Leading International Marathi News Daily

रविवार, ५ जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

‘वीकएण्ड’ला पावसाचा ‘ओव्हरटाइम’
मुंबई, ४ जुलै / प्रतिनिधी

 

संपूर्ण जून महिना दडी मारून बसलेला पाऊस आषाढी एकादशीपासून हळूहळू बरसू लागला आणि ‘वीकएण्ड’ला ‘ओव्हरटाइम’ करण्याच्या उद्देशाने आलेल्या पावसाने आज रौद्र रूप धारण करून मुंबईचे जनजीवन अक्षरश: अस्ताव्यस्त करून टाकले. सोसाटय़ाच्या वाऱ्यांसह आज मुंबई आणि उपनगरांना मुसळधार पावसाने झोडपून काढले आणि रेल्वे, बससेवा ठप्प झाल्या. शहर आणि उपनगरातील अनेक सखल भागांत कमरेइतके पाणी साचले आणि मुंबई महापालिका आणि आपत्कालीन यंत्रणेचे परिस्थितीला तोंड देण्यास सज्ज असल्याचे दावे सपशेल फोल ठरले. मुंबईत ठिकठिकाणी सुरू असलेल्या पुलांच्या आणि अन्य मोठय़ा बांधकामांसाठी खोदण्यात आलेल्या रस्त्यांमध्ये पाणी साचले. मुंबईत १२ ठिकाणी वृक्ष कोसळल्याच्या घटना घडल्या, तर गोवंडी येथे विजेचा धक्का लागून एका महिलेचा मृत्यू झाला . वांद्रे टर्मिनस येथे सब-वेची भिंत कोसळून तीन जण जखमी झाले. आज शनिवारचा दिवस असल्याने चाकरमान्यांना पावसाचा मोठा फटका बसला नाही, मात्र साचलेल्या पाण्यातून वाट काढताना घराबाहेर पडलेल्यांची चांगलीच त्रेधातिरपिट उडत होती. साचलेल्या पाण्यातून खेळण्याचा आनंद बच्चेकंपनीने लुटला आणि वडीलधाऱ्या माणसांनी पालिकेला लाखोली वाहिली. पहिल्या पावसानेच मुंबईला २६ जुलैची आठवण करून दिली आणि त्या आठवणींनीच मुंबईकरांच्या अंगावर सरसरून काटा उभा राहिला. आषाढी एकादशीपासून पावसाला हळूहळू सुरुवात झाली आणि आज सकाळपासूनच मुंबई शहर
आणि उपनगरांत पावसाची संततधार सुरू झाली. दुपापर्यंत पावसाचा जोर कमी होता मात्र सायंकाळनंतर पावसाने जोर धरला, काही ठिकाणी वीजही गायब झाली आणि मुंबईकरांच्या हालास पारावार राहिला नाही. पावसाचा धिंगाणा सुरू होताच शहराच्या सखल भागांत पाणी साचू लागले आणि तेव्हाच पुढे सर्व जनजीवन अस्ताव्यस्त होणार याची चाहूल लागली. परळ, हिंदमाता, शिवडी कोर्ट, काळाचौकी, अंधेरी- कुर्ला रोड, मिलन सब-वे, वांद्रे शासकीय वसाहत, गोरेगाव, किंग्ज सर्कल, कांदिवली (प.) आदी नेहमीच्या ठिकाणी पाणी तुंबले. साचलेल्या पाण्यातून वाट काढताना मुंबईकरांचा आणि पर्यायाने घरी त्यांची प्रतीक्षा करणाऱ्यांचा जीव टांगणीला पडला. एकीकडे रस्त्यावरील वाहतुकीचा बोजवारा उडालेला असतानाच मुंबईची जीवनरेखा समजली जाणारी पश्चिम रेल्वे कूर्मगतीने तर मध्य आणि हार्बर रेल्वेसेवा ठप्प झाली. कुर्ला, शीव, भांडुप, नाहूर, भायखळा, चिंचपोकळी, करी रोड, घाटकोपर, चुनाभट्टी, वडाळा येथे लोहमार्गावर पाणी साचले आणि लाखो प्रवासी गाडय़ांमध्येच अडकून पडले. तरीही तीनही मार्गावरील गाडय़ा अर्धा तास उशिराने धावत असल्याचा दावा रेल्वेच्या वतीने करण्यात येत होता.
पावसाचा जोर उत्तरोत्तर वाढत गेला आणि स्थिती हाताबाहेरच जाऊ लागली तेव्हा ठिकठिकाणी
स्थानिकांनी घराबाहेर धाव घेतली आणि मदतकार्य सुरू केले. पालिकेची यंत्रणा सुसज्ज असल्याचा दावा करणाऱ्यांना आणि आपत्कालीन यंत्रणेला नागरिक लाखोली वाहत होते. पालिकेचे काम आम्हाला करावे लागत आहे, याची पालिकेच्या कर्मचाऱ्यांना लाजही वाटत नाही, अशी उत्स्फूर्त प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करीत होते. पावसाबरोबरच आलेल्या सोसाटय़ाच्या वाऱ्याने नागरिकांच्या हालात अधिकच भर टाकली. मुंबई आणि उपनगरांत १२ ठिकाणी वृक्ष उन्मळून पडल्याच्या घटना घडल्या. वांद्रे टर्मिनस येथे सब-वेची भिंत कोसळून रेल्वेचे दोन कर्मचारी एक प्रवासी महिला जखमी झाली. त्यांना तातडीने रुग्णालयात
हलविण्यात आले आहे. गोवंडी येथे विजेच्या धक्क्याने एक महिला मृत्युमुखी पडली तर लहान मुलगा जखमी झाला. आतापर्यंत मिठी नदीच्या पातळीतही वाढ होऊ लागली होती. रात्री उशिराचे वृत्त हाती आले तेव्हा मिठी नदीच्या पाण्याची पातळी २.४ मीटर इतकी होती. धोक्याची पातळी २.७ मीटर इतकी असून पावसाचा जोर पाहता यंदाही तेथील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यावाचून गत्यंतर राहणार नाही, असे सांगण्यात येत होते. मुंबईसह उपनगरांमध्ये पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला असल्याने पालिकेने नागरिकांना घरातून बाहेर न पडण्याचा इशारा दिला आहे. लाइफ जॅकेट, बोटी तयार ठेवण्यात आल्या असून अग्निशमन दल आणि आपत्कालीन यंत्रणेला अत्यंत सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे, असे सांगण्यात येत होते. पावसाचा जोर वाढला तरी स्थिती हाताबाहेर जाणार नाही, असा दावा आपत्कालीन यंत्रणेचे अधिकारी करीत असले तरी जनतेचा रोष पाहता यंत्रणेचे अधिकारी अधिक बोलण्यापेक्षा कानावर हात ठेवणेच पसंद करीत होते.