Leading International Marathi News Daily
रविवार, ५ जुलै २००९

जीएंनी आपल्या लेखनामागील प्रेरणांसंबंधी एके ठिकाणी स्पष्टपणे लिहिले आहे. ते म्हणतात, ‘माझ्या कथा आत्मचरित्रात्मक नाहीत. काही माणसांची यातनेने गच्च झालेली जीवने मी भोगलेली आहेत. त्या अर्थाने ती माझी आहेत.’ खरे पाहता ललित साहित्य म्हणजे लेखकाचा समाजजीवनानुभव आणि स्वजीवनानुभव यांचा संगम असतो! तो नुसता संगम नसतो, तर वरील दोन अनुभवप्रवाहांना परानुभव या नावाचा आणखी एक प्रवाह मिळाल्याने बनलेला त्रिवेणी संगम-प्रीतिसंगम असतो! प्रत्येक ललित कलाकृतीत हे तिन्ही प्रवाह, कमी अधिक प्रमाणात, सतत जाणवत असतात. लेखक लौकिकदृष्टय़ा सुपरिचित असेल; तर ते प्रवाह स्पष्टपणे जाणवतात. लेखकाच्या व्यावहारिक आयुष्यासंबंधी तुटपुंजी माहिती असेल; तर त्या प्रवाहांच्या खुणा धूसर, अस्पष्ट दिसतात, जाणवतात. आणि यापैकी काहीच गाठीला नसेल; तर त्या कलाकृतीबद्दल व तिच्या रचनाकाराबद्दल वाचकाच्या मनात प्रचंड कुतूहल निर्माण होत राहते! लेखकाचा स्वानुभव कोणता, परानुभव कोणता, लेखकाने पाहिलेले किती, ऐकलेले किती, वास्तव कुठले- काल्पनिक कुठले, असे अनेक प्रश्न निर्माण होतात! कारण काही लेखक परानुभवच अशा काही स्वानुभावाच्या पातळीवर जगत असतात की, त्यांना अलग करून दाखविणे ‘नीरक्षीर न्याया’तील राजहंसालाही अशक्यप्राय होऊन जावे!
आता हे खरे की, कोणतीही कलाकृती-साहित्यकृती- तीत मांडलेल्या अनुभवाच्या जातीपातीवर श्रेष्ठ-कनिष्ठ ठरत नसते; तर तो अनुभव किती जिव्हाळ्याने, किती उत्कटपणे मांडला जातो त्यावर ठरत असते. प्रत अनुभवांमध्ये नसते, अनुभवांच्या चितारण्यात असते. ते चितारणेच अनुभवाला चिरतारुण्य बहाल करत असते. मग तो अनुभव लेखकाने लौकिकार्थाने ‘याचि देही याचि डोळा’ घेतलेला असो अथवा नसो!
या सर्व विवेचनाच्या पाश्र्वभूमीवर विचार करता नि:शंकपणे व निश्चितपणे असेच म्हणावे लागते, की जीएंची कथा ही ‘या कथ्यते सा-’ सारखी नुसती कथा नाही; तर मानवी मनाचा, जीवनाचा मूलगामी शोध घेणारी, त्याच्या लौकिक जीवनासंबंधी प्रचंड कुतूहल निर्माण करणारी आणि त्यांनी घेतलेल्या प्रत्येक अनुभवाच्या उष्ण श्वासातून जन्माला आलेली अलौकिक-पारलौकिक कथा आहे! उदाहरणार्थ, तुती, कैरी, राधी..
‘राधी’ हा जीएंचा हळवा, उत्कट अनुभव आहे. तो जसा लेखकाचा अनुभव आहे, तसाच तो वाचकाचाही अनुभव आहे. गल्लीच्या एका टोकावर राहणारी गोपाळभटाची राधी आणि त्याच गल्लीच्या, पण दुसऱ्या टोकावर राहणारा चिमुरडा बालकथानायक यांच्यामधील तरल भावबंध जीएंनी इतक्या फुलपाखरी हळुवारपणे विणले आहेत की, कथेच्या शेवटी सहृदय वाचकाचे मन विकल होऊन जाते! या कथेतील अवघे अनुभवविश्व जीएंनी एका दहा-बारा वर्षांच्या मुलाच्या मुखातून वदविले असल्यामुळे, एरव्ही झगझगीत देदीप्यमान नक्षत्री वस्त्रप्रावरणांमध्ये ऐटदार वावरणाऱ्या जीएंच्या शैलीने या कथेत साधे, सुती, पण सात्त्विक मंगल असे धूतवस्त्र नेसले आहे! आणि म्हणूनच ही ‘राधी’ जीएंच्या कथासृष्टीत ठळकपणे उठून दिसते! छोटय़ा कथानायकाप्रमाणेच वाचकाचे मनही विस्कटून टाकते!
जी. ए. कुलकर्णी हे मराठी साहित्याच्या कथाविश्वातील सूर्यासारखे तेजस्वी नाव.
१० जुलै हा जीएंचा जयंतीदिन.
या दिवशी ‘राजहंस प्रकाशना’तर्फे ‘जीएंची कथा : एक परिसरयात्रा’ हे पुस्तक प्रकाशित होत आहे.
प्रतिभाशाली व्यक्तीच्या जडणघडणीत आणि कलानिर्मितीत कोणकोणते घटक कार्यरत असतात, हा सामान्यांपासून तज्ज्ञांपर्यंत साऱ्यांनाच कुतूहलाचा वाटणारा विषय. व्यक्तिगत घटकांपासून बाह्य घटकांपर्यंत अनेक घटक त्यात अंतर्भूत असतात. त्या प्रतिभाशाली व्यक्तीच्या कलाकृतींमधून या साऱ्या घटकांचे कधी धूसर-पुसट, कधी गडद गहिरे, कधी सूक्ष्म-तरल, कधी जडबंबाळ अवाढव्य, कधी मनाला उन्नत आकाशात नेणारे, कधी निराशेच्या खोल खाईत भिरकावून देणारे दर्शन आपल्याला घडत असते. जीएंच्या बाबतीत जणू त्यांच्या कथेतील एक धगधगते पात्रच बनून येणारे परिसर-दर्शन हा असाच एक महत्त्वपूर्ण प्रभावी घटक.
प्रा. अ. रा. यार्दी आणि प्रा. प्रल्हाद वडेर यांनी जीएंच्या विविध कथांमधील ओळखखुणांचा मागोवा घेत त्या कथांमधील परिसराचा धांडोळा घेतला. त्याचे आजचे रूप न्याहाळले. जीएंच्या काळातील रूपाची कल्पना केली आणि वाचकांसमोर हा सारा वेधक आलेख सादर केला. ‘जीएंची कथा : एक परिसरयात्रा’ अशा पद्धतीचे आलेखन आणि त्यातून त्या प्रतिभावंताच्या काही पैलूंचा घेतलेला शोध मराठी साहित्यातून फारच अभावाने आढळतो.
संकल्पित पुस्तकातील ‘राधी : महादेव गल्ली’ या कथेचा हा संपादित अंश..

या ‘राधी’ची कथा अगदी साधी आहे. मित्राने-आबाने गाव सोडताना टाकलेल्या शब्दावर विश्वास ठेवून, कुठे जायचे, काय करायचे याबद्दल शब्दानेही न विचारता भाबडा गोपाळभट सारा संसार दोन गाठोडय़ात भरून राधीला घेऊन शहरात येतो. पण पुढे त्याला खूळ लागते. मग आबा, गणेशवाडीभट व धोपेश्वरकर मास्तर असे तिघे मिळून त्याला दूर कुठल्या तरी हॉस्पिटलमध्ये ठेवतात. आणि मग चिंधीसारख्या वीतभर रुंदीच्या गल्लीच्या एका टोकावरील, एकच भिंत असलेल्या खोलीत राधीच्या एकाकी आयुष्याला प्रारंभ होतो.
 


या राधीला गल्लीतली माणसे, विशेषत: स्त्रीवर्ग, अजिबात सामावून घेत नाहीत. त्यामुळे एक प्रकारचे बहिष्कृत जीवनच या राधीच्या वाटय़ाला येते. या बहिष्कृत आयुष्यात उभ्या गल्लीत तिला दोनच व्यक्तींचा जिवाभावाचा आधार असतो- आबा आणि गणेशवाडीभट!
तात्पर्य, गणेशवाडीभट, आबा, कृष्णाबाई-आबांची पत्नी, त्यांचा शाळेला जाण्याच्या वयाचा मुलगा आणि ही सगळी मंडळी ज्या गल्लीत राहतात, ती महादेव गल्ली- ही या कथेची मूल पंचतत्त्वे असून त्या पंचतत्त्वाच्या परस्परपूरक आणि परस्परविरोधी संयोगातूनच गोपाळभटाची ही ‘राधी’ साकारलेली आहे!
असे म्हटले जाते आणि ते खरेही आहे की, ललित साहित्यातल्या व्यक्तिरेखा या खऱ्याही असतात आणि खोटय़ाही असतात. खऱ्या या अर्थाने की, त्या व्यक्तिरेखांचा आपल्याला अनेक व्यक्तींमध्ये भास होत असतो. त्यांच्यातल्या खुणा इतर अनेक व्यक्तींमध्ये ठळक-पुसट दिसत असतात. तर खोटय़ा या दृष्टीने की, त्या व्यक्तिरेखा जशा मनश्चक्षूंना दिसतात, तशा त्या प्रत्यक्षात चर्मचक्षूंना आढळत नाहीत. कारण माणसे वेगवेगळी असतात व वेगवेगळी असूनही माणसांसारखी असतात. जसे व्यक्तिरेखांबद्दल, तसेच त्या व्यक्तिरेखा ज्या वातावरणात वावरतात त्य वातावरणाबद्दलही म्हणावेसे वाटते!
परंतु जीएंच्या बहुसंख्य कथांमध्ये वेगळेच अनुभवाला येते. त्यांच्या कथेतील व्यक्तिरेखांची सरसकट प्रचीती येत नाही. त्या अशा काही वैशिष्टय़पूर्ण असतात की, त्या जशा जाणवतात तशा प्रत्यक्षात दिसणे तर दूरच, पण त्याच्यातल्या ओझरत्या खाणाखुणाही लीलया आढळत नाहीत. कारण त्या आणखी कुणासारख्या नसतात. त्या असतात त्यांच्यासारख्याच!
त्यांच्या कथेतील पाश्र्वभूमीबद्दलही असेच म्हणावे लागते. ‘स्वामी’ कथेतील ध्यानमंदिर काय, ‘तळपट’मधील मल्लिकार्जुनाचा माळ काय अथवा ‘फुंका’मधील तळात मगरीच्या पाठीसारखे दिसणारे खडक असलेले तळे काय- त्यांची अनुभूती इतकी स्वस्त नाही.
महादेव गल्ली
राधीच्या महादेव गल्लीबद्दलही नेमके असेच म्हणावे लागते. गावासारखी गावे असतात, वाडय़ांसारख्या वाडय़ा असतात, शहरांसारखी शहरे असतात आणि गल्ल्यांसारख्या गल्ल्याही असतात! सुभाष रोड काय, किंवा सावरकर रोड काय, वा आणखी कुठला रोड काय! फक्त नावे वेगळी असतात. त्यांचा चेहरा असतो तो मात्र एकसारखाच! पण ‘महादेव गल्ली!’ ‘राधीमधली महादेव गल्ली’ ही राधीमधलीच महादेव गल्ली आहे. ती प्रत्यक्षात तर आहेच; पण तिच्यासारखी अन्यत्र कुठेही नसलेली, असण्याची सुतराम शक्यता नसलेली, अशी ती गल्ली आहे.
जीएंनी केलेले ‘महादेव गल्लीचे वर्णन’ किती फोटोग्राफिक आहे, याची कल्पना, ती गल्ली ज्यांनी पाहिली नाही अशा व्यक्तींना तर येणेच शक्य नाही; परंतु ती गल्ली पाहिलेल्या बेळगावकरांनाही येणार नाही. बेळगावमधील मारुती गल्लीच्या पश्चिम टोकावर, उत्तराभिमुख उभ्या असलेल्या ‘वृंदावन हॉटेल’च्या व दुरून एखाद्या नांगर टाकलेल्या जहाजासारख्या दिसणाऱ्या पाचमजली इमारतीच्या डाव्या बाजूला जे ‘बोळा’सारखे दिसते, तीच महादेव गल्ली होय. पाच-पन्नास वर्षांपूर्वी, किंवा त्याहीपूर्वी; आणि आजसुद्धा त्या गल्लीतून चौचाकी वाहन वा दुचाकी बैलगाडी जाऊ शकत नाही. शहापूर बेळगावच्या तद्दन भंगीबोळानेही मिशीला पीळ मारावा अशा या गल्लीचे आजचे जरी रूप पाहिले; तरी ती गल्ली पूर्वी किती आणि कशी अरुंद असावी, याची खाडकन कल्पना येते आणि जीएंच्या वर्णनातील प्रत्येक शब्दाशब्दातली यथार्थता पटते.
महादेव गल्ली ज्या कोपऱ्यावर वळते त्या पश्चिम टोकावर, गल्लीच्या मानाने मोठेच्या मोठे महादेवाचे एक देऊळ आहे. त्या देवळाचाही ‘राधी’त स्पष्टपणे उल्लेख आला आहे. या देवळाजवळच ती (गल्ली) उत्तरेकडे वळते व पुढे आडव्या गेलेल्या अनुसुरकर गल्लीला जाऊन भेटते. ती गल्ली जिथे वळते, त्या ठिकाणी ती पूर्वी इतकी अरुंद होती, की खुद्द तिलासुद्धा अंग चोरूनच जावे लागायचे. आज या कोपऱ्यावर लाईटचा खांब नाही. पण इ. स. १९५० पर्यंत या ठिकाणी म्युनिसिपालिटीचा डोक्यावर रॉकेलचा दिवा धारण करून उभा असणारा खांब होता!
महादेव गल्लीचा कोपरा
बेळगावच्या महादेव गल्लीतही असे अनेक वाडे होते आणि सुदैवाने आजही त्यांतील काही पाहावयास मिळतात. काही वाडय़ांनी आपले आर्ष रूप जसेच्या तसे जपून ठेवले आहे. तर काहींनी काळानुरूप बदल करवून घेतला आहे. उदाहरणार्थ मेहेंदळे वाडा, जोशी वाडा, दड्डीकरांचा वाडा, धोपेश्वरकर वाडा, बस्तवाडांचा वाडा, गाडगीळ वाडा वगैरे. ‘राधी’ कथेमध्ये वरीलपैकी बहुतेक सगळ्याच वाडय़ांचे उल्लेख, कमी-अधिक प्रमाणात आले आहेत. वाडय़ांचे उल्लेख आले आहेत आणि त्या वाडय़ांमध्ये राहणाऱ्या माणसांच्या आडनावांचेही उल्लेख आले आहेत.
पत्त्यांच्या खेळामध्ये प्रत्येक नव्या डावापूर्वी पिसल्या जाणाऱ्या पत्त्यांप्रमाणे एखाद्या परिसराची कथेसाठी निवड करताना जीएसुद्धा तो परिसर कसा पिसून काढतात, ते पाहणे खरोखर स्तिमित करणारे आहे. राधीच्या खोलीचे वर्णन करताना ते दोन गोष्टी सांगतात. पहिली गोष्ट म्हणजे, राधी महादेव गल्लीच्या एका टोकाला- पश्चिम टोकाला- राहत होती. दुसरी गोष्ट म्हणजे, ती ज्या खोलीत राहत होती तिच्या बाजूलाच गाडगीळांचा वाडा होता. कथेच्या शेवटी जेव्हा राधीला तिचेच कुत्रे चावल्यामुळे खूळ लागते व ती कुत्र्यासारखी कर्कश ओरडू लागते तेव्हा जीए आणखी एक वाक्य लिहितात, ‘तिच्या शेजारच्या ग्रामोपाध्ये मास्तरांनी तर कालच आपली मंडळी गावात पाठवून घर बंद केले होते.’
या साऱ्यांवरून एक चित्र स्पष्ट होते की, राधी महादेव गल्लीच्या पश्चिम टोकावर असलेल्या गाडगीळ वाडा आणि ग्रामोपाध्ये वाडा यांच्या मधल्या जागेत बांधलेल्या खोपसदृश खोलीत राहत होती.
परंतु वास्तवात गाडगीळ वाडा तेथे नाही. महादेव गल्लीत गाडगीळ वाडा आहे, पण तो गल्लीच्या पश्चिम टोकावर नसून गल्लीच्या बरोबर मध्यावर आहे. अचूक सांगावयाचे तर महादेव गल्ली जिथे वळते त्या कोपऱ्यापासून अंदाजे पन्नास-साठ पावलांवर पण पूर्वेकडे आहे. गंमत म्हणजे जीए ज्या ठिकाणी ग्रामोपाध्ये वाडय़ाचा उल्लेख करतात तो वाडा मात्र त्याच ठिकाणी आहे. त्यांच्या शेजारीही एक वाडा आहेच, पण तो गोडसे यांचा आहे.
महादेव गल्लीची मागची बाजू
जीएंनी असे का बरे केले असावे, याचे उत्तर देणे मात्र अवघड आहे. एक सहज मनात येते. त्यावेळी त्या गल्लीत, आणि एकंदरीत बेळगावमध्ये, गाडगीळांचा वाडा एक तालेवार वाडा होता. आजसुद्धा तोच वाडा अवघ्या महादेव गल्लीत आपल्या वैशिष्टय़पूर्ण चेहऱ्याने व खानदानी डौलाने उभा असलेला म्हणून उठून दिसतो. शिवाय त्या गाडगीळांचे रामलिंगखिंडीत स्वत:च्या मालकीचे ‘श्रीराधामुरलीधरा’चे एक देऊळही आहे. या साऱ्यांमुळे जीएंच्या मनावर त्या वाडय़ाचा प्रभाव पडला असावा.
महादेव गल्लीचे व त्या गल्लीच्या ‘एका टोकावर’ राहणाऱ्या राधीच्या खोलीचे असे वास्तवदर्शी वर्णन केल्यानंतर तोच धागा पकडून जीए आणखी दोन वाक्ये टाकतात. म्हणतात, ‘गल्ली जेथे थोडीशी वळते, तेथे मांजरडोळ्यांची शांती राहात असे. तेथेच कचऱ्याचे कुंड होते व म्युनिसिपालिटीचा रॉकेलचा दिवा होता.’ या वर्णनातील दिवा जर मालवून टाकला; तर हेही वर्णन आजसुद्धा किती जिवंत व चपखल आहे, याचीही कल्पना प्रत्यक्ष त्या ‘स्पॉट’ला गेल्याशिवाय कोणाला येणार नाही.
‘राधी’ कथेतल्या छोटय़ा कथानायकाच्या निवेदनातून गोपाळभटाच्या राधीच्या घराची, ते नेमके कुठे कसे होते याची, जशी कल्पना येते, तशी तो स्वत: राहात असलेल्या घराची येत नाही. त्याच्या ‘शेजारचे मेहेंदळे व त्यांच्यासमोरील जोशी यांच्या घरातील माणसांनी जर आळीपाळीने आपलं अंगण सारवून रांगोळी घालण्याचे ठरवून घेतले होते.’ किंवा ‘चार घरे सोडून राहत असलेला बाळू संध्याकाळी पायरीवर वाचत बसला, की मीही मोठय़ाने वाचत पायरीवर बसे.’ अथवा ‘आमच्या शेजारी रामभाऊ दड्डीकर राहत होते.’ वा ‘नंतर नंतर मी शाळा सुटल्यावर मागच्या गल्लीने येऊन परसातून घरात येऊ लागलो.’ तसेच ‘एकदा संध्याकाळी मी खिडकीत बसलो होतो, तेव्हा काळे रस्त्याने चाललेले मला दिसले.’ ‘त्या दिवशी कितीतरी दिवसात राधी आमच्या घरावरून गेली. तिला परशाच्या दुकानातून गूळ घ्यावयाचा होता. मी खिडकीत बसलो होतो. तेव्हा तिने मुद्दाम घराकडे पाहिले व ती माझ्याकडे पाहून हसली.’ यासारख्या उद्गारांच्या आधारानेच त्याच्या घराच्या चकबंदी निश्चित कराव्या लागतात. आणि त्या तशा केल्या, की त्याचे घर असे दिसू लागते : त्याचे घर उत्तराभिमुख असून उत्तरेकडे रस्ता, उजव्या बाजूला मेहेंदळेवाडा तर डाव्या बाजूला दड्डीकरवाडा किंवा उलटापालट आणि मागच्या बाजूला म्हणजे परसाकडे पूर्व- पश्चिम असा आणखी एक रस्ता.
हे झाले त्या कथेतल्या बालनायकाचे महादेव गल्लीतले कथेतले घर. पण त्याच्या घराच्या वास्तवातील खुणा शोधताना फारच कसरत करावी लागते. कारण प्रत्यक्षात पिवळा रंग दिलेल्या मेहेंदळेवाडय़ाच्या डाव्या बाजूला दर्शनी हिरव्या रंगाने रंगविलेला व रस्त्याकडे मोठी खिडकी असलेला दड्डीकर यांचा वाडा आहे तर उजव्या बाजूला, पूर्वेकडे देशपांडे यांचा वाडा आहे. मुख्य म्हणजे वरील तिन्ही वाडय़ांना रस्त्याकडच्या बाजूने खिडक्या आहेत. पण नेमक्या कोणत्या खिडकीत बसून कथानायक पुस्तक वाचीत होता, ते ठरविणे कठीण आहे. तथापि, आठ-दहा वर्षांच्या शाळकरी मुलाला खिडकीत बसून रस्त्याकडे पाहात बसण्याजोगी खिडकी म्हणजे दड्डीकर यांच्या वाडय़ाचीच खिडकी, असा तर्क करता येतो.

प्रश्नमंजूषा १० चे उत्तरे आणि विजेते जाणून घेण्याची उत्सुकता वाचकांच्या मनात आहे. पण ही उत्सुकता अजून पुढच्या आठवडय़ापर्यंत अशीच ताणलेली राहणार आहे. बाहेर पावसाचा पत्ता नसला तरी आमच्याकडे मात्र प्रवेशिकांचा पाऊस पडला. या प्रवेशिका तपासण्याचे काम अजून पूर्ण झालेले नाही, त्यामुळे प्रश्नमंजूषा १० ची उत्तरे आणि विजेते १२ जुलैच्या अंकात जाहीर करण्यात येतील.

कृतज्ञतापूर्वक गुरुपूजन

पौर्णिमा ही चंद्रकलेला पूर्णत्व आणून देणारी तिथी असल्याने ज्ञानाची परिपूर्णता व्यासमहर्षीच्या वाङ्मयातून झाली असल्याने आषाढशुद्ध पौर्णिमा ही तिथी व्यासपौर्णिमा म्हणून ओळखली जाते. आद्यगुरू व्यासांपासून ज्ञानदानाची परंपरा चालविणारे जे कुणी आहेत, त्या सर्वाचा समावेश ‘गुरुसंस्था’ या व्यापक-स्वरूपाशी निगडित केला गेला असून, आता गुरुपदवीस योग्य असलेल्या सर्वच क्षेत्रातील गुरूंपासून ते आत्मज्ञान प्राप्तीचे अध्यात्मज्ञान देणाऱ्या सद्गुरूंपर्यंत जे कुणी कार्यप्रवण आहेत, त्या सर्वाच्या कार्यकर्तृत्वाचे कृतज्ञतापूर्वक स्मरण करण्यासाठी गुरूगौरव, गुरुपूजन, गुरूवंदन केले जाते. येत्या मंगळवारी व्यासपौर्णिमा आहे, त्या निमित्ताने हा लेख.

व्यासोच्छिष्ट जगत्रय:
आषाढशुद्धपौर्णिमा तीच व्यासपौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. ज्ञानसागर असलेले सद्गुरू आपल्या शिष्याला उपदेश करून ज्ञानसंपन्न करतात. त्यांच्या या उपकाराचे कृतज्ञतापूर्वक स्मरण करण्यासाठी सर्वत्र गुरुपूजन केले जाते. व्यासमहर्षीनी केवळ वेदांचे व्यवस्थापन करून त्याचे चार भाग पाडले, ही गोष्ट खरी; पण तेवढेच त्यांचे कार्यकर्तृत्व नाही. ऋग्वेद, यजुर्वेद, अथर्ववेद आणि सामवेद अशा चार भागांत त्यांनी वेदांचे विभाजन करून अर्थभेदाच्या दृष्टीने सार्थव्यवस्थापन केले; पण याशिवाय त्यांनी महाभारत आणि भागवत हे दोन महान ग्रंथ लिहून जगातल्या सर्व अनुभवांचे ज्ञान मिळविले. म्हणूनच त्या संदर्भात ‘व्यासोच्छिष्ट जगत्रय:’ असे म्हटले जाते. महाभारत ग्रंथात व्यावहारिक जगातील सर्व प्रवृत्तींचा विशेष अनेकविध व्यक्तित्त्वांच्या चित्रणाने त्यांनी मांडला. सद्गुणांसह दुर्गुणांचाही परामर्ष घेतला. महाभारतातच कृष्णार्जुन-संवादरूपाने गीता सांगितली. त्यात कर्म, ज्ञान, भक्ती, उपासना याविषयीचे मार्गदर्शन केले. भागवत ग्रंथात विविध पौराणिक कथांचा समावेश करून भक्तिमाहात्म्य विशद केले. त्यामुळे आद्यगुरू म्हणूनच त्यांचा उल्लेख केला जातो. पौर्णिमा ही चंद्रकलेला पूर्णत्व आणून देणारी तिथी असल्याने ज्ञानाची परिपूर्णता व्यासमहर्षीच्या वाङ्मयातून झाली असल्याने आषाढशुद्ध पौर्णिमा ही तिथी व्यासपौर्णिमा म्हणून ओळखली जाते. आद्यगुरू व्यासांपासून ज्ञानदानाची परंपरा चालविणारे जे कुणी आहेत, त्या सर्वाचा समावेश ‘गुरुसंस्था’ या व्यापक-स्वरूपाशी निगडित केला गेला असून, आता गुरुपदवीस योग्य असलेल्या सर्वच क्षेत्रातील गुरूंपासून ते आत्मज्ञान प्राप्तीचे अध्यात्मज्ञान देणाऱ्या सद्गुरूंपर्यंत जे कुणी कार्यप्रवण आहेत, त्या सर्वाच्या कार्यकर्तृत्वाचे कृतज्ञतापूर्वक स्मरण करण्यासाठी गुरूगौरव, गुरुपूजन, गुरूवंदन केले जाते.
गुरुसाक्षात् परब्रह्म
गुरूसंस्थेचा प्रारंभ मानवी जीवनात त्याला जन्म देणाऱ्या आईपासून सुरू होतो. म्हणून ती पहिली- गुरुमाऊली आहे. मग शैक्षणिक क्षेत्रातले शिक्षक, तसेच राजकीय, सामाजिक, औद्योगिक याही क्षेत्रातले मार्गदर्शक हेही गुरू पदवीस योग्य ठरविले गेल्याने त्यांचेही स्मरणपूर्वक- पूजनवंदन केले जाते. त्यातही पारमार्थिक- हितोपदेश करून आत्मोद्धाराचा मार्ग दाखविणारे सद्गुरू हे सर्वाधिक- श्रेष्ठगुरू आहेत. कारण त्यांना ज्ञानदेव- तुकारामादी संतांनी देवतुल्य म्हणा, वा देवस्वरूप मानले आहे. ज्ञानदेव म्हणतात, ‘गुरुविण देव नाही दुजा। पाहता त्रलोकी।।’ तर तुकोबाराया सांगतात, ‘देव गुरुपाशी आहे। वारंवार सांगू काये?।। तुका म्हणे गुरू भजनी। देव भेटे जनीवनी।।’ नामदेव महाराज कीर्तन भक्तीतून ‘आत्मज्ञानाचा दीप जगात प्रज्वलित करू,’ असे सांगतात. नाथरायांनी सद्गुरूंना देह नौकेचे कर्णधार’ असे म्हटले आहे. गुरुचरित्रात ‘सद्गुरू हा परब्रह्मस्वरूप’ मानला गेला आहे, तर गुरूलिलामृत ग्रंथात ‘गुरुविण ज्ञान व्यर्थची असे’ म्हटले गेले आहे. समर्थ रामदासस्वामी यांनी ‘सद्गुरुविण जन्म निर्फळ’ असे म्हटले आहे. तात्पर्य हेच, की गुरू-सद्गुरू हे ज्ञानदाते-मोक्षदाते आहेत. आपले अज्ञान दूर करून ते ज्ञान देतात. अंधकारात प्रकाशाची वाट दाखवितात. दु:ख- संकटप्रसंगी आपल्या कृपाशक्तीने ते शिष्याला आधार देतात. ती शेवटची- गुरुमाऊली आहे. ती देहाने असताना तर मार्गदर्शन करतेच. पण देहाने नसतानाही समाधिस्थानी बसून अधिकारपरत्वे दर्शन देऊन मार्गदर्शन करते. म्हणूनच व्यासपौर्णिमेला म्हणजेच गुरुपौर्णिमेला कृतज्ञतापूर्वक स्मरण करून गुरूस वंदन केले जाते. ब्रह्मा, विष्णू, महेश यांनाही मार्गदर्शन करणारे, ‘गुरुसाक्षात परब्रह्म’ असून, ‘तस्मै श्री गुरुवे नम:’ असेही म्हटले जाते. म्हणूनच गुरुवाक्य हे सर्वत्र प्रमाण म्हणून मानले जाते. गुरूही त्रिकालीच नव्हे, तर सर्व काळी मार्गदर्शन करणारी ‘कृपाशक्ती’ आहे. तिलाच ‘गुरूतत्त्व’ म्हणतात.
कृतज्ञतेच्या ‘पाच कथा’
सद्गुरूंविषयीची महानता आणि त्यामुळेच त्यांच्याविषयी वाटणारी कृतज्ञता सांगणाऱ्या पाच कथा उदाहरणादाखल देता येतील. त्यात शिष्याची गुरूभक्तीही प्रकटलेली आहे. (१) नाथांनी एकनाथी-भागवत ग्रंथात दत्तात्रेयाने केलेल्या चोवीस गुरूंचा उल्लेख केला आहे. त्यात एकाग्रता हा गुण आपण लोहाराकडून घेतला असे ते सांगतात. राजाची मिरवणूक जात असताना ती कोणत्या रस्त्याने गेली? असे विचारता तो लोहार म्हणतो, की मला ते ठाऊक नाही. कारण माझे सर्व लक्ष माझ्या कामाशीच लागून राहिले होते. ज्ञानसाधनेत इतकी एकाग्रता असणे आवश्यक आहे. (२) धौम्य ऋषीचा अरुणी नावाचा एक शिष्य शेतातल्या बांधावरून पाणी पाहू लागले, म्हणून ते अडविण्यासाठी स्वत:च रात्रभर तिथे बांधावर आडवा झोपून राहिला. ‘पाणी अडव’ अशी गुर्वाज्ञा होती. इतका आज्ञाधारकपणा असायला हवा. (३) द्रोणाचार्य हे कौरव-पांडवांचे शस्त्रविद्या शिकविणारे गुरू होते. त्यांनी एकलव्यास धनुर्विद्या देण्यास नकार दिला तेव्हा एकलव्याने अपार श्रद्धेने द्रोणाचार्याचा पुतळा करून घेऊन आपले शिक्षण पूर्ण केले. गुरुनिष्ठा आणि प्रयत्न यांच्या बळावर तो इतका निष्णात झाला, की भुंकणाऱ्या कुत्र्याच्या तोंडात सात बाण मारून त्याने त्याचे भुंकणे बंद केले; पण कुत्र्याच्या तोंडाला जखम होऊ दिली नाही. ते पाहून द्रोणाचार्य आश्चर्यचकित झाले. पुढे त्यांनी एकलव्याचा अंगठा कापून घेतला हा त्यांचा कृतघ्नपणा आहे; पण एकलव्याने अंगठाही कापून देऊन गुरुदक्षिणा दिली, केवढी ही गुरूभक्ती आहे. त्याने गुरुपूजनच केले. (४) अवतारी पुरुष म्हटल्या गेलेल्या श्रीकृष्णाने सांदिपनी गुरूंच्या आश्रमात रानात जाऊन सरपण आणले आणि गुरुसेवा केली. सेवाधर्म जागवून गुरूंविषयीची कृतज्ञता व्यक्त केली. (५) जनार्दनस्वामी हे नाथांचे सद्गुरू होत. त्यांनी हिशेबात एका पैची झालेली चूक रात्रभर जागून शोधून काढली. चिकाटीपणा हा त्यांचा गुणधर्म होता. पुढे हेच जगन्नाथस्वामी त्यांचे मोक्षगुरूही झाले. नाथांनी आपल्या अभंगात ‘एका जनार्दन’ ही मुद्रा घेऊन त्यांच्याविषयीची कृतज्ञता व्यक्त केली आहे. या सर्व कथांतून गुरू-शिष्य परंपरा आणि शिष्यांनी गुरूंचे केलेले कृतज्ञतापूर्वक स्मरण-पूजनही केले, हे पाहायला मिळते. प्रत्येकाच्या जीवनात असे अनेक प्रसंग घडून येऊन गुरुस्मरण जागे राहिले आहे.
‘धर्म’ सोडू नका!
व्यासांच्या चरित्र व कार्याचे फार थोडेच संदर्भ उपलब्ध आहेत. व्यासांच्या वडिलांचे नाव पराशर आणि आईचे नाव सत्यवती. यमुना नदीच्या एका द्विपावर त्यांचा जन्म झाला. म्हणून त्यांना द्वैपायन असेही म्हणतात. कोठे कोठे त्यांचा उल्लेख कृष्णद्वैपायन असा केला गेला आहे. कारण ते रंगाने काळे होते. बादराश्रमात त्यांनी तपश्चर्या केली म्हणून त्यांना बादरायण या नावानेही संबोधिले गेले आहे. शुकमुनी हा त्यांचा पुत्र होय. महाभारतात सत्यवतीच्या सांगण्यावरून त्याने अंबिका आणि अंबालिका या तिच्या विधवा-सुनांशी समागम केला आणि त्यातून धृतराष्ट्र, पंडु, विदुर ही मुले जन्माला आली. व्यासमहर्षी हे फार मोठे तपस्वी होते. ब्रह्मदेवाजवळ त्यांनी अध्ययन केले आहे. व्यासांना दीर्घायुष्य असावे किंवा व्यास ही सद्गुरूंची पदवी असावी, असेही म्हणायला अनुमान आहे. कारण महाभारताचे रचयिते तेच आहेत. महाभारत काळातही ते वावरले आहेत. त्यांनी अठरा-पुराणेही लिहिली आहेत. ब्रह्मसूत्रे लिहिली. म्हणूनच ते जगत्वंद्य- सद्गुरू मानले गेले आहेत. त्यांनी केलेला उपदेश सर्वाधिक महत्त्वाचा आहे. महाभारताच्या शेवटी लिहिलेल्या श्लोकात ते म्हणतात, ‘काम, भय, किंवा लोभ यापैकी कोणत्याही कारणासाठी मानवाने धर्माचा त्याग करू नये. कारण धर्म हा नित्य, शाश्वत असून सुख-दु:खे ही अनित्य आहेत. ती प्रसंगोद्भव असतात. अनुकूल वा प्रतिकूल परिस्थितीतही आपण आपल्या धर्माचेच पालन केले पाहिजे. जीव म्हणजेच आत्मा हाही नित्य असून, जन्म-मरण मात्र अनित्य आहे. त्याचा काळ वा त्याची वेळ ही अनिश्चित आहे; पण जन्म आणि मृत्यू या दोन टोकांच्या अवकाशात असलेल्या कालावधीत मानवाने धर्माचरण करावे. तेच जीवनाचे शाश्वत-सत्य आहे.’ परोपकार हेच पुण्य आणि परपिडा हेच पाप होय, अशीही पाप-पुण्याची सुटसुटीत आणि सोपी व्याख्या त्यांनी केली आहे. आपल्या सर्व ग्रंथातून त्यांनी जीवनधर्मच शिकविला आहे. हेच त्यांचे जगावर फार मोठे उपकार आहेत. म्हणून व्यासपूजा केली जाते. गुरुपूजन करून आणि गुरुवंदन करून आपण परात्परगुरू असलेल्या व्यासांनाच अभिवादन करीत आहोत.
प्रा. डॉ. नरेंद्र कुंटे