचा जॉब बदलला होता, मात्र रोल तोच होता. शब्बीर मियाकडेसुद्धा तो लोकांना ‘दवाई’ द्यायचा आणि आता येथेसुद्धा दवाई (मात्र खरीखुरी) देण्याचे कार्य तो मोठय़ा हिकमतीने पार पाडायचा. शकीला भाभी दवाखान्यात उसण गेली म्हणून औषधाला आली तर, ‘हेले को मत उठाणा भाभी इस ऊमर मे’ अशी कोपरखळी मारायला तो विसरत नसे. राशिचक्रवाल्या पाध्यांच्या भाषेत तो ‘विंचू’ राशीवाला नक्कीच असणार.
डॉक्टर देशपांडे, सरपंच अन् गण्या असं त्रिकूट एकत्र आलं की गावातल्या लोकांच्या पोटात धस्स व्हायचं. जमीला खाला तर आपल्या सगळ्या कोंबडय़ांना आत बोलवून घ्यायची. जमीला बुढीने ऑऽऑऽऽ केले की जेथे असतील तेथून कोंबडी- कोंबडे पळत-उडत तिच्याकडे धाव घ्यायचे. जमीलाच्या कुटुंबात दीडशे सदस्य होते. ती एकटी व १४९ कोंबडय़ा!! डॉक्टर-कंपौंडर-सरपंच या त्रिकुटाची तिच्या कोंबडय़ांवर सदैव वक्रदृष्टी असायची. सरपंचाजवळ एक ओलं केलेलं पोतं असायचं. डॉक्टरजवळ पोंगा पंडित असायचे एका घेराला बांधलेलं. कोंबडीच्या कळपाकडे ते फेकलं की त्याला भाळून एखादी कोंबडी हमखास दवाखान्याकडे यायची. शिकाऱ्याच्या चपळाईने सरपंच तिला पकडायचा व घराकडे धूम ठोकायचा. इकडे बाकी कोंबडय़ांनी कल्ला केला की गणू खालाला आवाज द्यायचा. ‘इत्ता बडा बोक्या उधर तेरी मुर्गी लेके भाग्या’ असे सांगायचा. अशा तऱ्हेने आठवडा-पंधरा दिवसांतून तिची एक ना एक कोंबडी गायब व्हायची व इकडे त्रिकुटाची मुर्गीपार्टी सजायची..
मात्र आज जमीलाबानो स्वत:च कोंबडी घेऊन दवाखान्यात आली होती. ‘बेटा, देख रे इसे-कैसे झिमे जैसी कर रही है.’ खालाजान! मी माणसांचा डॉक्टर आहे. मला यातलं काय कळणार-इति डॉ. देशपांडे, परंतु गिऱ्हाईक जाऊ देईल तो गण्या कसला. डॉक्टरसाहेब, तुम्हाला सांगायचं राहून गेलं. काल मी तालुक्याच्या ठिकाणी गेलो होतो तेव्हा तेथे आपला वर्गमित्र कांबळे भेटला होता. जिल्हा परिषदमध्ये मोठ्ठा अधिकारी आहे. त्याने स्वाईन फ्ल्यूची लस तुम्हाला देण्याकरिता दिली आहे. असे सांगून आतमध्ये गेला व एका परीक्षानळीत (टेस्ट टय़ूबमध्ये हो) कसलंसं लिक्विड घेऊन आला. ड्रॉपरने दहा-पंधरा थेंब त्याने कोंबडीला पाजले व आश्चर्य म्हणजे एव्हाना मरगळलेली कोंबडी ताडदिशी उठली अन् कोंबडी पळालीच्या चालीवर फडफड भयाला लागलीच्या ठेक्यावर चक्क मोठमोठय़ा कोंबडय़ांसोबत भांडाया लागली! ‘खाला पचास रुपये’ असे म्हणत गणूने फी मात्र न चुकता वसूल केली. दारू पोटात गेली की चुहाँ भी शेर बनता है भाया!
तू त्या कोंबडीला दिलं तरी काय? डॉक्टरसाहेब तुमची ती बिगर वासाची डायट की फायट जिन आहे ना! ती!! डॉक्टरांनी आपल्या कपाळावर मारून घेतले. मात्र ही वार्ता गावभर वाऱ्यासारखी पसरली. जो तो बर्ड फ्ल्यू प्रतिबंधक लस घ्यायला गर्दी करू लागला. लोकांचा आग्रह पाहून गण्या ग्लुकोज वाटर (सलाईन हो) चे पंधरा पंधरा थेंब कोंबडीच्या मुखात (चोचीत) टाकू लागला व पन्नास पन्नास रुपये घेऊ लागला. रविभाऊ गावचे प्रतिष्ठित पत्रकार सर्व मोठमोठय़ा पेपरच्या, जिल्हा पुरवणीमध्ये त्यांची बातमी नक्कीच लागायची. त्यांनी या गर्दीचा/रांगेचा व डॉ. देशपांडे यांच्या कार्याचा (खरं तर आपल्या गण्याच्या उचापतीचा) इत्थंभूत वृत्तान्त सगळ्याच पेपर्सना दिला आणि दुसऱ्या दिवशी हाहाकार माजला. थेट मेक्सिकोवरून शास्त्रज्ञांचे एक पथक आले. त्यांनी गणूच्या ‘प्रतिबंधक लस’ व ‘स्वाईन फ्ल्यू’ लसीचे नमुने सोबत नेले. अमेरिकेच्या पथकाने यामधील केमिकल कंपोझिशनमध्ये थोडाफार बदल करून लस बनवली व त्यामुळे मेक्सिको/अमेरिकेतील स्वाईन फ्ल्यू आटोक्यात आला. गण्याला व्हाईट हाऊसमध्ये बोलावण्यात आलं. त्याच्या सन्मानार्थ प्रेसिडेंट ओबामांनी डिनर ठेवले. मिशेल वहिनींनी त्याच्या गालाला गाल लावून खास अमेरिकन शैलीतील आलिंगन दिले. कोल्हे-काकडीचं नाव जगात पोहोचलं.
भूपेन्द्र कुसळे

रिटायरमेंटनंतर काय करावे?
- अशोक परब, ठाणे
नोकरीत असताना काय दिवे लावले ते आठवावेत.
दगडाचे वय कसे मोजतात?
- संदेश ढगे, शहापूर

मला तुमची जन्मतारीख माहीत नाही.
जर तुम्हांला ट्वेन्टी-ट्वेन्टी विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघात घेतले तर?
- अरविंद माच्छी, डहाणू

मला आयुष्यात धावाधाव करायला आवडत नाही.
मेल्यानंतर आपण आपली सर्व संपत्ती, धनदौलत, घर-दार आपल्याबरोबर वर घेऊन जाऊ शकलो, तर काय होईल?
- विद्या लोहोकरे, ठाणे

तुम्ही तर टॅक्स कन्सल्टन्टच्या जीवावरच उठलात.
क्रिकेट सामन्यांमध्ये तोकडय़ा वस्त्रांमधील चीअरगर्ल्स नाचविण्याचा नेमका उद्देश काय?
- प्रवीणसिंह परदेशी, मु. सोनई

अनेकदा क्रिकेटचा सामना कंटाळवाणा होतो,आणि लोकांना घरी जायचे नसते.
मूर्ख आणि अतिशहाणा यात फरक काय?
- अरविंद करंदीकर, तळेगाव दाभाडे

मूर्ख माणूस सांगितलेले काम कसे का होईना, करतो तरी. अतिशहाण्याबद्दल काय सांगावे? ती काकांचीच करायला बघतो.
भारत महासत्ता होईल का?
- जय नार्वेकर, मालाड

मी अफवांवर विश्वास ठेवत नाही.
अलीकडची शिकलेली, बिगर शिकलेली मुलं शब्दागणिक शिव्या का देतात?
- सदानंद बामणे, वांद्रे
काहीही असो, मराठी भाषा टिकवतायंत ना!

भिकारी : मी दोन दिवसांपासून उपाशी आहे. मला काही खायला द्या.
गृहिणी : अजून स्वयंपाक झाला नाही.
भिकारी : माझा मोबाईल नंबर घ्या, स्वयंपाक झाला की ‘मिस कॉल’ द्या.
- अशोक परब, ठाणे.

‘पाण्याखाली सतत ४८ तास राहण्याचा जागतिक विक्रम’ या शीर्षकाची बातमी वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाली. सविस्तर बातमी अशी होती- प्रसिद्ध जलतरणपटू जलवीरने सतत ४८ तास पाण्याखाली राहण्याचा जागतिक विक्रम प्रस्थापित केला आहे. बातमीत पुढे असे म्हटले होते- जलवीरची अंत्ययात्रा उद्या सकाळी १० वाजता निघेल.
- श्रीराम हळबे, पुणे.

एकदा दोन बेवडे तर्र होऊन नेहमीप्रमाणे लाल किल्ल्यासमोरून घरी चालले होते. तेवढय़ात एकजण थांबला, लाल किल्ल्याकडे निरखून दुसऱ्यास म्हणाला, ‘‘यार. आज लाल किल्ला रास्तेमे आया दिखता है. जरा पिछे ढकेल देंगे.’’ दुसऱ्यानेही निरखून पाहिले आणि सहमती दर्शवली. दोघेही कपडे काढून लाल किल्ल्याच्या भिंतीला जोर लावून ढकलू लागले. समोरून चाललेल्या एका माणसाने हे पाहिले. तो दोघांना म्हणाला, ‘‘काय करता आहात. देखो ना आज लाल किल्ला थोडा रास्तेमे आ गया है. हम उसको पिछे ढकेल रहे है.’’ त्या माणसाला बेवडय़ांची धुंदी लक्षात आली. त्याने दोघांचे कपडे १० फूट दूर नेऊन ठेवले आणि म्हणाला, ‘‘तुमचे प्रयत्न यशस्वी झाले, पाहा लाल किल्ला पीछे गया.’’ बेवडय़ांनी ते पाहिले आणि जाणाऱ्या इसमास धन्यवाद दिले.
- दामोदर वैद्य, सोलापूर.

तळीराम आर्य मदिरा मंडळात भाषण करताना म्हणाला, ‘‘शिक्षण संस्थेच्या जवळपास मद्याची दुकानं असता कामा नये, हा कायदा चांगला आहे. साऱ्या शिक्षण संस्था ताबडतोब मद्याच्या दुकानापासून दूर हलवल्या पाहिजेत.’’
- एम. एस. परदेशी, सोनई.

एका कॉलेजमधील वॉचमनला एका दक्ष पालकाने विचारले, ‘‘हे कॉलेज चांगले आहे का?’’ यावर वॉचमन म्हणाला, ‘‘उत्तम! अत्युत्तम आहे. मी माझे एमबीए येथूनच पूर्ण केले आणि मला इथेच चटकन नोकरी मिळाली.’’
राजेश कोरे, जळगाव.

एका कॉलेजमधील वॉचमनला एका दक्ष
पालकाने विचारले, ‘‘हे कॉलेज चांगले आहे का?’’
यावर वॉचमन म्हणाला,
‘‘उत्तम! अत्युत्तम आहे. मी माझे एमबीए येथूनच पूर्ण केले आणि मला इथेच चटकन नोकरी मिळाली.’’
राजेश कोरे, जळगाव.

People who do lots of work...
make lots of mistakes

People who do less work...
make less mistakes

People who do no work...
make no mistakes

People who make no mistakes...
gets promoted

That's why I spend most of my time
sending e-mails & playing games at work
I need a promotion.

अनिल देवसेकर
Email: anil@sankalpan.com