Leading International Marathi News Daily

रविवार, ५ जुलै २००९

पेट्रोल दरवाढीच्या निषेधार्थ शिवसेनेची निदर्शने
औरंगाबाद, ४ जुलै/खास प्रतिनिधी

केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेलमध्ये केलेली दरवाढ आणि महावितरणने प्रस्तावित वीज दरवाढ केल्याच्या निषेधार्थ शिवसेनेच्या वतीने औरंगाबाद जिल्ह्य़ात ११ ठिकाणी तीव्र निदर्शने करण्यात आली. शहरात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर खासदार चंद्रकांत खैरे, माजी खासदार प्रदीप जयस्वाल आणि जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली ही निदर्शने करण्यात आली.

धोंडूतात्या महाराजांच्या दर्शनासाठी दीड लाख भाविक
उदगीर, ४ जुलै/वार्ताहर

उदगीर तालुक्यातील डोंगरशेळकी येथील समर्थ धोंडूतात्या महाराजांचे आषाढी एकादशीनिमित्त दर्शन घेण्यासाठी भक्तांनी मोठी गर्दी केली. महाराजांचे रात्री उशिरापर्यंत दीड लाख भाविकांनी दर्शन घेतले. मंदिरापासून दोन किलोमीटर अंतरापर्यंत भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. विठ्ठल नामासोबतच समर्थ धोंडूतात्यांच्या मामाच्या गजराने अवघा परिसर दुमदुमून गेला होता. पहाटे ५ वा. उदगीरचे उपजिल्हाधिकारी संभाजीराव अडकुणे यांच्या हस्ते महापूजा करण्यात आली, तर संस्थानाचे विश्वस्त रामराव मुंडे यांच्या हस्ते अडकुणे यांचा सत्कार करण्यात आला. पहाटेपासूनच मिळेल त्या वाहनांनी भाविक दर्शनासाठी येत होते, तर हजारो भाविक स्त्री-पुरुष, लहान मुले पायी तात्यांच्या दर्शनासाठी येत होते. यात्रेकरूंसाठी चहा-फराळ, पाण्याची व्यवस्था संस्थानच्या वतीने नि:शुल्क करण्यात आली होती. कोणताही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

भारत राखीव बटालियनच्या कार्यक्रमात आमदारांना डावलले
औरंगाबाद, ४ जुलै/खास प्रतिनिधी

राज्य राखीव पोलीस बल गट क्र. १४ (भारत राखीव बटालियन) याच्या नूतन वास्तुचे हस्तांतरण आणि उद्घाटन समारंभाला औरंगाबाद शहरातील तीन आमदारांना डावलण्यात आले आहे. खासदार व आमदारांची नावे आहेत, मात्र आमदार डॉ. कल्याण काळे, आमदार किशनचंद तनवाणी, आमदार एम. एम. शेख, आमदार विक्रम काळे, आमदार सतीश चव्हाण या पाचही आमदारांना या उद्घाटन समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून बोलाविण्यात आले नाही.

सहाव्या वेतन आयोगात औषध निर्माता पदावर अन्याय
औरंगाबाद, ४ जुलै/खास प्रतिनिधी

सहाव्या वेतन आयोगात राज्यातील शासकीय-निमशासकीय आरोग्य सेवेत कार्यरत असलेल्या औषधी निर्माता या पदास लागू करण्यात आलेली वेतनश्रेणी अन्यायकारक आहे याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी संघटनेमार्फत आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

गॅस्ट्रोमुळे मुलीचा मृत्यू
उदगीर, ४ जुलै/वार्ताहर
तालुक्यातील किनी यल्लादेवी येथील प्रतिक्षा दगडू कांबळे (वय ९) हिला गॅस्ट्रोची लागण होवून उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. ती जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकत होती.जि. प. शाळेत इयत्ता चौथ्या वर्गात शिकणारी प्रतिक्षा हिला गॅस्ट्रोची लागण झाली. तिला वाढवणा येथील प्रश्नथमिक आरोग्य केंद्रात उपचारार्थ दाखल करण्यात आले. आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी कदम यांनी प्रतिक्षाचा मृत्यू झाल्याचे सांगितले. प्रतिक्षा कांबळे हिच्या घराशेजारी असलेल्या कूपनलिकेशेजारून घाण पाणी वाहणारे गटार आहे. त्या गटाराचे पाणी कूपनलिकेत शिरले असण्याची शक्यता आहे. त्या पाण्यामुळेच प्रतिक्षाला गॅस्ट्रोची लागण झाली असणे शक्य आहे.

भाजपाच्या बैठकीत विधानसभेबाबत चर्चा
औरंगाबाद, ४ जुलै/खास प्रतिनिधी
आगामी विधानसभा आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीची तयारी भारतीय जनता पक्षाच्या औरंगाबाद शहर शाखेने सुरू केली आहे. शनिवारी भाजपाच्या शहर कार्यकारिणीची बैठक झाली.
या बैठकीत लोकसभा निवडणुकीचा अहवाल, मतदार नोंदणी, पक्षाची बांधणी, आंदोलन आणि आगामी विधानसभा व महानगरपालिका निवडणुका यावर चर्चा करण्यात आली. या बैठकीला सहसंघटनमंत्री डॉ. राजेंद्र फडके, मराठवाडा संघटनमंत्री प्रवीण घुगे, महापौर विजया रहाटकर, माजी आमदार श्रीकांत जोशी, शहराध्यक्ष अतुल सावे, माजी महापौर डॉ. भागवत कराड, शिरीष बोराळकर, बसवराज मंगरुळे यांनी मार्गदर्शन केले

उपमुख्यमंत्री आज औरंगाबादमध्ये
औरंगाबाद, ४ जुलै/खास प्रतिनिधी
राज्याचे उपमुख्यमंत्री छगन भुजबळ हे रविवारी औरंगाबाद शहराच्या दौऱ्यावर येत आहेत. पुणे येथून खासगी हेलिकॉप्टरने औरंगाबाद विमानतळावर त्यांचे आगमन सकाळी सव्वा अकरा वाजता होणार आहे. सिडको, एन-५च्या नाटय़गृहात आयोजित राष्ट्रवादी काँग्रेसच्या विभागीय शिबिरात उपस्थित राहणार आहेत.

विजेच्या खांबाला चिकटून तरुणाचा मृत्यू
गेवराई, ४ जुलै/वार्ताहर

विजेच्या खांबाला स्पर्श झाल्याने तरुणाचाशॉक लागून मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सकाळी घडली. तालुक्यातील मौजे बागपिंपळगाव येथे राहणारा परमेश्वर बाबर (वय २२) याचा रस्त्यालगत असलेल्या विजेच्य खांबाचा त्याला स्पर्श झाला आणि शॉक लागून तो जागीच मृत्यू पावला. पोलिसांनी अकस्मात मृत्युची नोंद केली आहे.

सोयाबीनने भरलेली मालमोटार पळविली
उदगीर, ४ जुलै/वार्ताहर

येथील जमहूर ऊर्दू शाळेसमोरील सोयाबीनने भरलेली मालमोटार चोरटय़ांनी रातोरात पळविली. मालमोटारसह सोयाबीनची किंमत साडेसहा लक्ष रुपये आहे. सोयाबीन या धान्याने भरलेली मालमोटार (क्र. एमएच ०४ - ३०१०) जमहूर ऊर्दू विद्यालयासमोर मालमोटार चालक व मालक पीरखान महम्मद खान पठाण यांनी थांबविली होती. अंधाराचा फायदा घेऊन नांदेड तालुक्यातील तरोडा येथील रहिवासी असलेला संतोष नारायण गायकवाड याने ही मालमोटार पळविली असल्याची तक्रार पीरखान पठाण याने पोलिसात दिली. मालमोटारमधील सोयाबीनच्या धान्यासह मालमोटारीची किंमत साडेसहा लाख रुपये असल्याचे फिर्यादीने म्हटले. या मालमोटारीचा पोलीस शोध घेत आहेत.

‘मराठवाडा गौरव’ पुरस्काराने बी. बी. ठोंबरे सन्मानित
लातूर, ४ जुलै/वार्ताहर

मराठवाडा लोकविकास मंचतर्फे नॅचरल शुगरचे संस्थापक बी. बी. ठोंबरे यांना ‘मराठवाडा गौरव’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. ठोंबरे यांनी नॅचरल शुगर अँड अलाईड इंडस्ट्रीज लि. या साखर उद्योगाची सुरुवात करून कृषी औद्योगिक क्षेत्राच्या माध्यमातून ग्रामीण भागाचा विकास आणि महाराष्ट्रातील साखर उद्योगाला नवी दिशा देण्याचे काम केले आहे तसेच लातूर जिल्ह्य़ातील मांजरा सहकारी साखर कारखान्याच्या उभारणीत व यशस्वी घोडदौडीत तसेच बीड जिल्ह्य़ातील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या उभारणीतसुद्धा अत्यंत महत्त्वाचे कार्य करून एक नवीन संकल्पना अंमलात आणली आहे. या क्षेत्रातील योगदान व कर्तृत्व पाहून नुकताच ठोंबरे यांना मुंबई येथे केंद्रीय अवजड उद्योगमंत्री विलासराव देशमुख यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला.

मोलकरणी संघटनेचे आज शिबिर
औरंगाबाद, ४ जुलै/खास प्रतिनिधी

मोलकरीण व घरेलू कामगार संघटनेच्या कार्यकर्त्यांचे अभ्यास शिबिर उद्या (रविवारी) सिमंत मंगल कार्यालयात होणार आहे. शहरातील १६७ वस्त्यांतील समितीचे सर्व सदस्य या शिबिरात सहभाग होणार आहेत.

रमेश बोथगिरे यांचे निधन
औरंगाबाद, ४ जुलै/प्रतिनिधी
खुलताबाद पंचायत समितीचे विस्तार अधिकारी (कृषी) रमेश बोथगिरे यांचे शुक्रवारी निधन झाले. ते ३९ वर्षाचे होते. गेल्या काही महिन्यांपासून ते आजारी होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.

जावयाला विष पाजले
औरंगाबाद, ४ जुलै/खास प्रतिनिधी

पत्नीला नेण्यासाठी सासुरवाडीला आलेल्या जावयाला रस्त्यातच मारहाण करून आणि विष पाजून जीवे मारण्याची फिर्याद पैठण पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणात पत्नीसह सासू-सासरा, मेव्हणा आणि अन्य दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गंगापूर तालुक्यातील वायगाव येथील बद्रीनाथ दौलत मनाळ (वय २२) हा २१ जूनला आपली पत्नी कविताला घेण्यासाठी पैठण तालुक्यातील तुळजापूर येथे आला होता. कविताचे बद्रीनाथबरोबर किरकोळ भांडणामुळे तिच्या घरच्या मंडळींनी तिला पाठविण्यास नकार दिला. पैठण-औरंगाबाद रस्त्यावरील दूध डेअरीजवळ मोटारसायकलवरून जाणाऱ्या बद्रीनाथला काही जणांनी मारहाण केली. सासऱ्याने जावई त्याचा हात धरला आणि मेव्हणा अर्जुनने तोंडात विषारी औषध टाकून जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता.

हप्ता देण्यास नकार; मालमोटारीवर दगडफेक
औरंगाबाद, ४ जुलै/प्रतिनिधी

चिकलठाणा औद्योगिक वसाहतीतून नियमितपणे मालमोटार नेण्यासाठी हप्ता मागणाऱ्यास नकार देताच त्याने दगडफेक करून मोटारीचे नुकसान केले. ही घटना काल दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास प्रिमियम कंपनीच्या गेट क्रमांक २ येथे घडली. मालमोटार चालक रमेश रामराव जाधव यांनी दिलेल्या तक्रारीनुसार फंटय़ा उर्फ ज्ञानेश्वर पाखरे (रा. ब्रीजवाडी) यांनी त्यांची मोटार अडवून ७०० रुपये हप्त्याची मागणी केली. जाधव यांनी त्याकडे दुर्लक्ष केले असता त्याने दगडफेक केली. यात मालमोटीरीचे अडीच हजार रुपयांचे नुकसान झाले. सिडको औद्योगिक वसाहत पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविला आहे.

डॉ. चाकूरकर यांच्या पुस्तकावर आज चर्चासत्र
परभणी, ४ जुलै/वार्ताहर
गणेश वाचनालय व जनशक्ती वाचक चळवळ यांच्यावतीने घेण्यात येणाऱ्या एक पुस्तक एक दिवस या उपक्रमात पैठण येथील डॉ. उर्मिला चाकूरकर यांच्या ‘पलाशपंख’ या कवितासंग्रहावर उद्या (रविवारी) चर्चासत्राचे आयोजन केले आहे. प्रमुख वक्ते वामन देशपांडे (मुंबई) आहेत. कवी केशव खटिंग हेही या पुस्तकावर आपले विचार मांडणार आहेत. गणेश वाचनालयात सायं. ६ वा. हा कार्यक्रम होईल.

शाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त बुधवारी बैठक
लोहा, ४ जुलै/वार्ताहर
शाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त बुधवारी शासकीय विश्रामगृहावर जयंतीच्या कार्यकारिणीसाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. अखिल भारतीय मातंग संघाचे तालुकाध्यक्ष पांडुरंग दाढेल यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या बैठकीस तालुक्यातील मातंग समाजाच्या कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे. यात जयंती सोहळ्यानिमित्त प्रश्नयोजित विविध कार्यक्रमाची रुपरेषा ठरविण्यात येणार आहे. बैठकीस उपस्थित राहण्याचे आवाहन सुरेश दाढेल, किसन दाढेल, ज्ञानू दाभाडे, भारत दाढेल, पप्पू दाढेल मारुती भिसे, प्रकाश दाढेल, ज्ञानेश्वर भिसे यांनी केले आहे.

प्रश्नथमिक शाळा चार महिन्यांपासून बंद
सोयगाव, ४ जुलै/वार्ताहर

तालुक्यातील निमचौकी येथील प्रश्नथमिक शाळा ग्रामस्थ व शिक्षण विभागातील शीतयुद्धामुळे चार महिन्यांपासून बंद आहे. गटविकास अधिकारी प्रकाश दाभाडे व शिक्षण विस्तार अधिकारी रमेश ठाकूर यांनी शाळेचे कुलूप उघडण्यासाठी केलेली शिष्टाईला अपयश आले. पहिली ते चौथीतील २० विद्यार्थी झाडाखाली ऊन, वारा, पावसाचा सामना करीत शिक्षण घेत आहे. शिक्षकाचे सर्व रेकॉर्ड कुलूप बंद असल्याने शिक्षकाला तारेवरची कसरत करावी लागत आहे. सर्वाना शिक्षण मोहिमेचा उदो उदो होत असताना दुर्गम भागातील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित
आहेत.

मुंबईला धरणे आंदोलन
लोहा, ४ जुलै/वार्ताहर

पदवीधर अंशकालीन कर्मचारी संघटनेच्या वतीने मुंबई येथील प्रदेश काँग्रेस मुख्यालयाच्या समोर ७ जूनला धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. तेव्हा जिल्ह्य़ातील अंशकालीन कर्मचाऱ्यांनी मोठय़ा संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संघटक विजय चन्नावार यांनी केले आहे. अंशकालीन कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात मुख्यमंत्र्यांनी यापूर्वी घोषणा केली, पण प्रभावीपणे अंमलबजावणी केली नाही. याच्या निषेधार्थ अंशकालीन कर्मचारी संघटनेच्या प्रदेशाध्यक्षा रेखा अहिरराव यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस प्रदेश मुख्यालय, टिळक भवन, मुंबई येथे ७ जूनला धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.

सभामंडपासाठी पाच लाखांचा निधी
लोहा, ४ जुलै/वार्ताहर

जुन्या लोहा शहरातील महादेव मंदिराच्या सभामंडपासाठी आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या स्थानिक विकास निधीतून पाच लाख रुपयांचा निधी देण्यात आला आहे. जुन्या शहरात प्रश्नचीन हेमाडपंथी महादेव मंदिर आहे. त्या मंदिरासाठी मागील तीन महिन्यांपूर्वी २१ हजार रुपयांची देणगी आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी दिली. त्याच कार्यक्रमात मंदिरालगत सभामंडपाच्या सांस्कृतिक सभागृहासाठी पाच लाख रुपयांचा निधी देण्याची घोषणा आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी केली होती. आचारसंहिता व निवडणूक पार पडल्यानंतर आज पाच लाख रुपयांच्या निधीचे पत्र वीरशैव समाजाचे कार्यकर्त्यांकडे दिले.

लायन्सचा पदग्रहण समारंभ
गंगाखेड, ४ जुलै/वार्ताहर

येथील लायन्स क्लबचे नूतन अध्यक्ष प्रश्न. विठ्ठल घुले, सचिव ज्ञानेश्वर महाजन यांच्यासह पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा रविवारी, ५ जुलैला परभणीचे जिल्हा पोलीस अधीक्षक रघुनाथ खैरे यांच्या उपस्थितीत होत आहे. पूजा मंगल कार्यालयात पार पडणाऱ्या या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी लायन्सचे पदग्रहण अधिकारी के. सी. पारख हे तर प्रमुख पाहुणे म्हणून श्री. खैरे यांच्यासह माजी नगराध्यक्ष डॉ. मधुसूदन केंद्रे, झोन अध्यक्ष डॉ. अनिल कांबळे, कवी राजेसाहेब कदम आदी उपस्थित राहणार असल्याची माहिती संयोजकांनी दिली आहे.

सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या
गंगाखेड, ४ जुलै/वार्ताहर
तालुक्यातील खोकलेवाडी येथील विवाहितेने सासरच्या मंडळींकडून होणारा शारीरिक व मानसिक छळ सहन न झाल्याने विषारी औषध प्रश्नशन करून आत्महत्या केली आहे. या घटनेत पतीसह पाचजणांविरु द्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सारिका ऊर्फ पुष्पा आश्रोबा बिडगर (वय २०)असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. सोपान बाळू बनकर (रा. झरी, ता. पाथरी, जि. परभणी) यांनी याबाबत पिंपळदरी पोलीस फिर्याद दिली आहे. त्यात म्हटले आहे, नवरा आश्रोबा रामा बिडगर, सासरे रामा बाबुराव बिडगर, सासू लक्ष्मी, दीर नामदेव, नणंद मीरा यांनी संगनमत करीत एक वर्षापासून सारिकाचा छळ करीत होते आणि माहेराहून ५० हजार रुपये घेऊन येण्यास सांगत होते. आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंद करण्याच्या आग्रहास्तव त्यांनी प्रेत तब्बल १२ ते १३ तास ताब्यात न घेतल्याने तणावाचे वातावरण होते.

तेजमल बोरा यांना ‘जीवनश्री गौरव’ पुरस्कार जाहीर
लातूर, ४ जुलै/वार्ताहर

रोटरी क्लब मिडटाऊनचा २००९-१० चा जीवनश्री गौरव पुरस्कार चार्टर्ड अकाऊन्टन्ट तेजमल बोरा यांना जाहीर करण्यात आला आहे. चार्टर्ड अकाऊन्टन्ट डेचे औचित्य साधून क्लब सदस्य लिनेश शहा, शशिकांत मोरलावार, दीपक शहा, श्रीकांत पंचाक्षरी, सचिव सतीश कडेल यांनी अभिनंदन केले आहे. ११ जुलैला होणाऱ्या पदग्रहण समारंभात सन्मानपूर्वक त्यांना हा गौरव पुरस्कार यज्ञेश्वर महाराज सेलूकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे.

मोबाईल विक्रेत्यांचा बंद
लातूर, ४ जुलै/वार्ताहर

राज्य सरकारने १ जुलैपासून मोबाईल सेल्युलर हॅण्डसेटच्या व्हॅटमध्ये ४ टक्क्य़ांवरून १२.५ टक्क्य़ांवर केलेल्या वाढीच्या निषेधार्थ लातुरमधील मोबाईल विक्रेत्यांनी गुरुवारी दिवसभर आपली दुकाने बंद ठेवून निषेध नोंदविला. जिल्हा मोबाईल संघटनेच्या एका शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी एकनाथ डवले, विक्रीकर उपायुक्त अनंत श्रीमाळे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. व्हॅटवाढीचा सरकाराने फेरविचार करावा, अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

‘औषधाची माहिती देणे ही विक्रेत्याची जबाबदारी’
लातूर, ४ जुलै/वार्ताहर

रुग्णांना औषधाची योग्य माहिती देणे ही प्रत्येक औषध विक्रेत्याची वैयक्तिक जबाबदारी आहे, असे प्रतिपादन एम. एस. सी.डी.ए.चे सचिव अनिल नावंदर यांनी केले. लातूर तालुका केमिस्ट व ड्रगिस्ट असोसिएशनच्या बैठकीत ते बोलत होते. बैठकीस ईश्वर बाहेती, नागेश स्वामी, दिलीप मुसळे, कोंडिबा चोले, अंकुश काकडे, अतीश बादाडे आदी औषध विक्रेते उपस्थित होते. या प्रसंगी पी.सी.सी.बी. चे प्रशिक्षण पूर्ण करून आलेले परमेश्वर भेंडे, उमाकांत पाटील, ए. एस. शितोळे यांचा गौरव करण्यात आला. लातूर तालुका केमिस्ट अ‍ॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशनच्या वतीने मुद्रित करण्यात आलेले अत्यावश्यक सेवा असलेल्या माहितीचे कॅलेंडरदेखील प्रकाशित करण्यात आले. सूत्रसंचालन राजकुमार राजारूपे यांनी केले. आभार ईश्वर चांडक यांनी मानले. मराठवाडा विभागाचे सचिव अरुण दरकसे, धाराशिव अध्यक्ष विळेगावेप्पा, उपाध्यक्ष बोधकुमार चापसी, सहसचिव रामदास भोसले या वेळी उपस्थित होते.

वाइंडिंग यंत्राचे उद्घाटन
परळी वैजनाथ, ४ जुलै/वार्ताहर

तालुक्यातील टोकवाडी येथील संत जगमित्र सहकारी सूतगिरणीत नव्यानेच खरेदी केलेल्या ८५ लाख रुपयांच्या नवीन ऑटोकोन वाइंडिंग यंत्राचे उद्घाटन सूतगिरणीचे अध्यक्ष पंडितअण्णा मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले. यापूर्वी सूतगिरणीत अशी चार यंत्र होती. या पाचव्या यंत्रामुळे १२०० ते १४०० किलो सुताचे उत्पादन वाढणार आहे. याप्रसंगी सूतगिरणीचे उपाध्यक्ष जीवराज ढाकणे, संचालक वैजनाथ जगतकर, भीमराव सातपुते, जिल्हा बँकेचे संचालक वसंतराव सानप आदी उपस्थित होते. या वेळी कोईमतूर येथील विजयलक्ष्मी कंपनीच्या या ऑटोकोन यंत्राचे अभियंता सुभाषचंद्र यांनी केवळ १० दिवसांत जुळवणी केल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.

विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी प्रयत्न करणे गरजेचे - गिरवलकर
लातूर, ४ जुलै/वार्ताहर

संवाद, संपर्क, नियोजनबद्धता या व अशा माध्यमांतून विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन अ‍ॅड्. सांबप्पा गिरवलकर यांनी केले. महात्मा बसवेश्वर महाविद्यालयात नवनियुक्त प्रश्नचार्य नागोराव कुंभार यांचा पदग्रहण सोहळा नुकताच झाला त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी सचिव अ‍ॅड्. विजयकुमार शेटे, कोषाध्यक्ष महादेव खानापुरे, माजी प्रश्नचार्य टी. एस. कडगे, प्रभारी प्रश्नचार्य गिरजाप्पा मुचाटे आदी उपस्थित होते. प्रश्नचार्य डॉ. कुंभार म्हणाले, उच्च शिक्षणाचा दर्जा सुधारताना सामाजिक न्यायाचे भान ठेवून संवाद आणि समन्वयाद्वारे कार्य करण्याचा प्रश्नमाणिक प्रयत्न करीन. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गिरजाप्पा मुचाटे यांनी केले, तर आभार प्रश्न. डॉ. श्रीकांत गायकवाड यांनी मानले.

दलित-सवर्ण संबंध सुधारण्यासाठी लवकरच धोरण
औरंगाबाद, ४ जुलै/खास प्रतिनिधी
दलित-सवर्ण यांच्यात सामंजस्य वाढावे आणि त्यांच्यातील उच्च-नीचतेची भावना कमी करण्यासाठी लवकरच नवे धोरण आणले जाईल, अशी माहिती गृहराज्यमंत्री नितीन राऊत यांनी शुक्रवारी पत्रपरिषदेत दिली. बीड जिल्ह्य़ातील फुले पिंपळगाव येथे एका सेवानिवृत्त दलित शिक्षकाची हत्या करण्यात आली. नितीन राऊत यांनी फुले पिंपळगाव येथे भेट देऊन औरंगाबाद शहरात मराठवाडय़ातील आठही जिल्ह्य़ांतील पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. शाहू-फुले-डॉ. आंबेडकर यांच्या महाराष्ट्रात अ‍ॅट्रॉसिटीचे गुन्हे वाढत आहेत, ही चिंतनीय बाब असल्याचे ते म्हणाले. जनमानसात सामंजस्य निर्माण करण्यासाठी सर्व उपाययोजना करण्यास शसान कटिबद्ध आहे, असेही ते म्हणाले. मागासवर्गीयांवरील हल्ले रोखण्यासाठी अ‍ॅट्रॉसिटी कायद्यानुसार प्रशासनाने करावयाची कार्यवाही आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना या विषयावर ही बैठक घेण्यात आली.