Leading International Marathi News Daily

रविवार, ५ जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

नक्कल मिळवण्यासाठी वृध्द शेतक ऱ्याची तीन वर्षे वणवण
वसमत, ४ जुलै/वार्ताहर

तालुक्यातील पळसगाव येथील एक ७१ वर्षीय वृद्ध शेतकरी शेतवारची नक्कल मिळण्यासाठी

 

गेल्या तीन वर्षापासून सरकारी कार्यालयाचे उंबरठे झिजवीत आहे. माहितीच्या अधिकाराखाली माहिती आयुक्तांच्यापर्यंत नक्कलची मागणी केली. तरीही त्यांना उत्तर मिळाले नाही. उतार वयात या शेतक ऱ्यास सरकारी अधिकारी कसे सतावित आहेत याचे हे उदाहरण आहे, आता दाद कोणाकडे मागावी, असा प्रश्न या वृद्ध इसमास पडला आहे.
तालुक्यातील मौजे पळसगाव, (ता. माळवटा ) येथील शेतवारची नक्कल सव्‍‌र्हे नं. ५ व ६ मिळविण्यासाठी तुकाराम जळबाजी मिरकुटे (रा. पळसगाव) हे गेल्या तीन वर्षापासून संबंधित कार्यालयात हेलपाटे मारत आहेत. त्यांनी शेतवारची नक्कल मिळण्यासाठी प्रथम साधा अर्ज तहसील कार्यालयात ९ डिसेंबर २००६ रोजी दिला होता. पण याबाबत तहसील कार्यालयाकडून शेतवारची नक्कल उपलब्ध नसल्याचे सांगितले. त्यानंतर मिरकुटे यांनी लोकशाही दिनी जिल्हाधिकारी हिंगोली यांना निवेदन देऊन संबंधित तहसील कार्यालयाकडून विनाकारण त्रास दिला जात असल्याचे नमूद केले. याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाने संबंधित व्यक्तीस नक्काल देण्याचे आदेश दिले. पण तहसील कार्यालयाने जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला न जुमानता याबाबत उत्तर दिले नाही. तहसील कार्यालयाकडून उत्तर न मिळाल्याने त्यांनी माहिती अधिकाराखाली पळसगाव येथील सव्‍‌र्हे क्र. पाच व सहाची नक्कल मिळण्यासाठी ८ फेब्रुवारी २००८ रोजी अर्ज दाखल केला. किमान एक महिन्यांत या अर्जाचे उत्तर तहसील कार्यालयाने घ्यायला हवे होते, पण त्यांनी तब्बल चार महिन्यांनंतर याचे उत्तर दिले, ते पण थातूरमातूर. त्यामुळे मिरकुटे यांनी येथील उपविभागीय अधिकारी यांच्याकडे पुन्हा माहितीच्या अधिकाराखाली ४ जुलै २००८ रोजी अपील केले. याचे उत्तर उपविभागीय अधिकारी यांनी दिले. तसेच संबंधित तहसील कार्यालय व तालुका भूमी अभिलेख यांच्यावर ताशेरे ओढले.
त्यानंतरही मिरकुटे यांना न्याय न मिळाल्याने त्यांनी राज्य माहिती आयुक्त (औरंगाबाद) येथे माहितीच्या अधिकाराखाली १५ ऑगस्ट २००८ चा अपील अर्ज १७ ऑगस्ट २००८ रोजी दाखल केला. यामध्ये त्यांनी भूमी अभिलेख कार्यालयाकडे रेकॉर्ड कधी जमा केला याबाबत उल्लेख नाही व मागितलेली माहिती अभिलेख कक्षात उपलब्ध नसल्यामुळे तालुका भूमी अभिलेख वसमत यांच्याकडे जमा केला याचा प्रश्न उद्भवत नसल्यामुळे संबंधित कार्यालयाकडून माहिती देण्यात आली नाही तर अर्ज निकाली काढावा, असे नमूद केले आहे.
पण आयुक्त कार्यालयाकडे अर्ज करून आज अकरा महिने होत आहे. पण या कार्यालयाकडून संबंधित मिरकुटे यांना उत्तर मिळाले नाही. प्रथम तहसील कार्यालयाने चार महिने माहिती देण्यास विलंब लावला. आता आयुक्त कार्यालयाकडून अकरा महिन्यांनंतरही अर्जाचे उत्तर नाही. ‘छोटे मियाँ तो छोटे मियाँ, बडे मियाँ सुभान अल्ला’ अशी परिस्थिती पाहावयास मिळत आहे. एक शेतवार सव्‍‌र्हेची नक्कल मिळविण्यासाठी तुकाराम जळबाजी मिरकुटे यांना तीन वर्षापासून शासकीय कार्यालयाचे उंबरठे झिजवूनही त्यांच्या पदरात अजून काही नाही. जर शेतवार सव्‍‌र्हे पाच व सहाची नक्कल संबंधित कार्यालयात उपलब्ध नाही असे सांगत आहेत. मग याची नक्कल कुठे आहे व कोणत्या कार्यालयात मिळेल, असा प्रश्न या ७१ वर्षीय वृद्ध इसमास पडला आहे.