Leading International Marathi News Daily
रविवार, ५ जुलै २००९

कोणत्याही दोन खेळाडूंमध्ये तुलना करणे तसे कठीणच असते. शेवटी प्रत्येकाच्या खेळात, गुणवत्तेत फरक हा असतोच. काहीवेळेला एखाद्या खेळाडूला मिळणाऱ्या प्रसिद्धीमुळेही त्याला वरचा क्रमांक दिला जातो. तेव्हा अशी तुलना करायची झाल्यास त्यांच्या प्रत्यक्ष कामगिरीच्या जोरावरच त्यांचे श्रेष्ठत्व सिद्ध होऊ शकते. या आधारे सायनाचे पारडे नक्कीच सानियापेक्षा कुठेतरी जड असल्यासारखे वाटते.
सानिया मिर्झा आणि सायना नेहवाल या दोघींच्या नावातील अक्षरांत साम्य असल्याने त्यांचा उल्लेख करताना अनेकांचा
गोंधळ उडतो. त्यात दोघीही हैदराबादच्या म्हणजे तेथेही साम्यस्थळ आहेच. आता लोकप्रियतेचे बोलाल तर त्यातही
दोघी सारख्याच आघाडीवर. या पाश्र्वभूमीवर दोघींमध्ये तुलना करू लागलो आणि आघाडीवर कोण असा प्रश्न
उपस्थित केला गेला तर पटकन उत्तर देणे कठीण होईल. मात्र भारताचे माजी बॅडमिंटनपटू व सर्वप्रथम ऑल इंग्लंड
बॅडिमटन स्पर्धा जिंकणारे प्रकाश पदुकोण त्यासाठी फार वेळ घेत नाहीत. सायना हीच अव्वल आहे, असे
खात्रीपूर्वक ते सांगतात. खरे तर कोणत्याही दोन खेळाडूंमध्ये तुलना करणे तसे कठीणच असते. शेवटी प्रत्येकाच्या खेळात,
गुणवत्तेत फरक हा असतोच. काहीवेळेला एखाद्या खेळाडूला मिळणाऱ्या प्रसिद्धीमुळेही त्याला वरचा क्रमांक दिला जातो. तेव्हा अशी तुलना करायची झाल्यास त्यांच्या प्रत्यक्ष कामगिरीच्या जोरावरच त्यांचे श्रेष्ठत्व सिद्ध होऊ शकते. या आधारे सायनाचे पारडे नक्कीच सानियापेक्षा कुठेतरी जड असल्यासारखे वाटते.
 


पदुकोण यांनी सायनाच अव्वल असल्याचे म्हटल्यानंतर एक बॅडमिंटनपटू म्हणून ते सायनाला झुकते माप देत आहेत, असे वाटू शकेल. पण पदुकोण यांनी केलेले हे विश्लेषण बऱ्याचअंशी योग्य आणि संतुलित आहे. अर्थात, त्यांच्या या बोलण्यातून सानिया व सायना यांच्यातील एकीला श्रेष्ठ ठरविताना दुसरीला कनिष्ठ दर्जाची ठरविण्याचा हेतू दिसत नाही. सायनाचीही दखल प्रसारमाध्यमांनी घ्यायला हवी. तिच्याकडेही आंतरराष्ट्रीय स्तरावर पहिल्या क्रमांकापर्यंत पोहोचण्याची क्षमता आहे, हे पटवून देण्यासाठी त्यांनी ही धडपड केली आहे. तरीही या दोघींचा विचार करताना सायनाला झुकते माप द्यावेसे वाटते. या मागचे कारण विचाराल तर आंतरराष्ट्रीय स्तरावर सानियाने टेनिसमध्ये आपली जी प्रतिमा निर्माण केली आहे, ती तिच्या कामगिरीनेच तयार केली आहे हे सत्य नाकारून चालणार नाही. मात्र तिच्या या यशात तिच्या राहणीमानाचा, वावरण्याचा, प्रसारमाध्यमांचे लक्ष स्वत:कडे वेधून घेण्याच्या तिच्या कौशल्याचाही तेवढाच वाटा आहे. त्यामुळेच सानिया मिर्झा क्रिकेट पाहायला गेली, जाहिरातीच्या शूटिंगसाठी गेली की तिच्या मागे छायाचित्रकारांचा, दूरचित्रवाणी वाहिन्यांच्या कॅमेऱ्यांचा जथ्था असणे स्वाभाविक आहे. सायना मात्र अजूनही अशा प्रसिद्धीपासून दूर आहे. मुळात तिला ‘ग्लॅमगर्ल’ म्हणून अशी उपाधी कुणी दिलेली नाही, जी सानियाला केव्हाच मिळालेली आहे. अर्थात, ही उपाधी मिळाल्यामुळे कुणी मोठे होत नाही, हेही तेवढेच खरे आहे. किंबहुना, अनेकवेळा अशा झगमगाटी प्रसिद्धीमुळे खेळाडूचे लक्ष विचलित होण्याचाच धोका असतो. सानियाच्या घसरत्या कामगिरीला बऱ्याचअंशी ही अशी प्रसिद्धीच मारक ठरली आहे, हे नाकारता येणार नाही. विविध कारणांमुळे का असेना ती चर्चेत किंवा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. अशा गोष्टी खेळाडूच्या कारकीर्दीला त्रासदायकच असतात. खेळाडूंनी अशा गोष्टींपासून दूर राहणेच आवश्यक असते. सातत्याने वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या खेळाडूंच्या कारकीर्दीची काय गत होते, हे पटवून देण्यासाठी अनेक उदाहरणे देता येतील. प्रसिद्धी, सातत्याने नाव चर्चेत राहावे यासाठी अनेक खेळाडू ‘काळजी’ घेत असतात. पण तेच त्यांना भविष्यात महागात पडते. पण या फंदात न पडता आपल्या कामगिरीवर लक्ष केंद्रित करणारे
खेळाडू, त्यासाठी मेहनत घेणारे खेळाडू भविष्यात यशस्वी होतात. अधिक काळ कारकीर्द गाजवितात. दुर्दैवाने सानियाच्या कारकीर्दीत वादविवादांचे मोहोळ बऱ्याचवेळा उठले. कधी तिच्या पेहरावावरून तर कधी खेळापेक्षा ग्लॅमरकडे लक्ष असल्याच्या आरोपामुळे ती अडचणीत आली. यात सर्वस्वी तिची चूक नसली तरी ती अजिबात दोषी नव्हती असेही नाही. टेनिसवरील तिचे लक्ष विचलित होण्याचे कारण हेच आहे. त्याचाच परिणाम तिच्या कामगिरीवर झाला. सायनाच्या बाबतीत पाहायचे झाले तर अजूनही सायना वयाने लहान आहे. पण या वयातही ती आंतरराष्ट्रीय स्तरावर नावारूपाला आली आहे. असे असतानाही तिला अजून ग्लॅमरचा स्पर्श झालेला नाही. स्वत: ती देखील या ग्लॅमरपेक्षा खेळावर लक्ष केंद्रित करण्यास अधिक प्राधान्य देते, असे पाहावयास मिळते. तिने घेतलेल्या या मेहनतीमुळेच ती आज पहिल्या १० खेळाडूंमध्ये स्थान मिळवू शकली आहे. उद्या ती पहिल्या पाच खेळाडूंत येण्याचे स्वप्न पाहात आहे. बॅडमिंटनसारख्या खेळात भारतीय महिलांना एवढे यश कधीच मिळाले नव्हते. सायनामुळे आज भारतीय बॅडमिंटनला एक तजेला, एक आत्मविश्वास प्राप्त झाला आहे. सानियानेही सुरुवातीच्या काळात भारतीय टेनिसला ते दिवस दाखविले होते. पण कालांतराने फिटनेसची समस्या, ग्लॅमरचे वलय यामुळे खेळावरील तिची पकड सैल पडत गेली. बॅडिमटन हा खेळ मात्र अजूनही ग्लॅमरच्या विळख्यात सापडलेला नाही. कदाचित भविष्यात ती स्थिती उद्भवेलही. त्यासाठी सायनासारख्या खेळाडूंनी सावध राहायला हवे. तिचे प्रशिक्षक असलेले गोपीचंद यांनी त्यांच्या उमेदीच्या काळात एका शीतपेयाची जाहिरात करण्यास नकार दिला होता. असा
आदर्श सायनाने बाळगायला हवा. ग्लॅमरच्या वातावरणात वावरण्याचे क्षण येतीलही, पण त्याला एक मर्यादा आहे, हे पूर्ण ध्यानात ठेवायला हवे. स्वत:चा खेळ, त्यासाठी घ्यायची मेहनत, कारकीर्दीतील ध्येय याला पर्याय नाही, याची खूणगाठ बांधली की सायनाला पहिल्या क्रमांकावर पोहोचायला वेळ लागणार नाही.
महेश विचारे

आशेचा सुवर्णकिरण

भारताच्या सुशीलकुमार, राहुल आवारे यांनी जर्मनीतील कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदके पटकाविली. भारतीय कुस्तीगीरांना परदेशात खेळण्याची संधी आता उपलब्ध होत आहे. त्यामुळे खेळाडूंचा आत्मविश्वास उंचावत असल्याचेच सुशील व राहुलच्या कामगिरीतून दिसून येते.
आलिम्पिक क्रीडा स्पर्धेतील वैयक्तिक क्रीडा प्रकारात भारतास अधिकृतरीत्या पहिले पदक मिळवून देणारे कुस्तिगीर खाशाबा जाधव यांचा कित्ता सुशीलकुमारने बीजिंग ऑलिम्पिकमध्ये गिरविला. आता लंडन ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदकांची लयलूट करायची हाच ध्यास ठेवीत भारतीय कुस्ती संघटकांनी त्यादृष्टीने तयारी सुरू केली आहे. बीजिंगमध्ये सुशीलने मिळविलेल्या यशामुळे कुस्ती क्षेत्राने उभारी घेतली आहे. जर्मनीत झालेल्या स्पर्धेतही त्याने सुवर्णपदक जिंकून टीकाकारांना चोख उत्तर दिले. भारतीय मल्ल ऑलिंम्पिकसारख्या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत पदक मिळवू शकतात हे पुन्हा सिद्ध झाले आहे. आता केवळ ब्राँझपदकावर समाधान न मानता सुवर्णपदकविजेते मल्ल घडावेत या दृष्टीने चांगले गुणवान मल्ल हेरून त्यांना परदेशातील प्रशिक्षण शिबिरे व स्पर्धामध्ये भाग घेण्याची संधी देण्यास सुरुवात झाली आहे. भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष जी. एस. मंडेर, सरचिटणीस कर्तारसिंग, महाराष्ट्र कुस्ती परिषदेचे सरचिटणीस बाळासाहेब लांडगे यांच्याबरोबर या विषयासंदर्भात सविस्तर चर्चा करण्याची संधी मिळाली. पदक मिळविण्याबाबत निर्माण झालेली सकारात्मक वृत्ती हा फार मोठा बदल भारतीय कुस्ती क्षेत्रात दिसून येऊ लागला आहे. नेटाने प्रयत्न केले तर चार-पाच पदके मिळविण्याची क्षमता भारतीय खेळाडूंमध्ये आहे. हा विचार कुस्ती संघटकांमध्ये येऊ लागला आहे.
भारतात पुढील वर्षी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा होणार आहेत. ही स्पर्धा भारतीय खेळाडूंसाठी आगामी ऑलिंम्पिक क्रीडा स्पर्धेसाठी पूर्वतयारी म्हणून उपयुक्त ठरणार आहे.
संयोजनपदाबरोबरच या स्पर्धेत अधिकाधिक पदके मिळविणे हाही भारताचा उद्देश असेल. पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रकुल युवा क्रीडा स्पर्धेत भारताने सर्वच्या सर्व गटात सुवर्णपदकांचा वेध घेत कुस्तीत निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले. खरंतर या स्पर्धेत कुस्ती या क्रीडाप्रकाराचा समावेश केला जाणार नव्हता. कदाचित राष्ट्रकुल युवा स्पर्धा आयोजित केल्या जाणाऱ्या संघटकामध्ये कुस्तीमधील यशाबाबत साशंकता असावी. मात्र कुस्ती संघटकांनी वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा केल्यामुळेच या क्रीडाप्रकारास युवा स्पर्धेत स्थान मिळाले आणि भारतीय मल्लांनी पदकांची लयलूट केली. युवा स्पर्धेत वर्चस्व गाजविणारे मल्लच उद्याचे ऑलिंम्पिकपटू आहेत हे ओळखूनच भारतीय कुस्ती संघटकांनी युवा व कॅडेट गटातील मल्लांवर अधिक लक्ष केंद्रित करण्याचे ठरविले आहे. भारतीय मल्ल अनुभवामध्ये कमी पडतात हे ओळखून त्यांना परदेशातील अधिकाधिक स्पर्धामध्ये भाग घेण्याची संधी दिली जात आहे. पुण्याचा कुस्तीगिर राहुल आवारे याने जर्मनी येथील ग्रां. प्रि. कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदकाचा वेध घेतला. ऑलिंम्पिक ब्राँझपदक विजेता सुशीलकुमार यानेही सुवर्णपदक पटकाविले. या दोघांच्या सुवर्णपदकाखेरीज भारताने एकूण पाच पदकांची कमाई केली. युरोपियन मल्ल अधिक बलाढय़ व ताकदवान असतात. त्यांच्याविरुद्ध लढल्यावर आत्मविश्वास वाढेल हा हेतू डोळ्यासमोर ठेवीत कुस्ती महासंघातर्फे खेळाडूंना परदेशातील विविध स्पर्धामध्ये भाग घेण्याची संधी दिली जाणार आहे. तसेच युरोपियन देशांमध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या प्रशिक्षण शिबिरांमध्येही भाग घेण्याची संधी त्यांना मिळणार आहे. ऑलिंम्पिकच्या दृष्टीने पूर्वतयारी म्हणून या कुस्तीगिरांसाठी परदेशी मार्गदर्शकांची, फिजिओंची नियुक्ती केली जाणार आहे.
लंडन ऑलिंम्पिकसाठी अद्याप तीन वर्षे अवकाश असला तरी त्या दृष्टीने आतापासूनच पूर्वतयारी व नियोजन करण्यात येत आहे. भारतीय कुस्तीगिरांना कोणत्या वजन गटात पदकाची अधिक संधी आहे याचा बारकाईने अभ्यास करून त्यादृष्टीने खेळाडूंची निवड केली जाणार आहे. बीजिंग ऑलिंम्पिकमधील कामगिरी हा केवळ निकष न ठेवता आशियाई कॅडेट स्पर्धा, जागतिक कॅडेट स्पर्धा, राष्ट्रकुल युवा क्रीडा स्पर्धा तसेच आगामी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा या सर्व स्पर्धामधील कामगिरीचा अभ्यास करून त्याप्रमाणे खेळाडूंची निवड केली जाणार आहे. या महिन्याच्या अखेरीस आशियाई कॅडेट स्पर्धा होणार आहेत. ऑलिंम्पिक स्पर्धामध्ये कमी वजनी गटात भारतीय खेळाडूंना पदकाची अधिक संधी असते हे लक्षात घेऊनच कॅडेट स्पर्धेतील पदक विजेत्यांना ऑलिंम्पिकपूर्व सराव शिबिरात संधी दिली जाणार आहे. वेगवेगळ्या वातावरणात व वेगवेगळ्या ठिकाणी सराव करण्याची सवय व्हावी यादृष्टीने तीन-चार ठिकाणी या शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडानगरीत जागतिक दर्जाची सुविधा उपलब्ध आहे हे लक्षात घेऊनच तेथे दीर्घकालीन राष्ट्रीय शिबिर आयोजित केले जाणार आहे. तसेच पुण्यात दरवर्षी आंतरराष्ट्रीय स्तरावर किमान एकतरी स्पर्धा घेण्याची योजना कुस्ती महासंघाने आखली आहे. जालंधर येथे नव्याने आंतरराष्ट्रीय दर्जाचे कुस्ती संकुल उभारण्यात आले आहे. तेथे वरिष्ठ गटातील खेळाडूंसाठी शहीद भगतसिंह चषक आंतरराष्ट्रीय स्पर्धा आयोजित केली जाणार आहे. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी नवी दिल्ली येथे क्रीडानगरी उभारली जात आहे. या क्रीडा संकुलातील कुस्ती स्टेडियमची चाचणी घेण्याच्या दृष्टीने राष्ट्रकुल स्पर्धेपूर्वीही तेथे आंतरराष्ट्रीय स्तरावर स्पर्धा घेतली जाणार आहे. या स्पर्धामधील कामगिरीचाही विचार ऑलिम्पिकसाठी संघ निवडताना केला जाणार आहे. प्रत्येक गटासाठी तीन-चार संभाव्य खेळाडूंची निवड केली जाणार आहे. या कुस्तीगिरांना स्पर्धात्मक प्रशिक्षणाबरोबरच खेळाचे शास्त्रोक्त ज्ञान, मानसिक व शारीरिक तंदुरुस्ती, उत्तेजक औषधांचा उपयोग न करता ताकद कशी वाढवावी याबाबतही मार्गदर्शन केले जाणार आहे. रशियन संघराज्यातील देशांचे कुस्तीगिर, ऑलिंम्पिकमध्ये अव्वल दर्जाचे यश मिळवितात तसेच क्युबाचेही मल्ल चांगले यश मिळवितात. अशा खेळाडूंबरोबर मित्रत्वाच्या लढतीही आयोजित केल्या जाणार आहेत. शास्त्रोक्त पद्धतीने प्रशिक्षण देण्याबरोबरच पोषक व संतुलित आहार याबाबतही मार्गदर्शन केले जाणार आहे. खेळाडूंची नियमितपणे वैद्यकीय तपासणी केली जाणार असून ताकद व क्षमता याबाबत ते कोठे कमी पडतात. सुधारणा करण्यासाठी त्यांना कशाची आवश्यकता आहे याचाही बारकाईने अभ्यास केला जाणार आहे. भारतामधील बऱ्याचशा कुस्तीगिरांची घरची आर्थिक स्थिती बेताचीच असते. शासनाने कुस्तीगिरांकरिता शिष्यवृत्तीही सुरू केली आहे. मात्र त्याला काही मर्यादा असल्यामुळे अन्य खेळांप्रमाणेच भारतीय कुस्ती संघासाठी पुरस्कर्ते मिळविण्याचाही महासंघ प्रयत्न करीत आहे. रेल्वे, सेनादलामध्ये मल्लांना नोकरी मिळते त्याचबरोबर आणखी काही खासगी क्षेत्रातील कंपन्यांनी मल्लांना दत्तक घ्यावे यादृष्टीनेही महासंघातर्फे पावले उचलण्यात आली आहेत. कुस्तीगिरांनाही ब्रँड अ‍ॅम्बेसेडर म्हणून संधी मिळावी यासाठीही प्रयत्न केले जात आहेत. महाराष्ट्र व कुस्ती यांचे अतूट नाते आहे. राहुल आवारे, रणजित नलावडे, अजित पाटील यांच्यासारखे होतकरू खेळाडू भारताकडून अनेक स्पर्धा गाजवित आहेत. महाराष्ट्रात कुस्तीसाठी विपूल प्रमाणात गुणवत्ता उपलब्ध आहे. चांगले मार्गदर्शकही आहेत. तसेच आता आंतरराष्ट्रीय दर्जाची प्रशिक्षण केंद्रेही महाराष्ट्रात अनेक ठिकाणी उपलब्ध आहेत. या केंद्रांच्या देखभालीसाठी, तेथे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षक नियुक्त करण्याबाबत भारतीय कुस्ती महासंघाने ठोस पावले उचलली आहेत. काही ठिकाणी मार्गदर्शकही नेमण्यात आले आहेत. सुशील कुमारचे गुरू सतपालसिंह तसेच महान भारत केसरी दारासिंह यांनी केलेल्या सूचनेनुसार अशा केंद्रांमधील कुस्तीगिरांमध्ये मित्रत्वाच्या लढती आयोजित केल्या जाणार आहेत. त्यामधून प्राथमिक स्तरावर १०० ते १२० मल्ल निवडण्यात येणार असून त्यांच्यात पुन्हा सामने घेऊन २० ते २२ खेळाडूंचा संभाव्य संघ निवडला जाणार आहे. या खेळाडूंना परदेशातील प्रशिक्षणाची, स्पर्धाची अधिकाधिक संधी दिली जावी अशी सूचनाही सतपाल व दारासिंह यांनी केली आहे. त्यांच्या या सूचनांचा कुस्ती महासंघ गांभीर्याने विचार करील, अशी अपेक्षा आहे.
मिलिंद ढमढेरे

वॉन बॉर्न कॅप्टन
ए का बलाढय़ संघाला भिडायचे असेल तर त्याला फक्त नमविण्याचे स्वप्न उराशी बाळगून चालत नाही, तर त्यासाठी कृतीही महत्वाची असते. एक कर्णधार म्हणून रणनीती आखणे, संघ बांधणी करणे, संघातील खेळाडूंच्या गुणांवर आणि अवगुणांवर मेहनत घेणे, प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूंचा अभ्यास करणे अशी काही कामे करावी लागतात. त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे ‘दादा’ संघातील खेळाडूंबरोबर नजर भिडविण्यासाठी तुमच्यामध्ये जिगर असावी लागते. हे सर्व असून सुद्धा संघ पराभूत झाला तर त्याचे खापर डोक्यावर घेऊन पुढे चालत राहायचे आणि देशाला विजय मिळवून द्यायचा अशीच कोणत्याही कर्णधाराची ‘वन लाईन स्टोरी’ असते. त्याला या सर्व गोष्टी माहित होत्या, पण तरीही त्याने कर्णधारपद स्वीकारले आणि त्यामध्ये तो यशस्वी ठरला. त्याचा जन्मच जणू कर्णधारपद भूषविण्यासाठी झाला होता, असं म्हणा ना. तो कमालीचा शांत दिसत असला तरी त्याने आक्रमक पावले उचलून संघाला विजयाची शिखरे पादाक्रांत करून दिली. त्यानं युवा खेळांडूना एकत्र केले, त्यांच्यावर विश्वास ठेवला आणि इंग्लंडला तब्बल १८ वर्षांनी रिकी पॉन्टिंगच्या जगज्जेत्या ऑस्ट्रेलियन संघाला धूळ चारून मानाचा अ‍ॅशेस चषक इंग्लंडला मिळवून दिला. आत्ता तुम्ही त्याला ओळखलं असेल. हो त्याचे नाव मायकेल वॉन, इंग्लंडचा सर्वात यशस्वी कर्णधार. मायकेल वॉनने १९९९ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरूद्ध पदार्पण केले. त्या सामन्यात त्याला मोठय़ा धावा करता आल्या.
त्यानंतर पाकिस्तानविरूद्ध कसोटी मालिका इंग्लंडचा संघ खेळणार होता. पण वॉनचा प्रवेश मात्र पक्का नव्हता. यावेळी त्याच्यावर निवड समितीने विश्वाच दाखवला आणि त्याने तो सार्थ ठरविला. ओल्ड ट्रॅफर्ड येथे झालेल्या सामन्यात वॉनने पहिले शतक साजरे केले आणि त्याने त्यानंतर मागे वळून पाहिले नाही. २००२ च्या मोसमात त्याने श्रीलंका आणि भारताविरूद्ध सात कसोटींमध्ये ९०० धावा फटकाविल्या आणि तो संघाचा कणा बनला. या मालिकेत त्याने भारताविरूद्ध सर्वाधिक १९५ धावा फटकाविल्या. याच मालिकेतील नॉटिंगहॅम येथील सामन्यात मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकर भन्नाट फॉर्मात होता. इंग्लंडच्या वेगवान गोलंदाजांची त्याने भंबेरी उडविली होती. एकाही गोलंदाजाला त्याला बाद करणे जमत नव्हते. सचिन दोनशेच्या दिशेने वाटचाल करत होता. त्याला थांबविण्यासाठी कर्णधार नासीर हुसेनने वॉनच्या हाती चेंडू सुपूर्द केला. वेगवान गोलंदाजांना जे जमले नाही ते याला काय जमणार, असेच सारे जणं म्हणत होते. सचिनला दोनशे करण्यासाठी फक्त तीन धावांची गरज होती आणि तो त्या करेल अशी साऱ्यांचीच अपेक्षा होती. वॉनने एक चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर टाकला. सचिनला वाटले हा चेंडू सहज बॅटवर येईल. पण वॉनचा तो चेंडू फिरला आणि त्याने सचिनला ‘क्लिन बोल्ड’ केले.
त्यानंतर संपूर्ण मैदानभर नाचत त्याने त्याचा आनंद व्यक्त केला. २००३ साली नासीर हुसेनने निवृत्ती पत्करल्यानंतर कर्णधारपदाची माळ वॉनच्या गळ्यात पडली. सुरूवातीला त्याला यश लाभले नाही. पण त्याने अनुभवाला गुरू
मानायचे ठरविले आणि २००५ साली इंग्लंडच्या संघाला एकाही कसोटी सामन्यात पराभव पत्करावा लागला नाही. या वर्षांतील १३ कसोटी सामन्यांत त्याने ११ विजय मिळविले तर दोन सामने अनिर्णीत राखले. १९६८ नंतर वेस्ट इंडिजला त्यांच्याच मातील धूळ चारण्याचा पराक्रम त्याने केला. त्याचबरोबर मायदेशातील सातही सामन्यांमध्ये त्याने वेस्ट इंडिज आणि न्यूझीलंडला ‘व्हाईट वॉश’ दिला. २००५ ची अ‍ॅशेस मालिका इंग्लंडच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहली गेली ती वॉनमुळेच. १९८६ नंतर अ‍ॅशेस मालिकेत इंग्लंडला ऑस्ट्रेलियाला नमविता आले नव्हते. पण कतृत्वावर विश्वास असणारी माणसे अन्य कोणत्याही गोष्टींची तमा बाळगत नसतात. त्यावेळी पॉन्टिंगचा संघ जबरदस्त फॉर्मात होता. संघात गिलख्रिस्ट, हेडन, वॉर्न, मॅग्रा सारखे महान खेळाडू होते. तर दुसरीकडे इंग्लंडच्या संघात युवा खेळाडूंचा भरणा होता. ही मालिका ऑस्ट्रेलिया सहज जिंकेल अशी भाकिते वर्तविली जात होती. लॉर्ड्स येथील पहिल्या सामन्यात इंग्लंडचा दारूण पराभव झाला आणि या भाकितांना अधिकच बळकटी मिळाली. यावेळी वॉनवर दाही दिशांनी टीकास्त्र सुरू झाले. पण मितभाषी वॉनने त्यांच्याकडे लक्ष दिले नाही. त्याला संघावर विश्वास होता आणि खेळाडूंनीही त्याला योग्य साथ दिली. दुसरा कसोटी सामना इंग्लंडने जिंकला आणि ज्या वॉनवर टीका होत होती त्यालाच सर्वानी डोक्यावर घेतले. पण या विजयाने वॉन हुरळून गेला नाही, कारण वॉनला मालिका जिंकायची होती बरोबरी करण्यात त्याला रस नव्हता. त्यानंतर तीन सामन्यांमधला एक सामना इंग्लंडने जिंकला आणि वॉन इंग्लंडसाठी देवदूत ठरला. यापूर्वी माईक गॅटिंगने १९८६ साली इंग्लंडला अ‍ॅशेस मालिकेत विजय मिळवून दिला होता. मालिका जिंकल्यानंतरही त्याने श्रेय लाटण्यासाठी कोणतेही प्रयत्न केले नाहीत. तर या विजयाचे श्रेय त्याने संघाला दिले. एकीकडे विजयाची शिखरे पादाक्रांत करत असाताना वॉन दुखापतींनी हैराण झाला होता. आत्तापर्यंत त्याला आठवेळा गुडघ्यावर शस्त्रक्रिया करावी लागला. दुखापतींमुळेच त्याला २००६ चा मोसम खेळता आला नाही. त्यानंतर दुखापत त्याच्या पाचवीलाच पुजली. वॉन हा एक चांगला कर्णधार आणि खेळाडू होता. त्यामुळेच केव्हिन पीटरसनने कर्णधार झाल्यावर त्याला संघात घेण्याची इच्छा व्यक्त केली आणि त्यावर ते अडून बसला. वॉनसाठी त्याला कर्णधारपद सोडावे लागले, पण त्याची मागणी मात्र त्याने मागे घेतली नाही. वॉनसाठी कर्णधारपद सोडण्यापर्यंत पीटरसन पोहोचला, कारण तो एक दर्जेदार खेळाडू होता.
यंदाची अ‍ॅशेस मालिका खेळून निवृत्ती घेण्याचा वॉनचा विचार होता. पण ज्याच्यामुळे अ‍ॅशेस चषकाचे पाय इंग्लंडला लागले त्याच वॉनला निवड समितीने डावलले. अ‍ॅशेस खेळण्याचे स्वप्न पूर्ण होत नसले तरी वॉन निराश मात्र झालेला नाही. त्याने अ‍ॅन्ड्रय़ू स्ट्रॉसच्या संघाला शुभेच्छा दिल्या आहेत. पण क्रिकेटला अलविदा करण्यापूर्वी जी अ‍ॅशेस मालिका आपण देशाला जिंकू न दिली त्या मालिकेमध्ये खेळता येत नसल्याची बोच त्याच्या मनाला नक्कीच लागलेली असेल.
प्रसाद लाड

*मायकेल वॉन इंग्लंडसाठी ८२ कसोटी सामने खेळला, ज्यामध्ये १८ शतकांच्या जोरावर त्याने ४१.४४ च्या सरासरीने
५७१९ धावा फटकाविल्या. ज्यामध्ये १८ अर्धशतकांचाही समावेश असून १९७ धावा त्याच्या सर्वाधिक आहेत.
*५१ कसोटी सामन्यांमध्ये इंग्लंडचे नेत्तृत्व करताना त्याने २६ सामने जिंकले तर ११ सामन्यात त्याला पराभव पत्करावा
लागला.
*१९८६ नंतर म्हणजेच तब्बल १८ वर्षांनी त्याने इंग्लंडला अ‍ॅशेस मालिका जिंकवून दिली. यापूर्वी १९८६ साली माईक
गेटींगने इंग्लंडला अ‍ॅशेस मालिका जिंकवून दिली होती.
*१९६५ नंतर दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिजला त्यांच्याच मातीत धूळ चारण्याचा पराक्रम वॉनच्या नावावर
आहे.
*वॉनच्या नेत्तृत्वाखाली इंग्लंडने २००४ साली एकही कसोटी गमाविली नाही.