Leading International Marathi News Daily

रविवार, ५ जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

भारत राखीव बटालियनच्या कार्यक्रमात आमदारांना डावलले
औरंगाबाद, ४ जुलै/खास प्रतिनिधी

राज्य राखीव पोलीस बल गट क्र. १४ (भारत राखीव बटालियन) याच्या नूतन वास्तुचे हस्तांतरण

 

आणि उद्घाटन समारंभाला औरंगाबाद शहरातील तीन आमदारांना डावलण्यात आले आहे. खासदार व आमदारांची नावे आहेत, मात्र आमदार डॉ. कल्याण काळे, आमदार किशनचंद तनवाणी, आमदार एम. एम. शेख, आमदार विक्रम काळे, आमदार सतीश चव्हाण या पाचही आमदारांना या उद्घाटन समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून बोलाविण्यात आले नाही. या समारंभाला लोकप्रतिनिधींना डावलून अधिकाऱ्यांचीच नावे निमंत्रण पत्रिकेमध्ये आहेत. लोकप्रतिनिधींनी याचा जोरदार शब्दांत निषेध व्यक्त केला आहे.
भारत राखीव बटालियनच्या नूतन वास्तुचे हस्तांतरण व उद्घाटन समारंभ रविवारी राज्याचे गृहमंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते सकाळी ८.३० वाजता होत आहे. अध्यक्षस्थानी शालेय शिक्षणमंत्री व संपर्कमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे राहणार आहेत. या समारंभाला गृहराज्यमंत्री महंमद आरिफ नसीम खान, गृहनिर्माण राज्यमंत्री अ‍ॅड. प्रीतमकुमार शेगावकर, खासदार चंद्रकांत खैरे, पोलीस महासंचालक एस. एस. विर्क, आमदार राजेंद्र दर्डा यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. यांच्याशिवाय निमंत्रण पत्रिकेमध्ये पोलीस महासंचालक (गृहनिर्माण व कल्याण) हसन गफूर, अप्पर पोलीस महासंचालक अजित पारसनीस, गृहखात्याचे प्रधान सचिव पी. के. जैन, विशेष पोलीस महानिरीक्षक प्रभात रंजन, विभागीय आयुक्त भास्कर मुंडे, पोलीस आयुक्त के. एल. बिष्णोई, पोलीस बलाचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुरेंद्र एन. पांडेय, जिल्हाधिकारी संजीव जयस्वाल आणि राज्य पोलीस गृहनिर्माण कल्याण महामंडळाचे सरव्यवस्थापक टी. एस. भाल या अधिकाऱ्यांचीच नावे प्रमुख उपस्थितीत आहेत. या समारंभाला औरंगाबाद शहरातील पाच आमदारांना का वगळण्यात आले, याचे उत्तर देण्यास एकही अधिकारी पुढे धजावला नाही.
‘हा औरंगाबाद शहराचा कार्यक्रम आहे. औरंगाबाद स्थानिक स्वराज्य संस्थेतून मी निवडून आलेलो आहे. अन्य लोकप्रतिनिधींची नावे या कार्यक्रमाच्या प्रमुख उपस्थितीत आहे. निमंत्रण पत्रिकेमध्ये अधिकाऱ्यांच्याच नावांची गर्दी आहे. मग मलाच का डावलले’ अशी प्रतिक्रिया आमदार किशनचंद तनवाणी यांनी व्यक्त केली. पदवीधर मतदार संघाचे आमदार सतीश चव्हाण यांनीही याचा निषेध केला आहे. हा प्रश्न मी विधिमंडळात मांडणार आहे. विधिमंडळातील विषय समितीचा मी एक सदस्य आहे. या समितीपुढे या उद्घाटन कार्यक्रमात लोकप्रतिनिधींना का डावलले आणि अधिकाऱ्यांचीच नावे निमंत्रण पत्रिकेत का आली, असा सवालही आमदार सतीश चव्हाण यांनी केला. ल्ल
१९४ एकरांवर विसावलेले भारत राखीव बटालियन!
सातारा परिसरातील १९४ एकर एवढय़ा विस्तीर्ण जागेवर तीन टप्प्यांत उभे राहणाऱ्या भारत राखीव बटालियनच्या वास्तूचे उद्घाटन उद्या (रविवारी) होत आहे.
अत्यंत सुसज्ज व अत्याधुनिक अशा या बटालियनच्या जागेत जवानांना कमांडो प्रशिक्षणसुद्धा दिले जाऊ शकते. राज्यात प्रथमच अशा प्रकारचे बटालियन सुरू होत आहे. पहिल्या टप्प्यात कमांडंट कार्यालय, कंपनीचे कार्यालय, क्वार्टर गार्ड, मुलांचे वसतिगृह, त्यांच्यासाठी भोजनालय, परेडचे मैदान, बरॅक अशा गोष्टी १२ हजार चौरस मीटरवर उभारण्यात आले आहे. जवानांसाठी या ठिकाणी ३०७ निवासी गाळे तयार आहेत. अखेरच्या टप्प्यात फायरिंग रेंजचे काम शक्य आहे. तब्बल १४ कोटी रुपये खर्चून या इमारतीची उभारणी झाली आहे. भारत राखीव बटालियनच्या सात कंपन्या या ठिकाणी राहतील.
सात बटालियनचे अधिकारी-कर्मचारी व त्यांना दिली जाणारी सर्व सुविधा येथे आहे. पोलीस अधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती या ठिकाणी असेल. सहायक समादेशक, पोलीस उपअधीक्षक, पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षक अशा दर्जाचे अधिकारी व कर्मचारी येथे नियुक्त असतील.जवळपास वर्षभरात तयार झालेल्या या भारत राखीव बटालियनमध्ये पोलसी मोटार गॅरेज, तीन लाख लिटर क्षमतेचा भूमिगत जलकुंभ, पावणेदोन लाख लिटर क्षमतेचा उंच जलकुंभ आदींची उभारणी झाली आहे. एका बरॅकमध्ये ६४ जवान असे १२९ जवानांच्या राहण्याची व्यवस्था येथे झाली आहे.