Leading International Marathi News Daily
रविवार, ५ जुलै २००९

दोस्तांनो, पावसाळा सुरू झाला, की बहिणाबाईंच्या कवितेत वर्णन केल्याप्रमाणे सुंदर दृष्य दिसायला लागतं. जमिनीत दडलेल्या बियांना कोंब फुटतात, फांद्यांवर नवी पालवी येते; तर काही झाडांना फुलं येतात. बहिणाबाईंनी त्यांच्या काव्यात बघा कसं छान वर्णन केलंय. या कवितेचा अर्थ तुमच्या आई-बाबांकडून नक्की समजून घ्या-
धरतीच्या कुशीमधी। बी-बियाणं निजली।
वर पसरली माती। जशी शाल पांघरली।।
बिय टरारे भुईत। सर्व कोंब आले वऱ्हे।
बहरले शेत जसं अंगावरती शहारे।।
आता नुकताच पावसाळा सुरू झालाय. काही वनस्पती पावसाळ्याच्या सुरुवातीला मस्त फुलतात. आपण पावसाळ्यात फुलणाऱ्या लिलींची ओळख करून घेऊया.
लिलीच्या एकूण ११० जाती आहेत. त्यापैकी काही जाती तर आपल्या रोजच्या ओळखीच्या. काय, बुचकळ्यात पडलात ना? अहो, आपल्या रोजच्या जेवणात वापरतो तो कांदा आणि लसूण हे तर लिलीचेच प्रकार आहेत. कांद्याला दोन वर्षांनी फुलं येतात. त्यापूर्वीच आपण कांदा खाऊन फस्त करतो, म्हणून कांद्याची फुलं कधी बघितली नसतील. आणि आपल्या भारताचं राष्ट्रीय फूल म्हणजे कमळ, तेही एक प्रकारची लिली बरं का.
लिलीचा आणखी एक प्रकार म्हणजे कळलावी, वाघनखं, हळदीकुंकू या नावाने ओळखलं जाणारं लाल-पिवळं सुंदर फूल. गणपतीच्या आदल्या दिवशी घरी हरितालिकेची पूजा करतात ना, त्यासाठी याची फुलं आणि पत्री वापरतात. म्हणजे बघा, लिलीची फुलं तुम्हाला अगदीच अनोळखी नाहीत तर.
 


पावसाळ्यामध्ये जंगलात, बागांमध्ये, शेतात, एवढंच काय तर मुंबई-पुण्यासारख्या गजबजलेल्या शहरातसुद्धा लिलीच्या बऱ्याच जाती बघायला मिळतात. मग त्यापूर्वी ही झाडं कुठे दडलेली असतात बरं? यांचे कांद्यासारखे कंद जमिनीखाली सुप्त अवस्थेमध्ये असतात. पहिला पाऊस पडल्यावर त्याची मुळं भराभर वाढतात. कंदाच्या मधला भाग पानांमध्ये रुपांतरित होतो. त्यामधूनच एक दांडा बाहेर निघतो, त्याला फुलं येतात.
साऊथ इंडियन स्क्विल लिलीची छोटुकली निळी-जांभळी फुलं गुच्छाने येतात. सफेद मुसळी क्रायनम लिली, स्क्विल लिली यांचा फुलोरा सात दिवसांतच संपतो. मग ती फुलं कितीही आवडली तरी त्यांच्या दर्शनासाठी पुढच्या पावसाळ्यापर्यंत वाट बघावी लागते. सफेद मुसळीच्या पानांची तर भाजी करून खातातही.
लिलींना सुंदर सुवासही असतो. लिलीच्या अनेक जातींमध्ये औषधी गुण आहेत. त्यापैकी एक बहुगुणी लिली म्हणजे शतावरी. याचे अनेक औषधी उपयोग आहेत. कमळ, कळलावी, सफेद मुसळी, क्रायनम लिली या जातींमध्येही काही औषधी गुण आहेत. क्रायनम लिलीच्या झाडावरून साप फिरकत नाहीत.
मात्र लिलीच्या काही जातींना नष्ट होण्याचा धोका आहे. सिरॉय लिली हे मणिपूर राज्याचे राज्यफूल. ते फक्त सिरॉय डोंगरावरच आढळते. ते हळूहळू नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. वुडरोज क्रायनम लिली ही जात जवळजवळ नाश पावली होती. पण २००४ साली अचानक महाबळेश्वरला ती सापडली.
फुलांच्या हारांमध्ये असलेली पांढरी फुलं म्हणजे स्पायडर लिली. दलदलीच्या जागी ती वाढते. पण हार तयार करणे व सजावटीसाठी त्यांचा अतिवापर होत असल्यामुळे त्यांचीही संख्या हळूहळू कमी होते आहे.
पावसाळ्याव्यतिरिक्त इतर ऋतूंमध्येही काही जातींच्या लिलींना फुलं येतात. लिलीच्या बहुतेक जातींची लागवड करणे सोपे असते. बागेमध्ये घरातल्या कुंडय़ांमध्ये लिलींची लागवड सहज करता येते. पाण्याचा निचरा होणारी माती व भरपूर हवा लिलींना आवश्यक असते. लिलीचा कंद लावून त्याची थोडीशी काळजी घेतली तरी पुरते.
कमळफुलं लाल, जांभळी, पांढरी या रंगांमध्ये आढळतात. पांढरं कमळ हे श्रीलंका या देशाचं राष्ट्रीय फूल आणि आंध्र प्रदेश या राज्याचं राज्यफूल आहे.
दोस्तांनो, आता लिलींच्या काही जातींशी तुमची ओळख झाली आहे. आपल्या सभोवती, बागेत, रानावनात फुललेला लिलींचा फुलोरा अवश्य बघा. जमल्यास या महिनभरात मुद्दाम जवळच्या रानात फेरफटका मारा आणि या लिलींना भेटा.
मोक्षदा नूलकर

शनिवार आला की आमच्या शेजारी राहणाऱ्या अस्मीला उत्साहाचं भरतं येतं. अर्धा दिवस शाळा नि उद्या सुटी हे त्यांच्या आनंदाचं पहिलं कारण असलं तरी ते एकमेव कारण नसतं. आई अस्मीला भाजी बाजारात घेऊन जाते, हे त्यामागील खरं रहस्य असतं. रंगीबेरंगी कपडे घातलेली मुले-मुली, वेगवेगळ्या प्रकारची माणसं म्हणजेच भाजीवाले, फळवाले, मिठाईचे दुकानदार, फुगेवाले यांच्या दुनियेत अस्मीला त्या निमित्ताने शिरायला मिळते. म्हणूनच की काय, कोणास ठाऊक आईच्या पिशव्या घेऊन चालताना तिला ओझं होत नाही. पुढे आई आणि मागे अस्मी अशी त्यांची वरात निघते. दोघी बरोबर निघालेल्या असल्या तरी अस्मी मागे रेंगाळणार, हे ठरलेलंच होतं. हातातील पिशवी आणि त्यातील भाजी हे केवळ निमित्त होतं. जग न्याहाळायचं, ते डोळ्यांत भरून घ्यायचं आणि त्यांच्या कथा मित्र-मैत्रिणींना सांगायच्या हे सारं तिला खूप आवडायचं. आईला राग आला तरी अस्मीची मदत आईला हवीच असायची.
एके दिवशी आईने दोन किलो मटार म्हणजेच वाटाण्याच्या शेंगा घेतल्या. त्या शेंगांनीच पिशवी काठोकाठ भरली. त्यामुळे दुसरी कोणतीही भाजी विकत न घेता त्या दोघी घरी परत आल्या. दुपारचं जेवण झाल्यावर अस्मीने जराशी झोप काढली. संध्याकाळी पाचच्या सुमारास मित्र-मैत्रिणी तिच्या घरी आल्या. सगळ्यांना खेळायचा मूड होता. त्यामुळे सारेजण खेळायला बाहेर पडले. त्यांचे खेळणं सुरू होतं न् होतं तोच धुळीचा लोट उठला. ढगांचा गडगडाट ऐकू आला आणि जोरदार पाऊस सुरू झला. क्षणार्धात पावसाची जोरदार सर आली आणि त्यांच्या खेळावर पाणी फिरलं.
अस्मीच्या आईनं सगळ्यांना घरात घेतलं. त्यांच्यासाठी टीव्ही चालू केला. सगळ्यांना खेळायचं होतं, पण पावसामुळे त्यांच्यावर घरी बसण्याची वेळ आली. मुलांना टीव्हीवर सुरू असणाऱ्या कार्यक्रमात फारसा रस नव्हता, पण त्यांच्यापुढे दुसरा पर्याय नव्हता, कारण बाहेर पावसाची रिपरिप सुरू होती. तेवढय़ात वीज गेली आणि टीव्हीवरचे कार्यक्रमही गायब झाले.
‘आपण गाण्याच्या भेंडय़ा खेळूया,’ आर्यानं सुचवलं.
‘भेंडय़ा खेळूया, पण गाण्याच्या नको,’ सौरभने पुस्ती जोडली.
‘मग कशाच्या? तू सांग,’ आर्यानं सौम्य भाषेत विचारलं.
‘आपण कविता म्हणूया,’ गौरवला गाण्यात रस होता.
कोणता खेळ खेळायचा, हे ठरत नव्हतं. तेवढय़ात अरिहंत आला आणि म्हणाला, ‘आपण जोक सांगूयात.’
‘का करूया?’ आगाऊ सौरभचा प्रश्न.
‘ ए गप रे, सौरभ,’ आर्याताईचा आदेश.
अस्मीची आई हे सगळं ऐकत होती. वाटाण्याची पिशवी घेऊन ती बाहेर आली आणि म्हणाली, ‘गोल करून बसा आणि या वाटाण्याच्या शेंगा सोला बरं.’ तिने भरलेली पिशवी त्यांच्यासमोर ओतली. अस्मी आणि सौरभला ते नको होतं. आर्या आणि गौरव मात्र आईने सांगितलेलं ऐकायला हवं, या मताची होती. अरिहंत आपला लिंबू-टिंबू होता.
एकेक शेंग सोलत त्यांनी एका भांडय़ात वाटाणा गोळा केला आणि दुसरीकडे फोलपट टाकायला सुरुवात केली. अध्र्या तासात वाटाण्याच्या साऱ्या शेंगा सोलून पूर्ण झाल्या.
‘वाटाणा एके ठिकाणी आणि फोलपट मात्र दुसरीकडे भिरकावलं. असं का झालं माहीत आहे का?’ गौरवने विचारलं.
‘कारण शेंगा सोलायला चौघे होते,’ सौरभने खोडकरपणे उत्तर दिलं.
‘चौघांनी दाणे एकाच भांडय़ात ओतले. शेंगांची फोलपटं मात्र इतस्तत: भिरकावली, असं का?’ गौरवचा प्रश्न आर्याने स्पष्ट करून सांगितला.
‘वाटाणा महत्त्वाचा. फोलपटाला कोण विचारतो?’ अस्मीने तिच्या भाषेत उत्तर दिले.
‘मी देखील हेच सांगत होतो..’ गौरवने सांगितले.
‘काय?’ डोळे विस्फारून सौरभनं विचारलं.
‘महत्त्वाचं असेल ते आपण सांभाळून ठेवतो. महत्त्वाचं नसेल तर आपण फेकून देतो. असंच ना रे गौरव?’ आर्याला आईने सांगितलेलं आठवलं.
‘बरोबर,’ गौरव ओरडला.
‘आपण महत्त्वाचे बनूया- वाटाण्यासारखे-’ अस्मीने सगळ्यांना सल्ला सांगितला.
‘फोलपटासारखे नको,’ सौरव ओरडला.
स्वयंपाकघरातून अस्मीची आई सगळे ऐकत होती. तिला खूप आनंद झाला. मुलांची समज पाहून तिला मुलांचं कौतुक वाटलं.
आता फोलपटं पिशवीत भरा, आईने मुलांना सांगितलं.
सगळ्यांनी मिळून फोलपटं गोळा केली. ज्या पिशवीतून शेंगा ओतल्या होत्या, त्याच पिशवीत त्यांनी फोलपट भरायला सुरुवात केली. अर्धी फोलपटं भरून झाली नाही, तोवरच पिशवी पूर्ण भरली.
‘हे काय, फोलपट आणि वाटाणे दोन्ही पिशवीत बसले. वाटाणे निघून गेले. खरं तर सर्व फोलपट भरून झालं तरी पिशवीत जागा उरली पाहिजे.’ गौरवने शंका उपस्थित केली.
‘वाटाणे आणि फोलपट एकत्र असतात तेव्हा त्यांना कमी जागासुद्धा पुरते. ते अलग होताच त्यांना जादा जागा लागते,’ सौरभने खुलासा केला.
‘आपण शेंगा बनूया. एकत्र राहू या,’ आर्याने सल्ला दिला. सगळ्यांनी माना डोलवल्या.
आईने सगळ्यांना खाऊ दिला. खाऊ खाल्ल्यानंतर सारी मुलं आपापल्या घरी गेले. ते आज नवं काहीतरी शिकले होते.
डॉ. आर. एस. जैन

ही देखणी कार्डस् बनविण्यासाठी तुम्हाला जुन्या मासिकातील एकाच आकारात कापलेली तीन चित्रे, पातळ कार्डबोर्ड, कात्री, पेन्सिल, पट्टी आणि डिंक लागेल.
१. चित्रे कापा आणि त्यांना १,२, ३ असे क्रमांक द्या.
२. पातळसा कार्डबोर्ड तिन्ही चित्रांच्या उंचीएवढा आणि तिघांच्या मिळून होणाऱ्या रुंदीएवढा कापा.
३. कार्डबोर्डावर १ सें.मी.चे रकाने बनवा. रकान्यांना चित्रात दाखविल्याप्रमाणे क्रमांक द्या आणि त्याला घडय़ा घाला.
४. प्रत्येक चित्रावर एक सें.मी.चे रकाने काढा आणि त्याच्या पट्टय़ा कापा.
५. कार्डबोर्डवर काढलेल्या पहिल्या क्रमांकाच्या रकान्यावर पहिल्या चित्राच्या पट्टय़ा चिकटवा.
६. दोन व तीन चित्रांच्या पट्टय़ाही अशाच प्रकारे त्या त्या रकान्यावर चिकटवा.
७. कार्डबोर्ड उभा धरा आणि तुम्हांला डाव्या, उजव्या आणि समोरच्या बाजूने तीन वेगवेगळी चित्रे दिसतील.
डॉ.अरविंद गुप्ता, आयुका.

साहित्य- सोसायटीच्या आवारातील झाडा-झुडपांच्या जमा केलेल्या वाळलेल्या काडय़ा, बुरशी, लाकडी तुकडे इत्यादी. अ‍ॅक्रिलिक रंग (लाल, काळा, सोनेरी), फेव्हिकॉल अथवा लाकूड चिकटवणारा गोंद, ब्रश, वॉर्निश.
कृती- जंगलसफारीत फिरताना किंवा तुमच्या आसपास फेरफटका मारताना तुम्ही वाळलेल्या काटक्या जमा करू शकता. या सर्व नैसर्गिक कचऱ्याचे तुम्ही सुंदर शोपीस बनवता येते. आपल्या मित्र-मैत्रिणींना भेट द्यायला तसेच घराच्या भिंती सजवायला या सर्व सामानाचा वापर करता येईल. माडाच्या झाडाचे तुरे मिळाले तर फारच छान. किंवा मिळालेल्या फांद्या आणि बुरशीची फुलं आलेल्या चार काडय़ा घेऊनही तुम्ही कलात्मक रचना करू शकता. या रचना तुम्हाला आवडतील तशा प्रकारे चिकटवा आणि दिवसभर वाळू द्या. त्या पूर्णपणे वाळल्यानंतर त्यावर अ‍ॅक्रिलिक रंगांनी रंगकाम करावे आणि पूर्णपणे वाळल्यावर त्यावर ब्रशने वॉर्निश लावा. त्यामुळे लावलेला रंग पक्का होईल आणि शोपीस उठावदार दिसेल.
अर्चना जोशी
vinarch68@gmail.com