Leading International Marathi News Daily

रविवार, ५ जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

विनयभंग प्रकरणातील आरोपींची जामिनावर सुटका
हिंगोली, ४ जुलै/वार्ताहर

हिंगोली जिल्हा परिषदेतील उपमुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी गिरी व हिंगोली पंचायत

 

समितीतील वरिष्ठ सहायक शेख जावेद यांच्याविरुद्ध दाखल झालेल्या विनयभंग प्रकरणात दोन्ही आरोपींची जामिनावर सुटका झाली.
हिंगोली तालुक्यातील खंडाळा प्रशाळेवर प्रतिनियुक्तीवर परिचरपदी कार्यरत असलेल्या महिलेने शिवाजी गिरी व शेख जावेद यांच्याविरुद्ध दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाला होता. याप्रकरणाने जिल्हा परिषदेत एकच खळबळ उडाली. सर्व कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषद कार्यालयासमोर शुक्रवारी धरणे आंदोलन करून दोन तास काम बंद ठेवून मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना लेखी निवेदन दिल्याने प्रकरण चांगलेच गाजले.
आरोपींचे वकील अ‍ॅड्. मनीष साकळे यांनी न्यायालयामार्फत एफआयआरची नक्कल मागविली. आरोपी गिरी व शे. जावेद हे वकिलामार्फत न्यायालयात हजर झाले असता येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी रुपेश राठी यांच्या न्यायालयात सुनावणी होऊन त्यांनी दोन्ही आरोपींचा जामीन मंजूर केल्याने त्यांची जामिनावर सुटका झाली आहे.