Leading International Marathi News Daily

रविवार, ५ जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

मृत्यूच्या तांडवातून वाचलेल्या बाहियाची चित्तरकथा

 

जेव्हा मदतपथकाने १४ वर्षांच्या बाहियाला पाहिलं, तेव्हा ती खवळलेल्या हिंदी महासागरात कोसळलेल्या विमानाच्या अवशेषांवर कशीबशी तोल सावरत उभी होती.. तिच्या भोवताली प्रेतांचा खच तरंगत होता.. मंगळवारी कोमोरोस बेटानजीक कोसळलेल्या येमेनिया विमान अपघातात तब्बल १५२ प्रवासी मरण पावले, पण या भीषण अपघातात वाचलेली एकुलती एक व्यक्ती ठरली आहे बाहिया बकारी. मदतपथकाने वाचवलेल्या बाहियाला बुधवारी संध्याकाळी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. एखादं फ्रॅक्चर, शरीरावर ठिकठिकाणी उठलेले ओरखडे नि जखमा झालेली बाहिया ही तिच्यासोबत प्रवास करणाऱ्या आईबद्दल सारखी चौकशी करत असते. तेव्हा तिची आई शेजारच्या खोलीत असल्याचे तिला सांगितले जाते. मृत्यूच्या तांडवातून बाहेर पडलेली बाहियाची कथा हा एक दैवी चमत्कार म्हणावा लागेल. तिचं बचावणं हे तिच्या जिद्दीची चित्तरकथाच ठरली आहे.
‘..विमानामधल्या सेवकांनी आम्हांला आमचा सीटबेल्ट बांधायला सांगितला आणि त्यानंतर मदतनौका येईपर्यंत पाण्यात तासन्तासकाढले..’ इतकंच काय ते याक्षणी बाहियाला आठवतं, असे तिचे काका जोसेफ युसूफ यांनी कोमोरोसची राजधानी असलेल्या मोरोमीशहरातील अल मरूफ हॉस्पिटलमधून एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.
बाहिया ही पॅरिसच्या दक्षिणेकडील कॉर्बेल - इस्सोन्न्स या उपनगरात राहते. या अपघातात ती वाचली असली तरी तिच्यासोबत प्रवास करणारी तिची आई तसेच दोन, आठ आणि दहा वर्षांची तिची तीन लहान भावंडं मात्र मृत्यूमुखी पडल्याचं तिला कसं सांगावं, या विवंचनेत तिचे वडील कासिम बकारी आहेत.
बाहिया ही एक बुजरी मुलगी असून तिला सफाईने पोहताही येत नाही. मात्र पाण्यात तरंगणाऱ्या विमानाच्या अवशेषावर ती चढू शकली आणि मदतपथक पोचेपर्यंत तिने तासन्तास धीर धरला होता. ‘काय झालं हे मला मागीत नाही. मी पाण्यात पडले होते. माझ्या भोवताली माणसांचा आवाज येत होता, पण चोहोबाजूला काळोख होता, त्यामुळे काहीच दिसत नव्हते.’, असे बाहिया सांगते.
तिने मदतीसाठी आलेली नौका पाहिली आणि ती त्यांना वाचविण्यासाठी इशारा करू शकली. तिला ज्या मदतनौकेने वाचवले, त्यावरील सरजट सईद अब्दिलाई यांनी ‘युरोप वन रेडिओ’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की, जेव्हा मदतपथकाने तिला वाचविण्यासाठी लाइफरिंग तिच्या दिशेने फेकली, तेव्हा ती रिंग पकडण्याइतपत शक्तीही बाहियाकडे शिल्लक राहिली नव्हती. त्यामुळे मदत अधिकाऱ्याने तिच्या दिशेने पाण्यात उडी घेतली आणि तिला वाचवले. ती नेमकी किती वेळ पाण्यात उभी होती, याबाबत थोडा संभ्रम निर्माण झाला आहे. तिचे काका पाच तास सांगत असून फ्रान्सचे आंतरराष्ट्रीय सहकार्य मंत्री अलैन जोयान्देत यांनी साडेतेरा तास ती पाण्यात तग धरून उभी होती, असे ‘दि असोसिएटेड प्रेस’ने नमूद केले आहे.
अपघातग्रस्त ए ३१०-३०० या विमानाची चाके १९ वर्षे जुनी असून २००७पासून त्यांच्या वापरावर फ्रान्समध्ये बंदी लागू असल्याचे फ्रेंच वाहतूकमंत्री डॉमिनिक बस्सेरो यांनी स्पष्ट केले आहे. मात्र येमेनिया अधिकाऱ्यांनी विमानात किरकोळ त्रुटी असून त्या सुधारण्यात आल्या होत्या आणि हा अपघात वादळी हवामानामुळे घडला असून तांत्रिक दोषामुळे घडला नाही, असा खुलासा केला आहे. याआधी २ मे रोजी हे विमान आकाशात झेपावले होते, अशी पुस्तीही त्यांनी जोडली. सौजन्य - ‘न्यूयॉर्क टाइम्स’