Leading International Marathi News Daily

रविवार, ५ जुलै २००९

‘वीकएण्ड’ला पावसाचा ‘ओव्हरटाइम’
मुंबई, ४ जुलै / प्रतिनिधी

संपूर्ण जून महिना दडी मारून बसलेला पाऊस आषाढी एकादशीपासून हळूहळू बरसू लागला आणि ‘वीकएण्ड’ला ‘ओव्हरटाइम’ करण्याच्या उद्देशाने आलेल्या पावसाने आज रौद्र रूप धारण करून मुंबईचे जनजीवन अक्षरश: अस्ताव्यस्त करून टाकले. सोसाटय़ाच्या वाऱ्यांसह आज मुंबई आणि उपनगरांना मुसळधार पावसाने झोडपून काढले आणि रेल्वे, बससेवा ठप्प झाल्या. शहर आणि उपनगरातील अनेक सखल भागांत कमरेइतके पाणी साचले आणि मुंबई महापालिका आणि आपत्कालीन यंत्रणेचे परिस्थितीला तोंड देण्यास सज्ज असल्याचे दावे सपशेल फोल ठरले.

ठाणे जिल्ह्यातही पावसाची जोरदार सलामी
ठाणे, ४ जुलै/प्रतिनिधी

कोकणासह ठाणे जिल्ह्याला सायंकाळपासून पावसाने सलामी दिल्याने शेतकरीराजा सुखावला आहे. मात्र नालेसफाईअभावी ठाण्यातील वंदना एस.टी. स्टँड, वागळे इस्टेट, गावदेवी मंदिर या ठिकाणी पाणी साचल्याने प्रवासी व नागरिकांचे हाल झाले. संततधार पाऊस पडत असताना राबोडीतील एका बेकरीला लागलेल्या आगीची घटना वगळता जिल्ह्यात कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही. ठाणे महापालिकेकडून नालेसफाईबाबत करण्यात आलेले सर्व दावे पहिल्याच पावसात फोल ठरले असून राममारूती रोड, घंटाळी रोड, गोखले रोड, गावदेवी मंदिर परिसराला तलावाचे स्वरूप आले होते. त्याचा विपरीत परिणाम वाहतुकीवर झाला. अनेक चाकरमान्यांना भिजतच घरी जावे लागले. उद्या सुट्टी असल्याकारणाने मुलांसह आबालवृद्धांनी पावसात चिंब भिजत आनंद लुटण्याचा प्रयत्न केला. टी.एम.टी आणि एस.टी.ला उसळलेली गर्दी पाहून रिक्षाचे भाव वाढले. कळव्याच्या विटावामधील सूर्यानगर, वागळे इस्टेटमधील शिवाजीनगर, साईनाथनगर , घोडबंदर रोडवरील पारिजात गार्डन, वाघबीळ परिसरात पाणी साचल्याने नागरिकांचे हाल झाले. अशाप्रकारे धो-धो पाऊस कोसळताना राबोडी दोनमधील जनता बेकरीला आग लागली. ती विझविण्यासाठी अग्निशमन दलाला पाचारण करावे लागले. नेहमीप्रमाणे वंदना एस.टी. स्थानकात पाणी साचले. रस्त्यावरील साचलेल्या गुडघाभर पाण्यामुळे लहान वाहने बंद पडली तर वाहतुकीला ब्रेक लागला. वास्तविक या ठिकाणच्या नाल्याचा प्रवाह इतरत्र वळविण्यात आल्याने दर पावसाळ्यात एस.टी. स्टँड जलमय होतो. ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातही पावसाने दमदार सुरूवात केली असून कल्याण-डोंबिवलीला चांगलाच पाऊस पडला. उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर आणि शहापूरमधील धरण परिसरात चांगला पाऊस पडला.

सेरेना सरस
व्हीनसला नमवून तिसरे विम्बल्डन जेतेपद

विम्बल्डन ४ जुलै/पीटीआय
विम्बल्डन खुल्या टेनिस स्पर्धेत लागोपाठ तिसऱ्यांदा विजेतेपद मिळविण्याचे व्हीनस विल्यम्सचे स्वप्न आज हुकले. अंतिम फेरीत तिचीच धाकटी बहिण सेरेना हिने तिला ७-६ (७-३), ६-२ असे पराभूत करीत या स्पर्धेत तिसऱ्यांदा अिजक्यपद मिळविले. अमेरिकेच्या विल्यम्स भगिंनीमध्ये झालेल्या या लढतीबाबत कमालीची उत्सुकता निर्माण झाली होती. विशेषत: या स्पर्धेत अजिंक्यपदाची हॅट्ट्रिक करण्याची संधी व्हीनसला होती. तथापि व्हीनसच्या तुलनेत अधिक वेगवान सव्‍‌र्हिस व परतीचे फटके असे बहारदार खेळणाऱ्या सेरेनाने स्वत:ची सव्‍‌र्हिस एकदाही गमावली नाही. हेच तिच्या यशाचे गमक ठरले.

वाहतूक समस्या सोडवण्यासाठी छोटय़ा प्रयोगांची मोठी गरज
मुंबई ४ जुलै /प्रतिनिधी

वाहतुकीच्या गंभीर समस्येने मुंबईला ग्रासले आहे. या समस्येतून बाहेर पडण्यासाठी काही कडक उपाय योजण्याच्या गरजेवर आज मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) आणि ‘लोकसत्ता’ यांच्या संयुक्त विद्यमाने सह्याद्री अथितीगृह येथे आयोजित ‘इको फ्रेन्डली गव्हर्नन्स फोकसड् ट्रान्स्पोर्ट’ या विषयावरील कार्यशाळेत भर देण्यात आला. रस्त्यांच्या दुतर्फा उभ्या करण्यात आलेल्या गाडय़ांमुळे उच्चभ्रूंची वस्ती असलेल्या कारमायकल रोडवरील एका इमारतीत अग्निशमन दलाची गाडी घुसू शकली नव्हती, असे आर. ए. राजीव यांनी सांगितले.

पन्नाशीत सेवानिवृत्ती स्वीकारल्यास
पूर्वीपेक्षा एक टक्का कमी पेन्शन मिळणार!
निशांत सरवणकर
मुंबई, ४ जुलै

भविष्य निर्वाह निधीचा लाभ घेणाऱ्या देशभरातील सुमारे चार कोटी कामगारांपैकी जे कामगार वयाची पन्नाशी गाठल्यानंतर सेवानिवृत्ती घेऊन निवृत्तीवेतनाचा पर्याय स्वीकारतात त्यांना एक टक्का कमी निवृत्ती वेतन घ्यावे लागणार आहे. भविष्य निर्वाह निधी व्यवस्थापनाने घेतलेला हा निर्णय देशभरातील कार्यालयांना एका परिपत्रकाद्वारे कळविण्यात आला आहे. मात्र त्याची जाहीर वाच्यता कुठेही करण्यात आलेली नाही. हा केवळ एक टक्का कमी केल्यामुळे भविष्य निर्वाह निधी व्यवस्थापनाकडे लाखो रुपये गोळा होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

मृत्यूच्या तांडवातून वाचलेल्या बाहियाची चित्तरकथा
जेव्हा मदतपथकाने १४ वर्षांच्या बाहियाला पाहिलं, तेव्हा ती खवळलेल्या हिंदी महासागरात कोसळलेल्या विमानाच्या अवशेषांवर कशीबशी तोल सावरत उभी होती.. तिच्या भोवताली प्रेतांचा खच तरंगत होता.. मंगळवारी कोमोरोस बेटानजीक कोसळलेल्या येमेनिया विमान अपघातात तब्बल १५२ प्रवासी मरण पावले, पण या भीषण अपघातात वाचलेली एकुलती एक व्यक्ती ठरली आहे बाहिया बकारी. मदतपथकाने वाचवलेल्या बाहियाला बुधवारी संध्याकाळी रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

उत्तर कोरियाने केली क्षेपणास्त्र चाचणी
सेऊल, ४ जुलै / ए.एफ.पी.

अमेरिकेच्या धमकीला भीक न घालता उत्तर कोरियाने सात अण्वस्त्र वाहक क्षेपणास्त्रांची चाचणी घेतली. विशेष म्हणजे आज अमेरिकेमध्ये स्वातंत्र्यदिन साजरा होत असताना उत्तर कोरियाने ही चाचणी घेतल्याचा दावा दक्षिण कोरियाने केला आहे. उत्तर कोरियाने या चाचण्या जपानच्या पूर्वेकडील समुद्रात केल्याचे दक्षिण कोरियाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. या क्षेपणास्त्र चाचण्यांची अमेरिकेने गंभीर दखल घेतली आहे. आंतरराष्ट्रीय प्रमाणवेळेनुसार सकाळी चार वाजता या चाचण्या घेण्यात आल्याचे सांगण्यात आले. ही चारही क्षेपणास्त्रे मध्यम की लघु पल्ल्याची होती याबाबतची माहिती उपलब्ध झाली नाही. पण ही क्षेपणास्त्रे स्कड जातीची असल्याचे वृत्त ‘यॉनहोप’ या वृत्तसंस्थेने दिले आहे. या क्षेपणास्त्र चाचण्यांवर दक्षिण कोरियाचे अधिकारी लक्ष ठेवून असल्याचे सूत्रांनी सांगितले. ४ जुलै २००६ म्हणजे तीन वर्षांपूर्वी उत्तर कोरियाने क्षेपणास्त्र चाचणी घेतली होती. त्यामुळे याची दखल घेत उत्तर कोरियावर संयुक्त राष्ट्रसंघाच्या अटी लादण्यावर अमेरिकेने पुढाकार घेतला होता. तसेच उत्तर कोरियावर आर्थिक आणि सैन्य र्निबध घालण्यासाठीही अमेरिका आंतरराष्ट्रीय समुदायावर दबाव वाढवित आहे.

 


महाराष्ट्राचा आखाडा संदर्भातील बातम्या वाचण्यासाठी वरील इमेजवर क्लिक करा, त्याचप्रमाणे या बातम्यांवरील आपली प्रतिक्रिया ऑनलाईन नोंदविण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा.

 

प्रत्येक शुक्रवारी